- भागा वरखडे
पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर पुन्हा एकदा भारताविरोधात बरळले आहेत. त्यांचे शब्द भयावह आहेत. अमेरिकेतील एका कार्यक्रमात त्यांनी धमकी दिली, की, जर भारताशी युद्ध झाले आणि पाकिस्तानचे अस्तित्व धोक्यात आले, तरी ते अण्वस्त्रे वापरतील. अर्धे जग नष्ट करतील. मुनीर यांचा इशारा म्हणजे शेख चिल्लीच्या गोष्टीसारखा आहे. ज्या फांदीवर आपण बसलो आहोत, त्याच फांदीवर कुऱ्हाड चालवण्याचा हा प्रकार आहे.
मुनीर यांनी असे काही बोलण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी अमेरिकेतील पाकिस्तानी-अमेरिकन समुदायाला संबोधित करताना अशा धमक्या दिल्या आहेत. मुनीर यांचा इशारा काय आहे? भारतासाठी याचा काय अर्थ असू शकतो? याचा विचार करावा लागेल.
असीम मुनीर यांच्या धमक्याचा नेमका अर्थ काय आहे?
मुनीर यांना अमेरिकेतील एका कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आले होते. तिथे त्यांना खूप आदर देण्यात आला. तिथे त्यांनी पुन्हा तोच सूर आळवला. पाकिस्तान एक अणुशक्ती आहे आणि गरज पडल्यास अर्धे जग नष्ट करू, असा इशारा त्यांनी दिला. त्यांचे शब्द ऐकून असे वाटते, की ते स्वतःला सलाहुद्दीन किंवा खालिद सारखा महान मुस्लिम कमांडर म्हणून पाहतात. मुनीर यांचा असा विश्वास आहे, की अल्लाहने त्यांना पाकिस्तानला जगाचे केंद्र बनवण्याचा आदेश दिला आहे. ते म्हणतात, की जरी आज पाकिस्तानला भिक्षेचा कटोरा (कश्कोल) घेऊन फिरावे लागत असले, तरी तो अल्लाहच्या योजनेचा एक भाग आहे. 
अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे (पेंटॅगॉन) माजी अधिकारी मायकेल रुबिन यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना सूट घातलेले ओसामा बिन लादेन असे वर्णन केले आहे. त्यांनी म्हटले की, मुनीर यांच्या अलीकडील अणु धोक्याच्या विधानामुळे पाकिस्तान गुंडराजसारखे वागत आहे.
पंतप्रधान शाहबाज शरीफदेखील मुनीर यांच्यासोबत आहेत. ते मुनीर यांच्या शब्दांचे समर्थन करतात. मुनीर यांनी भारताला अनेक धमक्या दिल्या आहेत. सिंधू नदीवरील धरणांवर बॉम्बस्फोट, रिलायन्सच्या तेल प्रकल्पांना लक्ष्य करण्याचा इशारा त्यांनी दिला. त्याचबरोबर पूर्व भारतावर क्षेपणास्त्रे डागण्याची धमकी त्यांनी दिली.
सिंधू नदीवरील धरणावर बाँबस्फोट केला, तर भारतापेक्षा त्यात पाकिस्तानचे जास्त नुकसान आहे, हे त्यांच्या लक्षात आले नाही. मूर्खांच्या नंदनवनात राहिलेले पाकिस्तानचे अनेक नेते बेजबाबदार विधाने करीत असतात. भारतही अण्वस्त्र संपन्न देश आहे आणि त्याच्याकडे पाकिस्तानपेक्षा अधिक अणुबाँब आणि अण्वस्त्रे आहेत, हे कदाचित त्यांना माहीत नसावे. या गोष्टी भारत आणि पाकिस्तानमधील प्रचार युद्धात त्याची कमकुवतपणा दर्शवतात.
कोण आहेत जनरल असीम मुनीर?
मुनीर यांचा भूतकाळदेखील त्याचे विचार समजून घेण्यास मदत करतो. 1986 मध्ये जेव्हा माजी हुकूमशहा झिया-उल-हक यांनी सैन्याचे इस्लामीकरण सुरू केले, तेव्हा मुनीर सैन्यात सामील झाले. त्यांचे कुटुंब जालंधरहून स्थलांतरित झाले होते आणि त्यांचे वडील शाळेतील शिक्षक होते, ते मशिदीत इमामदेखील होते. त्यांचे कुटुंब ‘तथाकथित’ खालच्या जातीचे होते, ते स्वतःला सय्यद म्हणवून स्वतःला उच्च दाखवू इच्छित होते.
या पार्श्वभूमीमुळे ते इस्लामिक/जिहादी विचारसरणीशी जोडले गेले, जे त्यांच्या शब्दांत स्पष्टपणे दिसून येतो. कुराण आणि इस्लामिक धर्मग्रंथांचा हवाला देऊन ते त्याचे म्हणणे योग्य ठरवतात. त्यांच्या अगोदरचे अध्यक्ष जनरल बाजवादेखील त्याच पार्श्वभूमीचे होते; परंतु बाजवा यांच्यावर ब्रिटिश भारतीय सैन्याचा प्रभाव होता. तो मुनीर यांच्यामध्ये पूर्णपणे संपला आहे.
जनरल असीम मुनीर सुमारे साठ वर्षांचे आहेत. ते एका शाळेचे प्राचार्य आणि धार्मिक विद्वान व्यक्तीचे पुत्र आहेत. 1986 मध्ये ते मंगलामध्ये ऑफिसर्स ट्रेनिंग स्कूल येथे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पाकिस्तानी लष्करात दाखल झाले. प्रशिक्षणाच्या काळात त्यांची सर्वोत्तम कॅडेट म्हणून निवड झाली होती. ट्रेनिंग स्कूलमधून पदवी मिळवल्यानंतर ते सर्वप्रथम पाकिस्तानच्या 23 फ्रंटियर फोर्स रेजिमेंटमध्ये नियुक्त झाले होते.सुमारे चार दशकांच्या लष्करी सेवेत जनरल असीम मुनीर यांनी पाकिस्तानच्या संवेदनशील उत्तरेकडील सीमेवर लष्कराचे नेतृत्व केले.
संबंधित लेख वाचा: 1) दुश्मन का दुश्मन दोस्त होता है… कट्टर तालिबानशी मैत्री करण्याची वेळ भारतावर का आलीये? |
त्यांनी पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांचे नेतृत्व केले. यासोबतच त्यांनी सौदी अरेबियासोबत संरक्षण संबंध मजबूत करण्यासाठी सौदी अरेबियामध्ये कामही केलं. इस्लामाबाद येथील नॅशनल डिफेन्स युनिव्हर्सिटीमधून पब्लिक पॉलिसी आणि स्ट्रॅटेजिक सिक्युरिटी मॅनेजमेंटमध्ये त्यांनी पदव्युत्तर पदवी देखील घेतली आहे. याशिवाय त्यांनी जपान आणि मलेशियाच्या लष्करी संस्थांमध्ये देखील शिक्षण घेतलं आहे. जनरल असीम मुनीर यांची वर्ष 2022 मध्ये पाकिस्तानच्या लष्करप्रमुखपदी नियुक्ती झाली होती.
मुनीर यांचे दहशतवादी रेकॉर्ड
मुनीर यांचे दहशतवादी रेकॉर्ड आहे. 2019 च्या पुलवामा हल्ल्याशी आणि 2022 च्या पहलगाम हत्याकांडाशी त्यांचा संबंध आहे. ‘जैश-ए-मोहम्मद’ने पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला केला होता, जो ‘आयएसआय’च्या परवानगीशिवाय शक्य नव्हता. पहलगाममध्ये हिंदू पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले. ते लष्कर आणि ‘आयएसआय’च्या उच्च अधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय घडू शकले नसते. मुनीर त्या वेळी ‘आयएसआय’ प्रमुख होते, म्हणून ते या घटनांसाठीदेखील जबाबदार आहेत. या घटनांनी भारत आणि पाकिस्तानला युद्धाच्या उंबरठ्यावर आणले.
मुनीर यांच्या अलीकडील विधानांवरून असे सूचित होते, की ते पुन्हा असे करण्याचा प्रयत्न करू शकतात. मुनीर यांची जिहादी वृत्ती आणि दहशतवाद्यांना पाठिंबा देणे हे भारतासाठी धोका आहे. त्यांच्या सैन्य आणि सरकारमध्ये त्यांचे शब्द थांबवण्याची शक्ती नाही, म्हणून भारताला त्याच्या कृतींसाठी तयार राहावे लागेल. मुनीर यांनी भारताचे वर्णन चमकणारा मर्सिडीज आणि पाकिस्तानचे वर्णन दगडांनी भरलेला डंप ट्रक असे केले.
ट्रकशी झालेल्या धडकेत मर्सिडीजचे नुकसान होईल. ट्रक गमावल्याचा कोणताही पश्चात्ताप होत नाही. हा विचार पाकिस्तानी लष्करप्रमुखांचा आहे. त्यांनी त्यांचा देश गरीब करून स्वतः पाश्चात्य देशांमध्ये कुटुंब स्थायिक केले आहे. भारताची प्रगती त्यांना खुपते आहे. त्यामुळे ते भारताच्या प्रगतीचा नाश करण्यासाठी काहीही करण्यास तयार आहेत.
भारताने पाकिस्तानी समर्थकांच्या आणि त्यांच्या समर्थकांच्या बोलण्याला बळी पडू नये. मुनीर आणि त्यांचे सैन्य जिहादी मानसिकतेने ग्रस्त आहेत. ते स्वतःला मध्य आशिया, अरबस्तान आणि अफगाणिस्तानातून भारतावर हल्ला करणाऱ्या सैन्याचे उत्तराधिकारी मानतात. त्यांच्या योजना स्पष्ट आहेत. त्यांचा सामना करण्यासाठी भारताला आपले संरक्षण आणि सुरक्षा धोरण मजबूत करावी लागेल.
या धोक्यांना तोंड देण्यासाठी संरक्षणतज्ज्ञांनी दुप्पट मेहनत घेतली पाहिजे, जेणेकरून भारताला त्याचा शत्रू नष्ट करता येईल. भारताच्या चार दिवसांच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ने पाकिस्तानला गुडघे टेकावे लागले. त्यात पाकिस्तानच्या डझनभराहून अधिक हवाई तळांचे नुकसान झाले. भारताने पाकिस्तानच्या अणु धमक्यांना प्रत्युत्तर दिले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर नवीन संरक्षण धोरण तयार करण्यात आले आहे.
भारताचे चोख प्रत्युत्तर
एकीकडे मुनीर भारताला अणुबाँबचा इशारा देत असताना दुसरीकडे त्यांच्या युद्धनौका भारताच्या सीमेवर खोल समुद्रात युद्धाभ्यास करीत आहेत. भारताने पाकिस्तानच्या क्षेपणास्त्राची ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी काय हालत केली, याचा मुनीर यांना विसर पडलेला दिसतो. भारताने सिंधू नदीवर धरण बांधले, तर आपण ते दहा क्षेपणास्त्रांनी उडवू, असा इशारा त्यांनी दिला; परंतु त्यांच्या हे लक्षात येते, की भारताकडे क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा आहेत, त्याचबरोबर पाकिस्तानची अण्वस्त्रे आणि क्षेपणास्त्रे त्याने हवेतच नष्ट करून ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी पाकिस्तानला धडा शिकवला होता. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्यावर प्रतिकिया दिली आहे.
या गोष्टी अशा देशात अणु कमांड आणि नियंत्रणाच्या अखंडतेवर शंका निर्माण करतात, जिथे सैन्य दहशतवादी संघटनांशी संगनमत करते. तसेच, या धमक्या एका मित्र देशाच्या मातीतून दिल्या गेल्याचे दुर्दैवी असल्याचे वर्णन करण्यात आले. भारताने स्पष्ट केले, की तो अणुब्लॅकमेलला बळी पडणार नाही आणि आपल्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व पावले उचलेल.
भारत त्याच्या अण्वस्त्रांची श्रेणी आणि ताकद सतत वाढवत आहे. त्यात लांब पल्ल्याच्या ‘आयसीबीएम’ क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. भारताचे धोरण असे आहे, की तो प्रथम अण्वस्त्र हल्ला करणार नाही. दुसरीकडे, पाकिस्तानचे अण्वस्त्र धोरण अस्पष्ट आहे. ते बहुतेक कमी पल्ल्याच्या शस्त्रांवर अवलंबून असते. अलिकडच्या अमेरिकन गुप्तचर अहवालात म्हटले आहे, की पाकिस्तान आपला अण्वस्त्र साठा वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे, जो येत्या काळात धोका बनू शकतो. सध्या पाकिस्तानकडे सुमारे 170 अण्वस्त्रे आहेत.
मुनीर यांचा अर्ध्या जगाचा नाश करण्याचा दावा खोटा आहे. त्यांच्या सर्वात लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्र शाहीन-3 चा पल्ला 2,750 किलोमीटर आहे. तो जागतिक हल्ल्यासाठी पुरेसा नाही. तो प्रादेशिक लक्ष्यांपुरता मर्यादित आहे. मुनीर यांच्या विधानामुळे पाकिस्तानमधील अण्वस्त्रांच्या सुरक्षिततेबद्दल आणि नियंत्रणाबद्दल आणखी शंका वाढल्या आहेत. पाकिस्तानने आतापर्यंत अनेक वेळा भारताला अणुहल्ल्याच्या धमक्या दिल्या आहेत. अगोदर धमक्या द्यायच्या आणि नंतर कांगावा करायचा, ही पाकिस्तानची वृत्ती आहे.






