- भरत यादव
पश्चिम बंगाल राज्यातील अयोध्या टेकड्यांच्या कुशीत वसलेल्या पुरुलियाजवळील जिलिंग सेरेन या दुर्गम गावात पोहोचणे कधीकाळी अतिशय कठीण होते.डोंगर-दर्या आणि जंगलांनी वेढलेल्या या नयनरम्य गावात प्रामुख्याने संथाल आदिवासी समाज राहतो.
अयोध्या टेकड्या एक आकर्षक पर्यटन स्थळ म्हणून विकसित झाल्या असल्या तरी, त्यांच्या आसपासच्या अनेक छोट्या वस्त्या विकासापासून वंचित आहेत आणि जिलिंग सेरेन ही त्यापैकी एक आहे,जी टेकडीच्या शिखरापासून 25 किमी अंतरावर आहे.या गावाचे नाव फारसे कुणाला माहीत नसले तरी, या गावातील एक साधी महिला तिच्या शिक्षणक्षेत्रातील आगळ्यावेगळ्या प्रयोगांमुळे आता देशभरात चर्चेत आहे.
ती आली, तिनं पाहिलं अन्…?
2020 मध्ये मालती मुर्मू या नवविवाहितेचा या गावात प्रवेश झाला. उच्च माध्यमिक परिक्षा उत्तीर्ण मालतीने सासरी येताच गावातील मुलांच्या शिक्षणाची दयनीय स्थिती पाहिली. तेव्हाच याबाबत काहीतरी करण्याचा निर्धार तिने केला.पतीच्या मदतीने प्रारंभी एका झोपडीत मुलांना शिकवण्यास सुरुवात केली.
आता पाच वर्षे उलटून गेली आहेत, आणि ती आता लाल टिनाच्या छताखालील एका मातीच्या खोलीत शिकवते. दोन मुलांची आई असलेली मालती सकाळी पूर्णवेळ शिक्षिका बनते,आणि हे सर्व ती कुठल्याही प्रकारचा आर्थिक मोबदला न घेता करते.
मालती आपल्या छोट्याशा गावातील पहिली ते चौथी इयत्तेपर्यंत मुलांना संथाली भाषेत शिकवते. मायबोलीतील शिक्षणामुळे मुलांमध्येही अभ्यासाची गोडी वाढली आहे. आता ते स्वतःहून शिकण्यासाठी उत्सुक असतात. गावातील एक महिला सुमिता मांडी सांगतात, “माझी मुले येथेच शिकतात. मालती त्यांना त्यांच्या भाषेत विषय समजावून सांगते.मालती प्रामुख्याने ओलचिकी लिपीत संथाली भाषेत शिकवते.
गावात आल्यानंतर मालतीला प्रथम काय वाटले? या प्रश्नावर मालती म्हणते, “लग्नानंतर इथे आले तेव्हा मुलांना शिक्षणामध्ये कच्चे असल्याचे पाहिले. मी माझ्या पतीला म्हणाले, त्यांना शिकवता आले तर? त्यांचा मला तात्काळ पाठिंबा मिळाला. मग सुरुवातीला 2020 मध्ये झोपडी बांधून शिकवायला सुरुवात केली. नंतर गावकऱ्यांच्या मदतीने पक्की वर्गखोली बांधली. आता विद्यार्थ्यांची संख्या 45 हून अधिक आहे.
|
|
पतीच्या मदतीने झोपडीतून सुरू झाला शिक्षण प्रवास
या गावात अनेक वर्षांपासून औपचारिक शिक्षणाचा अभाव आहे. ही कमतरता दूर करण्यासाठी मालतीने आपल्या घरी विनामूल्य शिक्षण केंद्र सुरू केले. गावात जवळच एक प्राथमिक शाळा आहे, जिथे प्रामुख्याने पहिल्या पिढीचे विद्यार्थी जंगलातील पायवाटेने जायचे. मात्र, विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांना शिक्षणात फारसा रस नव्हता.
2020 मध्ये कोविडमुळे शाळा बंद झाली, तेव्हा ऑनलाइन वर्ग ही संकल्पना या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी हास्यास्पद वाटत होती. जे लोक लाकूड गोळा करून आणि मोलमजुरी करून आपली उपजीविका करत होते, त्यांच्याकडे आता स्मार्टफोन होते. स्वाभाविकच, शाळा बंद झाल्याने विद्यार्थ्यांनी अभ्यास करणे थांबवले. मालतीला वाटले की, हा त्यांच्यासाठी कठीण काळ आहे.
एकदा का मुलांची अभ्यासाची सवय मोडली की, त्यांना पुन्हा शाळेत आणणे कठीण आहे. बारावी उत्तीर्ण झालेल्या मालतीला शिक्षणाचे महत्त्व समजले आणि तिने शिकवणीवर्ग सुरू केले. मालतीची शिकवण्याची अनोखी पद्धत गावातील अनेक मुलांना आकर्षित करत आहे.
मालती म्हणाली की, सुरुवातीला प्रतिसाद फारसा नव्हता, कारण गावकऱ्यांना अशक्य वाटत होते की ती इतक्या मुलांना कसे शिकवू शकेन? आपल्या निश्चयावर ठाम राहून, मालतीने दोन आघाड्यांवर लढाई सुरू केली, एक घरी आणि दुसरी गावकऱ्यांशी. त्यानंतर तिने गावकऱ्यांना समजावण्यासाठी घरोघरी जाणे सुरू केले, तसेच आपल्या कुटुंबीयांचेही मन वळवले.
तिचा ठाम निग्रह पाहून तिचा पती बंका मुर्मू देखील पुढे आला. हळूहळू गावकऱ्यांना तिचा उद्देश नीटपणे समजला आणि त्यांनी आपली मुले तिच्या वर्गात पाठवायला सुरुवात केली.
”मालतीच्या शाळेत डोकावून पाहिल्यास, ती पांढऱ्या बोर्डवर मार्करने संथाली या आदिवासी भाषेची लिपी शिकवताना दिसते. सोबतच ती आपल्या विद्यार्थ्यांना बंगाली आणि इंग्रजीचेही धडे गिरवण्यास देते.पुढील काळात तिचा उद्देश आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शिक्षण देण्याचा आहे.गावात सरकारी प्राथमिक शाळा असूनही,अनेक पालक आपल्या मुलांना जाणीवपूर्वक मालतीच्या शाळेत पाठवतात.
पर्वतीय भागातील आदिवासी गावात शिक्षणाचा प्रकाश पसरवणारी मालती मुर्मू
गावकरी सुधीर मुर्मू सांगतात, ‘गावातल्या सरकारी शाळेत मुलांना पोषण आहार मिळतो, पण मालतीची, ( गावातले लोक तिला प्रेमाने दिदीमोनी म्हणतात ) शिकवण्याची पद्धत वेगळी आणि हवीहवीशी आहे.म्हणूनच बहुतेक गावकरी आपल्या मुलांना इथेच शिकायला पाठवतात.’
मालतीची शाळा सकाळी सात वाजता भरते. ती मुलांना सामान्य ज्ञान, विज्ञान शिकवते आणि त्यांच्या बुद्धिमत्तावाढीच्या गोष्टींवर विशेष भर देते.तिचा उद्देश असतो की गावातली आदिवासी मुले अभ्यासाच्याबाबतीत शहरातील विद्यार्थ्यांपेक्षा मागे राहू नयेत.तिच्याकडे शिकणारे चौथीतील विद्यार्थी बसंती मुर्मू आणि अजय हेमब्राम आता इंग्रजीत तरबेज झाले आहेत.
त्यांना संगणक शिकण्याचीही इच्छा आहे.मालतीच्या या उपक्रमाला तिचा पती बांका मुर्मू याचे संपूर्ण पाठबळ आहे.तो घरची जबाबदारी सांभाळून पत्नीला गावातील मुलांना शिकवण्यासाठी वेळ उपलब्ध करुन देतो.पण त्याला एक खंत आहे,गावकऱ्यांनी शाळेसाठी खोली बांधली असली, तरी तिथे अद्याप आधुनिक शिक्षणासाठी लागणार्या विविध साहित्याचा अभाव आहे.संगणक आणि इतर साधने उपलब्ध झाली तर हा उपक्रम अधिकाधिक यशस्वी होईल,असे त्याला वाटते.
शिक्षणाबरोबर आदिवासींची अंधश्रद्धा दूर करते मालती…
केवळ अभ्यासक्रमातील विषयच नव्हे, तर मालती इतर विविध विषयही शिकवते. ती विद्यार्थ्यांमधील अंधश्रद्धा दूर करून त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचा प्रयत्न करते. ती जणू आपल्या विद्यार्थ्यांना अंधारातून प्रकाशाकडे घेऊन निघाली आहे.
दोन मुलांची आई असलेली मालती अनेकदा तिच्या दोन महिन्यांच्या मुलासह शिकवताना दिसते. तिच्या या समर्पणाचा बंकाला खूप अभिमान वाटतो. तो म्हणतो, "तिची जीवनकथा खूप कठीण आहे. मी 2020 मध्ये मालतीशी लग्न करून तिला गावात आणले तेव्हा येथील शिक्षणाची स्थिती खूपच वाईट होती. शिक्षणच नसेल तर पुढची पिढी कशी पुढे जाईल? असा प्रश्न पडायचा. झालदा येथून 18 किलोमीटर वर आहे. बाघमुंडी, जिथे हायस्कूल आहे, ते 25 किलोमीटर अंतरावर आहे. शिकण्यासाठी मुलांना इतक्या लांब जाणे जवळजवळ अशक्य आहे," असे तो म्हणाला.
"जवळच प्राथमिक शाळा असली तरी तिथल्या शिक्षणाचा दर्जा चांगला नाही, कारण तिथे येणारे शिक्षक शिफ्टमध्ये येतात. कोविड-19 च्या काळात विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले, जेव्हा ती शाळा लॉकडाऊनमुळे बंद होती. म्हणून माझ्या पत्नीने वंचित मुलांना शिकवायला सुरुवात केली.
गावकऱ्यांच्या मदतीने शाळेची भिंत बांधली गेली. मीही शक्य तितकी मदत करत आहे. सुरुवातीला अनेक स्वयंसेवी संस्थांनी मदत केली. पण त्या सर्व हळूहळू निघून गेल्या. जर सर्वांनी मालतीला मदत केली आणि यासाठी सरकार पुढे आले, तर मालती आणखी चांगले काम करू शकेल," असे बंका म्हणतो.
गावकरी मिनती सोरेन आणि सुनिता मंडीरा म्हणाल्या, "गावात प्राथमिक शाळा आहे, जी लॉकडाऊनच्या काळात बंद होती. संपूर्ण गावातील मुलांनी अभ्यास करणे थांबवले. तेव्हाच मालती पुढे आली. शिक्षित असल्याने, मालती गावातील मुलांसाठी आणि किशोरवयीन मुलांसाठी शिक्षणाची मशाल बनली आहे. आम्ही सर्वजण तिच्या पाठीशी आहोत.
मालती एका साध्या वर्गात शिकवते.बंकाच्या खेद व्यक्त करण्यावरून, आसनसोलमधील प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर कुंडू यांनी जिलिंग सेरेनला भेट देऊन मालतीच्या पाठीशी उभे राहण्याचे वचन दिले आहे.ते सांगतात, "मी अयोध्या टेकड्या, आसनसोल, जयचंद्री आणि इतर दुर्गम भागात 'बोइटोई-होईचोई' शाळा चालवतो. मालती मुर्मूने तिला पाठबळ देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे माझी तिच्याशी भेट झाली,’ असे ते म्हणाले.
‘जगभरातली शिक्षणप्रणाली सध्या वेगाने प्रगत होत आहे. आता स्मार्ट वर्गखोल्या बनवल्या जात आहेत. मग गावातील आणि आदिवासी पाड्यांवरील मुलांना हे शिक्षण का मिळू नये? म्हणून, मालती जे सामान्य शिक्षण केंद्र चालवत आहे, त्यात आणखी सुधारणा करुन मी तिच्या प्रयत्नांना स्मार्ट शिक्षणाने कसे पुढे नेता येऊ शकेल हे पाहणार आहे,’ असे चंद्रशेखर सांगतात.
मर्यादित साधनांमध्ये सुरु असलेली मालतीची अध्यापनातली ही जादू गावकर्यांना प्रभावीत करीत आहे.पश्चिम बंगालमधील दुर्लक्षित जंगली इलाख्यात वसलेल्या या आदिवासी गावातील मालतीच्या सदर उपक्रमाने पुरुलियातील ‘सिधो कान्हो बिरसा विद्यापीठा’तील संथाली भाषा विभागाचे प्राध्यापक आणि शिक्षणतज्ज्ञ श्रीपती टुडू खूपच प्रभावित झाले आहेत. ते सांगतात, “मालती मुर्मुचे शिक्षणक्षेत्रातील हे उल्लेखनीय काम केवळ आदिवासी समाजासाठीच नव्हे,तर संपूर्ण देशासाठी एक आदर्श उदाहरण ठरणार आहे.अशा प्रकारे जर ग्रामीण भागातील महिला शिक्षण प्रसारासाठी पुढे आल्या, तर आपल्या देशातील शिक्षणाचे प्रमाण झपाट्याने वाढेल, यात मुळीच शंका वाटत नाही.’






