- संपत मोरे
आपल्या साहित्य व्यवहारात अनेक लेखक अनेक कारणांमुळे अलक्षित राहिले आहेत. त्यांच्याविषयी समाज माध्यमांवर कधी चर्चा नसते. अधून मधून आवडत्या पुस्तकांच्या याद्यांचे खेळ खेळले जातात, त्यात चुकूनही त्यांच्या पुस्तकांचे उल्लेख कुणी करत नाहीत. इतकं दुर्लक्ष करण्यासारखे सुमार वा धंदेवाईक लेखक हे नक्कीच नाहीत. त्यांनीही त्यांच्या लेखनातून गंभीरपणे काही एक विधान करण्याचा प्रयत्न केला आहे. पण होतं काय, हे लेखक फारच क्वचित मुख्य धारेशी जोडले गेलेले दिसतील. त्यांची पुस्तकं नामांकित प्रकाशकांनी छापलेली नसतात. कुठल्या तरी स्थानिक पातळीवरच्या फारशी वितरण व्यवस्था नसलेल्या प्रकाशकांकडूनच ही पुस्तकं आलेली असतात.
मराठीतल्या महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या वृत्तपत्रे, नियतकालिके, समीक्षक, विद्यापीठे, पुरस्कार संस्था, साहित्य संस्था यांच्यापर्यंत ही पुस्तके अपवादानेच पोचलेली असतात. बहुतांश प्राध्यापकांना तर अभ्यासक्रमाबाहेरचे लेखक क्वचितच माहीत असतात, तर बहुतांश वाचकांना फेसबूकबाहेरचे माहीत नसतात. समीक्षक आणि परीक्षण छापणा-यांना फक्त चमकतंय तेच सोनं माहीत असतं. अशा उदासीन पार्श्वभूमीवर एखादा लेखक मिणमिणत राहिला नि कधी तरी विझून गेला तरी कुणाला थांगपत्ताही लागत नाही, हे खरंच आहे.
‘साहित्य अकादमी’ पुरस्कारप्राप्त लेखक प्रवीण बांदेकर यांचे हे एक टिपण… बांदेकरांनी हे टिपण लिहिलयं लेखक महादेव मोरे यांना उद्देशून. गेल्याच वर्षी निधन झालेल्या या महादेव मोरेंचा आज पहिला स्मृतिदिन… जवळपास ४० पुस्तकं नावावर. सर्वच विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात कलाकृतींचा समावेश. ज्यांच्या साहित्याचा अभ्यास करून अनेकांना एम.फील, पी.एच.डी. पदव्या मिळाल्या, त्या महादेव मोरेंना आयुष्यभर मात्र उदर निर्वाहासाठी पिठाची गिरणी चालवावी लागली होती.
हे ऐकून कुणाला आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे, या कामालाही त्यांनी कमी न लेखता ते निष्ठेने सांभाळत आपल्या कथात्म साहित्यातून सीमा भागातल्या शोषित वंचित समाजाच्या दुःखाला वाचा फोडली. विडी कामगार, चालक, वाहक, वेश्या, जोगते, गॅरेज, दुकान व बांधकाम कामगार या अलक्षित समूहाचे लोक त्यांच्या कथा कादंबऱ्यांचे नायक बनले. त्यामुळेच मराठी कथात्म साहित्याचा परीघ विस्तारला.
मुक्त पत्रकार संपत मोरे यांच्या ‘मुलुखमाती’ या पुस्तकात लेखक महादेव मोरे यांच्यावरचे एक प्रकरण आहे. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘बाईमाणूस’च्या वाचकांसाठी मराठीतल्या या थोर लेखकांच्या आठवणींना उजाळा देण्याचा हा प्रयत्न…
निपाणीचे लेखक महादेव मोरे पिठाच्या गिरणीत काम करतात, असं एका कथाकाराकडून समजलं. पण ते पटलं नाही. कारण सतरा कादंबऱ्या, सतरा कथासंग्रह, चार ललितलेख संग्रह एवढं लिहिलेला हा लेखक उदरनिर्वाहासाठी पिठाच्या गिरणीत काम करत असेल? ऐकतानाही कसंतरी वाटत होतं; पण सांगणारा त्याच्या म्हणण्यावर ठाम होता. मला मोरे यांच्या लिखाणाबाबतची माहिती होती, त्यामुळं तेवढ्या वेळेपुरतं त्याचं म्हणणं मी खरं मानलं. पण त्यांच्याबद्दल ऐकलेली ही वेगळी माहिती स्वस्थ बसू देत नव्हती.
मोरेंच्या पुस्तकावर त्यांचा पत्ता होता, ‘कामगार चौक, निपाणी.’
निपाणीतला कामगार चौक म्हणजे, छोट्या मोठ्या घरांची वस्ती. चौकात एका तरुणाला विचारलं,
‘लेखक महादेव मोरेंचं घर कुठं आहे?’
‘दादा आता हिकडं राहात नाहीत. बेळगाव नाक्यावर जाऊन विचारा. तिथं गॅस एजन्सीच्या जवळ त्येची गिरण हाय.’
संबंधित लेख वाचा: 1) मारुती चितमपल्ली यांच्या जाण्याने आपण काय गमावून बसलो आहोत? |
गिरणीजवळ आलो. गिरण सुरू होती. डोक्यावर पांढरी टोपी, पांढरा शर्ट, पायजमा घातलेले सत्तरी ओलांडलेले एक गृहस्थ चक्कीजवळ उभे होते. हेच महादेव मोरे! मराठी साहित्यात भरीव योगदान दिलेले लेखक, कन्नड मुलखात राहूनही आग्रहाने मराठीतून लिहिणारे. त्यांच्याकडे पाहिल्यावर ते लेखक असतील, असं कोणालाच वाटणार नाही, इतके साधे.
मला पाहताच म्हणाले, ‘दळण न्हाय आणलं?’ बोलण्यात कोल्हापुरी सूर. त्यांना वाटलं होतं, मी दळायलाच आलोय.
‘एवढं झाल्यावर मी बंद करणार हाय, म्हणून म्हटलं.’
मग मी त्यांना ‘मी दळायला नाही तुम्हाला भेटायला आलोय’, असं सांगितलं.
ते म्हणाले, ‘थोडा वेळ थांबा. एवढं दळण होऊ द्या.’
दळण झाल्यावर त्यांनी गिरण बंद केली. अंगावर सांडलेलं पीठ झाडत बाहेर आले. मग सुरू झाल्या, मनमोकळ्या गप्पा.
महादेव मोरेंचे वडील टॅक्सीचालक. घरची परिस्थिती बेताचीच. त्यांना नऊ भाऊ, तीन बहिणी. हे सगळ्यात थोरले. प्राथमिक शाळेत असताना त्यांना वाचनाचा छंद लागला. तेव्हा ते गुरुजींकडून मिळणाऱ्या साहसी कथा, रहस्यकथांची पुस्तके वाचायचे. दिवसेंदिवस त्यांचं वाचनाचं वेड वाढतच गेलं. हायस्कूलच्या काळात त्यांनी सानेगुरुजी, वि. स. खांडेकर यांची पुस्तके वाचली.
निपाणीला हायस्कूलचे शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी ते कोल्हापूरच्या गोखले कॉलेजात आले. या काळातही त्यांनी मनसोक्त वाचन केलं. वाचताना त्यांच्या मनावर नवकथाकार अरविंद गोखले यांच्या कथांचा प्रभाव पडला. पुढे खेड्यात भरणाऱ्या यात्रेवर त्यांनी ‘म्हाईचा दिवस’ ही कथा लिहिली. ती कथा एका स्पर्धेसाठी पाठवली. गंमत म्हणजे, त्या कथेला पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले. पहिल्याच कथेला बक्षीस मिळाले, ही घटना मोरेंनाही खरी वाटत नव्हती. त्यांच्यासाठी तो एक सुखद धक्का होता.
बक्षीस मिळाल्यानंतर मात्र त्यांनी सगळे लक्ष लेखनाकडे वळवले. याच काळात त्यांना शिक्षण सोडून निपाणीला यावे लागले. कारण ते इंटरआर्टच्या इंग्रजी विषयात नापास झाले. फक्त परीक्षेसाठी कोल्हापुरात थांबण्यासारखी त्यांची आर्थिक परिस्थिती नव्हती. त्यामुळे त्यांचं शिक्षण थांबलं.
मग, निपाणीतच राहून काहीतरी पोटापाण्याचा व्यवसाय करावा, असं मोरेंना वाटलं. तेव्हा त्यांनी मित्रांच्या समवेत निपाणीत चार चाकी गाड्यांचं गॅरेज सुरू केलं. या गॅरेजमध्ये त्यांना नाना तऱ्हेची माणसं भेटायची. दिवसभर गॅरेजमध्ये काम करताना ऐकलेले वेगवेगळे अनुभव त्यांच्या मनाला भिडलेले असायचे.
रात्रभर जागून तेच अनुभव मोरे लिहू लागले. त्यातूनच काही कथा, कादंबऱ्या लिहिल्या गेल्या. या लेखकाच्या कथा पुण्या-मुंबईच्या दर्जेदार साहित्य मासिकांतून छापून यायला लागल्या. दूरवरून वाचकांची पत्रे यायला लागली. लेखकांच्या वर्तुळातही या लेखकाची चर्चा व्हायला लागली. काही लेखक पत्रे पाठवून कौतुक करू लागले. पण मोरेंना याचं अप्रूप वाटत नव्हतं. ते नित्यनेमाने गॅरेजला जायचे. फावल्या वेळेत लिखाण करायचे.
ते सांगतात, ‘तेव्हा एका कथेला दहा रुपये मानधन मिळायचे. हे पैसेही खूप असायचे, कारण दहा रुपयात आठवड्याचा बाजार यायचा. कथा छापून आल्यानंतर अनेक दिवसांनी हे मानधन यायचे.’
पंधरा वर्षे गॅरेजमध्ये काम केल्यावर मोरे यांनी टॅक्सीचा व्यवसाय सुरू केला. टॅक्सी ड्रायव्हर म्हणून ते सर्वत्र फिरू लागले. या ड्रायव्हरकीच्या काळातील अनुभवाबाबत मोरे सांगतात, ‘तेव्हा रोज नवी माणसं भेटायची. प्रवास करताना माणसं त्यांचे अनुभव सांगायची, त्यातले अनेक अनुभव ऐकून माझ्या जिवाची घालमेल व्हायची. मग ऐकलेलं कागदावर उतरवून काढायचो. त्यातूनच अस्थिर जीवनाची शोकांतिका मांडणारी ‘एकोणिसावी जात’ कादंबरी मी लिहून काढली.
एक-दोन वर्षे टॅक्सी ड्रायव्हरचे काम केल्यानंतर मोरे त्यांच्या भावाची पिठाची गिरणी चालवू लागले. गेल्या तीस वर्षांपासून ते पिठाच्या गिरणीत काम करतात. या गिरणीत दळण घेऊन येणाऱ्या बायका कष्टकरी कुटुंबातील असायच्या. काही बायका देवदासी, विधवा, परित्यक्ता होत्या. त्या गिरणीवाल्या दादाला विश्वासानं मनातल्या गोष्टी सांगायच्या. या बायकांना दादा आधार द्यायचा. अनेकदा दारूड्या नवऱ्याच्या बायका दादाकडं नवऱ्याची तक्रार घेऊन यायच्या. त्यांची दुःख या संवेदनशील गिरणीवाल्या दादाला छळत राहायची. मग शोध सुरू व्हायचा. या शोधातूनच लिखाण सुरू व्हायचं.
रात्री 11 वाजता लिहीत बसलेला हा लेखक कोंबडा आरवल्यावरच भानावर यायचा. गिरणीतील काम संपल्यावर तिथच बाकड्यावर बसून लिहायला बसायचा. गिरणीतल्या याच बाकड्यावर बसून त्यांनी ‘चेहऱ्यामागचे चेहरे’, ‘चिताक’ हे राज्य सरकारने पुरस्कार दिलेले कथासंग्रह लिहिले आहेत. संपूर्ण देशभरात चर्चा झालेल्या निपाणीच्या तंबाखू आंदोलनावरची ‘झोंबडं’ ही कादंबरी याच गिरणीच्या बाकड्यावर बसून त्यांनी लिहिली आहे.
तीस वर्षे पिठाची हीच गिरणी महादेव मोरे यांची ‘स्टडी रुम’ बनली आहे.
‘तुम्हाला गिरणीत काम करायला आवडते?’
‘न आवडून काय करायचं? कर्तव्य म्हणून काही गोष्टी कराव्या लागतात.’ त्यांनी सांगितले.
‘केवळ लिखाण करून प्रपंच चालवणं शक्य नाही. लोकांना वाटतंय, लेखकाला लिहून खूप पैसे मिळत असतील; पण काही खरं नाही. संसारासाठी कष्ट करावे लागतातच...’
याच गिरणीच्या पाठीमागे मोरेंचं घर आहे. घरात त्यांच्या सांधेदुखीने आजारी असलेल्या पत्नी होत्या. मी बसलो होतो, त्या खोलीत शासनाकडून मिळालेल्या पुरस्काराच्या फ्रेम लावलेल्या. त्यांच्या पत्नीशी गप्पा मारत बसलो. काही वेळातच मोरे आतून चहा घेऊन आले. त्यांनी स्वत: बनवून माझ्यासाठी चहा आणलेला. मी संकोचलो.
‘अहो, चहा कशाला आणला?’
‘तुम्ही कशाला पुन्हा येताय एवढ्या लांब. खरं जेवणाचं करायला पाहिजे हुतं, पण माझी बायको जाग्यावरच असते. तिला काम जमत न्हाय. म्हणून कुणीबी मला फोन करून भेटायला येऊ का असं विचारलं, तर मी नको म्हणतो. बाह्यरगावावरनं आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करायला तर पायजेल. पण माझ्याकडनं तो होत नाही. म्हणून वाईट वाटतं.’ ते म्हणाले.
‘दादा, तुम्ही भेटला हेच लय महत्त्वाचं. तुम्ही मनाला लावून घेऊ नका.’ मी म्हणालो.
‘तुम्ही कानडी मुलखात राहूनही मराठीत लिहिताय. तुमची महाराष्ट्र सरकारकडून काय अपेक्षा आहे?’ मी विचारलं.
‘अहो, सरकारच्याच मागं इतकं व्याप हाय. आपुण कशाला त्यास्नी ताप द्यायचा. हात चालत्यात आणि डोळ्याला दिसतय तोवर लिहायचं. कसलीही अपेक्षा करायची नाही बघा.’ मोरे निरागसपणे म्हणाले.
आम्ही बोलत बसलेलो. ‘दादा...’ बाहेरून आवाज आला. मघाच्या बाई आल्या होत्या.
‘आलो... आलो...’ म्हणत ते उठले. मीही उठलो. बाहेर आलो. ते गिरणीत गेले. गिरणी सुरू केली. पाठोपाठ दळण चक्कीत टाकलं. स्वतःचं लेखकपण विसरून ते गिरणीवाल्या दादाच्या भूमिकेत गेले होते. त्यांचा निरोप घेऊन मी निघालो. आज लेखकराव व्हायच्या काळात विपुल लिहूनही जमिनीवर पाय असणारा, लिहिणं आणि जगणं यात तफावत नसणारा महादेव मोरे नावाचा एक माणूस आणि त्याचं जगणं मला बघायला मिळालं होतं. मी तिथून दूर आलो, आता मला गिरणी दिसायची बंद झालेली. पण गिरणीचा आवाज मात्र कानात घोंघावत होता, आणि गिरणीवाले दादाही माझ्या डोळ्यासमोर येत होते...






