राही सरनोबत… भारताची सर्वोत्कृष्ट पिस्तुल नेमबाज. महाराष्ट्रातील कोल्हापूरमधल्या राही सरनोबतने 25 मीटर पिस्तुल नेमबाजीच्या अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या आहेत. 2019 साली जर्मनीमधल्या म्युनिच शहरात झालेल्या ISSF वर्ल्ड शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने 25 मीटर प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. 18व्या आशियाई स्पर्धेत राहीने भारताना सुवर्ण पदक मिळून दिले. या कामगिरीमुळे ती 25 मीटर प्रकारात आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली महिला शूटर ठरली होती.
इतकी नेत्रदिपक कामगिरी करूनही राही सरनोबत गेल्या आठ वर्षांपासून सरकारी लाल फितीमध्ये अडकली आहे. ऑलिंपियन नेमबाज राही सरनोबतची उपजिल्हाधिकारी म्हणून 2014 मध्ये राज्य शासनाने नियुक्ती केली. तिला तीन वर्षे पगार मिळाला; मात्र प्रशिक्षणार्थी कालावधी पूर्ण केला नाही म्हणून राज्य शासनाने आजतागायत तिचा पगार काढलेला नाही. आजही ती देशासाठी खेळत आहे. यावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विधान परिषदेत आज आमदार अमित गोरखे यांनी प्रश्न उपस्थित केला.
आठ वर्षे पगारच नाही
गेली अकरा वर्षे राही सातत्याने सराव आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करीत आहे. याशिवाय तिने पॅरिस, लंडन ऑलिंपिकमध्ये देशाचे प्रतिनिधीत्व केले आहे. बारा विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक आणि राष्ट्रीय स्पर्धांमधून पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. सध्या ती पुढील महिन्यात चीनमध्ये होणाऱ्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेसाठी जय्यत तयारी करीत आहे.
राही हिला राज्य शासनाने शासकीय सेवेतील प्रशिक्षणार्थी कालावधी पूर्ण केला नाही म्हणून पगारापासून आठ वर्षे वंचित ठेवले आहे. तिने याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे लेखी आणि तोंडी कैफियत मांडली; परंतु अद्यापही यावर निर्णय झालेला नाही. आजही आमदार अमित गोरखे यांनी हा प्रश्न विधान परिषदेत मांडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागाला आदेश देऊन पगार आणि सेवेत नियमित करण्याचे आश्वासन दिले आहे.
संबंधित लेख वाचा: 1) तब्बल 12 वर्षे आपले शारिरीक व्यंग लपवून ठेवणारी ‘तनिषा’ आता वाऱ्याच्या वेगाशी स्पर्धा करतेय…! |
फ्लॅटसाठी कर्ज देण्यास बँकांकडून नकार
गेले आठ वर्षे शासनाकडून पगार न मिळाल्याने राहीचा पगार पत्रकात असलेल्या प्राप्तीच्या रकान्यात कोरा दिसतो. या सबबीखाली अनेक राष्ट्रीयीकृत बँकांनी तिला पुण्यामध्ये फ्लॅट घेण्यास कर्ज नाकारले. गेल्याही महिन्यांपूर्वी एका खासगी सहकारी बँकेने तिच्या कामगिरीची दखल घेत तिला दोन रुमचा फ्लॅट घेण्यास अर्थसाहाय्य केले. गेले अनेक वर्षे ती सरावासाठी पुण्यात भाडेतत्त्वावर फ्लॅट घेऊन राहत होती.
नोकरी मिळाल्यानंतरही कामगिरीत सातत्य
या संदर्भात राहीचा भाऊ आदित्य सरनोबत म्हणाला, ''राही पुढील महिन्यात चीनमध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत 25 मीटर पिस्तूल प्रकारात देशातर्फे खेळणार आहे. उपजिल्हाधिकारी म्हणून सेवेत रुजू झाल्यापासून तिने 12 विश्वचषक स्पर्धांमध्ये पहिल्या तीनमध्ये अव्वल स्थान, सुवर्ण, रौप्य, ब्राँझ पदके, तर दोन ऑलिंपिकमध्ये सहभाग, अनेक वेळा राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण आणि ऑलिंपिकमध्ये इतर नेमबाजांसाठी कोटा मिळवून देणारी पहिली भारतीय महिला नेमबाज अशा अनेक कामगिरी तिच्या नावावर आहेत. ती अर्जुन पुरस्कार विजेती आहे. ती देशासाठी सातत्याने खेळत आहे. नोकरी लागल्यानंतर तिने खेळ सोडलेला नाही. उलट तिची कामगिरी उंचावत आहे. याचा विचार करून शासनाने तिला नियमित सेवेत घ्यावे आणि नियमित पगार सुरू करावा.''
अडचणींचा सामना
दोन वेळा झालेला करोना आणि त्यानंतर शरीरावर झालेले दुष्पपरिणाम यातून सावरून पुनरागमन करणाऱ्या राही सरनोबतने काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णवेध घेतला. तिने नेमबाजीतील महिलांच्या 25 मी. एअर पिस्तूलमध्ये हे यश मिळवले. आपल्या गेल्या दोन वर्षांतील संघर्षाबाबत राही म्हणाली, ‘मला दोन वेळा करोनाची लागण झाली होती.
मात्र, त्याच्या दुष्परिणामाला मला सामोरे जावे लागले. नंतर मला न्यूरोपॅथिक वेदना होत होत्या. यातून सावरायला बराच वेळ आणि विश्रांती लागते. त्यामुळे जुलै 2022 ते मे 2023 पर्यंत मी अंथरूणाला खिळूनच होते. जवळजवळ वर्षभराच्या विश्रांतीनंतर परतले, तेव्हा माझ्यात त्राणही नव्हता. तसेच, सरावही नव्हता. मी तीन मिनिटांच्या सरावापासून सुरूवात केली. मात्र, ऑलिम्पिकला जाऊ शकणार नाही, हे जाणल्यावर मी पुन्हा सहा महिन्यांची विश्रांती घेतली. गेल्या सप्टेंबर-ऑक्टोबरपासून मी पुन्हा म्हाळुंगे-बालेवाडीत सरावाला सुरूवात केली. त्या वेळी अर्ध्या तासाच्या सरावाने सुरुवात केली होती. मात्र, आता चार-पाच तास पूर्वीप्रमाणे सराव करत आहे.’
या वर्षी अधिकाधिक प्रयोगावर भर देणार असल्याचे राहीने सांगितले. 34 वर्षीय राही म्हणाली, ‘माझे ध्येय एक-दोन स्पर्धांचे नाही. एशियन गेम्स, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत यश मिळायचे ध्येय असतेच. मात्र, या वर्षी धाडस करायचे आहेत. खूप प्रयोग करायचे आहे. काही गोष्टी माझ्यात डोक्यात आहेत, त्यासाठी काही स्पर्धांना जावे लागणार आहे. हे प्रयोग चांगले होतात की, नाही, हे पाहण्याचे ध्येय या वर्षी मी ठेवले आहे. जेणेकरून पुढच्या वर्षी मी महत्त्वाच्या स्पर्धांसाठी मी तयार असेन.’
भीतीपोटी वडिलांना सांगितले नव्हते शूटर बनण्याच्या स्वप्नाबाबत
30 ऑक्टोबर 1990 रोजी कोल्हापुरात जीवनराव सरनोबत आणि आई प्रभा यांच्या घरी जन्मलेल्या राहीचे शुटिंग करिअर 2008 मध्ये सुरू झाले होते. त्यावेळी ती 10व्या वर्गात शिकत होती. बोर्डाची परीक्षा असल्याने राहीने शुटिंगबाबत वडिलांना सांगितले नव्हते. दहावी पास झाल्यानंतर तिने वडिलांना याबाबक सांगितले होते. तिचे वडील जीवनराव यांनी सांगितले की, दहावी पास झाल्यानंतर राहीने अनेक क्रीडा प्रकारांत प्रयत्न केले. 10 मीटर एअर रायफल शुटिंग, ट्रॅप शुटिंगमध्ये तिने प्रयत्न केले. अखेर तिला 25 मीटर पिस्तुल शुटिंग आवडली.
राहीने विज्ञान क्षेत्रात करिअर करावे अशी तिच्या वडिलांची इच्छा होती. पण राहीची इच्छा पाहून ते शुटिंगच्या ट्रेनिंगसाठी तयार झाले. 2008 मध्ये ते नेमबाजीचे प्रशिक्षक अजित पाटील यांना भेटले आणि त्यांना राहीला प्रशिक्षण देण्यासाठी राजी केले. पाटील यांच्या प्रशिक्षणामुले राही एक ट्रेण्ड नेमबाज बनली. 
तेजस्वनी सावंतचा आदर्श
वडील जीवनराव यांनी सांगितले की, 2006 मध्ये राही 8 व्या वर्गात शिकत होती. त्यावेळी एका स्थानिक वृत्तपत्रात कोल्हापूरच्या तेजस्विनी सावंतला नेमबाजीत दोन सुवर्णपदक मिळ्याचे छापून आले होते. त्यानंतर कोल्हापुरात तेजस्विनीचा सत्कार झाला होता. तेच पाहून राहीने नेमबाज बनण्याचे स्वप्न पाहिले होते. राही आजही तेजस्विनीला आदर्श मानते असे तिच्या वडिलांनी सांगितले. तेजस्वनी रायफल शुटिंग करते पण राहीने पिस्तुल शुटिंगमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. जीवनराव यांनी सांगितले की, राहीने कोल्हापूरच्या गंगावेश येथे संभाजी राजे नेमबाजी प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण सुरू केले. त्यानंतर ती पुण्याच्या लक्ष्य इन्स्टिट्यूट(शूटिंग अकॅजमी) मध्ये ट्रेनिंगसाठी गेली.
वर्ल्डकपमध्ये गोल्ड जिंकणारी पहिली महिला
राही शुटिंह वर्ल्डकपमध्ये पिस्तुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला आहे. तिने 2013 मध्ये दक्षिण कोरियाच्या चांगवानमध्ये झालेल्या ISSF वर्ल्डकपमध्ये 25 मीटर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. तिने अमेरिकेत झालेल्या 2011 वर्ल्डकपमध्येही कांस्यपदकाची कमाई केली होती. राहीने 2010 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धांत भारतासाठी रौप्यपदक मिळवले होते. त्यानंतर 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये राही भारताची सर्वात कमी वयाची नेमबाज होती.






