- शंतनू खुजे
मावळ तालुक्यातील डोंगर-दऱ्यांत वसलेल्या जवळण या छोट्याश्या गावात कातकरी समाजातील एक साधी, शांत स्वभावाची महिला राहत होती. आयुष्य तिच्यासाठी आधीच संघर्षमय होतं, पण एक दिवस तिच्या जगण्यालाच जणू ग्रहण लागलं. कुष्ठरोगाचे चिन्ह दिसताच तिच्या आयुष्याने उध्वस्त होण्याचा मार्ग धरला. नवऱ्याने सोडून दिलं, नातेवाईकांनी तिरस्कार केला आणि समाजाने उघडपणे बहिष्कार टाकला.
आई-वडिलांच्या आधाराशिवाय तिच्या डोळ्यात पाणी आणि छातीत वेदना याशिवाय काहीच उरलं नव्हतं… पण ती हार मानणाऱ्यांपैकी नव्हती. अंधार गडद झाला तरी तिच्या मनात कुठेतरी एक छोटा दिवा पेटलेला होता,
"मी जिंकणार… मी पुन्हा उभं राहणार!"
ती आज बरी झाली आहेच, पण सर्वांत महत्त्वाचं म्हणजे ती इतरांना बरे करण्याचं बळ बनली आहे.
(डॉ. विजय वाळेकर)
ही एक उपचाराची कथा नाही, तर ही पुनर्जन्माची कथा आहे!
मावळ तालुक्यातील डोंगर-दऱ्यांत वसलेल्या जवळन या छोट्याश्या गावात कातकरी समाजातील कल्पना (नाव बदललेले) नावाची महिला राहत होती. वयाच्या विशीतच लग्न झाल्यानं आयुष्य तिच्यासाठी आधीच संघर्षमय होतं, पण एक दिवस तिच्या जगण्यालाच जणू ग्रहण लागलं. 2021 मध्ये नोव्हेंबरच्या सुमारास जेव्हा ती गर्भवती होती तेव्हा ती नियमित तपासणीसाठी मावळच्या येळसे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आली आणि तिथेच तिला कुष्ठरोग असल्याचं निदान झालं.
ज्यांना कल्पनाच्या या आजाराबद्दल निदान लागलं ते मावळच्या ठाकुरसाई उपकेंद्राचे डॉ. विजय वाळेकर ‘बाईमाणूस’शी बोलताना सांगतात, आमच्या इथे जवळण म्हणून गाव आहे, जेव्हा त्या गावामध्ये ज्यावेळेस आमचं ‘रुटीन सेशन’ होतं, त्यावेळेस ती तिथे आली होती. तिच्या कानाच्या पाळ्या आणि चेहऱ्यावर असलेल्या फोडींवरून आमच्या लगेचच लक्षात आलं की हे कुष्ठरोगाचं लक्षण आहे, त्यातच ती गर्भवती असल्यामुळे आणि कुष्ठरोगासारखाआजार असल्यामुळे ती अति जोखमीची रुग्ण म्हणून आयडेंटिफाय झाली…
संबंधित लेख वाचा: आपण कुष्ठरोग निर्मूलनाच्या अद्याप जवळपासही पोहोचलेलो नाही… |
यानंतर तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने कल्पनावर प्राथमिक उपचार सुरू करण्यात आले. पण अधिक व्यवस्थित उपचार होण्यासाठी तिला पुण्यातील ससून रुग्णालयात पाठवण्यात आलं. पण “आम्हाला न सांगता तिला ससूनला का पाठवलं” असं म्हणत तिच्या घरच्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. ज्या आशा वर्करच्या मदतीने तिला ससूनला पाठवण्यात आले होते, तिला कल्पनाच्या घरच्यांनी जाब विचारायला सुरुवात केली.
ससून हे सरकारी रुग्णालय असल्याने कल्पनाची तिथे गैरसोय होईल अशा भावनेनं तिच्या नातेवाईकांनी आशा वर्करच्या घरी गोंधळ घातला. पण प्रत्यक्षात मात्र कल्पनावर ससून रुग्णालयात योग्य पद्धतीने उपचार सुरू होते. आशा वर्कर यांच्यावर कल्पनाच्या कुटुंबीयांचा वाढता दबाव लक्षात घेता तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र मोहिते यांनी ॲम्बुलन्स पाठवून कल्पनाला ससूनमधून परत बोलावून घेतले.
ससून मधून परतल्यानंतर तिच्यावर पुन्हा उपचार सुरू करण्यात आले आणि डॉक्टर तिच्या प्रकृतीचा मागोवा देखील घेत होते. याच काळात तिने तिच्या बाळाला जन्म दिला. बाळ तीन महिन्याचं होईपर्यंत त्याच्या लसीकरणासाठी ती येळसे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर येत राहिली याच काळात तिच्यावर देखील उपचार सुरू होते. नंतरच्या काळात तिने कामाच्या निमित्तानं स्थलांतरण केलं. पण या काळातही तिनं औषधोपचार घ्यायचं थांबवलं नाही. पण नंतर तिला शरीरामध्ये बदल जाणवल्यामुळे तिनं औषध घेणं बंद केलं.
कल्पनासाठी देवदूत बनल्या आशा वर्कर “निर्मला शिंदे”
याच काळात आजाराचं निदान लागल्यानंतर तिला पतीकडून, नातेवाईकांकडून तिरस्कारचा सामना करावा लागला. सुरुवातीला तिच्या सोबत असणाऱ्या आई-वडिलांनी नंतर मात्र तिच्याशी दुरावा निर्माण केला. नवऱ्याने सोडून दिलं, नातेवाईकांनी तिरस्कार केला आणि समाजाने उघडपणे बहिष्कार टाकला. मात्र याच काळात आशा वर्कर निर्मला शिंदे यांनी तिला सख्य्या नातेवाईकांपेक्षा अधिक मदत केली.
कल्पनांच्या घरच्यांचा विरोध पत्करून तिला सुरुवातीला ससून रुग्णालयात पाठवण्याचं धाडस निर्मला शिंदे यांनीच दाखवलं. कल्पनाच्या तब्येतीचा मागोवा घेण्यासाठी त्या त्यांच्या पतीला सोबत घेऊन काही किलोमीटर प्रवास करत जायच्या. कल्पना गर्भवती होती त्या काळात तिची एक मैत्रीण तिच्या सोबत असायची पण नंतर ती गेल्यावर मात्र तिला सर्व आधार आशा वर्कर निर्मला शिंदे यांनीच दिला.
कुष्ठरोग हा ‘लेझी’ आजार, तो बरा व्हायला खूप वेळ लागतो...
कल्पनाला झालेला लेप्रसी हा लेझी आजार असल्याचं डॉ. वाळेकर सांगतात, "हा आजार येताना आरामात येतो, पण हा बरा व्हायला देखील खूप काळ लागतो. म्हणजे पहिला डोस मध्ये जवळपास 99% बॅक्टेरिया नष्ट होतात, पण शिल्लकचे एक टक्के नष्ट व्हायला खूप वेळ लागतो.”
डिलिव्हरी झाल्यानंतर तीन महिने कल्पनाने योग्य पद्धतीने उपचार घेतला, पण नंतरच्या काळात ती कामानिमित्त मुळशीला गेल्यामुळे तिने उपचार घेणे बंद केलं. याच काळात अचानक लेप्रा रिएक्शन होऊन ती उपचारासाठी परत येळशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाली. यावेळी येथील डॉक्टरांनी सोबतच्या इंटर्न्सच्या मदतीने तिला पुन्हा ससूनला पाठवलं. या काळात ती काही दिवस ससूनला थांबायची तर कधी ओपीडी बेसिस वर ट्रीटमेंट घ्यायची. योग्य तो उपचार सुरू असूनही तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचा डॉक्टरांना जाणवलं. त्यामागचं कारण होतं संतुलित आहाराची कमतरता आणि अपुरी काळजी.
याबाबत डॉ. वाळेकर सांगतात, “तिला कितीही व्यवस्थित गोळ्या औषध दिली तरी तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती, ती एका बाळाची आई असल्याने तिला अधिक पोषक अशा आहाराची आवश्यकता होती.”
यावर उपाय म्हणून जन आरोग्य समितीच्या आणि ग्रामपंचायतीच्या मीटिंगमध्ये डॉक्टरांनी केलेल्या विनंतीवरून लोकांनी तिला रेशन देऊन मदत करायला सुरुवात केली. पण हा उपाय तात्पुरता होता, पोषक आहार बंद झाला की तिची प्रकृती पुन्हा खालवायची. यावर उपाय म्हणून तिला कोंढव्याच्या डॉ. बांदोरवाला शासकीय लेप्रसी सेंटरला हलवायचं ठरवण्यात आलं. 2024 च्या मे महिन्यात तिची रवानगी कोंढव्याला करण्यात आली. तिच्यासोबत लहान मुल असल्यानं तिथे राहू शकणार नाही असं तेथील डॉक्टरांनी म्हटलं. पण नंतरच्या काळात तिला तिथे ठेवून घेण्यात आलं आणि मग तिच्या प्रकृतीत सुधारणा व्हायला सुरुवात झाली.
मुल सोबत नसल्याने तिच्या मनात प्रचंड विरह निर्माण झाल्याचं डॉ. वाळेकर सांगतात, “तिचा मुलगा सोबत नसल्याने ती नेहमी निराश असायची, याला कसं मॅनेज करायचं हा मोठा प्रश्न होता. तिला इथून डिस्चार्ज मिळतो का हे बघितलं, पण ते शक्य नव्हतं. मग एक दिवस मी तिचं काउन्सलिंग केलं. तिला म्हटलं, "बघ, तुला जो आजार झालाय, तो गंभीर आहे, तुला वाटतं का तुझ्या बाळाला पण ते व्हावं?" तिला सांगितलं , बघ तुझ्याकडे सुद्धा मोबाइल आहे आणि घरी तुझ्या आईकडे पण आहे तर तू मुलाशी फोनवर बोल, तू पूर्ण बरं झाली की मग आहेच ना पूर्ण आयुष्य म्हणलं त्याच्यासोबत खेळायला…."
अशी समजून घातल्यानंतर कल्पनाने नंतरचे काही महिने कोंढव्याला काढले. जिथे तिच्यावर योग्य ते उपचार करण्यात आले. तिची आरोग्याची योग्य ती काळजी घेण्यात आली. तिच्या आहारावर लक्ष देण्यात आले. ज्यामुळे तिला लवकर बरे होण्यास मदत झाली.
आणि आता ती त्याच रुग्णालयात इतर रुग्णांचा हात धरते, त्यांना औषधे देते…
डॉ. वाळेकर सांगतात, "काही महिन्यांपूर्वी ती कामानिमित्त आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आली, यावेळी आमच्या सोबतच्या काही कर्मचाऱ्यांनी तिला ओळखलंच नाही. इतकाच बदल तिच्यामध्ये झाला होता. आजार बरा झाल्यानंतरचा एक विलक्षण आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. 
पुढे ते सांगतात, कल्पना तिच्या उपचारासाठी दहा किलोमीटर वरून आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात येईल का याची आधी आम्हाला शक्यता कमी वाटायची, पण आज ती चक्क कोंढव्यावरून डिस्चार्ज घेते, नंतर पुणे स्टेशनला जाते तिथून जवळण या गावी जाऊन तिच्या बाळाला भेटते. त्यासोबतच ती लेप्रसीने त्रस्त असलेल्या अनेकांना मदत करते. पेशंटला ॲम्बुलन्समध्ये न्यायचे असल्यास अटेंडंट म्हणून भूमिका निभावते.
भौगोलिक विलगीकरणामुळे कातकरी समाज इतरांपेक्षा थोडा दूर राहत असल्याने लेप्रसी सारख्या आजारांबाबत त्यांच्या मनात आजही भीती आहे. लेप्रसी हा आजार स्पर्शाने पसरत नाही तर तो खोकल्यासारख्या ड्रॉपलेट इन्फेक्शनने पसरतो याबाबत त्यांच्या मनात आजही संभ्रम आहे. मात्र आता कल्पना एक कातकरी समाजातीलच महिला असल्यामुळे तिने ह्या आजारावर कशी मात केली याचा संदर्भ देऊन कातकरी समाजामध्ये नक्कीच जनजागृती करता करता येईल, असं डॉ. वाळेकर यांना वाटतं.
मुळात कल्पना या आजारातून बरी झाली तिच्या इच्छाशक्तीमुळे पण या काळात तिला सोबतच्या डॉक्टरांनी देखील खूप मदत केली. ज्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र येळसे येथील डॉ.सुवर्णा आरोटे, डॉ.राजेंद्र मोहिते, डॉ. विजय वाळेकर, डॉ. रोहन गरुड (इंटर्न) यांचा समावेश आहे.
वयाच्या विशीत लेप्रसी सारख्या आजाराच्या विळख्यात सापडूनही कल्पनाने हार न मानता हा लढा दिला. विपरीत परिस्थितीशी सामना करत आणि भावनांवर ताबा ठेवत तिने यावर मात केली. सुरुवातीला अशक्त, नैराश्यात असलेली कल्पना आज फक्त या आजारातून बरी झाली नाही तर ती अनेकांना बरे करण्याचे बळ बनली आहे. इच्छाशक्ती असल्यास कुठल्याही आजारावर मात करता येते हे तिनं दाखवून दिलंय.






