- संजना खंडारे
“आयुष्यभर कलेसाठी झटलो. समाजात प्रबोधनाचं काम केलं. आज दिवंगत तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर यांच्या नावाचा पहिलाच पुरस्कार मिळाल्याचा आनंद तर आहेच, पण मनात एक सल देखील आहे. हा पुरस्कार मिळाल्यानंतरही परिस्थितीत काय बदल होणार आहे? आमच्यासारख्या लोककलावंतांना जगण्यासाठी आजही धडपड करावी लागते. शासनाकडून महिन्याला मिळणारे हजार रुपये पुरतील तरी कसे?”
ही खंत आहे तमाशा कलेत पन्नास वर्षांपेक्षा जास्त आयुष्य वाहिलेल्या ज्येष्ठ कलावंत कोंडीराम लक्ष्मण आवळे म्हणजेच आवळे मास्तर यांची. सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यातील जांब गावचा हा शांत, सच्चा आणि सबंध आयुष्य कलेसाठी जगलेला माणूस, दिवंगत तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर यांच्या नावाने देण्यात येणारा पहिला राज्यस्तरीय 'कांताबाई सातारकर तमाशा कला पुरस्कार 2025' यंदा स्वीकारणार आहे.
2 नोव्हेंबर रोजी अहिल्या नगरच्या संगमनेरच्या मालपाणी लॉन्स येथे होणाऱ्या या पुरस्कार वितरण सोहळ्यास राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत प्रमुख पाहुणे असतील, तर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील अध्यक्षस्थान भूषवतील. या प्रसंगी राज्यभरातील तमाशा कलाकार आणि लोककलेशी जोडलेले मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. मुंबई विद्यापीठाचे प्रा. गणेश चंदनशिवे यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने आवळे मास्तर यांची निवड केली आहे. या आवळे मास्तरांशी बाईमाणूसने सामरिक साधून त्यांचा 50 वर्षांचा तमाशातील प्रवास कसा होता हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 
गरिबीतून कलेच्या दुनियेत...
10 जून 1948 रोजी सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यातील जांब येथे जन्मलेले आवळे मास्तर गरिबीत वाढले. त्यांनी पदवीच्या शिक्षण घेतलं आणि पुढे परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण थांबवावं लागलं. 1968 मध्ये महाराष्ट्र परिवहन महामंडळात त्यांना नोकरी मिळाली, पण “मन लागत नाही” म्हणून ती त्यांनी सोडली आणि 1973 मध्ये जगताप पाटील पिंपळेकर लोकनाट्य तमाशा मंडळातून त्यांनी तमाशाच्या जगात प्रवेश केला. 5 ऑक्टोबर 1973 रोजी त्यांनी पहिल्यांदा रंगमंचावर उभं राहून अभिनय केल्याचा क्षण आजही त्यांच्या आठवणीत ताजा आहे.
संबंधित लेख वाचा: आठवणीतील विठाबाई… |
ते सांगतात, " 5 ऑक्टोबर 1973 मध्ये मी पहिल्यांदा तमासगीर म्हणून रंगमंचावर उभा राहिलो. जगताप पाटील पिंपळेकर लोकनाट्य तमाशा मंडळ मधून मी तमाशाच्या जगात प्रवेश केला. कलावंत व्हायचं स्वप्न होतं पण कलावंत होणं इतकं सहज शक् नसतं, अनेक खटाटोप करावे लागले. अनेक फड मास्तरांचे मारही खाल्ले. अनेकदा बोलणे खाल्ले. पण या सगळ्या गोष्टींमुळे मी घडत गेलो. अनेक भूमिका निभावल्या. पन्नास वर्षांपेक्षा जास्त तमाशामध्ये काम केलं आणि आज अखेर मी पुरस्कार प्राप्त कलावंत झालो.
“खलनायकाच्या भूमिकेतून समाजाला आरसा दाखवणारे आवळे मास्तर”
गेली 50 वर्षे रंगमंचावर आवळे मास्तर यांनी तमाशाच्या वगनाट्यात खलनायकाच्या भूमिका सादर केल्या. ते सांगतात, “ माझ्या खानदानीमध्ये कोणीच तमासगीर नाही. ना माझी आई तमासगीरीण होती, ना माझे वडील तमासगीर होते. पण माझी यामध्ये आवड असल्याकारणाने मी तमाशाकडे झुकलो गेलो आणि उभं आयुष्य मी या कलेला वाहिलं.. गेली कित्येक वर्ष मी वगनाट्य मध्येच काम केले आहे. माझे मेव्हणे आनंदराव पांगारकर होते.
(कांताबाई सातारकर)
त्यांच्या शिकवणुकीने मी तमाशामध्ये एकच बाजू धरून काम केलं. वगनाट्यमध्ये गेली 50 वर्षांपेक्षा जास्त मी खलनायकाची भूमिका बजावली आहे. मी रंगमंचावर चांगला खलनायक रंगवू शकतो. ‘कोर्टा दारी फुटला चुडा’ या वगनाट्य मध्ये मी भणंगराव गेनूपाटील, ‘सख्खा भाऊ-बहिणीचा पक्का वैरी’, ‘डोंब्या नाग’ या वगनाट्यामध्ये राणूजी सरपंच, कलंकीता मी धन्य झाले इ. वगनाट्य ऐवजी मी पौराणिक कथांमध्ये सुद्धा भूमिका केली, ऐतिहासिक भूमिकेमध्ये शिवाजी,संभाजी, गणूजी अशा भूमिका केल्या.
लेखनातून समाजजागृती…
आवळे मास्तर फक्त कलावंत नाहीत, तर विचारवंतही आहेत. त्यांनी समाजातील वास्तवावर भाष्य करणारी सात वगनाट्ये लिहिली आहेत. 1) शेतकऱ्याची आत्महत्या, 2) ठिणगीचा झाला भडका, 3) आईची माया, 4) हीच शिवा सावकाराला, 5) लेकीच्या आबुला न्याय पित्याचा इत्यादी.त्यांच्या लेखनातून ग्रामीण वास्तव, स्त्रीसंवेदना आणि शेतकऱ्यांच्या वेदना शब्दरूपात उतरतात.
जांब गावामध्ये गावातल्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची कमतरता होती. गावकऱ्यांनी आवळेंना मुलांना शिकवण्याची विनंती केली. त्यांनी ती मान्य केली आणि पहिली-दुसरीच्या मुलांना शिकवायला सुरुवात केली. “गावकरी त्यानंतर आवळे मास्तर म्हणूनच मला हाक मारायला लागले” असे कोंडीराम सांगतात..
कांताबाईंच्या शिकवणुकीनेच माझ्यातला कलाकार घडला”
1976 मध्ये ते कांताबाई सातारकर तमाशा मंडळात दाखल झालो. ते सांगतात, “मी पहिल्यांदा मोठ्या भूमिकेसाठी निवडला गेलो होतो. घाबरलो होतो. बाईंनी विचारलं ‘कशाला घाबरता?’ मी म्हणालो, ‘बाई, तुमचं नाव ऐकूनच धडकी भरते!’ त्यावर त्या म्हणाल्या, ‘घाबरायचं नाही. मनापासून काम करा, नाहीतर आयुष्याच्या चिंध्या होतील.’ त्या शब्दांनी मी आयुष्यभरासाठी प्रेरित झालो.”
ते पुढे म्हणतात,”या प्रवासामध्ये सगळ्यात जास्त शिकायला मिळाले ते कांताबाई सातारकर यांच्याकडूनच.. तिच्यासारखी कणखर बाई मी उभ्या आयुष्यात बघितली नाही. पन्हाळगडची राणी, नजर कैदेत शिवाजी, या वगनाट्यमध्ये शिवाजीची भूमिका करणारी ती पहिली बाई होती. कांताबाई सातारकर जेव्हा शिवाजी महाराजांची भूमिका वगनाट्यात साकारायच्या तेव्हा त्यांचा पुत्र संभाजी म्हणून मी असायचो. कांताबाईंनी खऱ्या अर्थाने मला घडवलं. शिवाजी हा संभाजीपासून किती पावलांच्या अंतरावर उभा असला पाहिजे इथपासून शिकवलं..”
“प्रबोधन मागे पडलं आणि तमाशा फक्त करमणुकीत अडकला”
आवळे मास्तरांना एक खंत वाटते. ते म्हणतात, “आता वगनाट्य सादर करायला गेलं की लोक म्हणतात, ‘ते गाणं चालू करा, आम्हाला वगनाट्य नको. एवढं सगळं आयुष्य जगून आयुष्याची पन्नास वर्षांपेक्षा जास्त वर्ष कलेला वाहिली. वगनाट्य मधून समाजामध्ये प्रबोधन करण्याचं काम केलं. आज लोकांना ते प्रबोधन नकोय. वगनाट्य सादर करायला रंगमंचावर उतरल्यावर "ते गाणे चालू करा बरं वगनाट्य वगैरे आम्हाला काही बघायचं नाही" असं म्हणून प्रेक्षक जेव्हा अपमान करतात.. तेव्हा कोणत्या कलाकाराला त्याची कला सादर करावीशी वाटत असेल? आज फक्त बोटावर मोजणारे तमाशा फड आहेत जे सगळं काही रीतसर सादर करतात. पण प्रेक्षकांना ते बघायला आता आवडत नाही आणि यामुळे खरा तमाशा लोप पावत चाललाय याचं वाईट वाटतं…”
“हजार रुपयांत काय होतं?” शासनाकडून दुर्लक्ष
आवळे मास्तर पुढे म्हणतात, "म्हणजे बघा ना आयुष्याची इतकी वर्ष आम्ही समाज प्रबोधनासाठी घातली आणि आता आमच्या आयुष्याच्या उतारवयात शासनाकडून आम्हाला महिन्याला फक्त हजार रुपये मानधन मिळतं. या हजार रुपयात आमच्या गोळ्या-औषधी होत नाही, ना हे पैसे उपचार-पाण्यासाठी पुरतात.. कित्येक कलावंतांना वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे आयुष्य गमवावं लागलं. आम्ही समाजप्रबोधनासाठी आयुष्य दिलं, पण आज वृद्धापकाळात आमच्या जगण्याची जबाबदारी कोण घेणार?” त्यांचा हा प्रश्न शासनालाच नव्हे, तर संपूर्ण समाजालाही विचार करायला भाग पाडणारा आहे.
कलेनेच घर उभं ठेवलं…
“मी तमाशात गेलो तेव्हा घरच्यांनी विरोध केला. बायको म्हणाली, ‘तमाशात गेला तर आपल्या आयुष्याचा तमाशा होईल!’ पण मी ऐकलं नाही. मला कलावंत म्हणून जगायचं होतं,” ते सांगतात. आज त्यांना दोन मुलं, नातवंडं आहेत. “घरच्यांनी कधी तमाशावर प्रेम केलं नाही, पण तमाशातून आलेल्या पैशावर मात्र प्रेम केलं,” असं ते हसत म्हणतात.
“तमाशाने माझं घर चालवलं, लेकरांना शिकवलं, उपाशी राहू दिलं नाही. त्यामुळे या कलेबद्दल मनात प्रचंड आदर आहे.”
आज आवळे मास्तरांना कांताबाई सातारकर तमाशा कला पुरस्कार मिळतो आहे. त्यांना याचा अभिमान आहे, पण त्याहून मोठी भावना त्यांच्या शब्दांत आहे. ते म्हणतात, “हा पुरस्कार माझा नसून, मी सादर केलेल्या त्या कलेचा आहे. कला जर टिकली, तर मी जिंकलो असं समजा.”
कशी झाली निवड?
या संदर्भात माहीती देताना आमदार अमोल खताळ म्हणाले की, संगमनेरचे भूमिपुत्र असलेले कवी अनंत फंदी, पहिल्या महिला तमाशा कलावंत स्व. पवळा भालेराव, स्व. गुलाबबाई संगमनेरकर, लोकशाहीर विठ्ठल उमप, तमाशा कलावंत स्व. कांताबाई सातारकर यांच्या नावाने दरवर्षी राज्यातील कलावंताना पुरस्कार देवून सन्मानित करण्याचा निर्णय आपण जाहीर केला होता.
यातील पहिला पुरस्कार स्व. कांताबाई सातारकर यांच्या नावाने देण्यात येणार असून, यंदाच्या वर्षीचा पहिला पुरस्कार तमाशा कलेमध्ये आपले अनमोल असे योगदान देणारे वाई येथील कोंडीराम लक्ष्मण आवळे यांना देण्याचा निर्णय पुरस्कार निवड समितीने घेतला आहे. या पुरस्काराचे स्वरूप 21000 रोख, मानपत्र, शाल श्रीफळ असे असणार आहे. मुंबई विद्यापीठातील कला विभागाचे प्रमुख व गायक प्रा. गणेश चंदनशिवे यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आलेल्या पुरस्कार निवड समितीने आवळे मास्तर यांची पुरस्कारासाठी निवड केली.
1973 पासून त्यांनी तमाशा कलेसाठी स्वत:ला झोकून दिले. सात वगनाट्य त्यांनी शब्दबध्द केली असून, अतिशय बिकट अशा कौटूंबिक परिस्थितीवर मात करुन, त्यांनी पारंपारिक तमाशा कला जिवंत ठेवण्यासाठी कष्ट घेतले. चंद्रकांत ढवळपुरीकर, दत्ता महाडीक यांच्या बरोबरीने तमाशा कलेमध्ये त्यांनी दिलेल्या योगदानाचा यथोचित गौरव म्हणून आवळे मास्तर यांना सन्मानित करण्याचा निर्णय यावर्षी घेण्यात आल्याचे आमदार खताळ म्हणाले.






