- कोमल ठोंबरे
धोपटेश्वर गावातले सगळेच लहानथोरं आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलतात याकडे कानात प्राण आणून ऐकत होते. या गावापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या छ. संभाजीनगर शहरात आज मुख्यमंत्री आले होते. निमित्त होतं आजच्या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचं. मुख्यमंत्री आले, त्यांनी ध्वजारोहण
केलं, स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण केलं, भाषण ठोकलं आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर ते निघून गेले. पण त्यांच्या भाषणात धोपटेश्वरच्या गावकऱ्यांची जी मागणी होती त्यावर मुख्यमंत्री एक शब्दही बोलले नाहीत आणि धोपटेश्वरांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली…
जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील धोपटेश्वर गावातील लोकांची अशी कोणती मागणी होती? ही मागणी होती, दगडाबाई शेळके यांच्या स्मारकाची…! दगडाबाई शेळके कोण होत्या, तर ज्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनासाठी मुख्यमंत्री आले होते त्याच मुक्ती संग्रामात या दगडाबाई शेळकेंनी जुलमी निजामशाहीला सळो की पळो करून सोडलं होतं.
मराठवाड्याची ‘झाशीची राणी’ म्हणून साऱ्या पंचक्रोशीत ओळखल्या जाणाऱ्या या दगडाबाईंचे स्मारक याच धोपटेश्वर गावात व्हावे म्हणून गेल्या दोन वर्षांपासून ही लोकं वाट बघत आहेत. वास्तविक सरकारने दोन वर्षांपूर्वीच स्मारकाची घोषणा केली होती, पण पुढे ना फाईल सरकली, ना निधी मंजूर झाला ना स्मारकासाठी जागा शोधण्यात आली.
आज 17 सप्टेंबर, जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धोपटेश्वर गावातील लहान लेकरापासून ते वयोवृद्ध माणसापर्यंत सगळ्यांनीच सकाळी ग्रामपंचायतची वाट पकडली होती. गावामध्ये प्रभातफेरी ही काढण्यात आली.. स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायत कार्यालयासमोर ध्वजारोहण झालं. आकाशात तिरंगा फडकत होता आणि गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर अभिमान झळकत होता...
अभिमान यासाठी की, मराठवाडा मुक्तिसंग्रामच्या लढ्यात याच धोपटेश्वर गावातील दगडाबाई शेळके यांनी रझाकारांना घाम फोडून, जुलमी निजामशाहीविरुद्ध थेट छाती ठोकून लढा दिला होता. धोपटेश्वरची ही सून आपल्या शौर्यानं इतिहासात नाव कोरून गेली. पण आज त्यांच्या आठवणींचं प्रतीक असलेलं त्यांचं घर मोडकळीस आलं आहे, तर ज्या स्मारकाची शासनानं घोषणा केली होती, त्या निधीचंही अद्याप काही झालेलं नाही. गावकरी मात्र दगडाबाईंच्या शौर्याच्या कथा सांगत स्मारकाच्या प्रतिक्षेत आहेत. या रणरागिणीचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावा, यासाठी त्यांचं स्मारक उभारणं ही काळाची गरज आहे.
धोपटेश्वर येथील दगडाबाई शेळके यांचे हेच ते ऐतेहासिक परंतु आता पडझड झालेले घर
‘जालन्याची झाशीची राणी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दगडाबाईंचा इतिहास...
भारत 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र झाला तरी मराठवाडा निजामशाहीच्या ताब्यात होता. निजामाच्या जुलमी राजवटीविरुद्ध अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी धैर्याने लढा दिला, त्यापैकी एक म्हणजे दगडाबाई शेळके. अखेर 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा निजामाच्या तावडीतून मुक्त झाला. त्या ऐतिहासिक दिवसाच्या स्मरणार्थ 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तिसंग्राम दिवस म्हणून साजरा केला जातो.
दगडाबाई शेळके यांचा जन्म केव्हा झाला, याची नेमकी तारीख उपलब्ध नाही. पण जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील कोलते टाकळी हे त्यांचं गाव होते. त्यांचं लग्न बदनापूर लगतच्या धोपटेश्वर येथील देवराव शेळके यांच्याशी झाले. दगडाबाईंनी स्वामी रामानंद तीर्थ यांची प्रेरणा घेत स्वतःला मराठवाडा मुक्तिसंग्रामात झोकून दिले. त्यांनी बंदूक व हातगोळे चालवण्याचे प्रशिक्षण घेतले. एकदा निजामाच्या सैनिकांनी त्यांना शस्त्रास्त्रांसह रंगेहाथ पकडले होते. यामुळे त्यांच्यावर तुरुंगवास भोगण्याचीही वेळ आली होती.
पुढे 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा जुलमी निजामाच्या तावडीतून मुक्त झाला. त्यानंतर दगडाबाईंनी स्वतःला समाजकार्यात झोकून दिले. त्यांच्या कार्याची दखल केंद्र सरकारने घेतली. तत्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांनी त्यांचा मोठा सत्कार केला. त्या चांदवड येथील महिला शेतकरी मेळाव्याच्या अध्यक्षाही होत्या. 5 मे 2013 रोजी त्यांनी वयाच्या 98 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर धोपटेश्वर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्यासाठी नवऱ्याचे दुसरे लग्न लावून दिले
त्याकाळी दगडाबाई चक्क शर्ट-पॅन्ट घालून रात्री बेरात्री घोड्यांवरून या गावातून त्या गावात स्वातंत्र्यसैनिकांचे गुप्त संदेश पोहोचवण्याचे काम करत होत्या. हे काम करताना अनेकदा त्यांना कौटुंबीक रोषाला सामोरे जावे लागले. पण त्या खचल्या नाहीत. मुक्तिसंग्रामाच्या लढ्यात आपल्या जीवाचं काहीही बरेवाईट होऊ शकतं याची पूर्ण जाणीव त्यांना होती. त्यामुळेच त्यांनी स्वतः आपल्या पती देवराव यांचे लग्न मैनाबाई नामक महिलेशी लावून दिले.
निजामाच्या रझाकारांनी 1940 च्या दशकात मराठवाड्यात प्रचंड हैदोस घातला होता. एकदा त्यांनी जालना जिल्ह्यातील कोलते टाकळी गावात छावणी टाकली. त्यांनी गावातील महिलांना त्रास देण्यास सुरुवात केली. या प्रकारामुळे गावकरी घाबरले, पण दगडाबाई निडरपणे या प्रसंगाला सामोरे गेल्या. त्यांनी गुपचूप गावातील काही तरुणांना एकत्र केले. हातात बंदूक व हातबॉम्ब घेतले.
त्यानंतर रात्रीच्या अंधारात त्यांनी रझाकारांच्या छावणीवर हल्ला चढवला. त्यांनी रझाकारांच्या तंबूत अक्षरशः धुमाकूळ घालता. या घटनेमुळे मराठवाड्याच्या महिला ह्या तलवारीपेक्षा तीक्ष्ण व आगीपेक्षा भयंकर असल्याची जाणीव रझाकारांना झाली. त्या रात्री गावातील माणसं दगडाबाईंच्या शौर्याला पाहून अक्षरशः थक्क झाली आणि त्या दिवसापासून दगडाबाईंना मराठवाड्याची ‘झाशीची राणी’ म्हणून ओळखलं गेलं…
दोन वर्षांनंतरही दगडाबाईंचं स्मारक अद्याप रखडलेलं...
दगडाबाई शेळके यांच्या शौर्याच्या स्मृती जतन व्हाव्यात म्हणून 16 सप्टेंबर 2023 रोजी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यांच्या स्मारकासाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. धोपटेश्वर येथे स्मारक उभं करण्याचेही ठरले. पण दोन वर्ष उलटूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. केवळ अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी केली, त्यापुढे काहीच हालचाल झाली नाही. 
याच विषयावर ‘टीम बाईमाणूस’ने धोपटेश्वर येथील गावकऱ्यांशी संवाद साधला. धोपटेश्वर गावातील उपसरपंच नंदू दाभाडे यांनी ‘बाईमाणूस’शी बोलताना सांगितले, "दगडाबाई शेळके ह्या मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या लढ्यातील रणरागिणी होत्या, त्यांनी जुलमी निजामाच्या विरुद्ध लढा देऊन मराठवाडा मुक्तिसंग्रामामध्ये मोलाची भूमिका बजावलीये. 23 सप्टेंबर 2023 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रिमंडळाची बैठक होऊन त्यामध्ये दगडाबाई शेळके यांच्या स्मारकासाठी 5 कोटी रुपयाचा निधी शासनाने मंजूर केला होता.
आजपर्यंत दोन वर्ष झाले त्या निधीचं काय झालं कोणाला पता नाही. स्मारकासाठी आम्ही जागा देखील शोधून ठेवलीय. सरकारी यंत्रणेकडून एक दोन अधिकारी आले होते, जागेची पाहणी करून ते गेले, या गोष्टीला आता दोन वर्षे झालेत.. दगडाबाई शेळके यांचं कार्य स्मरणात राहण्यासाठी त्यांचं स्मारक उभारणं अत्यंत गरजेचं आहे."
दगडाबाई म्हणजे बॉम्बवाली बाई…
दगडाबाई शेळके यांचे चिरंजीव मनोहर शेळके हे धोपटेश्वर मध्येच राहतात. त्यांच्याशी ‘बाईमाणूस’ने संवाद साधल्यार ते म्हणाले, "आमच्या आईचं माहेर कोलते टाळकी अन् त्याचं सासर धोपटेश्वर. निजामाच्या काळात इथे रोहिले (क्रझाकार) यायचे, ते खूप अन्याय करायचे, लूटमार करायचे, महिलांना घराबाहेर पडण्यास मनाई करायचे.
त्या वेळी आई कोलते टाकलीला गेली, तिथं संपत भिल्ल नावाचा एक माणूस होता, त्याला गोफण चालवणं, बंदूक चालवणं, बॉम्ब तयार करणं हे सगळं येत होतं. आईने ते सगळं त्यांच्याकडून शिकून घेतलं. गोविंदभाई, राधाकिसन लाला यांच्या संपर्कात आल्यामुळे आई रझाकारांवर तुटून पडल्या .मग घोड्यावर बसणं, रेल्वेरूळ उखडून टाकणं, गोळीबार करणं हे सर्व तिने केलं. आईजवळ हातबॉम्ब सुद्धा असायचे, सगळे म्हणायचे दगडाबाई बॉँम्बवाली बाई आहे, रझाकार त्यांच्या जवळच जायचे नाहीत, पळून जायचे ते. असं आई आम्हाला नेहमी सांगायची.."
दगडाबाई शेळके यांच्या नियोजित स्मारकाची संभाव्य जागा
मनोहर शेळके पुढे सांगतात, "दोन वर्षांपूर्वी आमच्या गावात आमदार नारायण कुचे आले होते. दगडाबाईंचं स्मारक मंजूर झालं, असं म्हणून आमचा सत्कार केला. त्याच्यानंतर काहीच नाही.... जिथे आई राहायची ते घर आता पडलंय.. आई गावातील प्रत्येक महिलेसाठी प्रेरणास्थान होती. या पुढच्या मुलींनाही तिचा इतिहास कळावा यासाठी तिचं स्मारक उभारणं गरजेच आहे."
‘’आम्हाला त्यांचा अभिमान आहे’’
मीराबाई शेळके या दगडाबाईंच्या शेजारी आहेत. दगडाबाईंच्या शेवटच्या काळात त्या अनेकदा त्यांच्यासोबत वेळ घालवायच्या. त्या सांगतात, "दगडाबाई आमच्या शेजारी होत्या, खूप धाडसी होत्या, खूप अभिमान आहे सगळ्या गावाला त्यांचा. आमच्या शेजारी असल्यामुळे आम्ही नेहमी इथेच बसून गप्पा मारायचो. खूप हिंमत होती त्यांच्यात.. त्यांनी आम्हाला अनेक किस्से सांगितलेत.. दगडाबाई चा विषय सगळी कडेच निघतो, सगळे ओळखतात त्यांना.." 
राधाकिसन दाभाडे यांचं वयही आता 70 च्या घरात आहे. दगडाबाईंचं धाडसी काम त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे. ते सांगतात, "दगडाबाई शेळके यांचं माहेर टाकळी होतं. त्यांचा विवाह धोपटेश्वरचे देवराव पाटील यांच्याशी झाला, भारत स्वतंत्र झाला होता पण मराठवाडा निजामाच्या गुलामगिरीत होता. दगडाबाईने मराठवाड्यासाठी खूप मोलाचं काम केलं, त्यांना घरून, समाजातून भरपूर त्रास झाला पण त्या स्वतंत्र सेनानी होत्या.. म्हणून त्या मागे न हटता निजामाशी लढल्या आणि अखेर 17 सप्टेंबरला मराठवाडा स्वतंत्र झाला. दगडाबाईंचं धाडसी काम लक्षात राहावं यासाठी लवकरात लवकर स्मारक तयार करून द्यावं ही सगळ्या गावकऱ्यांची, तालुक्याची आणि सगळ्या जिल्ह्याची इच्छा आहे."






