(अप्सरा आगा, खेड)
‘’प्रत्येक बाईनं फक्त दोन हंडेच पाणी भरायचं…जर का तिसरा हंडा भरला तर 100 रुपये दंड लागलाच म्हणून समजा… कुटूंब कितीही मोठं असू द्या, एका घरासाठी फक्त दोन हंडे पाणी…’’
परसूल ग्रामपंचायतीच्या हद्दीत ज्या एकमेव विहिरीला पाणी आहे त्याच विहिरीभोवती पाण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या महिलांना ग्रामपंचायतीचे सदस्य ‘फक्त दोन हंडेच पाणी’ ओरडून ओरडून सांगत होते…
ऐकायला जरी हे नवल वाटत असलं तरी पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील परसूल आणि खरपूड या गावांमध्ये अक्षरश: हेच पाणीबाणी’चे चित्र पाहायला मिळतं. पोटाला पिळा पडेल ऐवढ्या खोल विहिरीतून पाणी बाहेर ओढायचं, त्यातच दोनच हंडे पाणी घ्यायचं अन् तिसऱ्या हंडा घेणाऱ्या महिलेला 100 रुपये दंड, असा नियम परसूल ग्रामपंचायतीनं लागू केलाय. पाणी टंचाईमुळं पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी ग्रामपंचायतीनं दंड सुरु केलाय. खेड तालुक्यातील डोंगरावर हे गाव असून, इथं पिण्याच्या पाण्यासाठी एकच विहीर आहे. त्यामुळं गावातील लोकांना पाण्याचं नियोजन करावं लागतं.
एका कुटुंबासाठी फक्त दोन हंडे, तिसरा हंडा घेतला तर 100 रु. दंड
खेड तालुक्यातील परसूल आणि खरपूड ही दोन गावं पुणे जिल्ह्यातील पश्चिम भागात आहेत. भौतिक सुविधांपासून खूप लांब असणारी आणि आदिवासी वाड्या असणारी गावं तालुक्याच्या शेवटच्या ठिकाणी आहेत. गावात पोहचण्यासाठी आवश्यक त्या दळणवळणाच्या सुविधा नाहीत. तालुक्यातील ही गावं डोंगराळ भागात असल्यामुळे पावसाळ्यात पडणारं पावसाच पाणी थेट वाहून धरणात जातं. परसूल आणि खरपूड ही गावं डोंगराच्या उताराच्या ठिकाणी वसल्यामुळे या गावांना दरवर्षी पाणी टंचाईचा सामना करावा लागतो.
महिलांना कित्येक मैलभर पायपीट करून पिण्याच्या पाण्यासाठी धोका पत्करावा लागतो. मागील पाच ते सहा वर्षांपासून गावातील महिलांनी एकत्र येऊन असं ठरवलं की, उपलब्ध विहिरीतून प्रत्येकीने फक्त दोन हंडेच पिण्याचे पाणी भरावे. येथील महिलांनी अलिखित नियमच केला आहे. कारण टंचाईच्या काळात पिण्याचं पाणी हे गावातील सर्व लोकांना समान पद्धतीने मिळालं पाहिजे हीच त्यांची भूमिका आहे.
संबंधित लेख वाचा: 1) महाराष्ट्राची पाण्याची वेदना भविष्याला छळणारी… |
पुणे जिल्ह्यात अनेक धरणे असली तरी, मार्च महिन्यातच परसूल ग्रामपंचायतमध्ये पाण्यासाठी गावकऱ्यांना अनेक संकटांना तोंड द्यावं लागतं. महिलांना तर लांब- लांब जाऊन पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. त्यातही पिण्याच्या पाण्याचे दोनच हंडे पाणी घ्यायचं नाहीतर तिसऱ्या हंड्यासाठी महिलांना दंड द्यावा लागणार आहे.
गावात वचक बसावा व पाण्यावर नियंत्रण राहावं म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय. गावातील सर्वांना पाणी मिळावं हे धोरण आहे. गावातील तरुण नोकरीसाठी बाहेरगावी गेले आहेत. त्यांच्या वयस्कर आई-वडिलांना आणि इतर सर्वांना पाणी मिळावं म्हणून असा निर्णय घेण्यात आलाय," अशी माहिती गावकरी शांताराम शिंदे यांनी दिली.
30-35 फूट खाली विहिरीच्या तळातून पाणी खेावं लागतं…
परसूलमधील खोपेवाडी हा एकूण 360 लोकवस्ती असलेला आदिवासी पाडाआहे. इथे पावसाळ्यात भात पिकवला जातो तर बाकी खरीप हंगामात पाणी नसल्यामुळे इतर पिकं घेता येत नाहीत. त्यामुळे महिलांना शेतामध्ये रोजगारच नसतो. मोठ्या प्रमाणात या वाडीतल्या महिला कामासाठी चाकणच्या कंपनीत रोजंदारीवर कामाला जातात.
यंदा फेब्रुवारीतच इथविहिरी कोरड्या पडल्या. पूर्वी गावातल्या या आडांचं पाणी, जे पिण्यासाठी वापरलं जातं, मे महिन्याच्या सुरुवातीपर्यंत रहायचं असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे. त्यानंतर बायांना दूरच्या विहिरीवर जावं लागायचं जिच्यात थोडं तरी पाणी राहिलेलं असायचं. पण 2019 पासून तीव्र टंचाई जाणवायला लागलीये. पाणी भरण्यासाठी महिलांना लवकर उठून एक - दोन किलोमीटर जाऊन दोन- तीन पाण्याचे हांडे घेऊन यावं लागत.
खोपेवाडीतील सुवर्णा बांगर सांगतात,' आम्हाला खडकातून वाट काढत दोन - तीन किलोमीटर जाऊन डोक्यावरून पाणी आणावं लागतं. उन्हाळा वाढला की विहिरीतील पाण्याची पातळी कमी कमी होते. सध्या पाणी विहिरींच्या तळाशी गेलं आहे. विहिरीला रहाट पण नाही, हाताने दोरी ओढून 30-35 फूट खाली विहिरीच्या तळातून पाणी काढावं लागतं. सकाळी दोन हांडे आणि संध्याकाळी दोन हांडे…
विहिरीतून पाणी ओढून आणायला अर्धा एक तास जातो. पाय तर दुखतातच पण विहिरीतून पाणी ओढून हात पण दुखतात. दोरीने पाणी ओढून हाताला छाले पडतात.. डोकं पण दुखायला लागतं. दरवर्षी पाणी टंचाई होते. त्यावर उपाय म्हणून पहिली आम्हाला एकच विहिर होती आता नव्याने एक विहीर पाडली आहे, पण दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असल्यामुळे विहिरीतील पाणी पुरत नाही.'
त्याच गावातील सीताताई बांगर या आशा सेविका म्हणून काम करतात. त्या सांगतात , ‘उन्हाळा जसजसा वाढत चाललाय तसं विहिरीतील पाणी खूप खोल गेलं आहे. दोरीने पाणी ओढून महिलांना त्रास होतो. महिलांच्या पोटात दुखतं. हात -पाय दुखतात. मासिक पाळीच्या वेळीचा त्रास तर सांगूच नका. विहिरी या उताराला आहेत. त्यामुळे आम्हाला वाट काढत काढत खाली उतरावं लागतं. दोन हांडे घ्यायचे एक डोक्यावर आणि एक कंबरेवर घेऊन चढ चढायला लागतो. बाईच्या नशिबालाचं काम लागलंय.
घरातली कामं करायची, पाणीही भरायचं आणि रोजगारालाही जायचं. एका विहिरीतून किमान 60-70 महिला पाणी आणतात. चिराग फाऊंडेशने विहिरीतून पाईपलाईन करून लोकांच्या सोयीसाठी एका टाकीत पाणी आणलं आहे. पण विहिरीतच पाणी नाही तर टाकीत कुठे येणार? जल जीवन मिशनचे नुसतेच बॅनर लागलेत. घरापर्यंत नळ आलेत पण अर्धवटच. नळाला पाणी नाही . काय करायचा असल्या योजनांचं.? काखेत कळसा आणि गावाला वळसा' अशी गत झाली आमची.'
धरणाचं 8 टक्के पाणी मिळायला हवं, तसा कायदाच आहे, पण…?
स्वप्नील म्हसे हा तरुण कार्यकर्ता या परिसरात सामाजिक प्रश्नांवर काम करतो. स्वयंम फाऊंडेशनच्या माध्यमातून स्वप्नील म्हसेला कोरो संस्थेची फेलोशिप मिळाली आहे. 'आमच्या खेड तालुक्यात तीन धरणे असूनही आमच्या गावासहित 50 पेक्षा जास्त गावांना पाणी टंचाईला समोर जावं लागतं. धरणाच्या बॅकवाटरला कित्येक गावं आहेत. बॅकवॉटरमधील पाणी धरणाच्या वरच्या भागातील गावांना मिळायला पाहिजे, पण ही गावं अजूनही पाणी टंचाईतच आहेत. धरणातील किमान आठ टक्के पाणी आम्हाला मिळायला पाहिजे असा कायदा आहे आणि ते पाणी आमच्या हक्काचं आहे परंतु ते आजपर्यंत आम्हाला मिळालं नाही. हा कायदा देखील गावातील लोकांना माहित नाही. आम्हाला पिण्याचे पाणी आणि शेतीला पाणी मिळावं हीच आमची मागणी आहे. गेली दोन - तीन वर्ष झालं आम्ही पाठपुरावा करतोय. तहसीलदार, कलेक्टर यांना 'आमच्या हक्काचं पाणी आम्हाला द्या. ते कोणत्याही योजनेतून बसवून द्या ही आमची मागणी आहे. आमच्या वाडीत साडेतीनशे - चारशे लोकसंख्या आहे. आमच्या आसपासच्या भागातील पाणी असलेल्या सगळ्या विहिरीचं पाणी जवळपास आटत आलं आहे. आम्हाला शेतीसाठी तर पाणी नाहीच पण प्यायलाही नाही. आमची एक विहीर आहे, त्यातूनच 60-70 महिला प्यायला पाणी घेऊन जातात. सगळे झरेही आटलेत. वर्षानुवर्षे पाणी टंचाई वाढतचं चालली आहे. गाव आणि वस्ती डोंगराच्या उताराला असल्यामुळे पावसाचं पाणी वाहून जातं, ते जमिनीमध्ये मुरत नाही. त्यामुळे जमिनीखालील पाणीसाठा वाढत नाही. धरण किंवा छोटे छोटे बंधारे बांधूनच पाणी अडवू शकतो आणि ते काम व्हावं म्हणून अजूनही आम्ही झगडतोय. आमच्याकडे पावसाळ्यात तेवढी आम्ही भात शेती होते. आमच्या शेतातून वाहून जाणाऱ्या धरणातील पाण्यावर धरणाखालचे लोक बागायतदार झालेत, पण आमच्या वाट्याला पाणी आलंच नाही.' असे विश्लेषण स्वप्नील म्हसे करतो.
स्वप्नील म्हसे बोलताना म्हणतो की, 'गावाच्या दुसऱ्या टोकाला मोठी बाजारपेठ आहे,पण तिथे जायला आम्हाला रस्ताच नव्हता. लोकांच्या सहभागातून खूप पाठपुरावा करून नदीवर एक पूल बांधून घेतला तेव्हा आता कुठे आम्हाला बाजारपेठ व शिक्षणासाठीचा मार्ग खुला झाला. चासकमान आणि भामा आसखेड या धरणात मोठ्या प्रमाणात मत्स्यपालन होतं. तिथे माश्यांचा मोठा लिलाव होतो. पण हा लिलाव बाहेरच्या लोकांसाठी आहे, स्थानिक मासेमारी करणाऱ्या कातकरी समाजाला मात्र त्यातून डावललं जातं, त्यांचा रोजगार हिरावला जातो. अशाप्रकारे धरणे असून आम्हाला प्यायला पाणी नाही, पाण्याअभावी शेती होत नाही, पारंपरिक मासेमारीचे काम करता येत नाही. पाणी टंचाईमुळे अनेक बाजूने आम्हाला दुबळं करून टाकलंय.'
इतका पाऊस पडूनही पाणी मुरत नाही, खडकांचा दोष आहे
गेल्या दोन वर्षांपासून ‘कोरो’चे प्रतिनिधी मारुती केसरकर हे परसूल आणि खरपुड या गावांमध्ये भूगर्भातील पाणी पातळी वाढावी, पाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे म्हणून काम करत आहेत. मारुती केसरकर सांगतात, आम्ही पहिल्यांदा गावाच्या समुद्रसपाटीपासूनच्या उंचीपासून म्हणजे गावाच्या सर्वात उंच भागापासून ते गावाचा सखल भागापर्यंत खडकांचा आणि विहिरांचा अभ्यास केला. विहिरींचे मोजमाप करून विहिरींची पाणी पातळी मोजायला सुरुवात केली. पाणी बघायचं असेल तर आपल्याला विहिरीतून बघता येतं.
भूजलाची पातळी जर मोजायची असेल तर विहिरींचे मोजमाप करणे गरजेचे असतं, विहिरीतील पाणी कधी आटतंय, कधी विहिरीची पाणी पातळी वाढते हे जर मोजायचं असेल तर विहिरीतूनच मोजता येतं. पावसाच्या आधी विहिरी 100 टक्के कोरड्या होत्या, त्यावेळी आम्ही विहिरीचं मोजमाप करतो व त्यानंतर पावसाळ्यात व हिवाळ्यात विहिरीचे मोजमाप करतो. पावसाळ्यात विहीरी लगेच भरतात,पण पावसानंतर दोन महिन्यातच पाणी पातळी कमी होऊन पुन्हा विहिरी आटायला लागतात.
मग तिथल्या खडकांचा अभ्यास करण्यात आला. तिथल्या खडकात पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी आहे. निव्वळ काळा पाषाण असलेल्या भागात जलव्यवस्थापन करायचं असेल तर छोटे - छोटे तलाव करणं, पाझर किंवा साठवण तलाव करणं, नालाबांध करणं, घरातील पाण्याचे नियोजन करणं एवढंच काय ते करावं लागेल. याच्या शिवाय तिथं काही करू शकत नाही, अशी इथली परिस्थिती आहे.’अशी माहिती केसरकरांनी दिली. 
जल जीवन मिशन अभियान
गावात गेल्या दोन वर्षापासून 'जलजीवन मिशन' योजनेचं काम सुरू असून, अजूनही ते पूर्ण झालेलं नाही. परसूल गावात उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच दोन हंडे पाणी हा निर्णय घेण्यात आलाय. अजून दोन महिने उन्हाळा असणार आहे. गावात पूर्वीची जुनी विहीर असून, या विहिरीला जेमतेम पाणी असतं. तर विहिरीतील पाणीसाठा टिकावा यासाठी ग्रामस्थांनी हा निर्णय घेतलाय. 'जल जीवन मिशन'चा खूप गवगवा झाला, बॅनरबाजी झाली. पण हे अभियान ग्रामीण भागात, वाड्या वस्त्यांपर्यंत पोहोचलंच नाही.
या अभियानाअंतर्गत काही ठिकाणी नळ जोडणी झाली आहे तर काही ठिकाणी नुसतीच पाईपलाईन झाली आहे ,पण या अभियानांतर्गत जे 'हर घर स्वच्छ पाणी मिळणार होतं. ते अजून तरी मिळालं नाही. महिलांना अजूनही पिण्याच्या पाण्यासाठी डोक्यावर हांडे घेऊन वणवण फिरावं लागतं. घरातील इतर कपडे असो व वैयक्तिक स्वछतेसाठी कुठेतरी धरणाचे पाणी साठलेल्या डबक्यातील अस्वछ पाणी वापरावे लागते.
(असर आणि बाईमाणूस यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ‘प्रोजेक्ट धरित्री’ उपक्रमांतर्गत ‘पर्यावरण बदल आणि लिंगभाव’ (Climate & Gender) या विषयावरची ही एक विशेष मालिका आहे.)






