- अप्सरा आगा
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी मठात गेली अनेक दशके वास्तव्य करत असलेली एक हत्तीण ‘महादेवी’, जिला स्थानिक प्रेमाने ‘माधुरी’ म्हणतात. ही केवळ हत्तीण नव्हती तर इथल्या लोकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू होती, परंपरेचा अविभाज्य घटक होती, आणि हजारो कोल्हापूरकरांशी तिची भावनिक नाळ जुळलेली होती..
मात्र, वन्यजीव कायद्याच्या पार्श्वभूमीवर आणि न्यायालयीन आदेशानुसार, महादेवीला जामनगरमधील 'वनतारा' या वन्यप्राणी पुनर्वसन केंद्रात हलवण्यात आलं. आणि याच घटनेने कोल्हापुरातील गावागावांतून संतप्त लोक रस्त्यावर उतरले. कोल्हापूर शहराच्या चौकाचौकात निषेधाचे फलक झळकले. शेकडो लोकांनी शांततेत पदयात्रा काढली. सोशल मीडियावर आक्रोश व्यक्त झाला....
कोण आहे ही माधुरी हत्तीण? कोल्हापूरवासियांची तिच्याशी एवढी भावनिक नाळ असतांना माधुरी हत्तीणीला का दूर केलं? माधुरी आता जिथे आहे तिथे सुरक्षित आहे का? माधुरी हत्तीणीला पुन्हा नांदणीला आणलं जाईल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न बाईमाणूसच्या या लेखात केला गेला आहे.. 
"आमची 'महादेवी' आम्हाला परत मिळावी"
गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील हत्तीण महादेवी म्हणजेच माधुरीसाठी कोल्हापूर परिसरात तीव्र आंदोलन सुरू आहे. सोशल मीडियावर तर अनेक लोक याबद्दल निषेध करतांना, प्रतिक्रिया देतांना दिसत आहेत. नुकताच कोल्हापुरात महादेवीला आणण्यासाठी भव्य मोर्चा देखील काढण्यात आला. त्यामध्ये लोकप्रतिनिधीसह गावकरी उपस्थित होते. या सर्व घडामोडीनंतर 'महादेवी'ची योग्य ती काळजी घेत असल्याचे वनतारा प्रशासनाने सांगितले आहे. असे असले तरी आमची 'महादेवी' आम्हाला परत मिळावी, एवढेच शब्द कोल्हापूरवासियांच्या तोंडातून ऐकायला मिळतायेत.
या मठात अनेक दशकांपासून हत्ती पाळण्याची परंपरा...
कोल्हापूरच्या नांदणी येथे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागातील 748 गावातील स्वस्तिश्री जिनसेन बहत्तरक पट्टाचार्य संस्थान हे जैन धर्मियांचे श्रद्धास्थान आहे. या संस्थानाला बाराशे वर्षांचा गौरवशाली इतिहास असून, अनेक दशकांपासून मठामध्ये हत्ती पाळण्याची परंपरा आहे. मठाच्या अखत्यारीत येणाऱ्या गावांमध्ये होणाऱ्या पंचकल्याण महोत्सवात धार्मिक कार्यासाठी महादेवी हत्तीणीला विशेष मान असतो. या महोत्सवात होणाऱ्या धार्मिक पूजेत इंद्र-इंद्राणींना हत्तीवरून मिरवणुकीने भगवंताच्या अभिषेकस्थळी नेले जाते. जो परंपरेचा एक अविभाज्य भाग मानला जातो. याचदरम्यान, महादेवी हत्तीणीच्या स्थलांतरावरून वाद निर्माण झाला आहे.
नेमकं प्रकरण काय?
महादेवी हत्तीणीचा वन विभागाकडून परवानगी न घेता मिरवणुकीसाठी वापर झाल्याचा आरोप 'पेटा'ने केला. प्रकरण न्यायिक पातळीवर पोहोचल्यानंतर चौकशीसाठी समिती नेमण्यात आली. समितीने हत्तीणीची पाहणी करून अहवाल सादर केला होता. प्राण्यांच्या हक्कालाच प्राधान्य द्यावे लागेल, असे निरीक्षण नोंदवलं होतं. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी या गावातील नांदणी मठाच्या महादेवी हत्तीणीबाबतची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली, त्यामुळे नांदणी मठाची महादेवी हत्तीण वनताराकडे सोपवण्यात आली. 
महादेवीला वनतारामध्ये का दाखल केले?
प्राणिमित्र संघटना पेटा इंडियाच्या अर्जावर महाराष्ट्राचे मुख्य वन्यजीव वॉर्डन यांनी या हत्तीणीच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमली. या हत्तीणीवर उपचार करण्यासाठी सर्व आवश्यक वैद्यकीय सोयी सुविधा असलेल्या ठिकाणी तिला नेऊन तिचे पुनर्वसन करावे, अशी शिफारस या समितीने एकमताने केली. 16 जुलै 2025 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने ही शिफारस स्वीकारली आणि तिला जामनगर येथील राधे कृष्ण टेम्पल एलिफंट वेल्फेअर ट्रस्ट (वनतारा) मध्ये दोन आठवड्यात हलवण्याचा आदेश दिला. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध जैन मठाने सर्वोच्च न्यायालयात अपील केले. 29 जुलै 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या दोन सदस्य पीठाने ही याचिका फेटाळून लावली.
ग्रामस्थांनी जीओ सीमकार्डवर टाकला बहिष्कार...
महादेवी हत्तीण 28 जुलै ला रात्री गुजरातकडे रवाना झाली. सर्वोच्च न्यायालयाने मठाची याचिका फेटाळल्यामुळे हत्तीणीला नांदणी पंचक्रोशीतील सर्वधर्मीयांनी पाणावलेल्या डोळ्यांनी निरोप दिला. या वेळी आक्रमक गावकऱ्यांनी ज्या वाहनातून महादेवीला नेण्यात येत होते. त्यावर दगडफेक केली. पण तरीसुद्धा न्यायालयाच्या निर्णयानुसार महादेवीची पाठवणी करण्यात आली. महादेवीला अंबानींच्या मालकीच्या वनतारा येथे रवाना केल्यानंतर ग्रामस्थांनी अंबानी समुहाच्या जीओ सीमकार्डवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
संबंधित लेख वाचा: 1) असं झालं तर भारताचा राष्ट्रीय वारसा असलेल्या हत्तींचं अस्तित्व धोक्यात येईल! |
'वनतारा'चं यावर काय म्हणणं आहे?
वनतारा हे गुजरातच्या जामनगरमध्ये 3500 एकरांवर पसरलेले वन्यजीव संरक्षण आणि पुनर्वसन केंद्र आहे. याच्यात 2000 प्रजातींचे दीड लाख प्राणी आहेत. वनतारामध्ये पशुसंवर्धनासाठी केलेल्या उपाययोजनांचा दर्जा पाहून ॲनिमल वेल्फेअर बोर्डाने वनताराला प्राणिमित्र राष्ट्रीय पुरस्कार (कंपनी गट) दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे वनतरा हे पर्यटन प्राणी संग्रहालय नाही. येथे पर्यटकांना किंवा पाहुण्यांना प्रवेश नाही. त्यायोगे येथील प्राण्यांना कमीत कमी त्रास होईल तसेच त्यांना जास्तीत जास्त एकांत मिळेल याची काळजी घेतली जाते.
इन्स्टाग्रामवर केलेल्या एका पोस्टमध्ये वनताराने म्हटले की, "महादेवी आता वनतारा येथे सुरक्षितपणे पोहोचली आहे. तिथल्या वातावरणात स्थिरावते आहे. तिच्या आसपास तिची काळजी घेण्यासाठी, देखभाल करण्यासाठी वनताराचे पशुवैद्यकीय पथक आहे. तिच्यासाठी आवश्यक असणाऱ्या तात्काळ आणि दीर्घकालीन वैद्यकीय गरजांची पशुवैद्यकीय पथक काळजी घेत आहे."
महादेवी हत्तीणी परत येईल?
खरंतर, महादेवी हत्तीणीची पुन्हा कोल्हापूरला रवानगी करण्याचे संकेत वनताराने दिले आहेत. मात्र, त्यासाठी आवश्यक अशा अधिकृत वन्यजीव खात्याने तसेच, जैन मठाने न्यायालयात कायदेशीर याचिका दाखल केली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, तसेच वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार प्राण्यांच्या वाहतुकीचे सर्व नियमांचे पालन करण्यात आले पाहिजे. जर न्यायालयाने आदेश दिला, तर महादेवीला वैद्यकीय देखरेखीखाली सुरक्षितरित्या पुन्हा कोल्हापूरच्या नांदणी मठात पाठवण्याची वनताराची भूमिका आहे.






