- शंतनू खुजे
“शिक्षण जरी सुरू असलं तरी शिकून नोकरी मिळेलच याची गॅरंटी नाही, पण सध्या तरी रील्स बनवून मला चांगले पैसे मिळतात. या पैश्यातून माझा वैयक्तिक खर्च भागून जातो. बेरोजगार राहण्यापेक्षा रील्स बनवणं बरं…” असं अवघ्या 19 वर्षाच्या सौरभ बोचरेला वाटतं.
सौरभ बुलढाणा जिल्ह्याच्या पिंपळगाव राजा येथे राहतो. सौरभ हा नुकताच बारावी पास झाला आणि तो सध्या गावालगतच्या एका महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेतोय. त्याला अतिशय धोकादायक स्टंट करून रील्स बनवण्याची सवय आहे. त्याच्या या सवयीबद्दल बोलताना तो म्हणतो की, "अशा धोकादायक पद्धतीच्या रील्स बनवणं मी काही सोशल मीडियावरील इंफ्लुएंसर कडून शिकलो. धावत्या ट्रेन समोर जाऊन रील बनवली किंवा धोकादायक स्टंट केला तर तशा रील्सला चांगले व्ह्यूज आणि लाईक मिळतात. जास्तीच्या व्ह्यूजमुळे अधिक फॉलोअर्स मिळतात आणि मग मिळणाऱ्या पैशात देखील वाढ होते"
सौरभ बोचरे हा त्याच पिंपळगावचाआहे ज्या गावातील शेख नदीम तरुणाचा काही दिवसांपूर्वीच धावत्या रेल्वेसमोर रील बनवण्याच्या नादात मृत्यू झाला होता आणि रील शुट करणारा त्याचा मित्र गंभीर जखमी झाला होता.
तो ऐकायलाच तयार नाही, म्हणतो स्टंटच्या रील्समुळे पैसे मिळतात
पिंपळगाव येथीलच सौरभ बोचरे देखील अशाच धोकादायक पद्धतीने रिल्स बनवतो. सौरभचा मित्र राज सातव म्हणतो की, "आमच्या गावातील दोन तरुणांचा आळसणा येथील रेल्वे स्थानकाजवळ अपघात झाल्यानंतर मी लगेच सौरभला भेटलो आणि त्याला सांगितलं की, थोड्या पैशासाठी आणि प्रसिद्धीसाठी अशा धोकादायक रील्स नको बनवू, पण तो ऐकायला तयार नाही. त्याला यातून कमी मेहनतीत चांगला पैसा मिळत असल्याने त्याला रील बनवण्याचं व्यसन लागलं आहे."
(‘’बेरोजगार राहण्यापेक्षा रील्स हे बनवणं बरं’’ असं म्हणणारा पिंपळगावचा सौरभ बोचरे.)
लग्नसमारंभासाठी निघाले, वाटेत रेल्वे ट्रॅकजवळ रील काढताना भयंकर घडलं
25 ऑक्टोबर रोजी शेगाव तालुक्यात ही घटना घडली. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी धोकादायक स्टंट करण्याच्या नादात आळसणा येथील चारमोरी पुलावर रील बनवताना धावत्या रेल्वेची धडक बसून 24 वर्षाच्या शेख नदीमचा मृत्यू झाला. शेख नदीम आणि त्याचा मित्र सय्यद शाकीर सय्यद नासीर आळसणा येथे लग्नासाठी गेले होते. लग्न समारंभानंतर त्यांनी गावाजवळील नागपूर–मुंबई रेल्वेमार्गावरील चारमोरी पुलावर रील शूट करण्याचं ठरवलं. रेल्वे ट्रॅकवर उभे राहून व्हिडिओ काढताना दोघांना रेल्वे गाडी किती जवळ आली आहे, याचा अंदाजच आला नाही. दोघांच्या कानात हेडफोन असल्याने रेल्वेचा हॉर्नही ऐकू आला नाही. काही क्षणांतच धावत्या गाडीने त्यांना धडक दिली. यात शेख नदीमचा जागीच मृत्यू झाला, तर सय्यद शाकीर याने जीव वाचवण्यासाठी पुलावरून उडी घेतली. मात्र त्या प्रयत्नात तो गंभीर जखमी झाला.
“लाईक्स” आणि “फॉलोअर्स”साठी स्वतःच आयुष्य धोक्यात घालणाऱ्या नदीमच्या गावाला ‘टीम बाईमाणूस’ने भेट दिली. गावातच ई - सेवा केंद्र चालवणारे सुरज दुबे म्हणतात, "समाजमाध्यमांवरील फॉलोअर्स आणि लाईक्सच्या नादात गावातील अनेक तरुण अशा पद्धतीच्या धोकादायक रील्स बनवतात. त्यांच्या हाताला काम नाही. त्यातच आता इंटरनेट देखील स्वस्तात उपलब्ध होतयं, त्यामुळे हे तरुण कामधंदा शोधण्याऐवजी रिल्स बनवण्याच्या फंद्यात पडतात.”
संबंधित लेख वाचा इतक्या उपाययोजना करूनही रेल्वे हत्तींना चिरडतेच… |
गावाच्या आजूबाजूला कंपन्या नाहीत, सरकारी नोकऱ्यांची भरती देखील वेळेवर होत नाही. पोरं काय करणार? त्यांना जगायचं आहे, त्यांनाही मोठ व्हायचं आहे. तरुणांसमोरील कमाईचे सर्व मार्ग बंद झाल्यामुळे मग तर अश्या सोप्या मार्गाचा अवलंब करतात, असं दुबे सांगतात.
पिंपळगावचे शिक्षक वाहिद शेख यांनी ‘बाईमाणूस’शी बोलताला सांगितलं की, बेरोजगारीच्या विळख्यात अडकलेल्या तरुणांना सोशल मीडिया हे एक सोपं, जलद आणि कमी कष्टात पैसे कमावण्याचं साधन वाटतं. इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर व्हायरल ठरतील असे व्हिडिओ बनवून एका रात्रीत स्टार बनण्याची आणि त्यातून आर्थिक उत्पन्न मिळवण्याची स्वप्नं हे तरुण पाहत आहेत. याच स्वप्नपूर्तीसाठी जास्त लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी धोकादायक व्हिडिओ बनवण्याकडे त्यांचा कल वाढतोय, ज्यात रेल्वे रुळांवर केले जाणारे जीवघेणे स्टंट हे विशेषतः लोकप्रिय आणि तितकेच धोकादायक ठरले आहेत.
सोशल मीडियावर रील्स बनवण्याच्या या धोकादायक ट्रेंडने अनेक तरुणांचे आयुष्य हिरावून घेतले आहे. या घटना केवळ अपघाती मृत्यू नसून, त्यामागे दडलेला आहे आपल्या देशातील युवापिढीला भेडसावणारा एक गंभीर प्रश्न तो म्हणजे बेरोजगारी. रोजगाराच्या संधींची कमतरता आणि झटपट प्रसिद्धी व पैसा कमावण्याच्या आमिषाने अनेक तरुण जीव धोक्यात घालून रील्सच्या मायाजाळात अडकत चालले आहेत, असेही वाहिद शेख म्हणतात.
(आळसणा येथील चारमोरी पुलावर रील बनवताना धावत्या रेल्वेची धडक बसून २४ वर्षाच्या शेख नदीमचा मृत्यू झाला.)
धावत्या रेल्वेपुढे रील बनवत होते, गाडी खाली चिरडले गेले
रेल्वे रुळांवर जीवघेणे स्टंट करताना काही तरुणांना आपले प्राण गमवावे लागल्याच्या दुर्दैवी घटना गेल्या काही दिवसांमध्ये घडल्या. पिंपळगावमध्ये जी दुदैवी घटना घडली त्याच्या चार दिवस अगोदर जळगाव जिल्ह्यातील पाळधी या रेल्वे स्थानकाजवळ अशीच एक घटना घडली. मोबाईलवर व्हिडिओ बनवण्याचा मोह दोन शाळकरी मित्रांसाठी जीवघेणा ठरला. ही घटना घडली धरणगाव तालुक्यातील पाळधी चांदसर रेल्वे गेटजवळ. धावत्या रेल्वेसमोर धोकादायक पद्धतीने रील शूट करत असताना अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसने धडक दिल्याने या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला.
या भीषण अपघातात मयत झालेल्या तरुणांची नावं प्रशांत पवन खैरनार (वय 18 वर्षे) आणि हर्षवर्धन महेंद्र नन्नवरे (वय 18 वर्षे) अशी आहेत. दोघेही पाळधी येथील महात्मा फुले नगर, प्लॉट भाग (रेल्वे गेट जवळील प्लॉट) येथील रहिवासी होते. पाळधी चांदसर रेल्वे गेटजवळ दोघे तरुण रेल्वे ट्रॅकवर रील तयार करत होते. यावेळी धरणगावकडून जळगावकडे जाणाऱ्या अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेस गाडीची त्यांना धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या निष्काळजीपणामुळे व साहसी कृत्यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला.
धोकादायक स्टंटमुळे झालेल्या मृत्यूंचा नेमका आकडा नसला तरी, अशा अनेक घटनांची नोंद मागील काही दिवसांमध्ये झाली आहे, ज्यातून या समस्येची तीव्रता स्पष्ट होते…
- जळगाव (महाराष्ट्र) : ऑक्टोबर 2025 मध्ये, जळगाव जिल्ह्यातील पाळधी रेल्वे गेटजवळ हेडफोन लावून रील बनवताना दोन तरुणांचा (हर्षल नन्नवरे आणि प्रशांत खैरनार) रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला.
- पुरी (ओडिशा) : ऑक्टोबर 2025 मध्ये, पुरी येथील जनकदेवपूर रेल्वे स्टेशनजवळ रील शूट करताना एका 15 वर्षीय तरुणाचा (विश्वजीत साहू) ट्रेनच्या धडकेत मृत्यू झाला होता.
- शेगाव (महाराष्ट्र) : ऑक्टोबर 2025 मध्ये, आळसणा येथे धावत्या रेल्वेसमोर रील बनवण्याच्या नादात एका तरुणाचा (शेख नदीम) मृत्यू झाला. त्यानेही हेडफोन लावले होते.
- सिवनी (मध्य प्रदेश) : मे 2025 मध्ये, दोन तरुण रेल्वे रुळांवर रील बनवत असताना मागून आलेल्या ट्रेनने एका तरुणाला धडक दिली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
(धावत्या रेल्वेसमोर धोकादायक पद्धतीने रील शूट करत असताना अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसने धडक दिल्याने प्रशांत पवन खैरनार आणि हर्षवर्धन महेंद्र नन्नवरे यांचा मृत्यू झाला. (photo: NDTV))
हे आहेत जीवावर बेतणारे स्टंट्स
सोशल मीडियावर व्ह्यूज मिळवण्यासाठी हे तरुण कोणत्याप्रकारे धोकादायक स्टंट्स करतात हे जेव्हा सौरभ बोचरेला विचारलं तेव्हा त्याने सांगितलेले स्टंटचे प्रकार अक्षरश: थरकाप उडवणारे होते. सौरभ सांगतो,’’ सगळ्यात जास्त लाईक्स आणि व्ह्युज ट्रॅकवर झोपून रील बनवली की मिळतात. वेगवान ट्रेन येत असताना ट्रॅकवर मध्ये किंवा रुळांच्या बाजूला झोपणे, ज्यामुळे ट्रेन अंगावरून जाते अशाप्रकारचा हा धोकादायक स्टंटचा प्रकार असतो.
या शिवाय ट्रेन खूप जवळून जात असताना अगदी ट्रॅकच्या कडेला उभे राहून, चालत, धावत किंवा डान्स करत व्हिडीओ बनवणे… ट्रेन अगदी जवळ आल्यावर ट्रॅक ओलांडण्याचा किंवा तिच्या समोरून पळून जाण्याचा प्रयत्न करणे… रेल्वे जवळ येतं असतांना पुलावरून खाली उड्या मारणे असे सगळे स्टंट अनेक तरुण करत असतात आणि त्यातूनच त्यांना चार पैसे मिळतात.
आजूबाजूच्या वातावरणापेक्षा युवकांना ‘इंफ्लुएंसर्स’ची भुरळ..
कमी शिकलेले पण काही तरी करण्याची तळमळ असणारे अनेक तरुण गावात असतात. बेरोजगार राहण्यापेक्षा कुठला तरी काम धंदा शोधून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. गावातील इतरांनी देखील अशा तरुणांच आदर्श घेऊन कुठलं तरी चांगलं पाऊल उचलणं अपेक्षित असतं पण त्यांच्यावर ह्या कष्ट करणाऱ्या तरुणांपेक्षा सोशल मीडियावरच्या इंफ्लुएंसर्सचा प्रभाव जास्त पडत असल्याचं दिसून येतं. आपल्या आजुबाजूला कुणी तरी काही तरी चांगलं काम करतंय याकडे दुर्लक्ष करून काहीत तरुण तथकथिक इंफ्लुएंसर्सना आपला आदर्श मानतात आणि त्यांच्या कडून वाईट गोष्टींचे अनुसरण करतात.
इंस्टाग्राम किंवा इतर प्लॅटफॉर्मकडून थेट पैसा नाहीच....
इंस्टाग्राम किंवा इतर तत्सम प्लॅटफॉर्म धोकादायक किंवा हिंसक व्हिडिओज साठी थेट पैसे देत नाहीत. उलट असे व्हिडिओ या प्लॅटफॉर्मच्या नियम आणि अटींच्या विरुद्ध असल्यामुळे मोनेटायझेशनसाठी अपात्र ठरतात. धोकादायक स्टंटचे व्हिडिओ लवकरात लवकर व्हायरल होतात, कारण लोकांना भीती आणि थरार आवडतो. हे व्हिडीओ इतके पाहिले जातात की रील्स स्टारचे व्ह्यूज आणि फॉलोअर्स कमी वेळात लाखो करोडो पर्यंत वाढतात.
एकदा हा फॉलोअर्सचा आकडा वाढला की, हे रील्स स्टार्स सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनतात. इंस्टाग्राम थेट पैसे देत नसले तरी लहान किंवा मोठे ब्रँड्स त्यांच्या उत्पादनांच्या जाहिरातीसाठी या इन्फ्लुएन्सर्सना पैसे देतात. ब्रँड्सना फक्त जास्त फॉलोअर्स असणारे अकाउंट हवे असते मग कंटेंट कोणता आहे याच्याशी त्यांना जास्त फरक पडत नाही. हाच त्यांच्या कमाईचा मुख्य आणि सर्वात मोठा मार्ग आहे.
थोडक्यात धोकादायक स्टंट करणारे लोक थेट इंस्टाग्राम मधून पैसे कमावत नाहीत, तर प्रचंड व्ह्यूजमुळे मिळालेल्या प्रसिद्धीचा वापर ब्रँड्सकडून जाहिराती घेऊन पैसे कमावण्यासाठी करतात.
रेल्वे पोलिसांकडून कारवाई पण तरीही धोकादायक स्टंट सुरूच....
रेल्वे रुळांवर किंवा ट्रेनजवळ अत्यंत धोकादायक, जीवघेणे स्टंट करणाऱ्यांचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे पोलिस तात्काळ कारवाई करतात आणि असे व्हिडिओ देखील समाज माध्यमांवरून त्वरित काढून टाकले जातात. परंतु असं असताना देखील या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. पोलिस कारवाईचा बडगा उगारत असतांना देखील हे तरुण थांबायला तयार नाहीत.
धोकादायक स्टंट केल्यामुळे पोलिसांनी अटक केल्याच्या काही घटना...
- रणजीत चौरसिया (उन्नाव, उत्तर प्रदेश) : रेल्वे रुळावर झोपून ट्रेन अंगावरून जाऊ देण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. त्याच्यावर इतरांचा जीव धोक्यात आणल्याबद्दल भारतीय रेल्वे कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
- इरफान रमजान खान (वांद्रे, मुंबई) : चांगला फॉलोअर्स असलेल्या या 'इन्फ्लुएन्सर'ला रेल्वे रुळावर बसून शूटिंग केल्याबद्दल रेल्वे पोलिसांनी अटक केली होती.
- अरमान शेख (मुंबई): जोगेश्वरीजवळील रेल्वे रुळांवर बंदुकीऐवजी लायटरने स्वतःवर गोळी झाडण्याचा अभिनय करण्याच्या व्हिडिओवरून त्याला अटक करण्यात आली होती.
रेल्वे रुळांवर घडत असलेल्या या घटना हा केवळ रील बनवण्याच्या वेडसरपणाचा परिणाम नाही, तर बेरोजगारी आणि सामाजिक अपेक्षांच्या ओझ्याखाली दबत चाललेल्या तरुण पिढीची ही निराशा आहे. 'रील्स'च्या माध्यमातून झटपट पैसा कमविण्याचा विचार तरुण करत असले, तरी यातील धोका दुर्लक्षित करून अजिबात चालणार नाही. यावर उपाययोजना म्हणून सरकारने विशेषतः ग्रामीण भागात रोजगार निर्मितीवर भर देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पालकांनी आपल्या पाल्यांना सोशल मीडियाचा सकारात्मक उपयोग आणि त्यातील धोका याबद्दल योग्य समुपदेशन करणे गरजेचे आहे. समाज माध्यमांवरील लाईक्स आणि फॉलोवर्स आपल्या जिवापेक्षा मोठे नाहीत, हे युवकांनी समजून घ्यायला हवं.
धोकादायक स्टंट करताना होणाऱ्या अपघातांमधून तरुणांना आपले प्राण गमवावे लागत आहे. गेल्या काही दिवसांत अशा घटनांमध्ये अधिक वाढ झाली आहे त्यामुळे ‘बाईमाणूस’ आपल्याला आवाहन करत आहे की जीव धोक्यात घालून अशा पद्धतीने रील बनवू नका.






