ठाणे जिल्ह्यातील शहापूरमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका इंग्रजी माध्यमिक शाळेत विद्यार्थिनींची मासिक पाळी तपासण्यासाठी तब्बल सव्वाशे विद्यार्थिनींना विवस्त्र करून त्यांचा छळ केल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार शहापूर मधील आर. एस. दमाणी इंग्लिश स्कूलमध्ये घडला असून याप्रकरणी मुख्याध्यापिकेसह आठ जणांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये पाच शिक्षिका, दोन महिला कर्मचारी आणि एका शिपायाचा समावेश आहे.
या घटनेमुळे आता राजकीय वर्तुळातून संताप व्यक्त होऊ लागला आहे. इंग्रजी माध्यमिक शाळेत विद्यार्थिनींची मासिक पाळी तपासण्याच्या बहाण्याने त्यांना विवस्त्र करून छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला.
मुलींच्या आत्मसन्मानाला काळीमा फासणारी ही घटना आहे. शाळेत मुलींना सुरक्षित वाटले पाहिजे. बाईच्या बाईपणाचा बाजार मांडला जाऊ नये. ज्यांनी हा प्रकार केला त्यांच्या घरी मुली नाहीत का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.या प्रकरणात पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल झाले असून आणखी कोणी यात सामील आहे का हे तपासणार असल्याचंही त्या म्हणाल्या आहेत.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यातील शहापूर शहरातील आर. एस. दमाणी इंग्लिश स्कूलमध्ये जवळपास 300 हुन अधिक मुली शिक्षण घेत आहेत. 8 जुलैला सकाळी 10 ते 12 च्या सुमारास मुख्याध्यापिकेने मुलींना शाळेच्या हॉलमध्ये एकत्रित बोलावलं. त्यांनतर शाळेतील बाथरूमच्या भिंतीवर रक्ताचे डाग असलेले फोटो प्राजेक्टरवर दाखवले.
यानंतर विद्यार्थिनींना मासिक पाळी कोणाला आली आहे. याबाबत विचारणा केली. ज्या मुलींनी मासिक पाळी आलेली आहे हे मान्य केलं त्या मुलींच्या हाताचे ठसे घेण्यास पाच शिक्षकांना सांगण्यात आलं. तसेच ज्या मुलींनी मासिक पाळी आलेली नाही असं सांगितलं त्या मुलींना बाथरूमध्ये नेऊन त्यांचे कपडे काढून त्यांची तपासणी करण्याचे आदेश महिला कर्मचाऱ्यांना मुख्याध्यापिकेने दिले.
या धक्कादायक घटनेची माहिती पालकांना समजताच पालकांनी 9 जुलैला शाळा गाठत मुलींसोबत घडलेल्या प्रकारचा जाब विचारला. त्याचबरोबर इयत्ता 5वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मासिक पाळी या नैसर्गिक प्रक्रियेबाबत योग्य शिक्षण देण्याऐवजी त्यांच्यावर मानसिक परिणाम होईल अशा रीतीने या विद्यार्थिनींना विवस्त्र करण्याचा लज्जास्पद प्रकार केल्याचा आरोप पालकांनी केला. दमाणी स्कूलमधील मुख्याध्यापिकेवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत येथून जाणार नसल्याची भूमिकाही पालकांनी घेतली.
मुख्याध्यापिका माधुरी गायकवाडवर गुन्हा दाखल...
याप्रकरणी पालकांच्या तक्रारीनंतर शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी गायकवाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यावेळी पीडित मुलींचे पालक थेट पोलीस ठाण्याच्या आवारात एकत्र आले. पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता कलम ७४, ७६ सह कलम ११, १२, २९ पोक्सो अन्वये मुख्यध्यापिकेसह ५ शिक्षिका व शाळा प्रशासन व्यस्थापन समितीत असलेल्या दोन महिला अशा आठ जणांवर शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.






