- अप्सरा आगा
सेक्सचा व्यापार करणारी केंद्रे भारतात अनेक आहेत. त्यांची संख्या पावणेतीन लाखांच्या आसपास आहे. महिला व बाल कल्याण खात्याने भारतात घेतलेल्या सर्वेक्षणानुसार भारतात सात लाखांच्यावर स्त्री वेश्या आहेत. अनधिकृत आकडा किती असेल याची कल्पना करवत नाही. पैकी सुमारे ३६ टक्के मुली अठरा वर्षाच्या आतील आहेत. तर सव्वा लाख लहान मुलं-मुली आहेत. जर या वयात त्यांचा या व्यवसायात प्रवेश होत असेल तर त्यांचे नातेसंबंध कशा प्रकारचे पुढे घडत असतील? अर्थातच त्यांचा अंत हा केविलवाणाच असतो.
वेश्याव्यवसाय हा भारतात सर्वात हीन समजला जाणारा व्यवसाय आहे. या व्यवसायाविषयी एक प्रकारची घृणा समाजात आहे, आणि पुरुषी मानसिकता असणारे महाभाग या व्यवसायातील स्त्रीला 'कुलटा' आणि 'समाजविघातक' समजतात. नातेसंबंध म्हणजे काय हे समजायच्या आतच जर शरीर संबंधात ढकलली जात असेल तर ती या विकृत समाज व्यवस्थेचा बळी आहे. ही विकृत समाजव्यवस्था उदारपणा आणि वैज्ञानिक ज्ञानाच्या अभावामुळे घडली आहे. खरेतर लैंगिक साक्षरता नावाची भानगड आमच्या समाजात कधीच नव्हती व आजही नाही. त्याचा दुष्परिणाम म्हणजे या देशात पसरलेली वेश्यालये.
कोणालाही हौसेने वेश्या व्यवसायात यायचं नसतं. अनेकजणी परिस्थितीच्या ओघात या जाळ्यात अडकतात. एकदा या अंधाऱ्या गल्लीत पाऊल पडलं की समाजाकडून केवळ अवहेलना, टोमणे आणि दुजाभावच मिळतो. बुधवार पेठेत राहणाऱ्या अशाच काही महिलांची ही गोष्ट, जिथे जगण्याच्या लढाईत त्यांनी व्यवसायालाही प्रतिष्ठेचं रूप दिलं. वेश्या व्यवसायाला जोड धंदा आणि स्वाभिमानाने जगण्यासाठी त्यांनी अगरबत्ती बनवण्यासारख्या कौशल्यावर आधारित कामाला सुरुवात केली. 'सहेली'सारख्या संस्थांच्या मदतीने आता त्या केवळ स्वतःसाठीच नाही, तर अनेक महिलांसाठी आशेचा किरण ठरू लागल्या आहेत, त्यांच्याविषयी...
'सहेली'च्या साथीनं तिनं स्वतःला पुन्हा घडवलं…
"वीस वर्षांपूर्वी, मी लहान असताना माझ्या पालकांनी माझं लग्न लावून दिलं. लग्नानंतर मला एक मुलगी झाली. सर्व काही व्यवस्थित चाललं होतं. पण काही दिवसांतच माझा नवरा मला सोडून गेला. आता, मी माझ्या मुलीला माझ्या आई- वडिलांकडे घरी राहण्यासाठी घेऊन गेलो. तिथे मला खूप त्रास दिला जात होता. छळ सहन न झाल्याने मी कामाच्या शोधात घर सोडलं. एका दलालने काम देण्याच्या बहाण्याने मला पुण्यात आणून विकलं. आता मी काहीही करू शकत नव्हते. माझ्या मागे मला आधार देणारं कोणीही नव्हतं. नंतर समोर आलेल्या परिस्थितीला सामोरे गेले. पण सुरुवातीला मी माझ्या स्वतःच्या मर्जीने वेश्याव्यवसाय करत नव्हते, परिस्थितीने मला भाग पाडलं. नंतर जबरदस्तीने मी बुधवार पेठेत वेश्याव्यवसाय करू लागले. माझी मुलगी गावाकडेच होती. मी तीन वर्षांने गावी गेले, पण त्यांनी मला राहू दिलं नाही. त्यांनी मला हाकलून लावलं. त्यांनी माझा खूप छळ केला. संगीता सांगत असते. "या व्यवसायात जितकं टॉर्चर नाही झालं, त्यापेक्षा जास्त घरच्यांकडून सहन करावं लागलं."
मात्र आज संगीता स्वतःच्या पायावर उभी आहे. समाजाने नाकारलेलं आयुष्य ती स्वतःसाठी जगतेय स्वाभिमानाने आणि समाधानाने…
संबंधित लेख वाचा: ‘दलित देवदासींचे’ दुहेरी शोषण… जात व्यवस्था आणि वेश्या व्यवसाय विरुद्ध कसे झगडत आहेत? |
'तुम्ही दुसरं काही काम का करत नाही? तुमच्यामुळे समाज बिघडत आहे', ही आमच्या बद्दलची लोकांची मानसिकता आहे. आम्हाला काय हौस आली का हे काम करायची? परिस्थितीने आम्हाला या जाळ्यात टाकलं. एकदा आपण या जाळ्यात अडकलो की, आपण सहज बाहेर पडू शकत नाही. हे काम सोडून द्या, असं म्हणणारा समाजच आम्हाला स्वीकारत नाही. आम्हाला कोणीही काम देत नाही. कारण लोकं आम्हाला बुधवार पेठेच्या रस्त्यांवर पाहत असतात.
त्यामुळे त्यांच्या मनात आमच्याबद्दलची एक वेगळीच प्रतिमा तयार होते. आम्ही दुसरीकडे कुठेतरी काम करायला गेलो, तरी आम्हाला टोमणे ऐकावे लागतात. कोरोना काळापासून आमचे काम कमी होत चालले आहे. त्यामुळे दुसरं काम असलं पाहिजे. म्हणून, मी अगरबत्ती बनवण्याचं प्रशिक्षण घेतलं. आता मी अगरबत्ती बनवते आणि विकते. त्यातून मला काही पैसे मिळतात. हळूहळू अगरबत्ती बनवण्याचं काम वाढेल, असं बुधवार पेठमधील कविता सांगते.
वेश्याव्यवसायातून अगरबत्तीपर्यंतचा प्रवास
प्रभा गेल्या दोन-तीन वर्षांपासून 'सहेली' संस्थेत महिला सेक्स वर्कर्सच्या हक्कांसाठी आणि आरोग्यासाठी काम करत आहेत. त्या म्हणतात, 'मी बुधवार पेठेतील सेक्स वर्कर्स महिलांसाठी काम करत असल्याने या महिलांना मी खूप जवळून पाहिलं आहे. लॉकडाऊन दरम्यान त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. आणि तेव्हापासून, काम खूप कमी झाले आहे. भविष्यात त्यांच्या वयानुसार काम होणार नाही.
त्यांचे नातेवाईक त्यांना जवळ घेणार नाहीत. अशा परिस्थितीत त्यांना आधार देणारे कोणीही नसेल. समाज त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे. भविष्यात त्या स्वतःचे जीवन जगू शकतील, यासाठी ‘सहेली’ने या महिलांना कौशल्य-आधारित प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा एक भाग म्हणजे 'अगरबत्ती' बनवण्याचे प्रशिक्षण. जेणेकरून भविष्यात ते त्यांच्या उपजीविकेचे साधन आणि बुधवार पेठेतील महिलांसाठी एक बाजूचा व्यवसाय बनेल.'
आज बुधवार पेठेतील संगीता, कविता आणि त्यांच्यासारख्या अनेकजणी आपलं आयुष्य बदलण्यासाठी प्रयत्नशील आहेत. जर पूर्वी त्यांनी परिस्थितीमुळे वेश्या व्यवसायात पाऊल ठेवलं, तर आता त्या परिस्थितीवर मात करून स्वतःसाठी एक नवीन ओळख निर्माण करत आहेत. अगरबत्ती बनवण्यासारख्या कौशल्यावर आधारित कामातून त्या आता स्वाभिमानाने आणि सन्मानाने जगू पाहत आहेत.ही केवळ त्यांच्या परिवर्तनाची गोष्ट नाही, तर आपल्या समाजाच्या दृष्टीकोन बदलण्याची गरज अधोरेखित करणारी कहाणी आहे.
समाज म्हणतो: “हे काम सोडा...” पण मग समाजच त्यांना दुसरी संधी, दुसरं काम, दुसरी ओळख द्यायला का तयार नाही? ‘सहेली’सारख्या संस्था त्या संधी निर्माण करत आहेत, पण एक संस्था पुरेशी नाही. त्यांना गरज आहे, आपल्यासारख्या प्रत्येकाच्या आधाराची आणि विश्वासाची. आज त्यांच्या हातून बनणाऱ्या अगरबत्त्यांचा सुगंध फक्त घराला नाही, तर त्यांच्या आयुष्यालाही नव्या वाटेचा प्रकाश देतो आहे. त्यांचा हा प्रवास थांबू नये, तर फुलावा, वाढावा. मगच खरं परिवर्तन घडेल.
वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी 'एक हात मदतीचा'
बुधवार पेठ ही पुण्यातील सर्वात जुनी रेडलाइट एरिया म्हणून ओळखली जाते. येथे राहणाऱ्या महिलांना आयुष्यभर वेश्याव्यवसायाच्या चौकटीतच जगावे लागते, अशी परिस्थिती दीर्घकाळ होती. मात्र, ‘सहेली’ संस्थेने या महिलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे. सहेली संस्थेत जवळपास 2000 हजार पेक्षा जात वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला कार्यरत आहेत. संस्थेच्या माध्यमातून शिवणकाम, हस्तकला, पाककला, लघुउद्योग यांसारख्या प्रशिक्षणांच्या सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
सहेली संस्थेत हजारो महिला उत्साहाने काम करतात.संस्थेकडून महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.या महिला सुगंधी अत्तर,सुगंधी अगरबत्ती,हर्बल साबण अशा विविध गोष्टींची स्वतः निर्मिती करतात. ‘सहेली’च्या उपक्रमामुळे अनेक महिलांनी आत्मविश्वासाने नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे.
वेश्याव्यवसायाच्या अंधाऱ्या चक्रातून बाहेर पडून त्यांनी कौशल्याधारित व्यवसाय स्वीकारले आहेत. त्यामुळे समाजातील त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन हळूहळू बदलताना दिसतो. त्यामुळेच संस्थकड अनुदान असा वा नसा, प्राशिक्षित कर्मचारा असात किंवा नसात एकदा चालू केलेले काम सदैव चालू राहतं हीच संघटनेची खरी ताकद आहे. या सर्व प्रवासाला जोड लागते ती आत्मविश्वास आणि सातत्याची.
वेश्या वस्तीतील महिलांचे पुनर्वसन ही एक खरंच गुंतागुंतीची गोष्ट आहे. पोलिसांची धाड पडल्यानंतर सोडवलेल्या बायांना संस्थेच्या आधारगृहात डांबणे म्हणजे पुनर्वसन नव्हे. काही संस्था पुनर्वसन कार्यक्रमांतर्गत पापड, लोणची, मेणबत्या बनवणे किंवा ब्युटी पार्लर, शिवणकाम या कोर्सला त्यांना दाखल करणे असे प्रयोग करतात पण त्यातून मिळणारे पसे नक्कीच पुरेसे नसतात, हे सत्य आहे. त्यामुळे एक एक महिला निवडून किंवा अगदी छोटे गट निवडून योग्य प्रकारचे पुनर्वसनाचे माध्यम निवडणे आवश्यक ठरते. असे काही यशस्वी प्रयोग 'सहेली'ने केले आहेत.
अशाप्रकारे आहे अगरबत्ती बनवण्याची प्रक्रिया…
- बुधवार पेठेतील दत्त मंदिरात वाहिलेली फुले गोळा केली जातात. ही फुले फेकून न देता पुनर्वापरासाठी वापरली जातात.
- गोळा केलेली फुले स्वच्छ ठिकाणी पसरवून वाळवली जातात, जेणेकरून त्यातील आर्द्रता निघून जाईल.
- सुकवलेली फुले मिक्सरमध्ये बारीक करून नैसर्गिक फुलपावडर तयार केली जाते.
- या फुलपावडरीत चारकोल पावडर, लाकडी मैदा आणि नैसर्गिक अर्थांचे असेन्स मिसळून अगरबत्तीचं पीठ तयार केलं जातं. पिठाच्या अगरबत्ती बनवली जाते.
- बनवलेल्या अगरबत्त्या सावलीत वाळवल्या जातात आणि नंतर पॅकेजिंग करून मॉल्समध्ये विक्रीसाठी पाठवलं जातं.






