- सविता चौहान
ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा जगभरात जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा करण्यात आला. भारतीयांना तर 'आईच्या दुधा'चं माहात्म्य अनेक चित्रपट, मालिका, पुस्तक आणि बऱ्याच वेगवेगळ्या माध्यमांतून सांगितलं जातं. नुकत्याच जन्मलेल्या बाळासाठी तर आईचं दूध अमृताहूनही जास्त गरजेचं असतं. वैद्यकीय तज्ज्ञांनी तर असं सांगितलंय की बाळ जन्माला आल्यानंतर पहिले सहा महिने बाळाला आईच्या दुधाशिवाय इतर कशाचीही गरज नसते, अगदी पाण्याचीही नाही. आईचं दूध बाळासाठी तर महत्वाचं आहेच पण त्या बाळाच्या माध्यमातून मातृत्वाचा सुंदर अनुभव घेणाऱ्या आईसाठी देखील स्तनपान तेवढंच महत्वाचं आहे.
पण आज आपण या लेखातून स्तनपानामुळे पर्यावरणाचे रक्षण कसे होत असते अशा एका वेगळ्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत. आपण पर्यावरण वाचवण्याच्या किंवा संसाधनांची बचत व शाश्वततेच्या उपाययोजनांबाबत बोलतो तेव्हा बहुतेक वेळा वृक्षारोपण, हरित ऊर्जा, सौर तंत्रज्ञान यांसारख्या मोठ्या उपाययोजना समोर येतात. मात्र, एक आईचे आपल्या बाळाला स्तनपान करणे, हाही पर्यावरण रक्षणाचा एक महत्त्वाचा भाग ठरू शकतो, हे आपल्याला माहीत आहे का?
प्रत्येक माता बाळाला दूध पाजताना पर्यावरणचे रक्षण करत असते
स्तनपान ही केवळ एक जैविक प्रक्रिया नाही, ती एक नैसर्गिक, शाश्वत आणि संसाधन-संरक्षण करणारी क्रिया आहे. ती केवळ आई आणि बाळाच्या आरोग्यास फायदेशीर नाही, तर स्तनपानामुळे पर्यावरणावरील ताणही कमी होत असतो. पाण्याची टंचाई, प्लास्टिक प्रदूषण आणि हवामान बदलाच्या संकटांनी ग्रस्त झालेल्या या जगात, स्तनपान हे एक सुलभ आणि शाश्वत पर्याय म्हणून समोर येत आहे. स्तनपान हा एक असा पर्याय आहे जो कोणत्याही अतिरिक्त संसाधनांशिवाय, कचरा न करता आणि कार्बन उत्सर्जन न करता पोषण, काळजी आणि संरक्षण या सगळ्यांचा समतोल राखतो.
स्तनपानासाठी कोणतीही पॅकेजिंग लागत नाही, कोणतीही फॅक्टरी किंवा यंत्र लागत नाही, त्यासाठी रसायनांचा वापरही होत नाही. हे एक शंभर टक्के ‘झिरो-वेस्ट’ पोषण तंत्र आहे. प्रत्येक वेळी जेव्हा एखादी आई बाळाला स्तनपान करते, तेव्हा ती अप्रत्यक्षपणे पाणी, गॅस, वीज आणि इतर संसाधनांची बचत करत असते.
पुण्याच्या माया देवी सांगतात, “माझ्यासाठी स्तनपान करणं सगळ्यात सोप्पं आहे. पण काही महिन्यांपासून दूध कमी पडतंय म्हणून मी गायीचं दूध वापरते. ते महाग आहे, आणि ते दूध गरम करणं, बाटली धुणं यात सगळा वेळ यात जातो. दोन महिन्यांनी नवीन बाटली घ्यावी लागते.” माया देवींनी मुलाला बाटलीतून दूध पाजण्यासाठी ‘मॉरिसन’ ब्रँडची 283 रुपयांची बाटली घेतली आहे. त्यामुळे यातून हे सिद्ध होतं की स्तनपान हे केवळ नैसर्गिकच नाही, तर आर्थिकदृष्ट्याही फायदेशीर आहे.
स्तनपान : ना कार्बन उत्सर्जन, ना प्लास्टिकचा वापर
‘ब्रेस्टफीडिंग सपोर्ट फॉर इंडियन मदर्स’ (BSIM) संस्थेच्या सीईओ आधुनिका प्रकाश म्हणतात, “स्तनपानाएवढं पर्यावरणपूरक दुसरं काही नाही. यात ना कार्बन उत्सर्जन होतं, ना प्लास्टिकचा वापर.” त्यांचे म्हणणे आहे की फॉर्म्युला दूध (पावडरचे दूध) देणं चुकीचं नाही, पण बहुतांश मातांना त्यातून होणाऱ्या पर्यावरणीय परिणामांची माहितीच नसते. ‘बायोमेड सेंट्रल’च्या एका अभ्यासानुसार 1 किलो पावडरचे दूध तयार करताना सुमारे 4 किलो कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन होते. या पार्श्वभूमीवर. स्तनपान हे हवामान बदलाला थोपवण्यासाठी एक प्रभावी उपाय मानले जाऊ शकते.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार, बाळाला जन्मानंतरचे पहिले सहा महिने केवळ आईचं दूध द्यावं आणि त्यानंतर दोन वर्षांपर्यंत ते सुरू ठेवावं. स्तनपान आई आणि बाळाचं नातं अधिकाधिक दृढ करतं. बाळाला लागणारे उष्मांक, जीवनसत्व, अँटी बॉडीज, लॅक्टोफेरॉन, इम्युनोग्लोब्लिन्स ही सत्वं बाळाची रोग प्रतिकारकशक्ती वाढवत असतात. स्तनपानामुळे बाळ आजारी कमी पडतो, त्यामुळे डॉक्टरकडे जाणं, औषधं आणि इंजेक्शन यांचा वापरही कमी होतो.
संबंधित लेख वाचा: 1) सानिया मिर्झा म्हणते तसं, खरचं वर्किंग वुमनसाठी ‘स्तनपान’ हे मोठं आव्हान आहे का…? |
इंजेक्शन, औषधांच्या बाटल्या या ही सगळी गोष्टी प्लास्टिकपासूनच तयार होतात आणि त्यामुळेही प्रदूषणात आपण भर घालत असतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, दरवर्षी जगभरात १६ अब्ज इंजेक्शन वापरली जातात. या सर्वांचं सुरक्षित निपटारा होतोच असं नाही, त्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो, कचऱ्यात वाढ होते. त्याउलट, स्तनपानामुळे कचऱ्याचं प्रमाण फारच कमी राहतं.
पावडरच्या दूधाने काय काय नुकसान होऊ शकतं?
फॉर्म्युला दूध उद्योगाकडून तयार होणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्या, सिंगल-यूज कंटेनर, सिलिकॉन निप्पल्स, लेबल्स आणि जाहिरातींसाठी वापरण्यात येणारं साहित्य, यामुळे दरवर्षी लाखो टन प्लास्टिक, धातू आणि कागद लँडफिलमध्ये जातो. एका अभ्यासानुसार, 55 कोटी फॉर्म्युला म्हणजेच पावडरचे डबे तयार करण्यासाठी 86,000 टन धातू आणि 3,64,000 टन कागद लागतो, ज्याचा नंतर कचरा तयार होतो. परिणामी पर्यावरणालाच नव्हे, तर सार्वजनिक आरोग्यालाही त्यामुळे धोका निर्माण होतो.
स्तनपानाचे अर्थकारण
फॉर्मुला किंवा दूध पाउडर बनवणाऱ्या कंपन्या ही बहू अब्जावधी डॉलरची इंडस्ट्री आहे. आजच्या घडीला जगात फार्मूला कंपन्यांची 90 अब्ज अमेरिकन डॉलरची उलाढाल आहे. आपल्या देशात इन्फान्ट फॉर्मुलाचे मार्केट सुमारे 6 अब्ज अमेरिकन डॉलरचे आहे. यामध्ये काही मोजक्याच बहुराष्ट्रीय कंपन्यांची मक्तेदारी आहे. ह्या कंपन्यांनी विकसनशील देशात आपले पाय रोवण्यासाठी तात्विकदृष्ट्या खूप गैरमार्गांचा वापर केला. आक्रमक जाहिरात तंत्राने न्यूनगंड निर्माण करत 'आईच्या दुधापेक्षा फॉर्मुला जास्त चांगला' असे ठसवले. विकसित देशात फॉर्मुला 'नॉर्मलाईज' केला गेला. काही गरीब देशात तर हॉस्पिटल करवी फॉर्मुलाची फ्री सॅम्पल वाटली गेली. त्यामुळे, आईच्या दूध करण्याच्या क्षमतेवर दुष्परिणाम झाल्यामुळे त्यांना फॉर्मुला विकत घेण्यावाचून पर्याय राहिला नाही.
फॉर्मुला बनवण्यासाठी वापरले गेलेले खराब पाणी यामुळे मुलांचे आरोग्य बिघडू लागले आणि महाग असल्यामुळे पातळ फार्मूला मुलांना पाजल्याने कुपोषणात भर पडू लागली. विकसित देशात याउलट परिणाम दिसू लागला, मुलांमध्ये लठ्ठपणा वाढीस लागला. बाळांच्या म्हणजेच पुढच्या पिढीच्या आरोग्यावर गरज नसताना दिल्या जाणाऱ्या फॉर्मुला दुधाचे असंख्य दुष्परिणाम मुलांमध्ये दिसू लागले.
त्यामुळे 70 च्या दशकात जागतिक पातळीवरच्या बालहक्क संघटनांनी या कंपन्यांच्या भांडवलखोरी आक्रमक जाहिरातबाजीविरुद्ध आवाज उठवला. त्यावर WHO ने फॉर्मुलाच्या विक्री आणि जाहिरात संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे (WHO कोड) तयार केला. हा कोड सर्व आरोग्यसेवा केंद्र, दवाखाने, डॉक्टर, नर्सेस, स्तनपान सल्लागार, औषधविक्रेते यांना बंधनकारक आहे. या अंतर्गत फार्मूला दुधाची प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष जाहिरात करण्यास मनाई आहे. फॉर्मुलाचे फ्री सॅम्पल देण्यास मनाई आहे.
हवामान संकट असताना स्तनपान कसे महत्वाचे ठरते?
हवामान बदलाचे संकट वेळोवेळी उद्भवत असताना जेव्हा वीज, पाणी आणि वाहतुकीची साधनं अपुरी पडतात तेव्हा स्तनपान हा एकमेव पोषणाचा विश्वसनीय मार्ग ठरतो. युनिसेफच्या एका अहवालानुसार, आपत्तीमुळे विस्थापित झालेल्या कुटुंबांमध्ये स्तनपान हा बाळासाठी सुरक्षित, पोषक आणि सहज उपलब्ध असलेला अन्नस्रोत ठरतो. पिण्याचं पाणी दूषित झालेलं असताना फॉर्म्युला दूध देणं धोकादायक ठरू शकतं.
स्तनपानाविषयी असणाऱ्या आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार बाळाला आईच्या दुधाशिवाय इतर कशाचीही गरज नसते. बाळाला फक्त कोलेस्ट्रॉलची गरज असते आणि आईच्या दुधातून तेच मिळतं. आपल्याकडे बाळाला लोणी, गूळ, मध अशा गोष्टी चाटवण्याची पद्धत आहे पण हे सगळं चुकीचं आहे. उन्हाळा जास्त असेल बाळाला पाणी कमी पडू शकतं अशी भीती वाटू शकते. मात्र आईच्या दुधात 87 टक्के पाणी असतं त्यामुळे बाळाला आईच्या दूधातूनच योग्य प्रमाणात पाणी मिळत असतं.
भारताची स्तनपानाची आकडेवारी चिंताजनक
याबाबतीत भारताची अधिकृत आकडेवारी बघू. 2021 च्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-5 नुसार, भारतात जन्मल्यानंतर पहिल्या तासात (गोल्डन अवर मध्ये) बाळाला स्तनपान देण्याचं प्रमाण केवळ 41.6% आहे. सहा महिने केवळ आईचे दूधच बाळाला देण्याचे (Exclusive Breastfeeding) प्रमाण सुमारे 53% आहे. म्हणजे प्रत्येक दोन मुलांमागे एक बाळच सहा महिन्यांपर्यंत केवळ आईचे दूध पिते. साधारण निम्म्या बाळांना सहा महिन्याच्या आतच आईच्या दुधासोबत किंवा दूधाखेरीज अन्य आहार दिला जातो. त्यामुळे, 38% बाळांची वाढ खुंटली (stunting) आहे. WHO नुसार सहा महिने केवळ स्तनपानाचे देशातील प्रमाण किमान 70% असायला हवं. म्हणजे आपल्याला अजुन किती मजल गाठायची आहे.
अर्थात ही आकडेवारी NFHS-4 हून चांगली आहे. याचा अर्थ आपली आरोग्य यंत्रणा योग्य दिशेने प्रयत्न करत आहे. पण अजूनही आपण कुठे कमी पडतोय? ही आकडेवारी आरोग्यदृष्ट्या चिंताजनक आहे. स्तनपान हे केवळ वैयक्तिक अनुभव नाही, तर ते पर्यावरणीय आणि सामाजिक धोरणाचा भाग असावं. ग्रामीण भागात स्तनपानाबद्दल जागरूकतेचा अभाव आहे, म्हणून स्थानिक भाषांमध्ये जनजागृती मोहिमा गरजेच्या आहेत.
दिल्लीच्या आशा ताई म्हणतात, “सार्वजनिक ठिकाणी असलेल्या सिसिटीव्हीमुळे मी मुलाला दूध पाजू शकत नाही. स्तनपानांसाठी सार्वजनिक ठिकाणी खोल्या आहेत मात्र त्यात स्वच्छतेचा अभाव असतो आणि नंतर त्या खोल्या बंद ठेवलेल्या असतात.एक आई आपल्या बाळाला दूध देण्यासाठी कोपरा शोधत राहू नये, यासाठी समाजाला जागरूक करणे आवश्यक आहे.
स्तनपानाला प्रोत्साहन देताना हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की तो महिलेचा वैयक्तिक निर्णय असतो. पर्यावरणीय आणि आरोग्याच्या फायद्यांमुळे त्यावर सक्ती होऊ नये. महिलेला माहिती, आरोग्यसेवा आणि मानसिक आधार दिला गेला पाहिजे, जेणेकरून ती स्वतः निर्णय घेऊ शकेल. स्तनपान ही केवळ एक आई आणि बाळ यांच्यातील नाळ नाही, ती एक अशी पर्यावरणपूरक कृती आहे जी आपल्याला शाश्वत भविष्यात घेऊन जाऊ शकते. कार्बन उत्सर्जन, प्लास्टिक कचरा, पाणी आणि ऊर्जा वापर यांचं प्रमाण कमी करून स्तनपान एक ‘हरित क्रांती’ घडवू शकतं, जी आपल्या घरापासून सुरू होते.
(संदर्भ - फेमिनिजम इन इंडिया)






