मल्लोझुला वेणुगोपालराव उर्फ सोनू उर्फ भूपती आणि टक्कलापल्ली वासुदेव राव उर्फ सतीश उर्फ रुपेश या दोन बलाढ्य नेत्यांसह आठवड्याभरात तब्बल २७० सशस्त्र नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आणि देशभरात नक्षल चळवळीच्या चर्चेला तोंड फुटले. विशेषत: भूपतीची शरणागती ही एक अभूतपूर्व घटना मानली जात आहे. त्याचे श्रेय घेण्यासाठी आता केंद्रीय मंत्री, पोलीस अधिकारी जरी पुढे येत असले तरी भूपतीचे मन वळवण्यासाठी खरे श्रेय दुसऱ्याच कुणाचे तरी आहे.
असिन राजाराम कुमार उर्फ अनिल आणि अंजू सुल्या जाळे हे ते जोडपं आहे ज्यांच्या प्रयत्नांमुळे वरिष्ठ माजी नक्षल नेता भूपतीने आपली शस्त्रे खाली ठेवली. माओवादी कार्यकर्ते असिन आणि त्याची पत्नी अंजू उर्फ सोनिया या दोघांनीही 2024 मध्ये आत्मसमर्पण केले होते. पोलिसांच्या नोंदी सांगतात की या निर्णयामागे आणखी एका आत्मसमर्पित माओवादीचा हात होता. त्याचं नाव असिन राजाराम कुमार. त्याने आपल्या या माजी नेत्याला एक पत्र लिहिलं, ज्यात त्याने हिंसेच्या पलीकडचं जीवन दाखवलं. आणि भूपतींनी ती वाट स्वीकारली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आत्मसमर्पण केलेल्या असिन राजाराम कुमारने भूपतींना लिहिलेल्या पत्राने भूपती आणि त्यांच्या ६० साथीदारांना शस्त्र खाली ठेवून मुख्य प्रवाहात येण्यासाठी मोठी भूमिका बजावली.
भूपतीला लिहिलेल्या त्या पत्रात असिनने लिहिले होते,’’ “प्रिय कॉम्रेड, मला ठाऊक आहे की तुम्हाला जनतेबद्दल आणि तुमच्या साथीदारांबद्दल प्रचंड प्रेम आणि करुणा आहे. तूम्ही मूलत: संवेदनशील साहित्यप्रेमी आहात, गनिमी योद्धा नव्हे. तुमच्यासाठी नेहमीच माणसं महत्त्वाची राहिली आहेत. रक्तपात तुम्हालाही नको आहे.”
‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये असिन आणि अंजू या आत्मसमर्पण केलेल्या जोडप्यांची मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. जंगलातील त्यांचे आयुष्य, भूपतींकडून मिळालेलं मार्गदर्शन आणि शस्त्र खाली ठेवण्याचा निर्णय याबद्दल ते बोलले आहेत.
एका आत्मसमर्पित माओवादी जोडप्याची कहाणी…
गडचिरोलीच्या हिरव्या टेकड्यांमधून, जिथे कधी बंदुकीचा आवाज सामान्य होता, तिथून एक नवी कहाणी जन्माला आली होती… प्रेमाची, बदलाची आणि नव्या सुरुवातीची. असिन फक्त नववीत असताना हरियाणातील नारवाना या गावातून निघून नक्षल चळवळीत सामील झाला. 2005 मध्ये घासो येथे जाट आणि दलित यांच्यात झालेल्या संघर्षात सुमारे 50 दलितांच्या घरांना आग लावण्यात आली आणि लुटमार झाली. त्या आगीत फक्त घरं नाही, तर एका तरुणाच्या मनातली न्यायाची भावना जळून उठली. “2006 मध्ये मी अबुझमाडला पोहोचलो. शिक्षण सोडलं. तेव्हाच आयुष्याने एक नवं वळण घेतलं,” तो सांगतो. त्याच्याशी संबंधित असलेल्या ‘क्रांतिकारी मजदूर किसान युनियन’ आणि माओवादी विद्यार्थी संघटना ‘जागृत छात्र मोर्चा’ यांनी दलितांच्या समर्थनार्थ कार्यक्रम आयोजित केल्याने प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई केली होती. या घटनेनंतर असिन भूमिगत झाला.
“पुढच्या वर्षी, म्हणजे 2006 मध्ये, मी हरियाणा सोडून माड (अबुझमाड, छत्तीसगड) येथे आलो. तेव्हा मी अकरावीत होतो आणि शिक्षण अर्धवट सोडले होते,” असिन सांगतो.
जंगलाकडे नेणारी वाट
2006 ते 2018 दरम्यान असिन माओवाद्यांच्या ‘प्रेस टीम’सोबत काम करत होता. सुरुवातीला तो दंडकारण्यातल्या डी.के. प्रभात प्रेसमध्ये कार्यरत होता आणि 2013 नंतर ओडिशातील जनसंघ्राम प्रेसमध्ये सामील झाला. त्यानंतर दोन वर्षे तो गडचिरोलीतील ‘कंपनी 10’ या सैनिकी विभागात होता, जिथे त्याने ग्रामपंचायत कायदे आणि वनअधिकार कायद्यावर काम केले.
अंजू सुल्या जाळे… जंगलातली शिक्षिका
अंजू सुल्या जाळे ही गडचिरोलीची आहे. सातवीत असताना तिने शाळा सोडली आणि २००७ मध्ये माओवादी संघटनेत प्रवेश केला. तिने कमांडर दिनकर याच्या नेतृत्वाखाली सहाय्यक म्हणून काम केले आणि माड परिसरातील घामंडी गावात ‘जनताना सरकार’ शाळेत शिक्षिका म्हणूनही काम केले. पुढे ती आणि असिन माडमधील त्याच प्रेस टीमचा भाग बनले. या दोघांवर दोन-दोन खटले दाखल होते आणि त्यांच्या डोक्यावर इनाम जाहीर झाले होते. असिनवर ६ लाख आणि अंजूवर २ लाख... त्यांनी ओडिशा आणि नंतर हिमाचल प्रदेशात ओळख लपवून वास्तव्य केले आणि अखेर २०२४ मध्ये गडचिरोली पोलिस व सीआरपीएफ अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केले.
भूपती उर्फ सोनू…एक नेता नव्हे, तर वडीलांसमान व्यक्तिमत्व
जंगलातील आयुष्यात, कुटुंब आणि पालकांचा आधार नसताना, भूपती हे दोघांसाठी पालकासारखे होते. असिन म्हणतो, “तो आमच्याशी इतक्या प्रेमाने वागत असे की आम्हाला कधी आई-वडिलांची उणीव भासली नाही. इतर केंद्रीय समितीचे सदस्य आम्हाला चिडवायचे आणि म्हणायचे, ‘भूपती मुलांना बिघडवतो!’”
अंजू सांगते, “मी जेव्हा भूपतींना 2008 मध्ये अबुझमाडच्या जंगलात भेटले, तेव्हा मी पंधरा वर्षांची होते. माझं बालपण त्यांच्यासोबतच गेलं. मला नेहमी वाटायचं, वडील असतील तर असेच असावेत.’ माझ्या स्वतःच्या कुटुंबाकडून मला फारसं प्रेम किंवा काळजी कधी मिळालीच नाही.”
असिनने 2008 ते 2013 दरम्यान भूपतींसोबत जवळून काम केले होते. “सुरुवातीच्या काळात मी त्यांच्या इंटरनेटसंबंधीच्या कामांची जबाबदारी घेतली होती. प्रेस रिलीज ईमेलने पाठवणे आणि बाह्य संपर्कांशी संवाद साधणे वगैरे,” तो सांगतो.
भूपतींचं मार्गदर्शन केवळ वैयक्तिक नव्हतं, तर रणनीतीच्या पातळीवर होतं. “त्यांना समजलं होतं की चळवळीचं बळ म्हणजे माणसांमाणसांमधले संबंध,” असिन म्हणतो.
केंद्रीय क्षेत्रीय गटाचे (Central Regional Bloc) प्रमुख म्हणून भूपतींच्या जबाबदारीत ओडिशा, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि तेलंगणा या राज्यांचा समावेश होता. ते सतत प्रवास करत आणि स्थानिक पथकांशी संपर्कात राहत. कधी-कधी ते पत्रकारांनाही भेटत.
मे 2025 मध्ये माओवादी चळवळीचे प्रमुख बसवराजू यांच्या एन्काउंटरनंतर नवीन महासचिव म्हणून देवुजींची निवड झाली तेव्हा भूपती नाराज होते का, या प्रश्नावर असिन म्हणतो, “भूपती यांनी देवुजींच्या निवडीला अडथळा आणला नसता. उलट, पक्ष प्रवक्ते आणि स्वीकारलेले वरिष्ठ नेते म्हणून त्यांच्या नियुक्तीत त्यांनीच मदत केली असती.”
अंजू आणि असिन दोघेही इंग्रजी व हिंदी दोन्ही भाषांत पारंगत आहेत. ते याचे श्रेय भूपतींना देतात. “दररोज ते आम्हाला एक तास वाचायला आणि लिहायला शिकवत असे,” अंजू सांगते.
प्रेम, विवाह, विचारांचा प्रवास आणि आत्मसमर्पण
भूपतींच्याच माध्यमातून या दोघांचे नाते जुळले. असिन सांगतो, “2012 मध्ये मी अंजूला लग्नाची मागणी घातली, पण ती साशंक होती. मी ‘सोनू दादा’कडे (भूपतींकडे) कामासाठी जायचो, तेव्हा ती त्यांच्या पथकात होती. मला ती खूप आवडली.”
अंजू सांगते, “असिन माझ्यापेक्षा जास्त शिक्षित होता. मला भीती वाटली की तो मला सोडून जाईल.”
भूपतींनीच मध्यस्थी केली. “त्यांनी मला समजावलं की असिन खूप चांगला माणूस आहे आणि तो कठीण परिस्थितीतही माझ्यासोबत राहील. त्यांनीच आमचं लग्न २०१३ मध्ये ठरवलं,” अंजू आठवते.
असिन सांगतो की हिमाचल प्रदेशात भूमिगत जीवन जगताना त्याला विचार करण्यासाठी वेळ मिळाला. त्याने वाचन सुरू केलं, सामाजिक माध्यमांवर आणि इतर व्यासपीठांवर लेखन करायला सुरुवात केली. त्याच काळात त्याला हिंसेचं निरर्थकपण जाणवलं.
तो म्हणतो, “गेल्या 75 वर्षांत कोणतीही समाजवादी क्रांती हिंसेद्वारे यशस्वी झालेली नाही. खरं तर, संविधानातच आपल्या बहुतेक समस्यांचे उत्तर आहे.”
डिसेंबर 2020 रोजी झालेल्या केंद्रीय समितीच्या बैठकीत भूपतीने चळवळीतील उणीवांवर बोट ठेवणारे दस्तऐवज सादर केले होते. ज्यात संघटनेच्या राजकीय आणि क्रांतिकारी भूमिकेवरच प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. परंतु केंद्रीय समितीने भूपतीचा दावा फेटाळून लावला होता. यावेळी त्याला चुकीची राजकीय भूमिका, व्यक्तिवाद, अहंकार आणि हुकूमशाही प्रवृत्ती सोडण्याचा सल्ला देण्यात आला होता.
“आता बंदूक नव्हे, पेन हातात”
असिन सांगतो की, भूपतींच्या विचारांतही 2020 नंतर बदल झाला होता. त्यांनी सशस्त्र कारवाईपेक्षा घटनात्मक आणि लोकसंगठनेवर भर देण्यास सुरुवात केली होती.
“सोनू दादा खरं तर अति-डाव्या अतिरेकी विचारांना बौद्धिक उत्तर देऊ शकतो,” तो म्हणतो.
2024 मध्ये असिन आणि अंजू यांनी आत्मसमर्पण केलं. सध्या असिन ‘लॉयड्स मेटल्स’च्या गडचिरोली येथील प्रकल्पात जनसंपर्क विभागात पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहे. “अशा नोकरीच्या संधींमुळे आत्मसमर्पणला एक अर्थ प्राप्त होतो. कार्यकर्त्यांना माहित असतं की त्यांना नोकरी, घर आणि समाजात पुन्हा सामील होण्याची संधी मिळेल,” असिन म्हणतो.
अंजू म्हणते की ती पुढे शिक्षण सुरू ठेवू इच्छिते. ती गडचिरोली पोलिसांनी आत्मसमर्पित नक्षलांसाठी सुरू केलेल्या साक्षरता कार्यक्रमाचाही भाग आहे. सरकारच्या आत्मसमर्पण धोरणाचं आणि गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या कल्याणकारी उपक्रमाचं कौतुक करत असिन म्हणतो, “जंगलातून येणारे लोक अत्यंत गरीब असतात. त्यांना मोफत जागा आणि घरं दिल्याने त्यांना आत्मसमर्पणाबद्दल कधीच पश्चात्ताप होत नाही. त्यामुळे त्यांना जगण्याचं साधन मिळतं आणि शस्त्र घेण्याची गरज संपते.”






