कुमारी मातांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरला आहे. दहा वर्षांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यात गरीबी व निरक्षरतेमुळे अनेक तरुणींची फसवणूक झाली आणि त्यातून त्यांना गर्भधारणा झाली होती. आजही त्याचे परिणाम यवतमाळातील कुमारी माता भोगत आहेत. पण आता कुमारी मातांच्या संख्येत वाढ होण्याची कारणं वेगळी आहेत आणि हे प्रमाण आता ग्रामीण भागाऐवजी शहरी भागात वाढलं असल्याने बिकट सामाजिक प्रश्न निर्माण झाला आहे. बीड आणि नागपूर जिल्ह्यात अल्पवयीन मुलींच्या गर्भधारणेचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढले आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्वत: ही बाब विधिमंडळात लेखी उत्तराद्वारे मान्य केली.
विदर्भ- मराठवाड्यात कुमारी मातांचे प्रमाण वाढले..
बीड जिल्ह्यात 2024-25 या कालावधीत बालविवाहाच्या पार्श्वभूमीवर 12 अल्पवयीन मुली गर्भवती झाल्याची नोंद आहे. तर नागपूर शहर व जिल्ह्यात एकूण 124 प्रकरणांपैकी 67 प्रकरणांमध्ये अल्पवयीन मुली गर्भवती झाल्या आहेत. नागपूरच्या शासकीय रुग्णालयात जानेवारी 2022 ते जून 2024 दरम्यान आलेल्या 124 कुमारी मातांच्या प्रकरणांचे विश्लेषण केल्यानंतर यातील तब्बल 67 प्रकरणे ही 18 वर्षाखालील वयोगटातील होती.
18 ते 21 वयोगटात 30 कुमारी माता तर 22 ते 25 या वयोगटात 21 महिला होत्या. 25 वर्षांवरील अविवाहित 6 महिला गर्भवती होत्या. गर्भधारणा झाल्यानंतर 33% कुमारी मातांनी गर्भपाताचा निर्णय घेतला असून 48% महिला प्रसुती पर्यंत पोहोचल्याचही डॉक्टरांनी सांगितलं. ज्यांची गर्भधारणा 24 आठवड्यांपेक्षा कमी होती अशा महिलांनी गर्भपाताचा पर्याय स्वीकारला तर 24 आठवड्यानंतरच्या प्रकरणांमध्ये अनेक महिलांना कुमारी मातृत्व स्वीकारावे लागले.
54% बाळ कमी वजनांची
अल्पवयात गर्भधारणा आणि बाळंतपण हे मुलीच्या शारीरिक आणि मानसिक मुलाच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. यामुळे कुपोषण, रक्तस्त्राव, उच्च रक्तदाब आणि प्रसूतीदरम्यान गुंतागुंत निर्माण होऊ शकते. कमी वजनाची बाळ जन्माला येऊन जिवालाही धोका होऊ शकतो. प्रसूती झालेल्या 75 प्रकरणांपैकी 54 टक्के बाळ कमी वजनाची होती. यातील 12 टक्के बाळांचा मृत्यू झाला.
48 टक्के कुमारी मातांनी दिला बाळाला जन्म
नोंद झालेल्या कुमारी मातांपैकी 48 टक्के कुमारी मातांनी बाळाला जन्म दिला, तर 33 टक्के कुमारी मातांनी गर्भपाताचा निर्णय घेतला. 24 आठवड्यांखालील गर्भवती महिलांनी अधिक प्रमाणात गर्भपाताचा पर्याय निवडला, तर 24 आठवड्यांनंतरच्या प्रकरणांमध्ये प्रसूतीचे प्रमाण अधिक होते.
कुमारी मातांच्या अनेक प्रकरणांमध्ये मुलींची किंवा महिलांची कौटुंबिक पार्श्वभूमी हालाकीची आहे. आर्थिक परिस्थिती खचलेली,कमालीचे दारिद्र्य शिक्षणाचा गंध नाही, कुटुंबाचे दुर्लक्ष अशा अनेक कारणांनी कुमारी मातांचे प्रमाण चिंतेचा विषय ठरत आहे. अनेकींना लैंगिक शोषणाच्या परिस्थितीतून जावे लागले असल्याने बदनामीच्या भीतीने अनेक महिला वेळेवर उपचार घेत नसल्याने बाळाच्या आरोग्यावरही परिणाम होतो.
कुमारी माता… लैंगिक शिक्षणाचा अभाव
यामागील कारणांचा शोध घेतला तर नकळत्या वयात जडलेले प्रेम, त्यातून निर्माण होणारे शारीरिक आकर्षण, यामुळे अल्पवयीन मुलांनी घर सोडण्याचे प्रमाण अधिक आहे. या घटनांमुळे कुमारी मातांचे प्रमाण वाढत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, होणाऱ्या बाळांना कुमारी माता सांभाळण्यास तयार नसल्याने बहुतांशी बाळांना अनाथाश्रमात दाखल केले जाते. काही बेवारस सोडली जातात. यामुळे वेगळाच सामाजिक प्रश्न निर्माण झाला आहे.
अनेक तरुणींना लैंगिक आणि प्रजनन आरोग्याविषयी पुरेशी माहिती नसते. या अज्ञानामुळेही अनपेक्षित गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते. लैंगिक शिक्षणाचा अभाव, गर्भनिरोधक उपायांची माहिती नसणे आणि सामाजिक व धार्मिक बंधने यामुळे तरुणी सुरक्षित लैंगिक संबंध ठेवण्यात अयशस्वी ठरतात. कुमारी मातांना मानसिक आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते.
गर्भधारणेनंतर आणि प्रसूतीनंतर त्यांना नैराश्य, चिंता, सामाजिक एकाकीपणा आणि आत्महत्येच्या विचारांचा सामना करावा लागतो. विशेषतः, किशोरवयीन मातांना पोस्टपार्टम डिप्रेशनचा धोका अधिक असतो. कुमारी मातांना समाजाकडून आणि कुटुंबाकडून अपमान, नाकारले जाणे आणि एकाकीपणाचा सामना करावा लागतो. काही वेळा, कुटुंबीय मुलींच्या गर्भधारणेची जबाबदारी स्वीकारत नाहीत, ज्यामुळे त्या मुलींना अनैतिक गर्भपात किंवा नवजात शिशूंच्या देखभालीसंबंधी समस्यांना सामोरे जावे लागते.
उपाययोजना आणि शिफारसी
शाळांमध्ये आणि समुदायांमध्ये लैंगिक आणि प्रजनन आरोग्याविषयी सर्वसमावेशक शिक्षण देणे आवश्यक आहे.
- कुमारी मातांना मानसिक आरोग्याच्या सेवा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
- बालविवाह प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
- कुमारी मातांना समाजाकडून आणि कुटुंबाकडून समर्थन मिळणे आवश्यक आहे.






