गेल्या दोन-चार दिवसांत लोकांच्या आरोग्याच्या हेळसांडीबाबत दोन धक्कादायक बातम्या आल्या. बरं या बातम्या कुणा आहारतज्ज्ञ किंवा सोशल मीडिया इन्फ्लुअन्सरकडून नव्हे तर चक्क सरकार आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून प्रसिद्ध झाल्या असल्यामुळे प्रकरण जरा गंभीर बनलं आहे.
यापैकी पहिली बातमी आहे मिठाच्या अतिसेवनाबाबतीत… भारतात मीठाचं अतिसेवन हा एक गंभीर सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न बनला आहे, असा अहवाल इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने प्रसिद्ध केल आहे आणि दुसरी बातमी आपण अत्यंत आवडीने खात असलेल्या वडापाव, समोसे, कचोरीच्या बाबतीत आहे.
ज्याप्रकारे सिगारेटच्या पाकिटावर धोक्याचा इशारा छापलेला असतो, त्याचप्रकारे आता तेलकट आणि गोड पदार्थांच्या बाबतीतही संभावित धोक्याचं फलक केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या सर्व कार्यालयांमधील उपहारगृहांमध्ये लावले जाणार आहेत. याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परिपत्रक प्रसिद्ध केलं आहे. या पदार्थांमध्ये समोसे, वडापाव, कचोरी, पिझ्झा यांचा समावेश आहे. कार्यालयांमधील कँटीनमध्ये तेलकट, गोड सेवनासंदर्भात धोक्याचा इशारा लावण्याचे आदेश केंद्र सरकारने सर्व कार्यालयांना दिले आहेत.
तुमच्या शरीरात दररोज 5 ग्रॅमपेक्षा जास्त मीठ जात असेल तर…?
कधी स्वयंपाकात मिठाचे प्रमाण कमी झाले तर तुम्ही लगेचच नाक मुरडता आणि अगदी आनंदाने जेवण्यास टाळाटाळ करता. मग अशावेळी मिठाचे कमी झालेले प्रमाण संतुलित करण्यासाठी तुम्ही जेवणात वरुन अतिरिक्त मीठ घेता. पण असं करुन तुम्ही आरोग्याच्या गंभीर समस्यांना अगदी मोफत आमंत्रण देता आहात. मिठाच्या अतिसेवनाने अनेक नसलेले आजार तुमच्या शरीरात नव्याने जन्म घेऊ लागतील.
पण या गोष्टीपासून बरेच लोक अनभिज्ञ असल्याने ते जेवणात योग्य प्रमाणात मीठ असलं तरीही आपल्या सवयीमुळे भरमसाठ मीठ वरुन टाकतात. पण आज आम्ही तुम्हाला या सवयीमुळे भोगाव्या लागणा-या परिणामांविषयी सांगणार आहोत. ते जाणून घेतल्यावर नक्कीच तुम्ही याचे गांभिर्य समजून घ्याल!
मीठामुळे आपल्या जेवणाची लज्जत वाढते. तसंच मानवी जीवनासाठीही मीठ अत्यंत गरजेचं आहे. मिठात असलेल्या सोडियममुळे शरीरात पाण्याचं प्रमाण संतुलित राहण्यास आणि पेशींना पोषक तत्त्वं शोषून घेण्यासाठी मदत होते. असं सगळं असताना अचानक इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी (NIE) यांच्या ताज्या अहवालामुळे लोकांच्या आरोग्यामध्येच आता ‘मिठाचा खडा’ पडला आहे.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचा धक्कादायक अहवाल
भारतात मीठाचं अतिसेवन हा एक गंभीर सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न बनला आहे, असे या अहवालाचा निष्कर्ष असला तरी त्यावर अधिक जाणून घेण्यापूर्वी हे बघूया की आपल्या शरीराला मिठाची नेमकी किती गरज आहे आणि त्यापेक्षा अधिक मिठाचे सेवन केल्यास काय आजार होऊ शकेल?
संबंधित लेख वाचा: 1) आपल्या आहारात प्लास्टिकचा तांदूळ… समज आणि गैरसमज! |
मीठ आयुष्यात अतिशय महत्त्वाचं आहे. विशेषत: पेशींसाठी ते अतिशय महत्त्वाचं ठरतं. यामध्ये सर्व मज्जातंतू, मेंदू, कणा, आणि सर्व स्नायूंचाही समावेश होतो. मीठ हे त्वचा आणि हाडांसाठी सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरतं. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार, आपल्या जेवणात नियमितपणे 5 ग्रॅम म्हणजेच जवळपास एक चमचा एवढं मीठ असणं आवश्यक आहे.
त्यात 2 ग्रॅम सोडियम असतं. मात्र जागतिक पातळीवर बोलायचं झालं तर लोक सरासरी 11 ग्रॅम मिठाचं सेवन करतात. त्यामुळे हृदयरोग, गॅस्ट्रिक कॅन्सर, ऑस्टिओपोरोसिस, लठ्ठपणा आणि किडनीच्या विकारांचा धोका वाढतो. जागतिक आरोग्य संघटनेचा अंदाज आहे की अतिरिक्त प्रमाणात मीठ खाल्ल्यामुळे दरवर्षी अंदाजे 18.9 लाख लोकांचा मृत्यू होतो.
आणि म्हणूनच भारतात मीठाचं अतिसेवन हा एक गंभीर सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न बनला आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी (NIE) यांच्या ताज्या अहवालानुसार, भारतीय लोकसंख्येमध्ये मीठाचं जास्त सेवन उच्च रक्तदाब आणि हृदयरोगाच्या वाढत्या जोखमीशी निगडीत आहे. या अहवालात असं नमूद करण्यात आलं आहे की, भारतीय जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केलेल्या दररोजच्या मीठाच्या मर्यादेपेक्षा जास्त मीठ खातात, ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत.
ICMR-NIE अहवालातील महत्त्वाचे मुद्दे
जास्त मीठ सेवन: अहवालानुसार, भारतीय सरासरीपेक्षा जास्त मीठ (सोडियम) खातात, जे WHO च्या 5 ग्रॅम प्रती दिन (सुमारे 1 चमचा) या शिफारशीपेक्षा जास्त आहे.
उच्च रक्तदाब: भारतात उच्च रक्तदाबाचं प्रमाण वाढत आहे आणि यामागे मीठाचं अतिसेवन हे प्रमुख कारण आहे.
हृदयरोगाचा धोका: जास्त सोडियममुळे हृदयविकार, स्ट्रोक आणि इतर हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो.
जागरूकतेचा अभाव: अहवालात असंही नमूद आहे की, कमी सोडियम आहाराबाबत लोकांमध्ये जागरूकता कमी आहे, विशेषतः ग्रामीण भागात.
कमी सोडियम जागरूकता प्रकल्प
ICMR आणि NIE ने कमी सोडियम आहाराला प्रोत्साहन देण्यासाठी एक विशेष प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पाचा उद्देश लोकांना मीठाचं सेवन कमी करण्यासाठी आणि निरोगी जीवनशैली स्वीकारण्यासाठी प्रेरित करणं आहे. यामध्ये खालील उपायांचा समावेश आहे.
- लोकांना मीठाचं अतिसेवन आणि त्याच्या दुष्परिणामांबाबत शिक्षित करणं.
- प्रक्रिया केलेल्या आणि पॅकेज्ड खाद्यपदार्थांवरील सोडियमच्या मात्रेबाबत स्पष्ट लेबलिंगला प्रोत्साहन.
- कमी मीठ असलेले खाद्यपदार्थ आणि पर्यायी मसाले वापरण्याबाबत मार्गदर्शन.
तज्ज्ञांचं मत
तज्ज्ञांच्या मते, आहारातील मीठाचं प्रमाण कमी केल्याने उच्च रक्तदाब आणि हृदयरोगांचा धोका लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो. यासाठी घरगुती जेवणात मीठाचा वापर मर्यादित ठेवणं, प्रक्रिया केलेले पदार्थ टाळणं आणि ताजे फळ आणि भाज्या यांचा समावेश वाढवणं गरजेचं आहे. ICMR आणि NIE यांच्यासोबतच सरकार आणि इतर आरोग्य संस्था देखील कमी सोडियम आहाराला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यामध्ये शालेय शिक्षणात आरोग्यदायी आहाराबाबत जागरूकता वाढवणं आणि स्थानिक पातळीवर समुदाय-आधारित उपक्रम राबवणं यांचा समावेश आहे.
शरीरावर होणारा परिणाम
आपण मीठ खातो तेव्हा आपली जीभ आणि घशातील सॉफ्ट पॅलेटला त्याची जाणीव होते. “मिठामुळे शरीराला आणि मेंदूला ऊर्जा मिळते. सोडियममुळे मिठाचे खडे तयार होतात. ते लाळेत जाऊन स्वादाच्या पेशींमध्ये प्रवेश करतात आणि त्यांना सक्रिय करतात. त्यामुळं विजेचा एक छोटा स्पार्क तयार होतो. मिठामुळे विचार आणि संवेदना जागवणारे सिग्नल्स प्रसारित केले जातात. त्यामुळे शरीर आणि मेंदूला उत्तेजना मिळते.
मिठाचं किती प्रमाण अधिक समजलं जातं?
शरीरावर मिठाच्या पातळीचा किती परिणाम होतो, तो व्यक्तीच्या अनुवांशिक रचनेवर अवलंबून आहे. जगात एक अब्जपेक्षा अधिक लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. मिठाचं सेवन कमी केल्यामुळं हा त्रास कमी होण्यास आणि उपचार करण्यात मदत मिळते. शरीरात जास्त मीठ असतं तेव्हा शरीर पहिल्यांदा ते पातळ करण्याचं काम करतं.
शरीर पाण्याचं संतुलन कायम ठेवतं. त्यामुळं इतर पातळ पदार्थांना चारही बाजूंनी पंप करण्यासाठी तुमच्या शरीराचा रक्तदाब वाढू लागतो. त्याचे परिणाम शक्यतो वाईट होतात. तुमच्या शरीरातील रक्तपेशी आणि त्यातही मेंदूतील रक्तपेशी कमकुवत असतील तर पक्षाघात होऊ शकतो.
वडापाव, समोसे आवडीने खाताय?
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये तेलाच्या वापरात 10 टक्के कपात करण्यात आवाहन केलं होतं. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘फिट इंडिया’ मोहीम जारी केली. भारतीयांनी दहा टक्के तेल कमी वापरावे, असे आवाहन यावेळी पंतप्रधानांनी केले. भारतात सध्या लठ्ठपणा ही मोठी समस्या झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान बोलत होते.
त्यामुळे आता या लठ्ठपणाला आमंत्रण देणाऱ्या कचोरी, समोसा, वडापाव, जिलेबी, छोले-भटुरे आदी भारतीय पदार्थांतून किती चरबी (फॅटस्) व साखर (शुगर) शरीरात जमा होते, याचे फलक सर्वत्र लावण्याचे आदेश केंद्रीय आरोग्य खात्याने दिले आहेत.
समोसा, वडा-पाव, कचोरी, जिलेबी यांसारख्या चटकदार अन् जिभेचे चोचले पुरविणाऱ्या पदार्थांमध्ये तेलाच्या किंवा साखरेच्या प्रमाणाविषयी ठिकठिकाणी फलक लावण्याच्या सूचना, हे लठ्ठपणा आणि अनारोग्याच्या विरोधातील लढ्यातले योग प्रसारानंतरचे पुढचे पाऊल ठरावे. त्याच्या अंमलबजावणीत अशा पदार्थांची लोकप्रियता, त्यांच्या सेवनाचे प्रचंड प्रमाण, यांची विक्री होणाऱ्या ठिकाणांमधील वैविध्य आणि आर्थिक-सामाजिक परिणाम हे मुद्दे अडचणीचे असले, तरीही निरोगी जीवनशैलीच्या दिशेने वाटचाल करण्याच्या दृष्टीने या उपायांचे स्वागत केले पाहिजे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने यासंदर्भात सूचना प्रसिद्ध केल्या असून, त्यानुसार सिगारेटच्या पाकिटांप्रमाणे विक्रीच्या टिकाणी या पदार्थांमध्ये तेल-साखरेच्या प्रमाणाचाचत 'वैधानिक इशारा' स्वरूपाचे फलक लावावे लागतील, यावर 'आहार स्वातंत्र्यावर गदा' अशी टीका सुरू झाली असली, तरी ही बंदी नसून खवय्यांना आपण काय खात आहोत आणि त्याचे आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतात, याची माहिती मिळण्याच्या हक्काचे पालन आहे, हे लक्षात घ्यावे. मात्र, केवळ हेच पदार्थ नव्हे, तर आरोग्यावर विपरीत परिणाम करणाऱ्या सर्व पदार्थ्यांबाबत फलक लावायला हवा.
आरोग्य खाते सर्वत्र फलक लावणार
भारतात सर्वत्र रस्त्यावर किंवा हॉटेलमध्ये गेल्यावर वडापाव, कचोरी, समोसा हे पदार्थ लोक चवीचवीने खात असतात. जलेबी, रबडी आदी पदार्थ आवडीने खातात. या पदार्थांमध्ये तेल व साखरेचे प्रमाण अधिक असते. परिणामी, लोकांमध्ये लठ्ठपणा वाढला आहे. या लठ्ठपणाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार पुढे सरसावले आहे. सिगारेट, तंबाखूप्रमाणे समोसा आणि जिलेबीवर ग्राहकांना इशारा देणारी सूचना छापली जाईल. मुलांमध्ये लठ्ठपणा आणि युवकांमध्ये वाढणारे वजन यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ‘जंक फूड’वर इशारा देणारी सूचना लावण्याची तयारी केली आहे.
रिपोर्टनुसार, आरोग्य मंत्रालयाने ‘एम्स’सह अनेक केंद्रीय संस्थांना अशाप्रकारचे पोस्टर्स लावण्याचे आदेश दिले आहेत. ज्यात स्पष्टपणे दररोज करण्यात येणाऱ्या नाश्त्यात किती फॅट आणि साखर आहे त्याचा उल्लेख करण्यात यावा. विशेषत: पहिल्यांदाच अशाप्रकारे ‘जंक फूड’वर तंबाखूसारखा इशारा देणारी सूचना जारी करण्याची तयारी करण्यात आली आहे.
आरोग्य सचिव पुण्य सलील श्रीवास्तव यांनी सांगितले की, भारतात तरुण व लहान मुलांमध्ये लठ्ठपणा वाढत आहे. लहान मुलांतील लठ्ठपणा हा ‘जंक फुड’च्या सवयी व शारीरिक मेहनत कमी केल्याने वाढला. 2021 मध्ये 18 कोटी लोक लठ्ठ होते. 2050 पर्यंत हेच प्रमाण 44.9 कोटीवर जाणार आहे. 2050 मध्ये भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा लठ्ठ व्यक्ती असणारा देश ठरणार आहे.
कँटीनमध्ये लावल्या जाणाऱ्या फलकात काय असणार?
कँटीनमध्ये लावल्या जाणाऱ्या फलकात काय असावं हे परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे. त्यात तेलकट आणि गोड खाद्यपदार्थांच्या चित्रासह त्यापुढे त्यामध्ये किती ‘फॅट’ आहे हेदेखील सांगण्यात यावं. त्यानुसार,
- एका वडापावमध्ये 10 ग्रॅम फॅट
- एका समोसामध्ये 17 ग्रॅम फॅट
- दोन कचोरींमध्ये 10 ग्रॅम फॅट
- 10 भजींमध्ये 14 ग्रॅम फॅट
- एका गुलाबजाममध्ये 32 ग्रॅम साखर
- एका कोल्ड ड्रींकमध्ये 32 ग्रॅम साखर
या पदाथांचे अतिरिक्त सेवन टाळून आरोग्यास घातक घटक आणि कॅलरी नियंत्रण, असे उद्देश असलेल्या या उपाययोजनांचे स्वागत करतानाच त्यांची मर्यादा आणि अंमलबजावणीतील अडचणीकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. केवळ फलक लावून हे पदार्थ भारतीय कितपत टाळतील, याचाबत शंका येणे साहजिक आहे. केवळ 'आरोग्यदायी अन्न घ्या, असे उपदेश पुरेसे नाहीत, तर त्यांच्या खिशाला परवडणारे आणि सकस-पोषक असे कोणते अन्न खावे, याचेही मार्गदर्शन आवश्यक आहे. यासाठी अंड्यांसारखे पर्याय असले, तरी त्यावाचतही सर्व वर्गात अद्याप पुरेशी स्वीकारार्हता नाही, विविध गावे शहरांमध्ये असे फलक लावणे आणि त्यातील घटकांच्या तपासणीची अंमलबजावणी कशी करणार, हा प्रश्न आहे.
आरोग्यदायी आहार, हा आर्थिक आणि सामाजिक विषय आहे. याचीही जाणीव हवी. सरकार नागरिकांचे आरोग्य राखण्यासाठी अशी पावले उचलत आहे; तर दुसरीकडे देशी-विदेशी उद्योगांकडून अशा 'जंक फूड' व शीतपेयांच्या आकर्षक आणि एक-दोन अपवाद वगळता बडे खेळाडू अभिनेत्यांच्या जाहिरातींचा मारा करून तेच पदार्थ खाण्यापिण्यास प्रोत्साहन देण्यात येते, हा विरोधाभास जोवर संपणार नाही, तोवर हे उपाय सिगारेटच्या पाकिटांवरील इशाऱ्यांसारखेच वाचून सोडून देण्याचा विषय ठरतील.






