- विठ्ठल साबळे
लोकगीतांनी देशभरात घराघरात पोहोचलेला आवाज आता बिहारच्या विधानसभेत घुमणार आहे. 25 वर्षाच्या प्रख्यात गायिका असलेल्या मैथिली ठाकूर यांनी पहिल्याच प्रयत्नात अलीनगर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवत बिहारच्या राजकारणात जोरदार एन्ट्री मारली आहे. एक कलाकार राजकारणात उतरतो हे या सेधालाहे नवीन नाही परंतु अवघ्या 25 वर्षाची तरुण महिलेची सांस्कृतिक ओळखीने ठसठशीत असलेली ही एन्ट्री देशातल्याबदलत्या राजकीय समीकरणांची नवी दिशा दर्शवते.
बिहारमधील अलीनगर मतदारसंघातून भाजपने गायिका मैथिली ठाकूरला उमेदवारी दिली होती. मैथिली विरोधात RJDने बिनोद मिश्रा यांना उमेदवारी दिली. मैथिली ठाकूर यांनी त्यांच्या पहिल्याच निवडणुकीत विक्रमी कामगिरी केली. अलीनगर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी विरोधी पक्षाचे उमेदवार बिनोद मिश्रा यांना तब्बल 11,730 मतांच्या फरकाने पराभूत केले. एकूण 84,915 मतं मिळवत त्या या मतदारसंघाच्या सर्वात युवा विजयी आमदार बनल्या. बिहारसारख्या स्पर्धात्मक राजकारणात हा विजय एक मोठा संदेश देणारा ठरला आहे.
सर्वात कमी वयाची आमदार
राजकारणात पूर्णपणे नवीन असलेल्या मैथिली ठाकूरने मिथिला प्रदेशातील प्रचंड लोकप्रियतेच्या जोरावर हा मोठा विजय संपादन केला. एका बाजूला, आरजेडीचे विनोद मिश्रा यांचा मतदारसंघात मोठा जनसंपर्क आणि मजबूत संघटनात्मक उपस्थिती असूनही, त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. केवळ २५ वर्षांच्या मैथिली ठाकूर यांनी हा विजय मिळवून बिहार विधानसभेतील सर्वात तरुण आमदार होण्याचा मान मिळवला आहे.
संबंधित लेख वाचा 'ओ स्त्री रक्षा करना'… केंद्र असो वा राज्य, हाच ठरतोय सत्तास्थापनेचा फॉर्म्युला! |
माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये मैथिलीनं गाण्यातून तिच्या भावना व्यक्त केल्या असून गायक मनोज तिवारी यांनीही मैथलीचं कौतुक केलं आहे. 'मी फक्त 25 वर्षांची आहे, पण येणाऱ्या काळात मी स्वतःला सिद्ध करेन,' असं भाजप उमेदवार मैथिली ठाकूर म्हणाली.
अलीनगर हा मिथिला प्रदेशातील एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे, जिथे राजकीय, सांस्कृतिक आणि जातीय गणिते नेहमीच गुंतागुंतीची असतात. या मतदारसंघात ब्राह्मण, यादव, रविदास आणि अत्यंत मागास जातींची लक्षणीय उपस्थिती आहे. यंदाच्या निवडणुकीत दोन्ही प्रमुख उमेदवार ब्राह्मण समाजाचे असले तरी, मैथिली ठाकूर यांची सांस्कृतिक ओळख आणि तरुणाईमधील त्यांची पकड यामुळे मतदारांनी पारंपरिक राजकीय अनुभवाऐवजी एका नव्या चेहऱ्यावर विश्वास दाखवल्याचे स्पष्ट झाले आहे.
संपत्तीचे तपशील: 3.82 कोटी
प्रतिज्ञापत्रानुसार, मैथिलीने एकूण संपत्तीपैकी 2 कोटी 32 लाख रुपये इतकी जंगम मालमत्ता जाहीर केली आहे. या जंगम मालमत्तेमध्ये रोख रक्कम, विविध बँकांमधील ठेवी, सोने-चांदी, आणि विविध प्रकारची गुंतवणूक यांचा समावेश आहे. तिच्याकडे असलेल्या विविध बँकांमध्ये जमा ठेवी आणि रोख रक्कम मिळून सुमारे 72 लाख रुपये आहेत. याव्यतिरिक्त, बॉंड्स, डिबेंचर्स आणि म्युच्युअल फंडमध्ये मैथिलीची सुमारे 31.42 लाख रुपयांची गुंतवणूक आहे. तिच्याकडे असलेल्या 409 ग्रॅम सोन्याची किंमत ५२ लाख रुपये इतकी आहे. विशेष म्हणजे, तिने 'मेसर्स मैथिली ठाकूर प्रोप्रायटरशिप फर्म'मध्ये 1.30 कोटी रुपयांचे मोठे भांडवली गुंतवणूक दर्शवली आहे. जंगम मालमत्तेसोबतच, मैथिलीने 1.50 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ताही जाहीर केली आहे. यामध्ये दिल्लीतील द्वारका येथे 2000 साली स्व-अधिग्रहितकेलेला एक फ्लॅट/निवासी समाविष्ट आहे, ज्याची सध्याची बाजारपेठेतील किंमत 1.50 कोटी रुपये आहे.
मैथिली झाली होती ट्रोल
बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, एका पत्रकारानं मैथिलीला विचारलं की, तुमच्या क्षेत्राच्या विकासाची ब्लूप्रिंट काय आहे? त्यावर मैथिली ठाकूरनं दिलेल्या उत्तरानं सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. मैथिलीनं पत्रकाराच्या प्रश्नावर क्षणभरही विचार केला नाही. अगदी तात्काळ तिनं जे उत्तर दिलं, त्यानं सर्वांच्या पायाखालची जमिन सरकली आहे. मैथिली अजिबात संकोच न करता कॅमेऱ्यासमोर म्हणाली की, "मी हे सर्वांसोबत कसं शेअर करू? ही पूर्णपणे वैयक्तिक आणि गोपनीय बाब आहे..."
बिहारचा अलीनगर हा सुमारे 3.1 ते 3.3 लाख लोकसंख्येचा मुख्यत्वे ग्रामीण भाग असलेला आणि मूलभूत सुविधांपासून मागे पडलेला मतदारसंघ आहे. बिहार देशातील सर्वात मागास राज्य मानले जाते. रोजगार शिक्षण आणि पायाभूत सुविधा या तिन्ही क्षेत्रांत गंभीर समस्या आहेत. अशा भागातून एक तरुण महिला विजयी होणे हे स्वतःमध्येच उल्लेखनीय आहे.
अलीनगर मतदारसंघात काम करताना मैथिली ठाकूर यांच्यासाठी सर्वात मोठी कसोटी असेल ती त्यांच्या लोकप्रियतेचा प्रत्यक्ष प्रशासनाशी मेळ घालण्याची. सोशल मीडियावर त्यांची प्रतिमा स्वच्छ आणि सकारात्मक आहे परंतु जमिनीवरची कामे ही वेगळीच लढाई असतात. सरकारी यंत्रणेची गती निधीचे निकष, अधिकारी वर्गाशी समन्वय आणि स्थानिक राजकारणातील स्पर्धा या सर्वांना सामोरं जाताना त्यांच्यावर दबाव वाढणार आहे. लोकांच्या अपेक्षा प्रचंड आहेत आणि ही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांना सक्षम टीम उभी करावी लागेल तसेच निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता आणि सातत्य ठेवावे लागणार आहे.
मैथिलीचा संगीत ते राजकारणापर्यंतचा प्रवास
मैथिली ठाकूरचा जन्म 25 जुलै 2000 रोजी बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील बेनीपट्टी येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रमेश ठाकुर. तिचे वडील आणि आजोबा दोघेही संगीतकार होते, ज्यांनी तिला भारतीय शास्त्रीय आणि लोकसंगीताचे अनेक बारकावे शिकवले. तीन भावंडांमध्ये मैथिलीसोबत तिचे भाऊ ऋषभ आणि अयाची संगीत क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांनी दिल्लीतील बाल भवन इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेतलं आणि त्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या आत्माराम सनातन धर्म कॉलेजमधून पदवी मिळवली.
लहान वयापासूनच लोकगीतं, भजनं आणि बिहारच्या लोकपरंपरेशी जोडलेली गाणी गात त्यांनी सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रियता कमावली. 2017 मध्ये 'रायझिंग स्टार' या टीव्ही शोमध्ये उपविजेती झाल्यानंतर मैथिलीची ओळख देशभर पसरली. तिच्या भावांसोबत, तिनं शेकडो लोकगीतं आणि भजनं गाऊन सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स मिळवले. हळूहळू, तिचं नाव केवळ गायिका म्हणून नव्हे तर 'मिथिलाची कन्या' म्हणून प्रसिद्ध झालं. ही लोकप्रियता ओळखून, भाजपनं तिला पक्षात समाविष्ट केलं आणि यावेळी तिला अलीनगर मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी दिली.
मैथिलीचा साधेपणा हा त्यांचा सर्वात मोठा गुण मानला जातो. लोकप्रिय असूनही त्यांनी कधीही सेलिब्रिटी असल्याचा दिखावा केला नाही. प्रचारसभा, भेटीगाठी किंवा जनतेशी संवाद त्यांच्या भाषा आणि वागणूक नेहमीच साधी जमिनीवरची आणि माणुसकीपूर्ण दिसते. बिहारसारख्या सामाजिकदृष्ट्या गुंतागुंतीच्या राज्यात “आपलीच मुलगी” अशी ओळख निर्माण करणं कठीण आहे परंतु मैथिलीने हे सहजपणे साध्य केलं. लोक मानतात की हीच त्यांची काम करण्याची शैली पुढे अलीनगरमध्येही दिसायला हवी.






