कोमल ठोंबरे
तुम्हाला हे माहित आहे का भारताच्या ब्लाईंड क्रिकेट टीमने आतापर्यंत कितीवेळा वर्ल्ड कप जिंकलाय? आमची खात्री आहे की, तुमच्यापैकी कुणालाच ही माहिती नसणार... पण तुम्हाला 1983... कपिल देवच्या नेतृत्वात भारताने वन डे क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला... 2007... कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीच्या टीमने भारताला पहिला टी 20 वर्ल्ड कप जिंकून दिला...
2011... धोनीच्याच टीम इंडियानं भारतानं दुस-यांदा वन डे वर्ल्डकप जिंकण्याचा भीमपराक्रम गाजवला… आणि 2024… रोहित शर्माच्या कप्तानपदाखाली टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कपवर पुन्हा एकदा आपले नाव कोरले….हे सगळं तोंडपाठ असेल. पुढचा वर्ल्ड कप कधी होणार? आयपीएलचा नवा हंगाम कधी सुरू होणार? हे देखील तुम्हाला ठाऊक असेल परंतू आतापर्यंत तब्बल पाचवेळा वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या भारतीय ब्लाईंड क्रिकेट टीमचा कॅप्टन कोण? हे आपल्यापैकी कुणालाच माहित नाही.
हे सगळं आम्ही अशासाठी सांगतोय की ब्लाईंड (दृष्टीहीन) क्रिकेटच्या जगतात एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय महिला ब्लाइंड क्रिकेट संघाने इतिहास रचला आहे. श्रीलंकेत खेळल्या गेलेल्या पहिल्या महिला ब्लाइंड टी-20 विश्वचषकात भारतीय संघाने विजय मिळवला आहे. भारतीय महिला ब्लाइंड क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात नेपाळचा दणदणीत पराभव केला. संपूर्ण स्पर्धेत भारत अपराजित राहिला आणि अंतिम सामन्यातही त्यांचे वर्चस्व कायम राहिले. अंतिम सामन्यात भारतीय संघाने नेपाळला सात विकेट्सने पराभूत केले.
महिला क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच ब्लाइंड टी-20 विश्वचषक खेळवला जात होता. भारताने तो जिंकून आपले वर्चस्व कायम ठेवले. पुरुषांच्या ब्लाइंड संघाने तर अनेक वेळा एकदिवसीय आणि टी-20 विश्वचषक जिंकले आहेत. जागतिक स्तरावर महिला संघाने पहिल्यांदाच जेतेपद जिंकले.
ब्लाईंड क्रिकेट कसे खेळले जाते?
आता हे ब्लाईंड क्रिकेट कसे खेळले जाते हेदेखील फार विलक्षण आहे. ब्लाईंड क्रिकेट टीममध्येही 11 खेळाडू असतात. त्यापैकी 4 क्रिकेटपटू पूर्णपणे अंध असतात. 4 क्रिकेटपटू अंशतः अंध असतात म्हणजे 2 ते 4 मीटरपर्यंतचं त्यांना दिसतं. तर 3 क्रिकेटपटू दृष्टीबाधित असतात म्हणजे 4 ते 6 मीटरपर्यंतचं त्यांना दिसतं. संघांना तिन्ही प्रकारच्या खेळाडूंचे मिश्रण ठेवावे लागते. ब्लाईंड क्रिकेटमधला बॉल प्लॅस्टिकचा आणि आकारानं मोठा असतो. त्यातल्या बॉल बियरींगमुळं घुंगरासारखा आवाज येतो. चेंडू अंडरआर्म पद्धतीने (खाली हात करुन किंवा हात न फिरवता) फेकला जातो. फलंदाजानं रेडी असं म्हटल्यानंतरच बॉल टाकला जातो. बॉल टाकल्यानंतर बॉलरला प्ले असं ओरडावं लागतं. पूर्ण अंध असलेल्या क्रिकेटपटूनं फोर मारला तर 8 रन्स आणि सिक्स मारला तर 12 रन्स मिळतात. अंध क्रिकेटपटूनं एक टप्पा कॅच पकडला तरी फलंदाज बाद होतो.
भारताची कर्णधार दीपिका… एका अपघातात दृष्टी गेली होती
भारतीय संघाचं नेतृत्व दीपिका टीसी हिनं केलं. ती कर्नाटकची असून, लहानपणीच एका अपघातात तिची दृष्टी गेली होती. ती एका शेतकरी कुटुंबात वाढली. हा खेळ तिच्या जीवनाचा मार्ग बदलेल याची तिला जाणीवही नव्हती. विशेष मुलांसाठीच्या शाळेमधून क्रिकेट तिच्यापर्यंत पोहोचलं. तिला संकोच वाटत असतानाही शिक्षकांनी तिथं दीपिकाला खेळण्यासाठी प्रोत्साहित केलं. कालांतराने, या खेळानं तिला दिशा आणि आत्मविश्वास दिला, असं ती सांगते.
लहानपणी अपघातात दृष्टी गमावलेल्या दीपिका टीसी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं ही कामगिरी केली आहे. विश्वचषकात भारताचं नेतृत्व करणं तिच्यासाठी महत्त्वाचं असल्याचं ती सांगते.
"माझ्या आणि माझ्या टीमच्या आयुष्यातील हा सर्वात मोठा क्षण आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, भारतीय महिला क्रिकेट संघानं नवी मुंबईत विश्वचषक जिंकला आणि आम्हाला या महिन्यात तो आनंद द्विगुणित करायचा आहे," असं दीपिका स्पर्धेपूर्वी म्हणाली होती. भारतीय महिला विश्वचषक विजेती जेमिमा रॉड्रिग्ज आणि पुरुष कसोटी कर्णधार शुभमन गिल यांनी खूप पाठिंबा दिल्याचं ती सांगते.
गंगा कदम… महिला ब्लाईंड संघाची एकमेव मराठी खेळाडू
भारतीय महिला ब्लाइंड क्रिकेट संघात महाराष्ट्राची एकमेव खेळाडू आहे जिचं नाव आहे गंगा कदम…
गंगा मूळची हिंगोली जिल्ह्यातली फुटाणे गावातली. कौटुंबिक परिस्थिती बेताची. वडील शेतकरी. कुटुंबात आठ मुली आणि एक मुलगा. मुलींत गंगा पाचव्या क्रमांकाची. शासकीय परिभाषेत तिच्या जन्मजात अंधत्त्वाची पातळी बी-३ मध्ये मोडते- म्हणजे तिला काही प्रमाणात दृष्टी असली तरी ती अधू आहे. तिच्याहून मोठ्या बहिणी फारशा शिकल्या नाही. कमी वयातच त्यांची लग्नं झाली. गंगाचं व्यंग पाहता किमान तिनं शिक्षण पूर्ण करत स्वत:च्या पायावर उभं राहावं, ही तिच्या पालकांची अपेक्षा होती. ती शिकली, नोकरीला लागली, तर घरची आर्थिक स्थिती काही अंशी सुधारेल अशी त्यांची इच्छा. यामुळे घरातून खेळाचे संस्कार किंवा त्याला पाठिंबा तिला कधी मिळाला नाही.
सोलापूर येथे अंध शाळेत शिकत असताना मुलांना किक्रेट खेळताना पाहून तिलाही हा खेळ खेळावासा वाटला. मैदानावर अम्पायरकडून खेळाडूंना ‘हियर’चा देण्यात येणारा आवाज, चेंडूत असलेले घुंगरू, त्या आवाजाच्या दिशेनं खेळाडूनं हवेत उंचवलेली बॅट, हे सारं तिला अनुभवायचं होतं. त्यातून क्रिकेटची आवड निर्माण झाली. या आवडीला तिचे क्रीडा शिक्षक शेळके सर यांनी खतपाणी घातलं.
गंगा सांगते, की ‘खेळात उतरले आणि माझा आत्मविश्वास वाढला.’ जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, विभागस्तरीय अशा विविध, दिव्यांगांसाठी असलेल्या स्पर्धांत तिनं उल्लेखनीय कामगिरी केली. शिक्षणासाठी बाहेर असल्यानं शिक्षण पूर्ण कर, स्वत:च्या पायावर उभी रहा, खेळबिळ खेळू नको, असं घरून सांगितलं जातं. माध्यमांमधून तिच्या कामगिरीविषयी काही बातम्या आल्या की तिसऱ्या व्यक्तीकडून तिच्या कुटुंबातल्या सदस्यांना त्याची माहिती मिळते आणि घरात एक ‘फायरिंग सेशन’ पार पडतं, असं गंगा सांगते. गंगा सांगते, “गावात सातवीपर्यंत शाळा आहे. पण तिथून पुढे शिकायचं, तर गावापासून पुढे पाच ते सात किलोमीटर असा वाहनानं प्रवास करावा लागतो. त्यासाठी दिवसाला एकाला 40 रुपये पडतात. हा खर्च परवडण्यासारखा नसला की शिक्षण थांबतं. माझं शिक्षण मी नोकरी करावी यासाठी सुरू आहे.”
महाराष्ट्रातून अंध महिला क्रिकेट संघात गेलेली ती एकमेव खेळाडू आहे. पहिलाच सामना एप्रिल-मे 2023 स्पर्धेत नेपाळ येथे- अर्थात बाहेरील देशात जाणार होता. याची माहिती तिनं वडिलांना दिली. नेहमीप्रमाणे वडील रागवले आणि खेळण्यापेक्षा नोकरी मिळते का पहा, असं त्यांनी सुचवलं. गंगाचा खर्च क्रिकेट संघ करणार असला तरी प्रशिक्षण व अन्य खर्चाच्या मदतीसाठी तिच्या प्रशिक्षकांनी मदत मिळवली. नेपाळ, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया अशा वेगवेगळ्या संघांशी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळून तिच्या संघानं विजय संपादित केला. तिच्या बरोबरीच्या अन्य महिला क्रिकेटपटूंचा त्या त्या राज्य सरकारांनी दखल घेत सत्कारही केला. काहींना आर्थिक मदत केली. मात्र महाराष्ट्र सरकारनं अद्याप गंगाच्या कामगिरीची दखल घेतलेली नाही, ही तिची शोकांतिका आहे.
लहान गावांतून आलेल्या खेळाडू… प्रत्येकीचा मोठा संघर्ष
संघातली 18 वर्षांची अष्टपैलू मैत्रीण फुला सरेन ही ओडिशातील आदिवासी समुदायातील. पाच वर्षांची असताना तिच्या डाव्या डोळ्याची दृष्टी गेली आणि त्यानंतर लवकरच तिच्या आईचीही दृष्टी गेली. अंधांसाठी असलेल्या शाळेतील एका शिक्षकाकडून तिला क्रिकेटबद्दल समजलं. स्पर्धांसाठी प्रवास करणं आव्हानात्मक होतं. शिवाय कुटुंबाच्या होकारासाठीही वेळ लागत होता, पण तिनं माघार घेतली नाही. एखादा मोठा क्षण तिच्यासाठी निर्णायक वळण नव्हता. तर आपण राष्ट्रीय स्तरावर काहीतरी करू शकतो हे तिच्यासाठी अधिक महत्त्वाचं होतं.
दुसरीकडे मध्य प्रदेशातील सुनीता सारथे यांनी शाळेतून क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं नाही. तर आधी महाविद्यालयीन शिक्षणही पूर्ण केलं होतं. अनेक नोकऱ्या शोधल्या. पण एका मित्राच्या सल्ल्यावरून त्या अंध क्रिकेट शिबिरात सामील झाल्या. हा खेळ सुरुवातीला त्यांना कठीण वाटत होता. पण त्यांनी सराव सुरू ठेवला. प्रशिक्षक सांगतात की, तिनं खूप सराव केला कारण उशिरा सहभागी झालो आहोत, असं तिला वाटत होतं. आता ती भारताच्या सर्वात विश्वासार्ह क्षेत्ररक्षकांपैकी एक आहे.
धनुष्यबाणामुळे डोळा गमावला, खेळातही केले काम मध्य प्रदेशच्या (दमोह) सुषमाला लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्याची आवड आहे. ती 4-5 वर्षांची असताना धनुष्यबाण खेळताना डोळ्याला दुखापत झाली. अशा परिस्थितीत सुषमाचे क्रिकेट खेळण्याचे स्वप्न धुळीस मिळू लागले. पण सुषमाने आपल्या भावांसोबत क्रिकेट खेळणे सुरूच ठेवले. सुषमाने वडिलांनाही शेतात मदत केली. 2019 मध्ये, तीला एका मित्राकडून अंध क्रिकेटबद्दल माहिती मिळाली आणि तो अकादमीमध्ये सामील झाला. येथून त्याची संघात निवड झाली.
11 एप्रिल 2022… भारताच्या अंध क्रिकेटपटूंसाठी महत्वाची तारीख
11 एप्रिल २०२२. भारताच्या अंध क्रिकेटपटूंसाठी ही तारीख खास ठरली. कारण या दिवशी भारताची पहिला महिला क्रिकेट टीम तयार झाली होती. भारताचे नेतृत्व कर्नाटकच्या दीपिका टीसीने केले. या संघात कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, ओडिशा, दिल्ली, आसाम आणि बिहार या नऊ वेगवेगळ्या राज्यांमधून निवडलेल्या १६ खेळाडूंचा समावेश होता. शाळेतील शिक्षक, स्वयंसेवी संस्था आणि समुदाय कॅम्पसद्वारे खेळाडूंना क्रिकेटबद्दल शिक्षित करण्यात आले.
क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इंडिया (CABI) ला हा संघ बनवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. CABI सचिव जॉन डेव्हिड सांगतात की, पुरुष संघाच्या स्थापनेपासूनच राष्ट्रीय असोसिएशन महिला संघ तयार करण्याचा विचार करत होता, पण यश मिळत नव्हते. आम्हाला अंध खेळाडू शोधणे, निधी उभारणे, प्रायोजकत्व मिळणे अशा अनेक समस्या होत्या. नेपाळ, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांनी राष्ट्रीय अंध महिला क्रिकेट संघाची स्थापना केली होती.
नेपाळ-इंग्लंड यांनी द्विपक्षीय मालिकाही खेळली. यामुळे आमची टीम तयार करण्याच्या प्रक्रियेला वेग आला. आम्ही राज्याराज्यात संघटना उभारल्या. 2019 पर्यंत आमच्याकडे 7 राज्ये होती. नंतर कोरोना आला आणि सर्व काही थांबले. कोविड नंतर, आमच्या राज्य संघांची संख्या 23 झाली. आमच्याकडे निधी नव्हता, म्हणून आम्ही देणगी जमा करून काही रक्कम जमा केली. आम्ही अजूनही प्रायोजकत्व शोधत आहोत.
खेळाडूंची निवड कशी होते राष्ट्रीय निवड चाचण्यांमध्ये देशभरातील 16 राज्य संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत 16 संघातील 224 खेळाडू सहभागी झाले होते. त्यातून अखेरच्या 38 खेळाडूंची निवड करण्यात आली आणि त्यानंतर देशभरातील सर्वोत्तम 17 खेळाडूंचा संघ तयार करण्यात आला. राष्ट्रीय चाचणी शिबिर मध्य प्रदेशातील भोपाळ शहरात आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, चंदीगड, गुजरात, झारखंड आणि राजस्थान या राज्यांनी सहभाग घेतला होता.
NGO कडून उभारला निधी कॅबीला सरकारकडून कोणतेही सहकार्य मिळाले नाही. अशा परिस्थितीत, बेंगळुरूच्या समर्थनम ट्रस्टने दोन्ही अंध क्रिकेट संघांना पूर्णपणे आर्थिक मदत केली. स्पर्धेचे व अंध क्रिकेटचे संपूर्ण नियोजन जागतिक अंध क्रिकेट संघामार्फत केले जाते.
बीसीसीआयकडून काहीही मदत नाही
बीसीसीआय... जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड. क्रिकेटवर BCCI पाण्यासारखा पैसा खर्च करते. भारतीय क्रिकेटपटूंना करोडो रुपयांची पॅकेजेस दिली जातात... अगदी आयपीएलमध्ये दरवर्षी विदेशी क्रिकेटपटूंवर देखील करोडो रुपयांची दौलतजादा करणारं BCCI... मात्र ब्लाईंड क्रिकेटला आर्थिक मदत देताना मात्र त्यांचा हात का आखडतो, हे मोठं कोडंच आहे. ब्लाईंड क्रिकेटर आणि सामान्य क्रिकेटपटू यांच्यात गुणवत्तेच्या बाबतीत काहीच फरक नाही. ब्लाईंड क्रिकेटपटूही वर्षवर मेहनत घेतात, मैदानात घाम गाळतात, देशाचं प्रतिनिधीत्व करता.. बदल्यात त्यांना काय मिळतं?
टीम इंडियातल्या क्रिकेटपटूंना श्रेणीनुसार मानधनाचं वार्षिक पॅकेज दिलं जातं. याउलट ब्लाईंड क्रिकेटपटूंचं मानधन निश्चित नाही.भारतीय क्रिकेटपटू एका वनडे मॅचमधून 6 लाख रुपयांची कमाई करतात. टी-20 मॅच खेळण्यासाठी त्यांना 3 लाख रुपये मिळतात. याउलट देशासाठी वर्ल्ड कप जिंकणा-या ब्लाईंड क्रिकेटपटूंना केवळ 3 हजार रुपये मिळतात. ब्लाईंड क्रिकेटपटूंना सरावासाठी धड मैदानही नाही. पाकिस्तानमध्येही ब्लाईंड क्रिकेट टीमला मान्यता आहे. मात्र भारतीय ब्लाईंड टीमला BCCIकडून अजून मान्यता मिळालेली नाही.
भारतीय महिला एकही सामना हरल्या नाहीत
अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर, भारताने नेपाळला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आणि हा निर्णय शहाणपणाचा ठरला. नेपाळच्या संघाला 20 षटकांत 5 विकेट्स गमावून फक्त 114 धावा करता आल्या. सरिता घिमिरेने सर्वाधिक 35 धावा केल्या. बिमला रायनेही 26 धावा केल्या. इतर कोणत्याही फलंदाजाने दुहेरी आकडा गाठला नाही, ज्यामुळे धावसंख्या कमी झाली. भारताकडून जमुना राणी टुडू आणि अनु कुमारी यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
प्रत्युत्तरात, भारतीय संघाने केवळ 12.1 षटकांत लक्ष्य गाठले आणि 47 चेंडू शिल्लक असताना विजय मिळवला. संघाची सर्वात मोठी सामनावीर खेळाडू फुला सरेन होती, तिने 27 चेंडूत नाबाद 44 धावा केल्या, ज्यामध्ये चार चौकारांचा समावेश होता. करुणा के. ने 27 चेंडूत 42 धावांची स्फोटक खेळी केली. बसंती हंसदा 13 धावांवर नाबाद राहिली आणि संघाला विजय मिळवून दिला. या धावांच्या पाठलागात भारताने फक्त तीन विकेट गमावल्या.
भारतीय महिला ब्लाइंड क्रिकेट संघाने श्रीलंकेचा 10 विकेटने पराभव करून स्पर्धेची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ऑस्ट्रेलियाचा 209 धावांनी पराभव केला. त्यानंतर भारतीय संघाने नेपाळचा 85 धावांनी पराभव केला. त्यानंतर अमेरिकेवर 10 विकेटने विजय मिळवला. भारताने पाकिस्तानविरुद्धचा सामनाही आठ विकेटने जिंकला. त्यानंतर त्यांनी सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा नऊ विकेटने पराभव करून अंतिम फेरीत स्थान निश्चित केले.
पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा 10 विकेट्सने पराभव केला. दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 209 धावांनी पराभव केला. तिसऱ्या सामन्यात नेपाळचा 85 धावांनी पराभव केला. चौथ्या सामन्यात अमेरिकेचा 10 विकेट्सने पराभव केला. पाचव्या सामन्यात पाकिस्तानचा 8 विकेट्सने पराभव केला. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा 9 विकेट्सने पराभव केला. अंतिम फेरीत भारताने नेपाळचा 7 विकेट्सने पराभव केला.






