‘थप्पड’ नावाचा एक चित्रपट येऊन गेला. त्यात एक दृष्य आहे… रत्ना पाठक आपल्या आवडीनिवडीबद्दल नवऱ्याला सांगते की, मी संगीत सोडलं कारण मला घर जास्त महत्वाचं वाटलं. माझ्या आईने मला हेच शिकवलं आणि आईला तिच्या आईने… ही पिढ्यानपिढ्यांची शिकवण आहे. स्त्रीचं काम म्हणजे घर आणि घर टिकवण्यासाठी तिनं तिच्या स्वतःच्या स्वप्नांचा गळा घोटला तरी चालेल.
ऑगस्ट 2025 मध्ये कॅम्ब्रिज डिक्शनरी मध्ये एक नवा शब्द समाविष्ट करण्यात आला – ‘ट्रॅडवाइफ’. ट्रॅडिशनल वाईफचा हा शॉर्टफॉर्म! डिक्शनरीमध्ये ‘ट्रॅडवाइफ’ची व्याख्या स्पष्ट करताना असे म्हटले आहे की, लग्न झालेली एक महिला जी घरकाम करते, स्वयंपाक बनवते, साफसफाई करते आणि त्याचबरोबर सोशल मीडियावर त्याचे प्रदर्शन करते.” हा शब्द डिक्शनरीत समाविष्ट करण्यामागे कारण दिले गेले की टिकटॉक, इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियावर सध्या ‘ट्रॅडवाइफ’चा ट्रेंड वाढत चालला आहे.
पण लगेचच प्रश्न उभा राहतो की असा वादग्रस्त शब्द कॅम्ब्रिजसारख्या प्रस्थापित शब्दकोशात का घ्यावा लागला? यामागचे स्पष्टीकरण असे दिले गेले की शब्दकोशाचे काम म्हणजे वापरकर्त्यांना आजच्या काळातील चर्चेत असलेल्या शब्दांशी परिचित करून देणे, मग ते शब्द वादग्रस्त का असेना.
‘’मला नोकरी नाही करायची, मी पूर्णवेळ ‘ट्रॅड वाईफ’ व्हायचं ठरवलं आहे.’’
काय प्रकार आहे हा ‘ट्रॅड वाईफ’चा,तर ट्रॅड वाईफ अर्थात ट्रॅडिशनल वाईफ म्हणजे आपली पूर्णवेळ गृहिणीपदाची जबाबदारी घेणारी स्त्री. पूर्वीच्या स्त्रियाचं हे नियमित आयुष्य आज पुन्हा एकदा नव्याने स्वीकारलं जात आहे.
खाली दिलेल्या एका आई आणि मुलीच्या संभाषणातून हा विषय आपण समजून घेऊ या…
“आरुषी, आजच्या वर्तमानपत्रातील जाहिरात बघून घे. सरकारी नोकऱ्यांची सुवर्णसंधी आहे. तुझ्या फिल्डमधील भरपूर पोस्ट आहेत. आणि हे बघ, आयटी कंपन्यांसाठीही व्हेकन्सी आहे. ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. आजच अर्ज मेल कर.”
आरुषीचं आईकडं आजिबात लक्ष नव्हतं. कुंदाताईंना तिचा रागच आला. मी काही सुचवते आहे तर या मुलीला काहीच गांभीर्य नाही. शेवटी त्या रागावून म्हणाल्या, “आरुषी, हातातील काम सोडून इकडं ये आधी. मी काही महत्वाचं तुला दाखवते आहे. हे कळत नाही का तुला?”
“आई, थोडं थांब. मी एक नवीन रेसिपी ट्राय करते आहे. ते मायक्रोवेव्ह मध्ये ठेवून मी येतेच.”
ते झाल्यावर किचन एप्रन काढून आरुषी आईसमोर आली. “अगं, आज मी ‘स्पिनच चीज रोल’ केले आहेत. सर्वांना आवडतील. मस्त सुवास येतोय ना? हं. आता बोल तू काय म्हणत होतीस?”
“आरुषी. ते नवीन रेसिपी वगैरे सर्व राहू देत. या नोकरीसंदर्भातील जाहिराती वाच आणि लगेच माझ्यासमोर तुझा अर्ज पाठव.”
“आई, मी तुला किती वेळा सांगितलं आहे की मला नोकरी करायची नाही.”
संबंधित लेख वाचा: धक्कादायक! निधी अभावी जगभरातल्या निम्म्या स्त्री संघटना बंद पडण्याच्या मार्गावर… |
“अगं, नोकरी करायची नाही. तर मग काय रांधा वाढा उष्टी काढा करत बसणार आहेस का तू आयुष्यभर? तू पदव्युत्तर आहेस. कॉलेजमध्ये मेरिटवर आली आहेस. कॉम्पुटर मधील सर्व ॲप्लिकेशन तू शिकून घेतले आहेस. सर्व कॉलिफिकेशन असताना नोकरी का करायची नाही? आणि तू नोकरी केली नाहीस तर तुझं लग्न कसं होणार?”
“आई. मी ट्रेड वाईफ अर्थात ट्रॅडिशनल वाईफ – म्हणजे आपली पूर्णवेळ गृहिणीपदाची जबाबदारी घेणार आहे. मला घरात रमायला आवडतं. किचनमध्ये वेगवेगळे पदार्थ करायला आवडतात. घरातील सजावट करायला आवडते. घरच्या बगिच्यात वेगवेगळी झाडं लावून त्याचं संगोपन करायला आवडतं.”
“आरुषी अगं, हल्ली केवळ गृहकृत्यदक्ष मुलगी कुणालाही नको आहे. सर्वंच मुलांना नोकरी करणारी. पैसे कमावणारी मुलगी हवी असते आणि हातात पैसा असेल तरच आपली सत्ता राहते. नाहीतर घरात काही किंमत राहात नाही. घरच्या कामाला काही मोल नसतं.”
“आई, तुझं म्हणणं बरोबर आहे. घरच्या कामाला काही मोल नसतंच. कारण त्याची पैशांत गणनाच करता येणार नाही. त्याच्यासाठी असलेलं प्रेम, आपुलकी पैशांत कशी मोजता येईल? तू नोकरी करत होतीस. घर आणि नोकरी सांभाळतानाची तुझी धडपड मी बघितली आहे. नोकरी करण्यासाठी तुला किती संघर्ष करावा लागला. हेही मी बघितलं आहे. मला तो करावा लागणार नाही. हे मला माहिती आहे, पण केवळ घरं सांभाळणं ही माझी आवड असू शकते. एवढं शिक्षण झालं म्हणून नोकरीच करायला हवी हा अट्टाहास का?”
“ आरुषी, गृहिणीला नेहमी गृहीत धरलं जातं. तिला मान,आदर घरात मिळत नाही. याचाही विचार कर आणि अगदीच घरात अडचणी आल्या तर दोघांची कमाई गरजेचीच असते.”
“आई, मी सुशिक्षित आहे. वेळ आलीच तर घराबाहेर पडून पैसे कमावू शकते किंवा माझ्याकडं कला आहे. मी घरबसल्या काही व्यवसाय करू शकते. पैसेही कमवू शकते. ‘ट्रेड वाईफ’ होणं ही माझी आवड आहे. मग फक्त लग्न व्हावं म्हणून मी नोकरी का करावी? घर सांभाळणं हेही एक कौशल्य आहे. पैसे कमावण्यापेक्षाही घरात पैसा कसा वाचवता येईल? घरातल्या सर्वांना सकस आणि पोषक आहार कसा देता येईल? मुलांचं संगोपन नीट कसं होईल? घरातील वातावरण आनंदी आणि उत्साही कसं राहील? घरातील संस्कार कसे जपता येतील याचा प्रयत्न मला करता येईल.
आई, घरात प्रेम आणि आदर मिळवणं ही वेगळी गोष्ट आहे. नोकरी करणाऱ्या सर्वच स्त्रियांना घरात आदर आणि जोडीदाराचं प्रेम मिळतंच असं नाही. उलट बहुतेकवेळा तिच्यापेक्षा. तिच्या पैशांवरच अधिक प्रेम असतं. मी काही मैत्रिणींचे अनुभवही ऐकले आहेत. एकमेकांच्या विचारांचा सन्मान केला. समजून घेतलं तर प्रेम आणि आदर आपोआप मिळतो. ते मिळवणं हे आपल्याही हातात असतं. आजी नेहमी म्हणायची नाही का, ‘नवऱ्याचे हृदय जिंकण्याचा मार्ग त्याच्या पोटातून सुरू होतो’. मला“ट्रेड वाईफ’ व्हायचं आहे. ज्याला माझे विचार पटतील त्याच्याशीच मी लग्न करेन.”
Trad Wife म्हणजे घरातली पारंपरिक पत्नी
तर ट्रॅड वाईफ म्हणजे काही वेगळी संकल्पना नाही तर आता आपल्याकडची संकल्पनाच विदेशातही दिसून येत आहे ज्याला ट्रॅड वाईफ असं म्हटलं जातंय. मात्र 50 च्या दशकातील ही संकल्पना अमेरिकत खूपच जास्त गाजलेली होती. Trad Wife अर्थात पारंपरिक अशी पत्नी. घरातील जबाबदारी पेलणारी आणि जिला घरातील कामे करायला अधिक आवडतात आणि घर सांभाळायला आवडते अशी पत्नी. यालाच ट्रॅड वाईफ असे म्हटले जाते. विदेशातील हा ट्रेंड आता आपल्या भारतातही पुन्हा सुरू झालेला दिसून येतोय.
50व्या दशकातील अशी पत्नी जिला स्वयंपाकघरात काम करायला आवडते आणि घर सांभाळायला आवडते. मुलांना सांभाळून घर व्यवस्थित राखणे आणि आपल्या पतीसह आनंदाने राहणे हा एकमेव अशा पत्नीचा उद्देश दिसून येतो. घर सांभाळणारी आनंदी गृहिणी अशी याची संकल्पना असून सध्या मुलांना दोन्ही पालकांचा वेळ मिळत नाही. त्यामुळे किमान आईचा अधिक वेळ त्याला मिळावा यामधून ही संकल्पना उदयाला आली असावी असं दिसून येतंय. घरात आनंदाने वेळ घालवणारी आणि आपल्या कुटुंबासाठी वेळ देणारी आई, पत्नी अशी ही संकल्पना पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये येतेय. अशा महिलेचे करिअर हे घराच्या अवतीभोवतीच घडताना दिसून येतेय.
परदेशातील ट्रेंड आता भारतातही
अनेक महिला सध्या या ट्रेंडला पाठिंबा देत असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी यावरून दोन गट पडल्याचेही सोशल मीडियावर दिसून आले आहे. मात्र अनेक महिलांना आपल्या मुलांसाठी Trad Wife व्हायचे आहे. यामध्ये लाजण्यासारखे काहीही नसून अभिमानाची गोष्ट असल्याचेही अनेक महिलांना वाटतेय. ऑफिस आणि घर या दोन्ही गोष्टी सांभाळणे आणि होणारी कसरत यामुळे महिलांना सगळेच गृहीत धरताना केवळ भारतातच नाही तर अन्य देशांमध्येही दिसून येत आहे. मात्र भारतात हे प्रमाण अधिक दिसते.
या गोष्टींमुळेच किमान एका गोष्टीत योग्य जबाबदारी घेऊन ती अधिक चांगली पार पाडता येईल म्हणून Trad Wife च्या संकल्पनेला अनेक महिलांचा पाठिंबा दिसून येतोय. पश्चिमी देशात तर अनेक महिला रील्स आणि फोटो पोस्ट करून आपण या Trad Wife ट्रेंडमध्ये अधिक आनंदी असल्याचे सध्या पोस्ट करताना दिसून येत आहेत. आपल्या होममेकर होणे अधिक आवडत असल्याचेही अनेक महिलांनी म्हटले आहे.
स्त्रीला पुन्हा घराच्या चौकटीत कैद करण्याचा प्रयत्न?
भारतीय समाजाच्या मानसिकतेचा विचार केल्यास Trad Wife हा प्रकार आपल्याकडे अधिक धोकादायक ठरू शकतो. मुंबईची स्नेहा म्हणते, “ट्रॅडवाइफच्या नावाखाली ज्या प्रतिमा वापरल्या जात आहेत, त्या प्रामुख्याने अमेरिकन महिलांच्या आहेत. कारण तिथे गृहिणी असणे ही दुर्मिळ बाब आहे. पण भारतीय संदर्भात हे जुळत नाही. येथे तर आधीपासूनच बहुसंख्य महिला गृहिणी आहेत. “घर सांभाळण्याची जबाबदारी ही स्त्री-पुरुष दोघांच्याही वाट्याला यायला हवी. यात कमीपणा किंवा गौरव असे काही नाही. ही भूमिका प्रचंड मेहनतीची असते. पण सोशल मीडियावरील अकाउंट्स ज्या पद्धतीने हे दाखवतात, त्यामुळे घरकाम करणे फार सोपे आहे असा भास निर्माण होतो.”
पुण्याची स्पेशल एज्युकेटर लक्ष्मी म्हणते की, “स्त्रीने आपलं आयुष्य कसं जगावं, हे ठरवण्याचा अधिकार तिच्याकडेच असायला हवा. माझ्या बहिणीने एमफिल पूर्ण करून आणि काही वर्षे शिकवून, शेवटी गृहिणी होण्याचा निर्णय घेतला. कारण तिला वाटलं की घर आणि नोकरी एकत्र सांभाळणे अवघड आहे. पण प्रश्न इथेच आहे… घरकामाला आपल्या समाजात अजूनही काम म्हणून मान्यता आहे का? घरकामाला कौशल्य लागत नाही, अशी धारणा अजूनही टिकून आहे. अशा वेळी ‘ट्रॅडवाइफ’ अकाउंट्स घरकामाचे कौतुक करताना, त्याच वेळी “पतीला खूश ठेवण्याचे टिप्स” देतात. म्हणजे स्त्री नाजूक राहो, हसतमुख राहो, सजूनधजून पतीला आकर्षित करो. ही प्रतिमा पितृसत्तेने ठरवून दिलेल्या चौकटीचीच पुनरावृत्ती आहे.
भारतात अजूनही स्त्रियांना करिअरकडे वळल्याबद्दल “आदर्श स्त्री नाही” असे हिणवले जाते. शिक्षण घेतलेल्या, आकांक्षा असलेल्या स्त्रियांनाही घरातच कैद करण्याची प्रवृत्ती दिसते. आज जर स्त्रिया असफल विवाहातून बाहेर पडू शकत असतील, तर त्यामागे तिची आर्थिक स्वावलंबनाची ताकद आहे. ‘ट्रॅडवाइफ’ ट्रेंड मात्र त्या लढाईनंतर मिळवलेल्या स्वातंत्र्याला मागे खेचणारा वाटतो. अशा वेळी ‘ट्रॅडवाइफ’सारखा ट्रेंड म्हणजे स्त्रीच्या स्वातंत्र्यावर कुरघोडी करण्याचा एक योजनाबद्ध प्रयत्नच वाटतो. ही केवळ फॅशन नाही, तर स्त्रीला पुन्हा एकदा घराच्या चौकटीत ढकलण्याचा सुसंस्कृत सापळा आहे.






