‘’भटेतरांच्या धार्मिक गुलामगिरीच्या थोतांडात देवळांचा नंबर पहिला लागतो. देवळांची उत्पत्ती ब्रम्हदेवाच्या बारशाला खास झालेली नाही. हिंदू धर्माची ही अगदी अलीकडची कमाई आहे. देऊळ हा देवालय या शब्दाचा अपभ्रंश आहे. देवाचे जे आलय वसतिस्थान- ते देवालय. आमचे तत्त्वज्ञान पहावे तो देव ‘चराचर व्यापुनि’ आणखी वर ‘देशांगुळे उरला’. अशा सर्व व्यापी देवाला चार भिंतींच्या आणि कळसबाज घुमटाच्या घरांत येऊन राहण्याची जरूरच काय पडली होती’’?
– प्रबोधनकार ठाकरे
‘देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे’ या प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकातील हा एक स्फोटक परिच्छेद…
प्रबोधनकार ठाकरे म्हणजे केशव सिताराम ठाकरे. बहुजनवादी विचारवंत आणि विद्रोही इतिहासकार ही त्यांची ओळख. बाळासाहेब आणि श्रीकांत ठाकरेंचे वडील. उद्धव आणि राज ठाकरेंचे आजोबा. आदित्य आणि अमित ठाकरे यांचे पणजोबा…
तर सध्या प्रबोधनकार ठाकरे आणि त्यांनी १९२६ साली म्हणजे तब्बल शंभर वर्षांपूर्वी लिहिलेलं ‘देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे’ हे पुस्तक सध्या चांगल्याच चर्चेत आहे. त्याला निमित्त आहे तीन दिवसांपूर्वी मुंबईत घडलेली एक घटना.
मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक वाटल्यानं वाद
मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयाचे कक्ष अधिकारी राजेंद्र कदम यांच्या निवृत्तीनिमित्त समारंभ सुरू होता. राजेंद्र कदम यांनी निवृत्तीच्या निमित्ताने त्यांच्या सहकाऱ्यांना ‘देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे’ हे प्रबोधनकार ठाकरे लिखित पुस्तक भेट दिले. मात्र, काही महिला कर्मचाऱ्यांना हे पुस्तक मिळाल्यानंतर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यावर सर्वांसमोर प्रबोधनकार ठाकरेंचे पुस्तक फेकले आणि कदम यांना माफी मागण्यास भाग पाडले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि एकच खळबळ माजली.
घटनेची पार्श्वभूमी अशी की, 30 ऑगस्ट रोजी राजेंद्र कदम यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. समाज जागृतीसाठी त्यांनी सहकाऱ्यांना काही विचारप्रवर्तक पुस्तके भेट दिली होती. मात्र, प्रबोधनकार ठाकरे यांचे पुस्तक मिळाल्यानंतर काही महिला कर्मचाऱ्यांनी आपल्याला धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करत त्यांचा निषेध नोंदवला. त्यांनी कदम यांना आपल्या कक्षात बोलावून सर्वांसमोर माफी मागण्याची मागणी केली. यावेळी महिलांनी पुस्तक फेकल्याचा आरोप करण्यात आला असून, हा संपूर्ण प्रकार मोबाइलवर रेकॉर्ड झाला आणि पुढे सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनासोबत बीएमसीच्या कर्मचारी संघटनांमध्ये संताप उसळला आहे.
सर्वांसमोर पुस्तक फेकले; मनसे संतप्त
या घटनेनंतर त्याचे अर्थातच तीव्र पडसाद उमटले. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, हा प्रकार म्हणजे मुर्खपणाचे सर्वोच्च उदाहरण आहे. ज्यांनी विरोध केला, त्यांनी प्रबोधनकार वाचले आहेत का? त्यांनी आयुष्यभर समाजातील अनिष्ट प्रथांविरोधात लढा दिला. त्या प्रबोधनकारांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे. सनातन धर्माच्या नावाखाली काहीजण समाजात विष पेरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या महिलेला प्रबोधनकारांना हिंदूविरोधी म्हणण्याचा अधिकार नाही. हा प्रकार महाराष्ट्राच्या प्रबोधनपर परंपरेला काळिमा फासणारा आहे. देशपांडे यांनी संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करण्याची मागणी केली आहे.
संबंधित लेख वाचा: ‘ब्राह्मणी एकाधिकारशाही’ मोडून काढण्यासाठीच प्रबोधनकरांनी सुरू केला सार्वजनिक नवरात्रोत्सव! |
या घटनेनंतर बीएमसी एससी, एसटी, व्हिजेएनटी, एसबीसी आणि ओबीसी एम्प्लॉईज असोसिएशनने तीव्र निषेध नोंदवला आहे. संघटनेचे सरचिटणीस संजय कांबळे-बापेरकर यांनी सांगितले की, फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित महाराष्ट्रात समाजप्रबोधन करणे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाच भाग आहे. पुस्तके वाटणे, वाचनाला प्रोत्साहन देणे हे समाजजागृतीचे प्रतीक आहे. प्रबोधनकार ठाकरे यांनी स्त्रीच्या सामाजिक आणि मानसिक गुलामीविरुद्ध आवाज उठवला. त्यामुळे त्यांच्या विचारांचा अभ्यास प्रत्येक महिलेनं करावा, हे आवश्यक आहे. संघटनेने या प्रकरणातील संबंधित महिला कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही केली आहे.
दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात निवृत्त कक्ष अधिकारी राजेंद्र कदम यांचा प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकवाटपावरून झालेल्या वादानंतर याला नवे वळण आले आहे. सहकाऱ्यांकडून अपमानित वागणूक आणि पुस्तक फेकल्याच्या प्रकारानंतर कदम यांनी आग्रीपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतरही रुग्णालय प्रशासनाने कारवाई न केल्याने कदम नाराज होते. दरम्यान, एससी, एसटी, व्हिजेएनटी, एसबीसी आणि ओबीसी एम्प्लॉईज असोसिएशनने संबंधित महिला कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली असून पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे.
‘देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे’ या पुस्तकात काय लिहिलं आहे?
ज्या ‘देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे’ या पुस्तकावरून इतका गहजब झाला त्या पुस्तकात प्रबोधनकार ठाकरे यांनी नेमकी काय मांडणी केली आहे हे आपण पाहू…
- प्रबोधनकार म्हणतात, ''देवळे म्हणजे भिक्षुकशाहीच्या जन्मसिध्द वतनी जहागिऱ्या. देवळांशिवाय भट नाही व भटाशिवाय देऊळ नाही, असा एक सनातनी नियमच ठरून गेला... काकतालीय न्यायाने पुजारी बनलेल्या भटाची घराणीच्या घराणी त्या त्या देवळाचे वंशपरंपरागत वतनदार बनले. पुराणाच्या गुलामगिरीने पागल बनलेल्या हजारो भोळसर हिंदूंनी देवाला गावे, जमिनी, दागदागिने आंदन द्यावी ती आयतीच पुजारी भटाच्या पदरी पडत. नाव देवाचे आणि गाव भटाचे.'' (पान क्र. 104)
- देवळामध्ये एकछत्री पिढयान्पिढया एकाच जातीचा अंमल असल्यामुळे अनेक सामाजिक व नैतिक अत्याचाराचे देवळे हे अड्डे बनले आहेत. प्रबोधनकार म्हणतात,
''सामाजिक व नैतिक अत्याचाराच्या जन्मभूमीचा व कर्मभूमीचा मान आमच्या हिंदूंच्या देवळांच्याच माथी मारावा लागेल... आजचा देवळाचा धर्म चमत्कारिक व शिसारी येण्याइतका गलिच्छ बनला आहे.'' (पान क्र. 105)
- या देवळामधली नैतिकता रसातळाला गेली आहे. त्याविषयी म्हणतात, ''देवळाच्या छपराखाली ब्रह्मचाऱ्याचे वंश किती वाढतात, पती नसताही किती पतिव्रता पुत्रवती होतात, किती गोसावडे सावकारी करतात, किती गुरुमहाराजांचे मठ गोकुळकाल्यात कटिबंध बुडतात आणि किती पळपुटया छंगीभंगी टग्यांचे थर येथे खुशालचेंडूप्रमाणे जमतात.'' (पान क्र. 106)
- हे अध:पतनाचे मूळ असलेले देवळे हिंदूंचे नसून ते फक्त या भिक्षुकांचे आहेत. हिंदूंचे जर असते तर त्यात सर्व हिंदूंना प्रवेश असता, पण असे नसते. देवळांच्या गाभाऱ्यात मूर्तीजवळ, पिंडीजवळ खेटून असतो तो भट. तेथून दहा वीस फुटाच्या अंतरावर दरवाजाच्या बाहेर असतात ते भटेत्तर हिंदू व देवळांच्या पायऱ्यापाशी असतात ते अस्पृश्य हिंदू. प्रबोधनकार म्हणतात, ''देवळे जर हिंदू धर्माची मंदिरे तर तेथे अखिल हिंदूमात्रांचा प्रवेश अगत्य झालाच पाहिजे. सामाजिक बाह्य प्रदेशात भटांनी माजविलेला जातिभेद व जातीद्वेष या धर्ममंदिरातूनच उगम पावल्यामुळे देवळे म्हणजे हिंदूंच्या जातिद्वेषाचे नरककुंडेच... अखिल हिंदू जनांनी आपले वर्चस्व फुगवून देवळाच्या व देवाच्या पायावर ओतले तरी देऊळ आणि देव यांचा खरा मालक भटच.'' (पान क्र. 107)
- भटाच्या या सनातन धर्माने स्पृश्य-अस्पृश्यच नव्हे तर ब्राह्मण-ब्राह्मणेत्तर हा वादही माजविला आहे. प्रबोधनकार या सनातनी धर्माविषयी म्हणतात, ''गोळीला तुम्ही पोळीला आम्ही हा भटांचा 'सनातन धर्म' त्यांनी आजपर्यंत पोटापाड मेहनत करून टिकविला आहे. समाज क्षेत्रात भिक्षुकशाहीला जगद्गुरुंनी हिंदूतच स्पृश्य आणि अस्पृश्य अशी सनातनी द्वेताची पोखरण घातल्यावर त्यांच्या दंडधारकांनी आणि 'पवित्र' बडव्यांनी स्पृश्य भागातही भट-भटेत्तर भेदाची रामरक्षा रांगोळी ओढून ठेवण्याचा जोरकस यत्न करण्यात या हिंदू देवळांचाच प्रामुख्याने उपयोग करून घेतला.'' (पान क्र. 108)
- आपले सर्व गुण, अवगुण, वासना, भावना, आवड-निवड या देवाला चिटकाविली आहे. प्रबोधनकार म्हणतात, ''माणसाच्या सर्व भल्याबुऱ्या विचार विकारांचा आरोप या दगडया देवांवर होत असल्यामुळे देव आणि माणूस यातल्या भेदाची रेष युक्लीडच्या रेषेप्रमाणे 'रूंदीशिवाय लांबी' अशा 'समजून चला' या धर्तीचीच झाली आहे.'' (पान क्र. 109)
- या देवळांनी अखिल हिंदूंमध्ये भेदाभेद, उच्च-नीचता, स्पृश्य-अस्पृश्य, माणूसघाणेपणा, सामाजिक व नैतिक अध:पात केल्यामुळे या गुलामगिरीप्रवर्तक देव, देवळे व त्यास पूरक संस्थांची राखरांगोळी करायला पाहिजे. भिक्षुकशाहीचा शेवट करण्याविषयी प्रबोधनकार म्हणतात, ''मनुस्मृती, पुराणे आणि देवळे या तीनच गोष्टींवर आज प्रत्येक भट जगत असतो, पण या तीनच गोष्टी म्हणजे अखिल भटेत्तर दुनियेच्या उरावर तीन प्राणघातक धोंडी आहेत. या तीन गोष्टी नष्ट करा... भिक्षुकशाही रसातळाला गेलीच! प्रदर्शनासाठी तिचा ठेवलेला नमुनाही हाती लागणार नाही.'' (पान क्र. 110)
- जसे भिक्षुकशाहीचा नाश करण्यासाठी जशा तीन गोष्टी सांगितल्या आहेत तशा या हिंदू समाजात माणूसघाण पसरविणाऱ्या देवळांची विल्हेवाट लावण्याचेही तीन मार्ग प्रबोधनकार सुचवितात. ''पहिला मार्ग बहिष्काराचा, दुसरा मार्ग वहिवाटीला धाब्यावर बसवून किंबहुना वहिवाटीचा चेंदामेंदा करून हिंदुत्वाच्या ठळक सबबीवर अखिल हिंदू जनांच्या देऊळ प्रवेशाचा आणि देवपूजेचा अधिकार धीटाईने बजावण्याचा तिसरा मार्ग म्हणजे पूर्णपणे त्याग.''






