कुपोषण हा शब्द जरी उच्चारला तरी डोळ्यासमोर मेळघाट, जव्हार, मोखाडा इथल्या डोकं आणि पोट वाढलेल्या कुपोषित मुलांचे विदारक चित्र उभं राहतं. पण नुकत्याच उघड झालेल्या माहितीनुसार आता मुंबईत सर्वाधिक कुपोषित मुलं असल्याचे सिद्ध झाले आहे. सरकारी आकडेवारीमध्येच हे उघड झालंय.
सरकारने कुपोषणमुक्त महाराष्ट्राची हाक दिली असली, तरी राज्यातील कुपोषित बालकांची संख्या लाखाच्या घरात पोहोचल्याचे विधानसभेत दिलेल्या आकडेवारीवरून समोर आले. विशेष म्हणजे, सर्वाधिक कुपोषित बालके मुंबई उपनगरात नोंदवण्यात आली.
विधानसभेत याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर महिला व बालविकास मंत्रालयाने आकडेवारी सादर केली. यानुसार फेब्रुवारीमध्ये राज्यात एकूण एक लाख 82 हजार 443 कुपोषित बालकांची नोंद करण्यात आली. राज्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासंदर्भात राज्यातील विविध पक्षांच्या 64 आमदारांनी तारांकित प्रश्न विधानसभेत उपस्थित केला होता. 
महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी त्यावर दिलेल्या लेखी उत्तरात ही माहिती मांडली. मुंबई, उपनगर, ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, नाशिक, पुणे, धुळे, संभाजीनगर आणि नागपूर येथील सन 2025 मधील 'पोषण ट्रॅक'ची आकडेवारी यावेळी देण्यात आली.
यानुसार राज्यात फेब्रुवारीमध्ये 48 लाख 59 हजार 346 बालकांचे वजन आणि उंची तपासण्यात आली. त्यापैकी 3.16 टक्के, म्हणजेच एक लाख 51 हजार 643 बालके मध्यम कुपोषित आणि 0.64 टक्के म्हणजेच 30 हजार 800 बालके तीव्र कुपोषित असल्याची नोंद करण्यात आली.
मुंबई उपनगरात सर्वाधिक कुपोषित बालकांची नोंद करण्यात आली आहे. येथील दोन लाख 34 हजार 896
बालकांच्या वजन-उंचीची नोंद करण्यात आली. त्यापैकी 13 हजार 457 बालके मध्यम कुपोषित, तर दोन हजार 887 बालके तीव्र कुपोषित असल्याची नोंद करण्यात आली. ही टक्केवारी अनुक्रमे 5.73 टक्के आणि 1.23 टक्के अशी आहे.
|
|
सहा हजार बालकांची नोंद नाही
पोषण ट्रॅक' मध्ये मुंबई महानगरपालिकेने सहा हजार 92 बालकांच्या पोषण श्रेणीची नोंदच केली नाही, तसेच सर्वाधिक कुपोषित बालके मुंबई उपनगरात असल्याचे निदर्शनास आले आहे, यामध्ये तथ्य आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावरील लेखी उत्तरात तटकरे यांनी हे अंशतः खरे असल्याचे सांगितले.
या लेखी उत्तरानुसार, राज्यात अंगणवाडी सेविका व मदतनीसांची सुमारे तीन हजार 602 पदे रिक्त आहेत. त्याचप्रमाणे बालविकास प्रकल्प अधिकारी व पर्यवेक्षिकांची पदेही रिक्त आहेत. ही पदे भरण्याबाबत कार्यवाही सुरू आहे, असे सरकारकडून सांगण्यात आले. 
कुपोषित बालकांचे प्रमाण वाढण्याची कारणे
महानगरात आढळणाऱ्या कुपोषणाचे ढोबळ मानाने दोन भाग पडतात. एक म्हणजे गरीब वर्गात झोपडपट्टी-वस्त्यांमध्ये होणारे कुपोषण आणि उच्च मध्यमवर्गीय-उच्चभ्रू वर्गात होणारे कुपोषण.
इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे याबाबत म्हणाले की, "जगाचा विचार करता भारतात सर्वात जास्त कुपोषित बालके आहेत. अनेक रिपोर्टमध्ये तसं समोर आलं आहे.
महिला गर्भवती राहिल्यापासून योग्य आहार न घेतल्यामुळं त्यांची बालकं कुपोषित होतात. तर दुसरीकडं पुढे बाळांना प्रमाणित आणि योग्य आहार न मिळाल्यामुळं स्थूल बालकांचं प्रमाण वाढून होणारं कुपोषणही आपल्याकडं अधिक आहे."
शहरात झोपडपट्टी-वस्त्यांमध्ये होणारी कुपोषणाची अनेक कारणे स्पष्ट आहेत. तुटपुंजे उत्पन्न आणि महागाई यामुळे या ठिकाणी संतुलित आहार मिळणे अवघड असते.
यावर उपाय पोषक आहाराचा योग्य नियमित पुरवठा आहे. शहरामध्ये झोपडपट्टी भागामध्ये गर्भवती महिला स्वतःची काळजी घेत नाहीत. त्यामुळे त्यांच्या बाळावर परिणाम होतो असे भोंडवे सांगतात.
अनेक ठिकाणी मुंबईत गरीब कुटुंबीयांना संतुलित आहार परवडत नाही, तसेच शासनाकडूनही पौष्टिक अन्नाचा नियमित पुरवठा होत नाही. तसंच स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा अभाव, लिंगभेद , बालविवाह आणि पारंपरिक अन्न संस्कृती यामुळेही कुपोषणाचं प्रमाण इतर ठिकाणी अधिक असतं. तसंच मुंबईसारख्या शहरांमध्येही ते आढळते असेही डॉक्टर सांगतात.
तसेच भोंडवे पुढे म्हणाले की, उच्च मध्यमवर्गीय-उच्चभ्रू वर्गातील बहुतेक बाळांना जन्मल्यानंतर आईचे दूध कमी दिले जाते. काही महिन्यांनी बाहेरचे पूरक अनैसर्गिक खाद्य दिले जाते. पुढे काही वर्षांनी जंक फूड सारख्या पदार्थांनी स्थूलपणा वाढतो हादेखील कुपोषणाचाच एक प्रकार आहे.
कुपोषण बालकांमध्ये वाढण्याची अनेक कारण आहेत. मात्र यामध्ये आहारासाठी दिले जाणारे कमी अनुदान हे एक मोठं कारण आहे.
2017 च्या शासन निर्णयाप्रमाणे केंद्र सरकारकडून पोषक आहारासाठी एका बालकासाठी 8 रुपये दिले जातात. त्यामुळे यावरच सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना प्रश्न उपस्थित करते.






