अगदी गाव-खेड्यातल्या लोकांच्या हृदयापर्यंत आपले चित्रपट आणि आपण सांगू पाहत असलेल्या कथा पोहोचवण्याची तळमळ प्रसिद्ध बंगाली दिग्दर्शक ऋत्विक घटक यांना होती. त्यासाठी एकदा ते म्हणाले होते, “ गावा-गावात लोकांना चित्रपट दाखवण्यासाठी फिरत्या मोबाइल व्हॅन असत्या तर किती बरे झाले असते.” ऋत्विक घटक यांनी अशी इच्छा बोलून दाखवली तेव्हा अनेक दशकांनंतर एका छोट्या बंगाली खेड्यातील तरुण मुलगी बरोब्बर उलट दिशेने मोठी झेप घेत प्रवास करेल आणि ग्रामीण बंगालमधून एक अस्सल कहाणी असलेला तिचा सिनेमा घेऊन थेट इटलीतल्या व्हेनिसला पोहोचेल आणि भारतीय सिनेमासाठी एक ऐतिहासिक मोलाचा क्षण घडवेल हे ऋत्विक घटकांना खरेही वाटले नसते.
व्हेनिस चित्रपट महोत्सवात सर्वोत्तम दिग्दर्शकाचा किताब
7 सप्टेंबरला, अनुपर्णा रॉयला 'सॉंग्स ऑफ फॉरगॉटन ट्रीज' या तिच्या पहिल्यावहिल्या चित्रपटासाठी 82व्या व्हेनिस चित्रपट महोत्सवाच्या 'ओरिझॉन्ती' विभागात सर्वोत्तम दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. हे पारितोषिक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. 'अजूनही जगात काही व्यासपीठं अशीही आहेत जी अशा जगभरातल्या अस्सल कथा सांगणारा, ठरीव चौकट मोडणारा सिनेमा साजरा करतात.”हे पारितोषिक अशाच मनाला सुखावणाऱ्या, जग सुंदर वाटायला लावणाऱ्या सत्याचा प्रत्यय आहे." असे अनुपर्णा आनंदाने म्हणाली.
'सॉंग्स ऑफ फॉरगॉटन ट्रीज' चे कथानक काय आहे?
अनुपर्णा रॉयचा चित्रपट मुंबईतील दोन स्थलांतरित स्त्रियांची कथा सांगतो, एक अभिनेत्री होण्याची आकांक्षा बाळगून असलेली पण परिस्थितीमुळे अर्धवेळ शरीरविक्रय करावा लागणारी, तर दुसरी एका कॉल सेंटरमध्ये काम करणारी, योग्य वराच्या शोधात असणारी…अनुपर्णा रॉयच्या पुरुलिया जिल्ह्यातील नारायणपूर गावापासून मुंबईपर्यंतच्या तिच्या प्रवासातल्या अनेक अनुभवांचे या सिनेमाच्या कथेत प्रतिबिंब उमटले आहे, जे शहर सतत तुमच्या अपूर्ण महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याची शाश्वती देत अख्ख्या भारतातल्या तरुण मनांना खुणावत असतं तिथे प्रत्यक्ष आल्यावर मात्र पुढ्यात काय काय वाढून ठेवलेलं असतं ते ही कथा सांगते. या सिनेमात स्थलांतरितांच्या अडचणींचं जळजळीत भान आहे, नागरी जीवनाच्या गुंतागुंतीचे आकलन करण्याचा भेदक प्रयत्न आहे.
संबंधित लेख वाचा: 124 जवानांना सोबत घेत 1300 चिनी सैनिक मारणाऱ्या मैजर शैतान सिंह यांच्यावरच्या ‘120 बहादुर’ सिनेमाला का होतोय विरोध? |
अनुपर्णाच्या जिवंत अनुभवांतून या कथाकथनाला निराळीच धार आली आहे. ज्या ठिकाणाहून प्रवास करून अनुपर्णा मुंबईत आली आहे त्या नारायणपूर गावाबद्दल ती म्हणते "मुलींची लवकर लग्न लावून देण्यातच काय ती इतिकर्तव्यता आहे असे तिथले लोक मानतात, पुस्तकं सोडून शासकीय संस्थांत रेशनचं धान्य मिळवण्यासाठी पिशव्या घेऊन उभं राहणं तिथं जगण्यासाठी अधिक महत्त्वाचं समजलं जातं”.
तिची बालपणीची एक मैत्रिण जिचं नाव 'झूमा' होतं तिच्याबद्दलची आठवण ती सांगते "१३व्या वर्षीच राज्य सरकारच्या एका योजनेंतर्गत तिचं लग्न लावण्यात आलं आणि ती जी नंतर गायब झाली ती पुन्हा कधी न दिसण्यासाठीच." अनुपर्णा अशा प्रकारच्या अस्तित्वच पुसून टाकल्या जाणाऱ्या मुलींसाठी, मन मारून टाकल्या जाणाऱ्या महिलांच्या आवाजांसाठी व खुरटवून टाकल्या जाणाऱ्या कोवळ्या आकांक्षांसाठी उभी राहिली आहे.
‘’पॅलेस्टाईनच्या पाठीशी उभे राहणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी’’
रॉयचा हा लढा निवडक प्रश्न घेऊन उभा असलेला, प्रसंग पाहून सोयीस्कररीत्या बदलणारा नाही. पुरस्कार स्वीकार करताना त्या जागतिक व्यासपीठावरून पॅलेस्टाईनमध्ये चाललेल्या अत्याचारावर ती म्हणाली : “जगातल्या प्रत्येक मुलाला शांतता आणि हवं तसं फुलण्याचं स्वातंत्र्य असलेलं मुक्त वातावरण मिळायलाच हवंय, पॅलेस्टिनची मुलं त्याला अपवाद नाहीत. या क्षणी पॅलेस्टाईनच्या पाठीशी उभे राहणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. मला यासाठी कोणत्याही टाळ्या नको आहेत. कदाचित मी माझ्या देशाला नाराज करेन, पण आता मला त्याची पर्वा नाही."
"पॅलेस्टाईनचा मुद्दा हा एक जागतिक संकट आहे, जिथे इस्रायलसारखा शक्तिशाली देश न्याय, शांतता आणि जीवनाचा नाश करत आहे. हे लाजिरवाणे आहे. एक जागतिक नागरिक म्हणून, मी या समस्या आणि दुःखाबद्दल बोललेच पाहिजे. माझ्या हातात माइक होता आणि मी स्वतःला ते मांडण्यापासून रोखू शकले नाही," असं अनुपर्णा म्हणाली.
ट्रोलिंग, टीका.. रॉय यांच्या पालकांचा उद्वेग
अनुपर्णाने म्हटल्यानुसार खरोखरच पॅलेस्टाईनच्या बाजूने बोलल्यामुळे भारतीयांनी तिला प्रचंड ट्रोल करायला सुरूवात केली आहे. 82व्या व्हेनिस चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक खिताब मिळाल्यानंतर अनुपर्णा रॉय यांनी केलेलं एक भाषण यासाठी कारणीभूत ठरलं आहे. मात्र, आपल्या मुलीनं असं काहीही चुकीचं बोललेलं नाही, असं म्हणत अनुपर्णाच्या पालकांनी या संपूर्ण प्रकरणावर उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, त्यांच्या या विधानामुळे त्यांच्यावर काही गटांकडून टीका केली जात आहे. यावर आता अनुपर्णाच्या पालकांनी तिची पाठराखण केली आहे. “आमच्या मुलीने अवघ्या देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी केल्यानंतर जे काही घडतंय, ते पाहून आम्ही प्रचंड विचलित झालो असून आम्हाला काळजी वाटू लागली आहे. माझ्या मुलीने पॅलेस्टाईनमधील मुलांवरील अन्यायाबाबत मांडलेल्या भूमिकेबद्दल तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. वेगवेगळ्या समाजातले लोक तिच्यावर टीका करत आहेत. विशिष्ट समाजाची बाजू घेतल्याचा आरोप करत आहेत. आम्ही तिच्याशी बोललो. ती सध्या मुंबईत असून कामात व्यग्र आहे. पण तीदेखील या सगळ्या प्रकरणामुळे दु:खी झाली आहे”, असं अनुपर्णाचे वडील ब्रह्मानंद रॉय यांनीसांगितलं.
“तुम्ही तिचं भाषण काळजीपूर्वक ऐकायला हवं. ती म्हणाली, ‘प्रत्येक मुलाला शांतता, स्वातंत्र्य व मोकळिकीचा अधिकार आहे आणि पॅलेस्टाईनही त्यासाठी अपवाद नाही’. ती कोणत्याही एका समाजाबद्दल बोललेली नाही. ती जगातल्या प्रत्येक लहान मुलाबद्दल बोलली आहे. तिने काहीही चुकीचं म्हटलेलं नाही”, असंही ते म्हणाले.
दरम्यान, अनुपर्णा रॉयची आई मनिषा रॉय यांनीदेखील यावर तीव्र नापसंती व्यक्त केली. “ते सगळे तिच्यावर का टीका करत आहेत? लहान मुलांच्या हिताबद्दल बोलणं चुकीचं आहे का? तिने फक्त तिचं मत व्यक्त केलं. प्रत्येकाला स्वत:चं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. तिने आपल्या देशाला अभिमान वाटावा असं काम केलंय. अशा व्यक्तीबरोबर समाजातील काही लोक असं कसं वागू शकतात?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
माध्यमिक शाळेत असताना तिचे आईवडील तिला "निरर्थक स्वप्नांच्या मागे धावू नको" असे म्हणत, चित्रपट निर्मितीचा व्यवसाय बेभरवशाचा. दिग्दर्शक म्हणून काम करताना सामोरं जावं लागणाऱ्या अनिश्चिततेने भरलेल्या आयुष्याकडे बोट दाखवत ते विचारत: “तू काय दुसरी सत्यजित राय होणार आहेस का?” त्या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणावेसे वाटते की ती कदाचित दुसरी सत्यजित राय होईलही. कदाचित होणारही नाही. पण एक गोष्ट मात्र पक्की आहे, दुसरी कुणीही न बनताही 'अनुपर्णा रॉय'ने तिचा स्वतंत्र ठसा जगावर उमटवलाच आहे.






