दक्षिणेकडील एका नृत्यप्रकाराचे व्हिडियो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. हलगीच्या ठेक्यावर दक्षिणेकडील काही महिला साडी नेसून या व्हिडिओमध्ये नाचताना दिसतात. मात्र हे व्हिडियो व्हायरल होण्यामागचे कारण म्हणजे नृत्य करताना या महिलांमधील जोश आणि उत्साह… या महिलांमधील उत्साह पाहून भलेभले गार झाले आहेत. इतकंच काय तर इं’स्टाग्राम स्टार’ डॅनी पंडितनेदेखील तशीच साडी घालून नाच केल्याचा व्हिडियोही व्हायरल होतो. अनेकांनी या आगळ्यावेगळ्या नृत्यावरून मिम्स तयार केले आहेत.
कोण आहेत या महिला…? या अशा भन्नाट नृत्यप्रकाराला काय म्हणतात…? देशभरात या व्हिडियोनी धुमाकूळ का घातला आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या लेखातून शोधणार आहोत.
ट्रेंडिंग व्हिडिओमधील महिला अशा का नाचतात?
सोशल मीडिया युजर्सना जरी या नृत्यातून आनंद मिळत असला आणि त्यावर मिम्स बनत असले तरी या नृत्यामागे आहे एक काळी बाजू…एक शोकांतिका… आपल्या समाजरचनेवरचा एक काळा डाग…देवदासी प्रथा…पुरुषी वर्चस्वाच्या शोषक सामाजिक उतरंडीतला तळाचा फुटलेला स्त्रीदेहाचा कलश म्हणजे देवदासी. याच देवदासी प्रथेअंतर्गत जेव्हा एखादी मुलगी आजारी पडते तेव्हा तिला श्रद्धेने मंदिरात नेलं जातं. मात्र तरीही तिची प्रकृती सुधारली नाही तर तिला मंगळसूत्र म्हणजे ‘पोट्टू थाळी’ बांधून तिचं लग्न देवतेशी लावून दिलं जातं. हे लग्न लावल्यानंतर तिला मंदिराला अर्पण केल जातं. अशा महिलांना 'मथम्मा' म्हणतात. एकदा का या महिला 'मथम्मा' झाल्या तर त्यांना मंदिरातील जत्रा आणि कार्यक्रमांमध्ये सार्वजनिक ठिकाणी नाचावं लागतं. तिला आयुष्यभर मंदिराची सेवा करावी लागते. सध्या जे व्हिडियो व्हायरल होत आहेत ते याच मथम्मा नृत्याचे आहेत.
तमिळनाडू, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्याच्या काही भागांमध्ये ही प्रथा अद्यापही सुरू असल्याचं म्हटलं जातं. देवीला किंवा मंदिराला अर्पण करण्याच्या पद्धतीला मथम्मा म्हटलं जातं.ही पद्धत दक्षिणेतील मडिगा समुदाय आणि इतर समुदायांमध्ये आढळून येते. आंध्रप्रदेशातील चित्तूर आणि तमिळनाडूतील तिरुवल्लूर जिल्ह्यांमध्ये ही पद्धत प्रचलित आहे. या महिलांना मथम्मा मंदिरामध्ये राहावं लागतं. अनेकदा त्यांना लैंगिक शोषणालाही सामोरं जावं लागतं.
दक्षिण भारतातल्या तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशा या दोन राज्यांततील काही खेड्यांमध्ये पुन्हा एकदा देवदासी प्रथेची छाया डोकावत असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय पातळीवर सुरू झाली आहे. तिरुवल्लूर जिल्ह्यातील एका मंदिरात झालेल्या एका विचित्र विधीवर मीडियाने प्रकाश टाकला आणि त्यानंतर प्रश्नांचे सावट वाढतच गेले. ही प्रथा खरोखरच संपली आहे की केवळ रूप पालटून आजही कुठेतरी जिवंत आहे?
तिरुवल्लूरमधील ‘विवाह’ आणि नग्न करण्याचा आरोप
दक्षिण भारतातील तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात अलीकडच्या काही दिवसांत एका विचित्र धार्मिक विधीबद्दल माध्यमांत आलेल्या बातम्यांनी पुन्हा एकदा एक जुना, वेदनादायी प्रश्न उभा केला आहे… देवदासी प्रथा खरोखर संपली आहे की ती आजही कुठेतरी जिवंत आहे? तिरुवल्लूर जिल्ह्यातील एका मंदिरात गेल्या महिन्यात पाच लहान मुलींना वधूसारखे सजवून मथम्मा देवीला अर्पण करण्यात आले, आणि त्या विधीनंतर पाच मुलांनी त्यांना नग्न केल्याचा आरोप आहे. आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातही अशीच एक घटना नोंदवली गेली. या बातम्यांनंतर एका स्वयंसेवी संस्थेने केलेल्या तक्रारीची दखल घेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दोन्ही राज्यांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना चार आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. आयोगाने म्हटले आहे की, जर हे आरोप खरे असतील तर ते मुलांच्या शिक्षण, सन्मान आणि जीवनाच्या मूलभूत हक्कांचे गंभीर उल्लंघन आहे.
काय आहे ही मथम्मा प्रथा?
दक्षिण भारताच्या या सीमा भागात देवदासी (स्थानिक भाषेत ‘मथम्मा’) या प्रथेचा इतिहास जुना आहे. अरुंथथियार अनुसूचित जातीच्या समुदायात असा समज पसरलेला होता की घरातील आजारी, अशक्त किंवा कुटुंबाला ‘सांभाळता न येणारी’ मुलगी देवीला अर्पण करावी. त्या क्षणापासून ती मुलगी ‘मथम्मा’ म्हणजेच देवदासी मानली जाई आणि तिला गावाची “सार्वजनिक मालमत्ता” समजले जाई. मुलगी पौगंडावस्थेत पोहोचली की पुजारी तिचे देवीशी ‘विवाहबंधन’ लावत असे. त्या नंतर त्या मुलीला कोणत्याही व्यक्तीशी लग्न करण्याची मुभा नसे. त्या सण-उत्सवात नाचत आणि गावातील कोणत्याही जातीतल्या पुरुषांना त्यांचे लैंगिक शोषण करण्याची मोकळीक असे, असा अनुभव तिरुवल्लूरमध्ये 27 वर्षे काम करणारे समाजकार्यकर्ते पी. स्टीफन सांगतात.
मानवाधिकार आयोगाच्या नोटिसीनंतर सरकारी यंत्रणांनी दोन्ही जिल्ह्यांतील अनेक गावांत चौकशी केली. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांना अशी कोणतीही प्रथा सध्या अस्तित्वात असल्याचे पुरावे आढळले नाहीत. तिरुवल्लूरचे बालसुरक्षा अधिकारी सेंथिल म्हणतात, “आमच्या आकलनानुसार अशी कोणतीही प्रथा आता येथे नाही.” त्यांच्या मते, माध्यमांनी ज्या विधीचा उल्लेख केला आहे, त्या विधीचा देवदासी प्रथेशी संबंध नसून तो मुलींना लवकर पौगंडावस्था यावी यासाठी कुटुंबांनी केलेला स्थानिक धार्मिक विधी असू शकतो. संबंधित मुली त्यांच्या घरी परतल्या असून शिक्षण सुरू ठेवत आहेत, असे ते सांगतात.
गावकरी मात्र माध्यमांच्या वृत्तांकनावर तीव्र नाराज आहेत. “गेल्या पंधरा वर्षांत ही प्रथा बंद झाली आहे, तरी माध्यमे आमच्या स्थानिक प्रथांना विकृत रूप देतात,” असा रोष एका स्थानिक कार्यकर्त्याने व्यक्त केला. त्यांच्या मते, सरकारी अधिकारी सतत गावात येत असल्यानेही गावकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
परंतु या सरकारी दाव्यांच्या उलट, राष्ट्रीय महिला आयोगाच्या दोन वर्षांच्या सर्वेक्षणात स्पष्ट निष्कर्ष नोंदवला. देवदासी प्रथा आजही तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र आणि ओडिशामधील अनेक गावांत अस्तित्वात आहे. या अभ्यासाचे नेतृत्व करणाऱ्या मद्रास विद्यापीठाच्या प्रियंवदा मोहनसिंग सांगतात, “आम्ही फक्त पाठ्यपुस्तकांमध्ये वाचलं होतं. पण प्रत्यक्षात अनेक गावात ही प्रथा आजही अस्तित्वात आहे. तिरुवल्लूरमध्ये, आंध्रच्या सीमेवर, मथम्मा प्रथा मोठ्या प्रमाणावर दिसली.”
देवदासींची एकमेव अधिकृत संख्या आजही 2006 मधील आहे 44,000 ते 2,50,000. यांपैकी सर्वाधिक कर्नाटकमध्ये, त्यानंतर आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात. जरी अनेक दक्षिणी राज्यांनी देवदासी पद्धतीवर बंदी घालणारे कायदे केले असले, तरी राष्ट्रीय महिला आयोगाच्या 2015-16 च्या अहवालात म्हटले आहे की, देवीशी ‘विवाह’ करण्याची सुरुवातीची धार्मिक परंपरा काळाच्या ओघात उच्चवर्णीयांच्या लैंगिक शोषणात रूपांतरित झाली. गेल्या काही दशकांत ही प्रथा मोठ्या प्रमाणावर कमी झाली असली, तरी तिचे ‘अवशेष’ आजही दक्षिण भारतात आढळतात.
देवदासी आणि मथम्मा प्रथेवर संशोधन करणारे प्रसिद्ध ब्लॉगर आणि लेखक समीर गायकवाड यांच्या मते, देवदासी हा हिंदू धर्मातील समाजरचनेवतरचा काळा डाग आहे. कितीही प्रयत्न झाले तरी अजूनही तो सकल पुसला गेलेला नाही हे सत्य आहे.
देवदासी हा हिंदू धर्मातील समाजरचनेवतरचा काळा डाग
याबद्दल अधिक माहिती देताना समीर गायकवाड म्हणतात की, कर्नाटकातील सौंदत्ती (जि. बेळगाव) हे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरचं यलम्माचं ठिकाण. दर माघी, चैत्री पौर्णिमेला इथे यात्रा भरते. ‘आहेव’ पुनव (पौष पौर्णिमा) ते रांडाव पुनव (मार्गशीर्ष पौर्णिमा) या काळात तिथं कर्मकांडं चालतात. कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि इतर राज्यांतील हजारो भाविक या काळात देवीदर्शनाला यल्लम्माच्या डोंगरावर येतात. सौंदत्तीतले देवदासी, जोगतीणी आणि जोगते (स्थानिक भाषेत जोगप्पा) यांना या दरम्यान उधाण आलेलं असतं. यल्लम्माचे वैधव्य सूचित करण्यासाठी तिची मानवी प्रतिनिधी असलेल्या जोगतिणीला रांडाव पुनवेला गावाबाहेर जाऊन हातातल्या बांगडय़ा फोडायच्या व आहेव पुनवेला पुन्हा भरायच्या असा 'विधी' असतो. देवीचे मंदीर तेराव्या शतकातील आहे.
देवी कडक परंतु भावभोळी असल्याचे मानले जाते. तिच्या मूर्तीची बैठक चतुर्भुज व बसलेल्या स्थितीतील असते. तिच्या डोक्यावर मुकुट, हाती वहाती डमरू, त्रिशूळ, पाश व ब्रह्मकपाल ही आयुधे असतात. सौंदत्तीच्या यात्रेत देवीला चांदीचा पाळणा वाहणे, बगाड घेणे, लिंब नेसणे इ.प्रकारे नवस फेडले जातात. चंद्रगुत्ती (जि. शिमोगा) येथेही रेणुकाम्बेची नग्न होऊन पूजा केली जायची. सौंदत्तीत ब्रिटिश अमदानीतही असे घडत असल्याचे उल्लेख मिळतात. नवसाने झालेल्या मुलामुलींना वा केसात जट झालेल्या मुलींना देवीला वाहत. वाहीलेला मुलगा जोगती व मुलगी जोगतीण बने. मुली देवदासी बनून गणिका वृत्तीने जगत. कवड्यांची माळ घालणे, देवीची मूर्ती असलेली परडी म्हणजेच ‘जग’ डोक्यावर घेणे आणि कपाळाला भंडार लावणे, ही जोगती बनण्याच्या विधीतले भाग असत.
फार पूर्वी नाही पण वीसेक वर्षांपूर्वी दर वर्षी अक्षरशः शेकडो मुलींना या यात्रेत देवीला सोडलं जायचं. कोवळ्या मुलींना नग्न करून त्यांना लिंबाचा पाला नेसवला जायचा आणि भल्या पहाटे डोक्यावर घागर घेवून तिने देवीचा डोंगर चढायचा. मग तिथंच तिचं विधीपूर्वक लग्न लागायचं. लग्न कसलं, हा म्होतूर लागलेला असायचा. गळ्यात देवीच्या नावाने लाल-पांढऱ्या मण्यांचं मंगळसूत्र बांधलं जायचं. एकदा का तिचं लग्न झालं की अन्य पुरुषाशी तिनं लग्न करायचं नाही, जोगवा मागून खायचं, देवीची सेवा करायची अशी बंधने असत. हे एवढ्यावरच थांबत नसे, काही दशकांपूर्वी तर या मुलींच्या कौमार्याचा लिलाव व्हायचा ! जो जास्तीत जास्त बोली लावेल त्याला तिचा कौमार्यभंग करायचा अधिकार मिळायचा. नंतर हेच तिचं प्राक्तन व्हायचं. बघता बघता ती शय्यासोबतीपुरती उरायची. कधी गावातच राहून तर कधी मुंबईच्या कुंटणखान्यात रवानगी होऊन तिचं प्रारब्ध रोज नागवलं जाई.
प्रमाण कमी झालं असलं तरी अद्याप लपूनछपून प्रथा सुरूच
महिला संघटना आणि अंधश्रद्धा निर्मुलनाच्या न्यायालयीन लढ्यातून ही प्रथा वरवर तर थांबली आहे. पण छुप्या पद्धतीने अजूनही अशा घटना घडत असतात. कधी त्या उजेडात येतात तर कधी येत नाहीत. ब्रिटिशांनी देवीला मुली सोडणे, तिला देवदासी बनवणे हा गुन्हा आहे, असा कायदा 1934 साली केला होता. मात्र स्वातंत्र्यप्राप्तीनंतर धार्मिक स्वातंत्र्याच्या नावाखाली या कुप्रथांना पुन्हा चांगले दिवस आले होते. मागील दशकात महाराष्ट्र व कर्नाटक सरकारने देवदासी प्रतिबंधक कायदा केला. त्यामुळे उघडपणे डोंगरावर किंवा सार्वजनिक ठिकाणी मुली किंवा मुलगे सोडले जात नाहीत, परंतु अजूनही चोरून पुजाऱ्याच्या घरी किंवा इतर ठिकाणी मुली सोडल्या जातात. हे प्रमाण आता खूप कमी झालं आहे.
देवीला मुलं-मुली सोडण्याची कसलीही कारणं पुरेशी असत. घरात कुणी आजारी असलं, गोठय़ात बैल मेला, अंगावर खरूज उठली व ती लवकर बरी झाली नाही, तरीही त्या मुलीला किंवा मुलाला देवीला सोडल्याची अनेक उदाहरणं आहेत. एक तर गरिबीमुळे या लोकांना दवाखाना करणं परवडत नसे वा डॉक्टरपेक्षा यांचा भक्तावर जास्त विश्वास असे. केवळ भंडारा लावून रोग बरा होतो, ही समजूत. वंशाला कुलदीपक असावा ही पूर्वापार चालत आलेला खुळचटपणा अनेक सुशिक्षितांमध्ये आजही आढळून येतो. सर्वार्थाने मागासलेल्या घटकांत तर अशा अंधश्रद्धांचा कहर असे. अनेक मुली जन्मास घातल्यावरही आपल्याला मुलगा व्हावा ही इच्छा असे. त्यासाठी पहिल्या मुलीला यल्लम्माला सोडली जायचे. एवढं करूनही कधी कधी मुलगा होत नसे. एकदा सोडलेली मुलगी लग्नसंसार करू शकत नाही. तिला देवदासी म्हणूनच जगावं लागतं.
केवळ अंधश्रद्धेतून हे आलेलं नाही तर यामागे आर्थिक कारणंही जबाबदार आहेत. एखाद्या जोगतिणीला जर तिला कुणापासून मूल झालं नाही तर ती आपल्या नात्यातली किंवा कुणाची तरी मुलगी दत्तक घेई व लहानपणीच तिला देवीला सोडून आपल्या म्हातारपणाच्या उदरनिर्वाहाची तजवीज करे. असेही प्रकार घडत ! आपल्या गळ्यात बांधलेलं यल्लम्माचं ‘दर्शन’ दुस-या कुणाच्यातरी गळ्यात आपण मरण्याआधी बांधले नाही तर देवीचा कोप होतो. सुखाने मरण येत नाही. आपल्या मुलीच्या, नातीच्या वा नात्यातल्या कुणाच्याही मुलीच्या गळ्यात एकदा हे बांधलं की, आपण यातून सुटलो अशी काहींची धारणा असते. वरवर ही अंधश्रद्धा असली तरी तिची खरी कारणे आर्थिकही आहेत. ही मुलगी मोठी झाल्यावर जोगवा मागून किंवा वेश्याव्यवसाय करून म्हातारपणी आपल्याला बघेल, याची ती सोय असे.
वयात आलेल्या अशा तरुण मुली गावागावातून जोगवा मागत इतर जोगतिणींबरोबर फिरत असत, तेव्हा त्यांच्यावर गावातील श्रीमंत जमीनदार किंवा दुकानदारांची नजर असे. ताफ्यातल्या प्रमुख बाईला पैशाची लालूच दाखवून ती बाई त्या मुलीला फूस लावून त्याच्याबरोबर तिचा ‘झुलवा’ किंवा त्याची ‘रखेली’ म्हणून ठेवण्यात यशस्वी होई. झुलवा लावणे म्हणजे एकाच माणसासोबत लग्नाच्या बाईसारखं राहणं. हा विधीही थोडाफार लग्नासारखा असतो. झुलवा लावलेला पुरुष तिला शेतात घर करून देतो किंवा तिच्या घरी येत असतो. त्याच्यापासून तिला मुलं झाली तर तो त्यांनाही पोसतो. हा उच्चवर्गीय असल्यामुळे अशा बाईला (जोगतिणीला) सहसा आपल्या घरी ठेवत नाही. बहुधा त्याचं पहिलं लग्न झालेलं असतं. हा झुलवा फार दिवस टिकतोच असं नाही.
तो पुरुष जर मरण पावला किंवा काही काळाने त्याने मदत द्यायची थांबवली, तर त्या बाईला वेश्याव्यवसायाशिवाय पर्याय उरत नाही. झुलवा न लावताही काही वेळा अशा मुलीला एखाद्या प्रतिष्ठित माणसाकडून दिवस गेले तर तो सरळ हात झटकून मोकळा होतो व ‘‘हे मूल माझं कशावरून?,’’ असा सवाल निराधार मुलीला विचारतो. काही वेळा केवळ भंडा-याची शपथ घेऊन, ‘‘मी तुला आयुष्यभर, काही कमी पडून देणार नाही,’’ असं सांगून काम झाल्यावर तिला वा-यावर सोडून दिलं जातं. 
अंधश्रद्धा व गरिबीमुळे देवीच्या नावावर मुलींचा बळी
या अशिक्षित मुलींचा यल्लम्मा व तिच्या भंडा-यावर विश्वास असतो, याचा गैरफायदा असे लोक घेतात. या जोगतिणी दरवर्षी सौंदत्तीला यल्लम्माच्या जत्रेला जात असतात. जत्रेच्या वेळी देवीला नवस केलेल्या भक्तांना लिंब नेसवतात. लिंब नेसणं म्हणजे संपूर्ण अंगाला कडुनिंबाच्या डहाळ्या बांधणं. सौंदत्ती डोंगराच्या पायथ्याशी जोगल गावी सत्यम्माचं देऊळ आहे व तिथे एक पाण्याचं कुंड आहे. या अस्वच्छ कुंडात भाविक अंघोळ करतात. काही नवस बोललेले (यात स्त्रियाही असतात) संपूर्ण अंगभर लिंब नेसून दोन-तीन किलोमीटर अनवाणी पायाने उन्हातून चालत डोंगरावर जातात. काही लोळण घेत नमस्कार घालत जाताना दिसतात. हे पाहिल्यावर अंधश्रद्धा कुठल्या थरापर्यंत जाऊन पोहोचली आहे, हे प्रकर्षानं जाणवतं.
परिसरातल्या लग्नप्रसंगात खेडय़ापाडय़ातून जोगतिणींना पहिला मान असतो. आपल्या ताफ्यासह तोरण घेऊन वाजतगाजत जोगतीण येते. एकीच्या हातात चौंडकं, दुसरीच्या हातात तुणतुणं, तिसरीकडे मंजिरी अशी वाद्यं असतात. वयस्कर जोगतिणीच्या हातात भंडा-याची पिशवी असते. लग्नघराच्या चौकटीला तोरण बांधते. या जोगतिणीला साडी-चोळी व बिदागी घरमालक देतो. यल्लम्माला मुलेही सोडली जातात. मुले सोडण्याचे प्रमाण तुलनेत कमी आहे. कारण ‘धंद्या’च्या दृष्टीने मुलींचा जास्त उपयोग होतो. कधीकधी मुलींनाही शहरात जाऊन धंदा करावा, असं वाटतं. काही जणी शहरात पळून जातात. शिवाय दलालांची नजर अशा मुलींवर असतेच. गावात जोगवा मागून किंवा वेश्याव्यवसाय करूनही पोट भरणं अशक्य असतं. त्यामुळे त्यांचा ओढा शहराकडे असणं स्वाभाविक आहे.
काही दलाल हे जत्रेच्या वेळी येऊन मुलगी हेरून ठेवतात. तिच्या पालकांना अनेक प्रलोभनं दाखवून तिला आपल्या ताब्यात घेतात. मुलीचे आई-वडील हे गरीब व मागासलेले असल्यामुळे नाईलाजानं व हिच्यामुळे दोन घास आपल्याला खाता येतील, या विचाराने हा सौदा करायला तयार होतात. अशा मुली मुंबई, मद्रास, पुणे, कोलकाता, बंगलोर अशा शहरातून वेश्याव्यवसायात ढकलल्या जातात. अंधश्रद्धा व गरिबीमुळे देवीच्या नावावर मुलींचा असा बळी दिला जातो. आजही महाराष्ट्राच्या सर्व भागात देवदासी आणि जोगते आढळतात.
(संदर्भ - sameerbapu.blogspot.com)






