गेल्या दोन वर्षांत भारतात किमान 75 हजार महिलांना डाकीण अथवा चेटकीण ठरवण्यात आले तर अडीच हजार महिलांना चेटकीण ठरवून त्यांची हत्या करण्यात आली. चेटकीण ठरवण्यामध्ये 97% महिला दलित, मागासवर्गीय किंवा अत्यंत मागासवर्गीय जातींमधील आहेत.
याच पार्श्वभूमीवर बिहारच्या पौर्णिया जिल्ह्यातून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. येथे चेटकीणीच्या संशयातून एकाच कुटुंबातील पाच जणांना जबर मारणार करण्यात आली. ते इथवर थांबले नाहीत तर त्यांनी पाचही सदस्यांना जिवंत जाळण्यात आलं. ही भयंकर घटना मुफ्फसल पोलीस ठाणे हद्दीतील टेटगामा गावात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गावातील रामदेव उराव याच्या मुलाचा या अघोरी प्रकारादरम्यान मृत्यू झाला होता आणि दुसऱ्या मुलाची तब्येत बिघडली. यानंतर गावकऱ्यांनी मुलाच्या मृत्यूसाठी गावातील बाबुलाल यांच्या पत्नीला चेटकीण असल्याचं मानत कुटुंबावर निशाणा साधला. बाबुलाल उराव (पती), सीता देवा (पत्नी), मनजीत उराव (मुलगा), राणी देवी (सून) आणि मो कातो (आई) यांना गावकऱ्यांनी जबर मारहाण केली आणि त्यानंतर पाचही जणांना जिवंत जाळलं. हे सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. गावातील अनेकजण आपलं घर सोडून दुसरीकडे निघून गेले आहेत.
पोलिसांनी या प्रकरणात एक आरोपी नकुल कुमार याला अटक केली आहे. याच्यावर पाच जणांचा जिवंत जाळणं आणि गर्दीला चिथावल्याचा आरोप आहे. या घटनेत बचावलेला एकमेव व्यक्ती ललित कुमारने सांगितलं की, त्याच्या संपूर्ण कुटुंबाला काळी जादू केल्याच्या संशयातून जाळण्यात आलं. याशिवाय हत्या केल्यानंतर मृतदेह तलावात फेकून देण्यात आले.
हत्याकांडामागील नेमकं कारण काय आहे?
टेटगावात रामदेव उरावचं कुटुंबीय राहतं. रामदेव यांचा मुलगा आजारी होता. कुटुंबाने तंत्र-मंत्राचा आधार घेतला. मात्र त्याची तब्येत अधिक खालावली आणि यातच त्याचा मृत्यू झाला. रामदेवला गावातील बाबूलाल उराव आणि त्याच्या कुटुंबीयांनी काळी जादू केल्याचा संशय होता. त्याने उराव कुटुंबाला मुलाच्या मृत्यूसाठी जबाबदार धरले. त्यांनी काळी जादू करून मुलाला मारल्याचा संशय व्यक्त केला. बाबूलाल याची बायको चेटकीण असल्याचं मानत त्याने गावातील कुटुंबाला एकत्र केलं आणि कुटुंबाला जिवंत जाळलं.
रात्री एक वाजता बोलावली पंचायत...
रविवारी रात्री गावात पंचायत बोलावण्यात आली. साधारण तीन गावातील 300 लोक या पंचायतीत सामील झाले. दोन ते तीन तास पंचायतीची बैठक सुरू होती. काही पंचांनी बाबूलाल आणि त्याच्या कुटुंबीयांना जबाबदार धरलं. यानंतर रात्री साधारण एक वाजता कुटुंबातील पाच सदस्यांना घरापासून 50 फूट अंतरात घेऊन जाण्यात आलं. येथे त्यांना जबर मारहाण केली. रश्शीने बांधण्यात आलं. यानंतर त्यांन जिवंत जाळलं. या घटनेवेळी तेथे शेकडो गावकरी उपस्थित होते. पीडित कुटुंब जीवाची भीक मागत होते. मात्र कोणीच त्यांच्या मदतीला आलं नाही. ही गर्दी त्यांना जिवंत जळताना पाहत होती.
भारतात डाकीण, चेटकीण म्हणून ठरविल्या गेलेल्या महिलांची अवस्था अत्यंत भयंकर आहे. त्यांना जमावाकडून ठेचले जाते, कधी चिरडून टाकले जाते, डोक्यावरील केस जबरदस्तीने काढले जातात, लैंगिक अत्याचार केला जातो, विष्ठा खायला लावली जाते आणि नग्न केले जाते. भारताला स्वातंत्र्य मिळून 78 वर्षे झाली, तरीही चेटकीण शिकारी (witch haunting) सारख्या स्त्रीविरोधी प्रथा आजही मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात आहेत, मात्र हे वास्तव अदृश्यच राहते. हे वास्तव फक्त त्या वेळी समोर येते जेव्हा त्या महिलांचा मृत्यू होतो. परंतु ज्या महिलांचा मृत्यू होत नाही, त्या जगण्यासही विवश होतात, वेगळया ठेवल्या जातात, समाजाकडून अपमानित होतात आणि त्यांचे सन्मानाने जगणे संपते.
भारतात चेटकीण समजून 2,500 महिलांच्या हत्या
निरंतर ट्रस्टने 2023-24 मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार, चेटकीण प्रथा प्रतिबंधक कायदा (1999) लागू होऊन 25 वर्षे झाली असली, तरीही ही प्रथा आजही सुरू आहे. किमान 75,000 महिलांना बिहारमधील प्रत्येक गावात किमान दोन किंवा त्याहून अधिक महिलांना चेटकीण ठरविले जाण्याची आणि त्यानंतर होणार्या हिंसाचाराची भीती सतत भेडसावत असते. राष्ट्रीय गुन्हे नोंदवही प्राधिकरणाच्या (NCRB – National Crime Records Bureau) माहितीनुसार, 2000 सालापासून चेटकीण ठरविल्या गेलेल्या 2,500 हून अधिक महिलांची हत्या झाली आहे.
बिहारमधील सर्वेक्षणानुसार, 114 गावांतील 145 महिलांशी झालेल्या चर्चेनंतर असे आढळले की, चेटकीण ठरवून झालेल्या हिंसाचाराच्या बळी गेलेल्या 75% महिला 46 ते 66 वयोगटातील होत्या, त्यापैकी 97% महिला दलित, मागासवर्गीय किंवा अत्यंत मागासवर्गीय जातींमधील होत्या. त्यातील बहुतांश महिला भूमिहीन कुटुंबांमधून होत्या. धकादायक बाब म्हणजे उच्चवर्णीय महिलांना कधीच लक्ष्य केले जात नाही. कोणीही त्यांना चेटकीण ठरविण्याचे धाडस करत नाही.
सर्वेक्षणात असेही आढळले की, 73% महिलांनी कधीच शाळेचे तोंड पाहिले नव्हते आणि 66% कडे कोणताही नियमित रोजगार नव्हता. आर्थिक दुर्बलता आणि शिक्षणाच्या अभावामुळे या महिला सहज लक्ष्य बनतात. अधिक चिंताजनक बाब म्हणजे, फक्त 31% पीडित महिलांनीच आपला गुन्हा पोलीस किंवा पंचायतींकडे नोंदविला आणि त्यापैकी 62% ना कोणताही न्याय मिळाला नाही. शिवाय, सर्वेक्षणातील 85% गावच्या नेत्यांना 1999 च्या कायद्याबद्दल कोणतीही माहिती नव्हती.
NCRB च्या ‘क्राइम इन इंडिया रिपोर्ट 2022’मध्ये हे वास्तव स्पष्टपणे दिसून येते. या अहवालानुसार, त्या वर्षातच भारतभरात जवळपास 85 लोकांची चेटकीण ठरवून हत्या करण्यात आली. मागील दहा वर्षांत, 2012 ते 2022 दरम्यान, चेटकीण शिकारीशी संबंधित हिंसाचारात 1,184 महिलांनी प्राण गमावले. या घटनांमध्ये सर्वाधिक पीडित झारखंडमधून (22.6%), ओडिशामधून (16.1%), मध्य प्रदेशमधून (15.1%) आणि छत्तीसगडमधून (13.1%) होते.






