(सौम्या पिल्लई)
बुलढाण्यापासून 70 किमी अंतरावरील बोंडगाव हे लहानसं गाव सध्या भारतातील टॉप रिसर्च इन्स्टिट्यूट्सच्या वैज्ञानिकांचं भेटण्याचं स्थान बनलं आहे. हे गाव आता एक मेडिकल मिस्ट्री बनलं आहे. भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद, एम्स, हैदराबाद इन्स्टिट्यूट ऑफ लाईफ सायंसेस्, जिल्हा मेडिकल बोर्ड, बावसकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे वैज्ञानिक असे अनेकजणं यावर आपलं डोकं लढवत आहेत…अगोदरच शेगाव तालुक्यातील कोलवड, बोंडगाव, कठोरा, मच्छिंद्रखेड या गावांवर एक संकट कोसळलं असताना त्यातून बाहेरट पडत असतानाच आता आणखी एक नवे संकट गावांवर ओढावले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये केसगळती होऊन लोकांना टक्कल पडलं होतं, त्याच गावात आता नखं तुटण्याचीही समस्या उद्भवली आहे. विशेष म्हणजे, ज्या लोकांचे केस गळत होते त्यांचीच आता नखंही गळत आहेत आणि यासाठी वेगवेगळ्या संस्था गावात दाखल झाले आहेत, या गावातील लोकांना वेगानं टक्कल का पडत आहे आणि नखं का गळत आहेत, हे समजून घेण्यासाठी.
अचानक आणि कोणत्याही उघड कारणाशिवायच इथल्या लोकांचे केस कमी होऊ लागले. आता डोक्यावर जखमा, नखांखाली काळे डाग, अस्पष्ट दृष्टी, वजन कमी होणं अशी लक्षणंही दिसून येत आहेत. त्यामुळे गावकरी आणि वैज्ञानिक दोघेही चकीत आहेत. वैज्ञानिकांनी इथली माती, पाणी, गावकऱ्यांचं रक्त व लघवी यांचे नमुने गोळा केले आहेत. 
ज्या लोकांचे केस गळत होते त्यांचीच आता नखंही गळत आहेत…
त्यातच आता नखगळतीचे संकट उभे ठाकले आहे. ग्रामस्थांची नखें कमकुवत होऊन गळून पडत आहे. बाधित गावांत जिल्हा आरोग्य विभागातर्फे सर्वेक्षणवजा पाहणी करण्यात येत आहे. 20 एप्रिलअखेर रुग्णसंख्या 60 च्या घरात पोहोचली आहे. पहिल्या दिवशी 17 एप्रिलला रोजी करण्यात आलेल्या सर्वेक्षणाअंती शेगाव तालुक्यातील चार गावात नखगळतीचे तब्बल 37 रुग्ण आढळून आले होते.
यातील बव्हंशी रुग्ण हे केसगळती व टक्कलचे रुग्ण असल्याचे आढळून आले. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला नखं कोरडी पडतात. त्यानंतर त्यावर पिवळसर डाग पडायला लागतात आणि सरतेशेवटी ती गळून पडू लागतात. ज्या रुग्णांना केसगळतीच्या समस्येला सामोरं जावं लागलं होतं, त्यांना आता या नव्या समस्येला सामोरं जावं लागतंय.
जानेवारीत या केस गळतीला सुरूवात झाली. लोकांनी पाहिलं की त्यांच्या केसांचे झुबकेच गळत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील 18 गावांमधील 400 हून जास्त लोक, स्त्री-पुरुष, मुलं-म्हातारे सारे एका रात्रीतून टकले झाले. त्यामुळे भितीचं आणि लाजेचं वातावरण एकाचवेळी पसरलं. पण कित्येक महिने उलटल्यानंतरही वैज्ञानिकांना, डॉक्टरांना यामागचं कारण समजलेलं नाही. दूषित पाण्यामुळे हे घडलं, की व्हायरल आहे की सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून दिल्या जाणाऱ्या गव्हात सेलेनियमचं प्रमाण जास्त असल्यामुळे हे झालं कोणीही ठामपणे सांगू शकत नाही.
“काही तरुणांचे गळालेले केस पुन्हा उगवले पण माझ्यासारख्या आजारी माणसाचे केस हळूहळूच वाढत आहे. माझा त्रास वाढतोय. आता माझ्या डोक्यावर काही जखमाही आहेत आणि उन्हाळ्यात त्यामुळे खूप त्रास होतोय,” 70 वर्षीय शांताबाई अंदूरकर सांगतात. 
शांताबाई एकट्या नाहीत. जानेवारीत बोंडगाव, हिंगना, कालवड भागातील लोकांचे केस गळाल्यानंतर आता त्यांचं वजन कमी होत आहे, काहींच्या अंगावर चट्टे पडत आहेत. जिल्हा मेडिकल अधिकारी याविषयी काही सांगायला तयार नाही.
11 वर्षाच्या सुरेशला ‘विराट कोहली’सारखी हेअर स्टाईल ठेवायची होती
11 वर्षांचा सुरेश दिगंबर स्वतःला विराट कोहलीचा फॅन समजतो आणि त्याच्याप्रमाणे क्रिकेट खेळतो आणि हेयर-स्टाईलही कोहलीसारखीच ठेवली आहे. तो कटींग सलूनमध्ये जाऊन आपले केस कमी करतोय आणि कोहलीसारखी दाढी वाढवण्याचा प्रयत्न करतोय. पण 5 जानेवारीला तो घरी आला आणि त्यानं डोक्यावरची टोपी काढली तर त्यात त्याच्या केसांचे झुबके होते.
त्याच्या आईनं त्याच्या डोक्यावर हात फिरवला तर बाकीचे केसही गळून पडले. त्याला आता टक्कल पडलं आहे. आपले केस पडताना पाहून तो रडू लागला तर आईनं त्याला थापड मारली. तिला वाटलं की त्यानं नेहमीपेक्षा जास्त जेल वापरल्यामुळे असं घडलं.
“मला काय करावं ते समजलं नाही,” त्या सांगतात, “मी त्याच्या वडिलांना फोन केला. आम्हाला माहित नाही की खाण्यात काही आल्यामुळे हे झालं की जेल लावल्यामुळे झालं.” पण सुरेश एकटा नव्हता. 2 जानेवारीला एकाच कुटुंबातील 32 वर्षीय रत्ना, 14 वर्षीय वैष्णवी आणि 7 वर्षीय प्रिया विनायक यांचेही केस गळू लागले. डॉक्टरांनी म्हटलं की ते वापरत असलेल्या शॅम्पूमुळे असं झालं असावं. पण दोन दिवसांतच बोंडगावातील 35 लोकांचे केस गळून पडले.
पुढच्या काही दिवसांत 18 गावांमधील 400 हून जास्त लोकांचे केस गळून पडले. “लोकांना भीति वाटू लागली की त्यांच्यासोबत आणि घरच्यांसोबत हा काय प्रकार सुरू आहे म्हणून,” गावाचे सरपंच रामेश्वर ठाकूर सांगतात, “मी जिल्हा अधिकाऱ्यांना फोन करून याविषयी विचारलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की इतर गावातही असंच घडत आहे. कोव्हिडनंतर आमच्यासाठी हा सर्वांत भीतिदायक आजार आहे.”
गाव झाली प्रयोगशाळा…
बोंडगावात लवकरच लोकांची गर्दी वाढू लागली. डॉक्टर, लॅब टेक्निशियन्स, जिल्हा अधिकारी, माध्यमे, संशोधक सारे इथं गोळा झाले. विभिन्न संस्थांमधील संशोधकांनी आपलं काम सुरू केलं. पद्मश्री डॉ. हिंमतराव बावसकर, जे रायगढच्या महाड गावचे डॉक्टर आहेत, त्यांनीही इथं शोध घेतला आहे.
गव्हामध्ये सेलेनियमचं प्रमाण गरजेपेक्षा जास्त असल्यानं असं घडलं असावं असा त्यांचा अंदाज आहे. शरीराला याची गरज असते पण जास्त प्रमाण हानीकारक ठरतं. गव्हात सेलेनियमचं प्रमाण 600 पट जास्त असल्याचं त्यांना आढळून आलं. “केस गळण्यासोबतच रुग्णांना तीव्र ताप, उलटी, डोकेदुखी, खाज, चक्कर अशी लक्षणंही आढळली,” ते सांगतात.
डॉ. बावसकर सांगतात की, हा गहू पंजाब व हरियाणामधून आला होता. रुग्णांच्या रक्तात, लघवीत तसेच केसांमध्येही सेलेनियमची प्रमाण नेहमीपेक्षा 35 ते 150 पट जास्त आढळल्याचं ते सांगतात. त्यांच्या शरीरात जस्ताचं प्रमाण कमी असल्याचंही आम्हाला आढळून आलं, ते सांगतात. पण भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदचे संशोधक हा दावा मान्य करत नाही.
सेलेनियमचं प्रमाण काही रुग्णांमध्ये जास्त असलं तरी ते यालाच कारणीभूत ठरवत नाहीत. यांच्यातील एका ज्येष्ठ संशोधकांनी ‘दिप्रिंट’ला सांगितलं, “केस गळण्यापलिकडे या रुग्णांमध्ये इतर काही समान लक्षणं नव्हती. काही आठवड्यांतच त्यांचे केस पुन्हा उगवायला लागले.”
गावकऱ्यांना या केस गळतीचं खरं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही. अनेकांनी इथं येऊन शोध घेतला पण कोणीही त्यांना निष्कर्ष सांगितलेले नाही. एका जिल्हा अधिकाऱ्यानं म्हटलं की, आम्हाला अजून काही निश्चितपणे समजलेलं नाही. पण आम्ही लवकरच सरकारला आमचा अहवाल पाठवणार आहोत. पण समस्या केस गळतीचीच नाही. अनेक नव्या समस्या पुढे आल्या आहेत आणि त्यांची कारणं कोणालाच माहिती नाही. त्यामुळे बोंडगावचे लोक आता यावर काही बोलायला तयार नाहीत.
‘’कित्येक महिने आम्हाला अस्पृश्यांसारखी वागणूक देण्यात आली’’
23 वर्षीय आदर्श अंदूरकर म्हणतो की समाजात आम्हाला वेगळी वागणूक मिळावी अशी आमची इच्छा नाही. तो सांगतो की सर्वांना या केस गळतीची माहिती मिळाल्यावर इथली ठरलेली 3 लग्न तुटली. शेजारच्या गावातील न्हाव्यांनी बोंडगावच्या लोकांचे केस कापणं बंद केलं. त्यामुळे रोग फैलावण्याची त्यांना भीती वाटत होती. सारे गावावर हसू लागले होते. एका मराठी वृत्तपत्रांत यावर एक कविताही छापून आली आणि ज्यात बोंडगावच्या टक्कल पडलेल्या स्त्रियांची टर उडवण्यात आली आणि त्यांच्यासोबत लग्न न करण्यास सांगण्यात आलं. 
आदर्श म्हणतो, कित्येक महिने आम्हाला अस्पृश्यांसारखी वागणूक देण्यात आली. अजूनही बाहेरचे लोक इथं आले तर इथलं काही खात-पित नाही. या सर्वांचा शांतपणे विरोध करण्यासाठी म्हणून आदर्श आणि त्याच्या 11 मित्रांनी- ज्यांना हा रोग जडला नव्हता- गावकऱ्यांसोबत एकता दर्शवण्यासाठी म्हणून आपले टक्कल करून घेतले.
आदर्श म्हणतो, “लोक म्हणतात की केसांचं काय घेऊन बसला, त्यानं काही होत नाही. पण हे खरं नाही. हिंदू देवांचं बघा, शंकरानं आपल्या केसांच्या जटांमधून वीरभद्र आणि भद्रकाली यांना जन्म दिला होता. दुर्गा, सरस्वती, काली इत्यादी देवींचे केस लांबसडक असतात. केस हे शक्तीचं प्रतीक असतं.” बुलढाण्यातील या गावांमध्ये मात्र ना केस आहेत ना त्यांची शक्ती आणि त्याचं कारण कोणालाच ठाऊक नाही.






