- अप्सरा आगा
मोहम्मद अखलाख आठवतोय का…? हो तेच अखलाख जे या देशातील मॉब लिंचिंगचे पहिले बळी ठरले होते. दादरी हत्याकांड नावाने ती घटना ओळखली जाते. अखलाख यांच्या झुंडबळीनंतरच भारतात पहलू खान, जुनैद आणि रकबार अशा विविध मॉब लिचिंगच्या घटनांचे प्रकार घडू लागले. सप्टेंबर 2015 मध्ये उत्तर प्रदेशच्या बिसादा गावात मोहम्मद अखलाक यांची जमावाने त्यांच्या घरात शिरून हत्या केली होती. त्यानंतर आतापर्यंत भारतात दोनशेहून अधिक लोक जमावाच्या हिंसाचाराला बळी पडले.
उत्तर प्रदेश सरकारने अखलाक हत्येच्या प्रकरणात आरोप मागे घेतले
आता दहा वर्षानंतर मोहम्मद अखलाख दादरी हत्याकांडची घटना पुन्हा प्रकाशझोतात येण्याचे कारण म्हणजे योगी आदित्यनाथ यांचे उत्तरप्रदेशचे सरकार. ग्रेटर नोएडा येथील दादरीमध्ये 2015 साली झालेल्या मोहम्मद अखलाख हत्याकांडातील सर्व आरोपींवरील आरोप मागे घेण्याचा निर्णय उत्तर प्रदेश सरकारने घेतला आहे. राज्य सरकारने खटला मागे घेण्यासाठी औपचारिक विनंती केली असून, सूरजपूर न्यायालयात यावर 12 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. उत्तरप्रदेश सरकारच्या या निर्णयामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. 
या प्रकरणातील सर्व आरोपींवरील आरोप मागे घेण्याबाबत सरकारकडून पत्र प्राप्त झाले असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील भागसिंह भाटी यांनी दिली. या संदर्भातील अर्ज सूरजपूर न्यायालयात सादर करण्यात आला आहे. या अर्जावर 12 डिसेंबर रोजी सुनावणी अपेक्षित आहे.
दरम्यान, अखलाख यांच्या कुटुंबाचे वकील युसूफ सैफी यांनी याविषयीची अधिकृत कागदपत्रे अद्याप मिळाली नसल्याचे सांगितले. "मी यासंदर्भात ऐकून आहे. कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतरच सुनावणीच्या दिवशी किंवा त्यापूर्वी मी यावर काही प्रतिक्रिया देऊ शकेन," असे त्यांनी स्पष्ट केले.
28 सप्टेंबर 2015… मॉब लिंचिंगची देशातील पहिली घटना
उत्तरप्रदेशच्या ग्रेटर नोएडा येथील दादरीमध्ये बिसाहडा गावात 52 वर्षाचे मोहम्मद अखलाख आपल्या कुटुंबासह अनेक वर्षांपासून राहात होते. 28 सप्टेंबर 2015 रोजी गावातील एका मंदिरात असलेल्या लाऊडस्पिकरवरून अचानक मोठमोठ्याने घोषणा होऊ लागली. ‘’मोहम्मद अखलाख यांनी एका गाईची कत्तल केली असून, ते गोमंस त्यांनी आपल्या घरातल्या फ्रिजमध्ये ठेवले आहे.’’ अवघ्या काही क्षणात शेदोनशेचा जमाव अखलाख यांच्या घराबाहेर गोळा झाला.
संबंधित लेख वाचा रमाबाई आंबेडकरनगर हत्याकांड : एका भळभळणाऱ्या जखमेची 28 वर्षे…! |
जमाव प्रचंड खवळला होता, त्यांनी मोहम्मद अखलाख यांना अक्षरश: घराबाहेर खेचून बाहेर काढले आणि दगड-विटांनी मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला आणि त्याचा मुलगा दानिश याच्या कवटीला गंभीर इजा पोहोचली होती. ही घटना घडल्यानंतर अखलाख यांची पत्नी इक्रमान यांनी त्याच रात्री स्थानिक पोलीस स्थानकात एफआयआर नोंदवला होता आणि त्यात त्यांनी अनेकांची नावे घेतली होती.
दादरी हत्या घटना निश्चितच दुःखद, पण…? - पंतप्रधान नरेंद्र मोदी
दादरी हत्या घटना निश्चितच दुःखद आहे, त्याचं समर्थन होऊच शकत नाही, असं स्पष्टपणे नमूद करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनेच्या 16 दिवसानंतर प्रतिक्रिया व्यक्त केली होती. पण त्याचवेळी, या घटनांसाठी केंद्र सरकारला दोषी कसं धरता येईल?, असा सवाल करत त्यांनी हात वर करण्याचाही प्रयत्न केला होता.
राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी राज्य सरकारची असते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. दादरीसारख्या घटनांचं भाजप कधीही समर्थन करत नाही. विरोधक भाजपवर सांप्रदायिकतेचा - जातीयवादाचा ठपका ठेवतात, पण तेच ध्रुवीकरणाचं राजकारण करत आहेत, अशी चपराक मोदींनी लगावली. ढोंगी धर्मनिरपेक्षतेचा भाजपनं नेहमीच विरोध केल्याचंही त्यांनी निक्षून सांगितलं.
या प्रकरणावरून देशात असहिष्णुतेसंदर्भात मोठे वादंग माजले असतानाच दादरी गावातदेखील वातावरण तापले होते.अखलाख यांना न्याय मिळवून देण्याऐवजी मोहम्मद अखलाखच्या कुटुंबाविरुद्ध 20 दिवसांत कारवाई करा नाहीतर जनप्रक्षोभ आवरता येणार नाही, अशा इशाराच बिसरातील गावकऱ्यांनी दिला होता. बिसरातील गावकरी आक्रमक झाले होता आणि त्यांनी अखलाखच्या कुटुंबियांविरुद्ध गोहत्या आणि गोमांस सेवनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी उचलून धरली होती.
फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट, अखलाखच्या घरात गोमांस नसून बोकडाचे मटण
मोहम्मद अखलाख यांच्या फ्रीजमध्ये ठेवलेले मांस नक्की कुणाचे होते यावर उलटसुलट अहवाल प्रसिद्ध झाले होते. जप्त करण्यात आलेल्या मांसाचे नमुने गाय वा अन्य कोणत्याही गोवंशाचे नसल्याचा रिपोर्ट आधी एका फॉरेन्सिक लॅबने दिला होता. मात्र वर्षभरानंतर मथुरा येथील लॅबने दिलेल्या रिपोर्टमध्ये हे मांस गाय वा तिच्या अन्य वंशाचे असल्याचे म्हटले होते. त्यापूर्वी स्थानिक पोलिसांनी त्याच्या घरात सापडलेले मांस बकऱ्याचे असल्याचा अहवाल दिला होता.
स्थानिक कोर्टाने मथुरा फॉरेन्सिक लॅबच्या रिपोर्टच्या आधारे अखलाकसह त्याच्या कुटुंबातील सदस्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अखलाक, त्याचा भाऊ जान मोहम्मद आणि सूनेसह कुटुंबातील सहा जणांविरोधात उत्तर प्रदेश गोहत्या अधिनियम 1955 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. एकीकडे पोलिसांनी गुन्हे दाखल करून या कुटुंबाची चौकशी सुरू केली असताना अखलाकचा मुलगा सरताज याने सदर मांस नव्याने लॅबमध्ये पाठवण्याची मागणी केली होती.
मांसाचे नमुने फेरफार करून बदलण्यात आले, असा आरोपही त्याने केला होता. हा सगळा घटनाक्रम तसेच पोलिसांनी वारंवार घेतलेली घराची झडती यानंतर 'अखलाकच्या घरात सापडलेले मांस गोवंशाचे नाही', या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. दोन महिने कसून शोध घेतल्यानंतरही मोहम्मद अखलाक आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी गोहत्या केल्याचा कोणताही पुरावा पोलिसांच्या हाती लागू शकला नसल्यामुळे अखलाखच्या कुटुंबातील सदस्यांना आरोपातून मुक्त करण्यात आले.
सर्व आरोपींना सहा महिन्यातच जामीन
नोएडातील सुरजपूर सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. अखलाख यांचा मुलगा मोहम्मद सरताज या प्रकरणाचा कोर्टात पाठपुरावा करतोय. सरताज भारतीय हवाई दलामध्ये काम करतो. सरताजने फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम 193 अंतर्गत याचिका दाखल केली आहे. आरोपपत्रातील निवेदनांचा उल्लेख, दूरध्वनी संवादांच्या नोंदींची जोड आणि माहितीच्या अधिकाराखाली गोळा करण्यात आलेले पुरावे, अशा सगळ्यांचा समावेश असलेली ही कलम 193 खालील याचिका जवळपास समांतर तपासासारखी दिसते.
सरताज सांगतो की, "सर्व 18 आरोपी अजूनही जामिनावर बाहेर आहेत. शिवाय, गावातील 'कथित गोहत्ये'विषयी पोलिसांना दूरध्वनीवरून पहिल्यांदा माहिती देणाऱ्या संजय राणा याच्याविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. खुनाच्या कटामध्ये त्याचा सहभाग होता आणि घटनास्थळी तो उपस्थितही होता, हे सिद्ध करणारा पुरेसा परिस्थितीजन्य पुरावा आणि पूरक कागदपत्रं आमच्याकडे आहेत."
अखलाक यांच्या पत्नीच्या नावाने दाखल केलेल्या कलम 193 खालील याचिकेनुसार, आरोपपत्रात संजय राणासह बिसाडा गावातील आणखी आठ रहिवाशांची नावं समाविष्ट करण्याची विनंती करण्यात आली आहे.
15 संशयित आरोपींना योगींनी दिली नोकरी
योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमधील दादरी येथील बहुचर्चित अखलाक हत्याकांडातील 15 संशयित आरोपींना बिसाहडा गावातील नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनच्या (एनटीपीसी) प्लांटमध्ये नोकरी दिली आहे. सर्व संशयित आरोपी सध्या जामिनावर आहेत. या आरोपींना नोकरी देण्यात आल्यामुळे देशभारत एकच खळबळ उडाली होती. सहा महिन्यात या प्रकरणातील सर्व आरोपी तुरूंगाबाहेर आले आहेत. यामध्ये तीन अल्पवयीन मुलांचाही समावेश होता. तर एकाचा तुरूंगातच मृत्यू झाला होता.






