अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातून माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथील पागोरी पिंपळगावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या अवघ्या 7 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर त्याच शाळेतील शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या गंभीर गुन्ह्याची तक्रार दडपण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे, तर मुख्य आरोपी शिक्षक अद्याप फरार आहे.
पाथर्डी तालुक्यातील एका गावात 7 वर्षाची मुलगी गेल्या महिनाभरापासून शाळेच्या सुटीत एकटी असल्याचा फायदा घेत शिक्षक संजय उत्तम फुंदे (रा. आनंदनगर, पाथर्डी) याने तिच्यावर 1 ऑगस्ट रोजी तसेच त्यापूर्वी महिनाभरापासून वेळोवेळी अत्याचार केला. पीडित मुलीने आरडाओरडा केल्यावर तिला मारहाणही झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पीडितेच्या वडिलांनी गुरुवारी पाथर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
पीडित मुलीने शिक्षक फुंदे याने गैरकृत्य केल्याचे तिच्या वडिलांना एक ऑगस्ट रोजी सांगितले होते, त्यानंतर तिचे वडील शाळेत शिक्षकाला जाब विचारण्यासाठी गेले मात्र तिथे त्यांना तो शिक्षक भेटला नाही. त्यामुळे पीडितेच्या वडिलांनी हा प्रकार गावातील लोकांना रोजी सांगितला. मात्र गावकऱ्यांनी पालकांवर तक्रार न देण्यासाठी दबाव आणला.
तक्रार केली, तर गावात राहू देणार नाही अशी धमकी देत पीडितेच्या कुटुंबाला गप्प बसवण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रकरण बाहेर आल्यानंतर पाथर्डी पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल झाला. त्यानंतर या गुन्ह्यात वरील चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षस सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने कारवाई केली.
संबंधित लेख वाचा: 1) हवामान बदल आणि स्त्रियांवरील लैंगिक अत्याचार यांचा थेट संबंध |
या घटनेचा पर्दाफाश करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड आणि अॅड. हरिहर गर्ने यांनी पुढाकार घेतला. त्यांना सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी, स्नेहालयाचे गिरीश कुलकर्णी, उडान संस्थेच्या पूजा दहातोंडे व शाहीन शेख यांची साथ लाभली. पीडित कुटुंबाला मानसिक आधार देतानाच तक्रार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. प्रकरण प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत आल्यानंतर पोलिस प्रशासनाने तातडीने दखल घेत गुन्हा दाखल केला.
दरम्यान, पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली असून, वैद्यकीय अहवाल प्राप्त होणे महत्त्वाचे ठरणार आहे. मुख्य आरोपी शिक्षक संजय फुंदे सध्या फरार असून त्याच्या अटकेसाठी पथक रवाना झाले आहे.
या प्रकरणात नराधम शिक्षकाला फाशीची शिक्षा व्हावी व खटला जलदगती न्यायालयात चालवून पीडित कुटुंबाला तत्काळ न्याय मिळावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड यांनी केली आहे. नराधम शिक्षकाच्या कृत्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली. पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विलास जाधव हे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.
आरोपी शिक्षकाचा अहवाल
शिक्षक फुंदे याच्या विरोधात गुन्हा दाखल होताच या कृत्याचा अहवाल गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवला आहे. फुंदे याने या अगोदरही असेच गैरवर्तन केल्याची माहिती आहे. मात्र गावातीलच राजकीय लोकांची मदत घेऊन ही प्रकरणे त्याने मिटवली होती. आरोपीमधील राजेंद्र दराडे हा सरपंच महिलेचा पती आहे.
प्रकरण दाबण्यासाठी मोठी लाच
या घटनेबद्दल सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वी साऊ एकल महिला समितीचे पाथर्डी जिल्हा समन्वयक किसन आव्हाड यांचा फोन आला.. ते अतिशय अस्वस्थ होते. पाथर्डी तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने 7 वर्षाच्या मुलीवर अनेकदा अत्याचार केल्याचे किसन आव्हाड सांगत होते. तिच्या गुप्तांगात नख लागल्याने जखम झाली होती. त्या मुलीचे वडील परप्रांतीय असून जवळच्या गावात ते पाव बटर विकतात. झाल्याप्रकाराने ते अतिशय घाबरून गेले.
तिच्या आईने घरगुती उपचार केल्याने जखम आणखी चिघळली. गावातील सरपंच बाईंचे पती आणि एका प्रमुख व्यक्तींकडे गेल्यावर त्यांनी शिक्षकाकडून 7.5 लाख रुपये घेतले व पीडितेच्या कुटुंबाला एक लाख देऊन गप्प बसवा असे सांगितल्याची चर्चा आहे... गावात राहू देणार नाही अशी धमकीही देण्यात आली आहे. जवळच्या पोलिस स्टेशनचे हवालदार यांनीही प्रकरण दाबण्यासाठी पाच लाख घेतल्याची चर्चा आहे. तसेच तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी हे त्या शाळेत चौकशीला गेले व असे काही न झाल्याचा अहवाल दिल्याची चर्चा आहे.






