मानवी त्वचेवरील ‘गोंदण’... ‘गोंदण’ हा आदिवासींचा सांस्कृतिक वारसा आहे. त्यातून सांस्कृतिक ओळख पटते. शिवाय ते सौंदर्याचे लक्षण आहे, ते औषध आहे. ते मनोसामाजिक, सामाजिक-सांस्कृतिक संकल्पना या दृष्टीने संवाद साधण्याचे माध्यमही आहे. ती आदिवासींची संस्कृती अंकित करणारी ‘व्हिज्युअल भाषा’ आहे.
ज्या काळात कला किंवा कलाकार ही संकल्पना अस्तित्वात नव्हती, त्या काळात आदिवासी लोकांनी कलेचा व सौंदर्याचा उत्तम नमुना म्हणून गोंदणकलेची जगाला देणगी दिली!
गोंदण (टॅटू) नव्या जमान्यात सर्वप्रिय झाले. फक्त गोंदवून घेण्यासाठीच नव्हे तर टॅटू कलाकार होण्याकडेही युवकांचा वाढता कल आहे. सनी भानुशाली यांच्यासारखे टॅटू कलाकार जागतिक पातळीवर प्रसिद्धीस पावले आहेत. आदिवासी जमातींमधील वाघ, ड्रॅगन यांसारख्या गोंदणामधील डिझाईन्सची युवावर्गात चलती आहे.
गुगलवर ‘Indian Tattoos’ या सदराखाली आदिवासी गोंदणामधील प्रतीकात्मक चिन्हे व काळ्या रंगाचा वापर मोठ्या प्रमाणात केलेला दिसून येतो. अनेक लोक भारतीय गोंदण मिळवण्याच्या प्रयत्नात असतात. त्यांना आदिवासी जमातीतील सुंदर व शक्तिशाली ‘गोंदण डिझाईन्स’ हवी असतात. काही तरुण-तरुणी त्यांच्या पूर्वजांच्या शोधात असतात. ते भारतीय आदिम वंशाचे भाग होते याचा त्यांना अभिमान वाटतो. 
पारंपारिक गोंदणकलेचा समावेश आता कला अभ्यासक्रमात
मात्र या सगळ्यांमध्ये पारंपारिक गोंदण कलाकार कुठे आहेत? आधुनिक तंत्रज्ञानामुळे या पारंपारिक गोंदण कलाकारांची काय अवस्था होत आहे? या गोंदण कलाकारांच्या पुढच्या पिढीला काही भवितव्य आहे का? या सगळ्या प्रश्नांना सामोरे जात महाराष्ट्र सरकारने आता एक अतिशय स्तुत्य असा निर्णय घेतला आहे. हा निर्णय आहे पारंपारिक गोंदणकलेचा समावेश कला शिक्षण अभ्यासक्रमात करण्याचा…
आज मंत्रालयात महाराष्ट्रातील पारंपारिक गोंदणकलाकारांच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी काही महत्वाची पावले उचलली. पारंपारिक गोंदणकलेचा समावेश कला शिक्षण अभ्यासक्रमात करण्याकरता पावले उचलावीत तसेच गोंदणकलेच्या संदर्भातील सर्वंकष संशोधनासाठी एक अभ्यासगट तातडीने स्थापन करावा असे निर्देश आज सांस्कृतिक कार्य मंत्री.एँड श्री आशिष शेलार यांनी आज दिले.
महाराष्ट्रात विविध भागात पारंपारिक गोंदणकला खूप प्राचीन काळापासून प्रचलित असून लोकसंस्कृतीचा भाग आहे. विवाह प्रसंगासह विविध उत्सवांमधे विविध धार्मिक चिन्हे शरीरावर गोंदून घेण्याची परंपरा राज्यात अनेक समाजांमधे आहे. मात्र आधुनिक तंत्रज्ञानामुळे या कलेवर परिणाम होत आहे.
राज्याच्या सर्व भागात समाजाच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या पारंपारिक गोंदणकलेसंदर्भात सर्वंकष संशोधन होणे आवश्यक आहे, अशी भावना मंत्री आशिष शेलार यांनी यावेळी व्यक्त केली. नवयुवकांमधे टॅटू आर्टच्या माध्यमातून गोंदणकला लोकप्रिय असून गोंदणकलेमुळे हजारो नवयुवकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो.
त्यामुळे या कलेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. या कलेविषयी संशोधन करून उच्च शिक्षण अभ्यासक्रमात गोंदणकलेचा समावेश केल्यास हजारो नवयुवकांना एक पारंपारिक कला आधुनिक शिक्षणाच्या माध्यमातून उपजीवीकेसाठी उपलब्ध होईल, असेही ते म्हणाले.
गोंदण एक आदिम कलेचा वारसा…
गोंदण म्हणजे नेमकं काय? गोंदण म्हणजे शृंगार, सौंदर्य, प्रेम, शील, पावित्र्य, शूरवीरतेचे प्रतीक. गोंदण म्हणजे प्रिय व्यक्तीच्या स्मरणाची खूण. गोंदण म्हणजे एक आदिम कला, जी हरएकाला मोहित करते. गोंदण म्हणजे काटा, दगड, शिंपला, धातू, हाडे, मासोळीचे काटे यांच्या तीक्ष्ण साधनाने शरीराला चिरे देऊन चित्राकृती, चिन्ह उमटवून घेण्यासाठी केलेली मोहक नक्षी.जिच्यात झाडांच्या पानाचा, सालीचा, कोळशाचा रंग, विशिष्ट माती, स्त्रीचे दूध, कारल्याचा रस, हळदीची पूड इत्यादी रंग भरले जात.
आदिमानवांच्या ओठांनी गुणगुणलेले हे गोंदणगाणे आजतागायत अनेकांच्या मनाला भुरळ घालतंय. संपूर्ण मानवी जगण्याला व्यापणारी ही इवलीशी गोंदणनक्षी. समाज, संस्कृती, कला आणि साहित्य, गीत-संगीत आदींना व्यापून असलेली आपण बघतो.
शांता शेळकेंच्या संग्रहात ‘गोंदण’पासून ‘काळीज गोंदण’ अशी अनेक शीर्षके सापडतात. ‘नदीची वळणे नागमोडी कातळाला झऱ्याचे गोंदण’, ‘मौनाच्या देहावरती, गाण्याचे गोंदण होते’, ‘तुझ्या नावाचं गोंदण डाव्या हातावर मिरविन’ किंवा ‘तुझ्या डाळिंबी व्हटानं घ्यावं कपाळ गोंदून’ अशा असंख्य कविता आपण वाचतो. लोकगीत आणि लोककथांमध्येही हजारो संदर्भ मिळतात.
जसे ‘नांदून आलीस पण गोंदूण नाही आलीस’, ‘लागं वतरा खणाई पणन कमी कोनी धणाई’ (खूप गोंदवून घेतलेस पण कुठे बाटली नाही) तथा ‘माणूस मेल्यावर त्याच्यासोबत केवळ अंगावरील गोंदणच जाते’ यातून अनेक लोकसमजुती, मिथके तयार झालीत.
ही आकाशातली पाठीवर गोंदलेली गोंदण चांदणी शुभा गोखलेंच्या स्टुडिओवर ‘गोंदणगाव’ म्हणून मिरवून घेते. सामान्य माणसांपासून बॉलीबूड हॉलीवूडसारख्या मायानगरीवरही आपली जादू करते.
गोंदण गोंदवून घेताना खूप दुखतं, वेदना होतात, जिवाची तळमळ होते, हे खरंय; पण त्यानंतर मिळणारा सौंदर्यानुभव मात्र आयुष्यभरासाठी असतो. त्याचा आनंद आणि नशा काही औरच असते. म्हणूनच तर आज बहुतेक जण शरीराच्या कोणत्याही भागावर गोंदवून घ्यायला शरमोहया बाळगत नाहीत. असे हे संमोहित करणारे गोंदण गाणे.
गोंदण कलेची परंपरा आणि महत्त्व
गोंदणकलेच्या आरंभाबाबत निश्चित सांगता येत नाही, परंतु आदिम काळातील माणसाला जेव्हा कला अवगत झाली असावी, तिथपर्यंत गोंदणकलेचा इतिहास नक्कीच जाऊ शकेल. खऱ्या अर्थाने आदिवासींनी जन्मास घातलेली ही कला आहे. अगदीच आदिम काळात जेव्हा वस्त्रप्रावरणांचा शोध लागला नव्हता, तेव्हा शरीराच्या शृंगारासाठी, लज्जा रक्षणासाठी ही गोंदणकला आदिवासींमध्ये रूढ झाली होती.
काम करताना शरीरावर जखम होऊन त्यात रंगद्रव्य भरल्याने कायम व्रण तयार होई वा अतिभौतिक शक्तींच्या भीतीपोटीही गोंदणकला अस्तित्वात आली असावी. तिच्याद्वारा व्यक्तीचे संरक्षण होत असावे, अशी कल्पना हर्बर्ट स्पेन्सरने व्यक्त केलीय. तर नॉईबुर्गर मॉक्सने वैद्यकाच्या एखाद्या प्रक्रियेतून हा प्रकार सुरू झाला असावा, असे म्हटले आहे.
आपल्या जमातीचे वेगळेपण राखण्याच्या उद्देशाने, ओळखीसाठी, धार्मिक कारणांसाठी, लैंगिक आकर्षण वाढवण्यासाठी अशी अनेक कारणे होत. परंतु सौंदर्यवर्धन हा प्रमुख उद्देश दिसतो. एकूणच गोदणकलेचा प्रवास आदिम काळापासून नागर, आधुनिक असा झालेला आहे.
|
|
इतिहासात गोंदण कलेचे संदर्भ कसे सापडले?
गोंदणाचे ऐतिहासिक संदर्भ शोधता नवपाषाण युगातील 5300 वर्षांपूर्वी सापडलेल्या ‘ओत्झी द आईस मॅन’ ओत्झ व्हॅलीतल्या या आदिमानवाच्या अंगावर 57 खुणांची गोंदण चिन्हे आढळली होती. 1948 मध्ये पाझरीक येथे एका गोठलेल्या थडग्यात ख्रिस्तपूर्ण 400 वर्षामागच्या एका म्हाताऱ्या जमात प्रमुखाचे प्रेत सापडले. त्याच्या अंगावर एडका, गाढव, हरीण, पक्षी, मासा, बोकड, राक्षस अशी चित्रे गोंदलेली होती. इजिप्त, सुदानमध्ये स्त्रियांच्या ममीच्या अंगावर आणि चेहऱ्यावर गोंदणे असत.
देवाची चिन्हे ते गोंदवित. गाणिका आणि राजनर्तिकांच्या मांड्यात माशांच्या काट्याने गोंदण कोरले जाई. ग्रीसच्या प्राचीन साहित्यात रानटी लोकांचे सरदार गोंदवित. जपान, चीनमध्ये गोंदणकलेला मानाचे स्थान आहे. न्यूझीलंडच्या माओरी जगातील ही कला प्रगत होती. अमेरिकेतले रेड इंडियन, जगभरातले आदिवासी अंगावर चित्र गोंदवित. अतिपूर्वेकडील ही कला जिप्सींनी भारतामार्गे युरोपात नेली, असे अभ्यासक मानतात.
आदिवासींच्या या कलेला बायबलेने निषिद्ध ठरविले होते. पैगंबरानेही मनाई केली. वैदिक वाङ्मयातही उल्लेख सापडत नाही, पण कालांतराने हिंदू संस्कृतीने गोंदण कला स्वीकारली. द्रविडांमध्ये ही कला चालू होती. नागरसंस्कृतीत ती आतापर्यंत गावंढळ वा रानटीपणाचे लक्षण म्हणून हेटाळळी गेली.
गोंदणाचे वेगवेगळे अर्थ
जगभरातल्या असंख्य आदिवासी भटक्या लोकसमूहांनी गोंदणकला जपली, जिवंत ठेवली. म्हणून निसर्ग आणि निसर्गातील सुष्ट-दुष्ट शक्तींचं प्रतीक म्हणून त्यांच्या जगण्याच्या, कलेच्या केंद्रस्थानी राहिली आहे. म्हणून त्यात आदिम संस्कृतींची प्रतीकात्मकता आढळते. निसर्गाची नानािवध रूपे, विशिष्ट असे अर्थ आणि समज दडलेले आहेत.
टिंबांच्या आकृत्या, मोर, मासे, स्वस्तिक, चित्रे, फुलपाखरे, तारे, फुलवेली-नक्षी, सिंह, सूर्य, ड्रॅगन, विंचू, पक्षी, परी, नाना तऱ्हेच्या आकृत्या, ठिपके, रेघा, गोंदल्या जात. स्त्रिया गाल, कपाळ, हनुवटी, छाती, स्तन, पाठ, कंबर, पाय, दंड, मनगट, मान इत्यादीवर तसेच भांगेखाली गोंदवून घेत. तर पुरुष हातापायांवर, दंड-छातीवर गोंदवित. आवडत्या व्यक्तीचे, नवऱ्याचे, भावाचे नाव हातावर गोंदवून घेण्याची प्रथा अजूनही दिसते. 
आदिवासी भटक्या-विमुक्त समूहांमध्ये गोंदणाला दागिन्यापेक्षा अधिक महत्त्व आहे. मुलगी सासरी जाताना माहेरची आठवण म्हणून फक्त गोंदण अंगावर घेऊन जाई. स्त्रियांमध्ये गोंदणाचे विशेष आकर्षण आढळते. गोंदणकलेतून जगभर अनेक प्रथा निर्माण झालेल्या दिसून येतात.
सॉलोमन बेटावरील जमातीत चेहऱ्यावर व छातीवर गोंदवून घेतल्याशिवाय मुलगी विवाहास योग्य ठरत नाही. ऑस्ट्रेलियात आदिवासी लग्नापूर्वी मुलीच्या पाठीवर गोंदतात. तैवानमध्ये लग्नाआधी मुलीचा चेहरा गोंदतात. पौपुआन जमातीत मुलीच्या सर्व अंगावर गोंदण्यात येते. नागा जमातीत गोंदल्यानंतरच तरुणांची लग्नं होतात. काही प्रतीके कुलाचाराप्रमाणे गोंदली जात. गोंदणामुळे सौंदर्यात भर पडते.
गोंदणाचा ॲक्युपंक्चर उपचार पद्धतीशी काही संबंध असावा, असा अंदाजही अनेक जण बांधतात. गुडघादुखीवर गुडघा गोंदवून घेणे, डोकेदुखीवर कपाळ गोंदवून घेणे अशाही अनेक प्रथा आढळतात. कोलामांमध्ये शरीर गोंदवून घेतल्यामुळे देवी निघत नाही, हा समज आहे. वारलींमध्ये घरावर कुठल्याही प्रकारचं संकट येत नाही, अशी श्रद्धा आहे.
शिवाय गोंदणामुळे रानावनात भूतपिशाच्चाची बाधा होत नाही. गोंदणामुळे नवऱ्याला दीर्घायु लाभतं, प्रेम टिकतं, असंही मानलं जातं. खरं तर गोंदणात आपल्या संस्कृतीचं संचित आढळतं. आदिम संस्कृतींच्या डोक्या-खांद्यावर आधुनिक संस्कृती आरूढ होताना आपण पाहतोय.
आज महानगरीय जगण्यात वावरताना सहज एखाद्या तरुणी, स्त्री, युवकांच्या घोळक्यावर नजर टाकली की, दोघा-चौघांच्या हात, मानेवर एखादं लहानमोठं नाजूकसं गोंदण हमखास दिसून येतं. आजकालचे तरुण शरीराच्या हव्या त्या भागावर आनंदाने गोंदवून घेतात. फॅशनच्या युगात अनेक पारंपरिक कला कात टाकत असताना गोंदणकलेला मात्र खऱ्या अर्थाने बहर येतोय.
अँजेलीना जेली, मेनग फॉक्स, पामेला ॲडरसन, इमा स्टोन, केविन पिटरसन, डेव्हिड बॅकहॅम, माईक टायसन, रॉक, ब्रॅडपीट, अक्षयकुमार, दीपिका पडुकोण, प्रियांका, कंगना, शृती हसन, रणबीर कपूर असे शेकडो स्टार्सही या गोंदणगाण्याला भुललेत. म्हणूनच आदिमांच्या गोंदणगाण्याची नशा जेवढी जुनी तेवढी अधिक खोल मुरलेली, म्हणावी लागेल.






