पंढरपूरच्या आषाढी वारीत शहरी माओ नक्षलवादी विचारांचा प्रचार -प्रसार होत असून “संविधान दिंडी- पर्यावरण वारी” यांसारखे लेबल लावून अनेक नक्षलवाद्यांशी संबंधित “लोकायत”सारख्या अनेक संस्थांचे लोक अशा प्रकारे वारकऱ्यांच्या दिंडीत हस्तक्षेप करत असल्याचा आरोप शिंदे सेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी केला होता. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना राज्याचे उप-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारीचे पावित्र्य आणि वारकऱ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्रधान्य देत अश्या व्यक्ती व संस्थांची गृहविभागामार्फत तात्काळ चौकशी करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आश्वासन सभागृहात दिले.
पंढरपूरच्या वारीप्रकरणी सरकारने इतका गंभीर आरोप केल्यामुळे पुरोगामी महाराष्ट्राला आणि वारकरी संप्रदायाला मोठा धक्का बसला आहे. यासंदर्भात संविधान समता दिंडीमार्फत राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले असून ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ आणि ‘संविधान समता दिंडी’ विषयी पसरवण्यात येत असलेल्या अफवा आणि गैरसमजाबाबत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
या निवेदनावर हभप शामसुंदर महाराज सोन्नर, हभप हरिदास महाराज तम्मेवार, हभप भारत महाराज घोगरे, हभप समाधान महाराज देशमुख, शरद कदम, अविनाश पाटील, अँड.वर्षा देशपांडे, नागेश जाधव, विशाल विमल, दीपक देवरे, सुमित प्रतिभा संजय, सरस्वती शिंदे, दत्ता पाकिरे, महादेव पाटील, राजाभाऊ अवसक , साधना शिंदे, माया वाकोडे, नरेंद डुंबरे, प्रकाश मानेकर, सुबोधदादा महाराज यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ आणि ‘संविधान समता दिंडी’ नेमकी कशासाठी?
भारतीय संविधानाचे अमृतमहोत्सवी वर्ष आपण साजरे करीत आहोत. आपल्या भारतीय संविधानात संत, समाजसुधारकांच्या विचारांचे प्रतिबिंब उमटले आहे. भारतीय संविधानात व्यक्त झालेला समतेचा विचार भागवत धर्माच्या वारकरी परंपरेतून आलेला आहे. संतविचार आणि संविधानिक मूल्ये ही परस्परांना पूरक आहेत. संविधानाला अभिप्रेत असणारी समता संतानी त्यांच्या विचारातून सातत्याने मांडली आहे. ‘यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर’ असे तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगातून मांडून ठेवले आहे.
संतांचे पाईक असलेले वारकरी यांच्यापर्यंत हा परस्परपूरक विचार अभंग, प्रवचन, कीर्तन या माध्यमातून पोचविणे आणि त्यातून संतांचे व संविधानाचे नाते अधिक वृद्धिंगत करणे हा उद्देश या ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ आणि ‘संविधान समता दिंडी’चा आहे. यासाठी विविध संघटना, संस्था व मान्यवर एकत्र येऊन महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या वारीच्या सांस्कृतिक सोहळ्यात सहभागी होत असतात.
भारतीय संविधानातील मूल्ये आणि संतविचार हे सर्वसामान्य लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी मागील 12 वर्षांपासून ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ आणि मागील 7 वर्षापासून ‘संविधान समता दिंडी’ सुरू आहे. वारी परंपरेला कोणतीही बाधा न आणता आमचे हे दोन्ही उपक्रम सुरू आहेत. पंढरपूरकडे निघालेल्या जगद्गुरू तुकोबांरायांच्या पालखी सोहळ्यात यंदा मंगळवार 24 जून 2025 रोजी यवत ते वरवंड या मार्गावर ‘एक दिवस वारी’ झाली. तसेच संविधान समता दिंडी शनिवार 21 जून 2025 रोजी समताभूमी, पुणे (महात्मा फुलेवाडा) येथे प्रस्थान कार्यक्रम होऊन संतभूमी, पंढरपूरकडे दिंडी मार्गस्थ झाली आहे.
संबंधित लेख वाचा: 1) ढोलकीच्या जागी पखवाज अन् तुणतुण्याच्या जागी वीणा… तमाशा कलावंत वारकरी होतात तेव्हा! |
वारकरी संप्रदायाला सनातनी वैदिक ब्राह्मणी धर्मात बंदिस्त करू पाहत आहेत
संविधानाचा विचार मान्य नसलेले काही लोक समाजात आहेत. त्या लोकांना संत विचारातील प्रेम, करुणा, मानवता मानवत नाही. ते लोक वारी आणि वारकरी संप्रदाय परंपरेला अनिष्ट सनातनी वैदिक ब्राह्मणी धर्मात बंदिस्त करू पाहत आहेत. संतांच्या व्यापक, समतेच्या आणि बंधुतेच्या विचारांना नाकारणारे हे लोक विकृतीने ग्रस्त होऊन कार्यरत आहेत. हेच लोक ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ आणि ‘संविधान समता दिंडी’ला विरोध करत आहेत.
‘संविधान समता दिंडी’ आणि ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’वर टीका करताना 'अर्बन नक्षल' या सहज सोप्या आणि पुरावा देण्याची कोणतीही अट नसलेल्या संकल्पनेचा वापर केला जात आहे. इतकेच नव्हे तर या टीकेच्या माध्यमातून हे लोक इतक्या महत्वाच्या संवैधानिक राष्ट्रीय कार्यामध्ये विघ्न घालू पाहत आहेत. संतांच्या काळात संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत चोखोबा महाराज, संत जनाबाई महाराज यांना त्रास देणाऱ्या मंबाजीसारख्या प्रवृती आजही समाजात वावरत आहेत.
विद्वेषाच्या विकृतीने ग्रस्त झालेली ही मंडळी, ज्या लोकांची किंवा संघटनांची अर्बन नक्षलवादी म्हणून नावे घेत आहेत, असे कोणीही 'एक दिवस तरी वारी अनुभवावी' आणि 'संविधान समता दिंडी' आयोजनात नाहीत. किंबहुना अशा लोकांचा किंवा संघटनांचा आमच्या आयोजनात संबंध नाही. याउलट संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे चोपदार ह. भ. प. राजाभाऊ चोपदार, ज्येष्ठ कीर्तनकार ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे , कैकाडी महाराज मठाचे अधिपती ह. भ. प. भारत महाराज जाधव, ह. भ. प. धम्मकीर्ती महाराज आदी मंडळी या संविधान दिंडीत सहभागी होत असतात.
अशा समाजविघातक प्रवृतींचा वेळीच बंदोबस्त करावा
भारतीय संविधानाला अभिप्रेत राष्ट्र उभारणी व संवर्धनाच्या चांगल्या विचाराला आणि उपक्रमाला थांबविण्यासाठी आणि आपली राजकीय सांस्कृतिक पोळी भाजून घेण्यासाठी हे विकृत लोक समाजाची दिशाभूल करून समाजात द्वेष आणि अशांतता तयार करत आहेत. समाजात भांडणे लावण्याचे काम या लोकांनी हाती घेतले असून ते लोक खोटे आरोप करीत आहेत.
त्यासाठी अफवा पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा समाजविघातक प्रवृतींचा आपण वेळीच बंदोबस्त करावा, ही आमची विनंती आहे. हे लोक आम्हाला बदनाम करून स्वतःच समाजात दुही माजवतील. तसेच हेच लोक वारीमध्ये अनिष्ट प्रकार करतील आणि त्याचा पुन्हा आमच्यावर आरोप लावतील, अशी आम्हास त्यांच्या जाहीर वक्तव्यावरून, बोलण्यावरून शंका येत आहे. त्यांचे आजवरचे वर्तनव्यवहार पाहिल्यास समाजात अशांतता निर्माण करणे, समाजाची दिशाभूल करणे, अशी त्यांची प्रवृत्ती राहिली आहे. तरी आपण या प्रवृत्तींची आणि अशा लोकांची चौकशी करावी, त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करुन त्यांना वेळीच थांबवावे, अशी आम्ही मागणी करीत आहोत. 
"वारीत तलवारी घेऊन घुसलेल्या धारकऱ्यांना अर्बन नक्षलवादी म्हणावं का?
शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी आषाढी वारीमध्ये अर्बन नक्षलवादी घुसल्याचा आरोप केल्यानंतर विद्रोही सांस्कृतिक चळवळीनं त्यांच्यावर कडाडून टीका केली आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे प्रवक्ते कॉ. अविनाश कदम आणि 'वारी समतेची' या पुस्तकाचे लेखक कॉ. विजय मांडके यांनी विधानपरिषदेच्या आमदार कायंदे यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला.
सत्ताधाऱ्यांनीच वारीमधील संविधानाचा प्रचार आणि प्रसार तसंच पथनाट्यावरून मनीषा कायंदे यांना टीका करायला लावलल्याचा आरोपही 'विद्रोही'नं केला आहे. जनसुरक्षा विधेयक संमत करण्यासाठी सत्ताधारी अर्बन नक्षलवादाचा उगाचच बाऊ करत आहेत. जनसुरक्षा विधेयकाची किती गरज आहे. हे दाखवण्यासाठीच सत्ताधाऱ्यांकडून मनीषा कायंदे यांना बोलायला लावले असल्याचा विद्रोही सांस्कृतिक चळवळीचा आरोप आहे.
"वारकरी सांप्रदाय हा संविधानाच्या गाभ्यात असलेल्या समता, बंधुता, न्याय, स्त्री-पुरुष समानता, अंधश्रद्धा निर्मूलन, विज्ञानवादी दृष्टिकोन घेऊन चाललेला सांप्रदाय आहे. मनीषा कायंदेंनी अर्बन नक्षलवादी म्हटलेले संविधानाचाच प्रचार करत आहेत. म्हणजेच वारकरी संतांच्याच विचाराचा प्रचार करत आहेत. त्यामुळे त्यांनी असली 'किडे'गिरी बंद करावी," असा टोला देखील 'विद्रोही'नं लगावला आहे.
"वारकरी सांप्रदाय हा कोणत्याही धर्माचा नाही तर तो मानवतेचा पाईक आहे, हे मनीषा कायंदेंनी लक्षात घ्यावे. वारीमध्ये वारकरी संतांच्या विचारांचे व संविधान आचरणाच्या प्रबोधनाचे काम करणाऱ्यांवर अर्बन नक्षलवादी म्हणून कारवाई झाल्यास विद्रोही सांस्कृतिक चळवळ त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार आहे," असंही कॉ अविनाश कदम आणि कॉ. विजय मांडके यांनी म्हटलं आहे.






