- अभिजीत तांगडे
छत्रपती शिवरायांचे व्यक्तिचित्र बहुजन हिताच्या नजरेतून उभे करून त्यांच्यातील आद्य समाजसुधारकाची, धर्मनिरपेक्षतेची आजवर फार बाहेर येऊ न शकलेली लखलखित बाजू ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकातून मांडणार्या निर्माता, दिग्दर्शक व कलावंतांना राज्यभरातील रसिकांनी काही वर्षांपूर्वी प्रचंड दाद दिली होती. त्याच्या बळावरच आजवर या नाटकाचे तब्बल 800 प्रयोग झाले होते.
आता हे बहूचर्चित नाटक नव्या रंगात, नव्या ढंगात त्याच कलाकारांना घेऊन पुन्हा एकदा रंगभूमीवर दाखल झाले आहे. अद्वैत थिएटर प्रकाशित, रंगमळा प्रस्तुत आणि विद्रोही शाहीरी जलसाच्या सहकार्याने होणाऱ्या ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ नाटकाचे पुन्हा एकदा हाऊसफुल्ल प्रयोग सुरू झाले आहेत. सध्याची परिस्थिती पाहता छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर करण्याची अत्यंत आवश्यकता आहे, हेच जाणून नाटकाचे प्रयोग पुन्हा सुरू केले आहेत.
याच पार्श्वभूमीवर ‘बाईमाणूस’ने ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाचा जन्म कसा झाला यावर लेखक राजकुमार तांगडे यांना बोलते केले.
‘या नाटकाचे प्रयोग आता प्रेक्षकच घडवून आणतील! - डॉ. श्रीराम लागू
नाटककार राजकुमार तांगडे सांगतात, आजपर्यंत महापुरूषांच्या चरित्रावर आधारलेली अनेक नाटकं महाराष्ट्रानं पाहिली. हे नाटक मात्र आम्ही चरित्रापेक्षा विचारावर आधारित करण्यावर भर दिला. आणि लोकांनीही त्याला भरभरून प्रतिसादही दिला. अगदी आमच्या कल्पनेच्याही पलिकडे. म्हणूनच आज इतक्या वर्षांनंतरही हे नाटक अनेक अर्थाने ‘जिवंत’ आहे. या कलाकृतीबरोबरच आमचीही उंची वाढली. खरंतर एखाद्या नाटकाचे आठशेपेक्षा जास्त प्रयोग होणे ही रंगभूमीसाठी मोठी गौरवाची गोष्ट आहे.
कुठल्याही नाटकातील कलाकारांना तर नाटकाच्या पहिल्या-दुसऱ्याच प्रयोगाला लोक ‘अजून नवीन काय?’ असं सहजपणे विचारतात. जसं आई न्याहारी वाढतानाच तिला आपण ‘दुपारी खायला काय करणार?’ विचारतो. पण या नाटकाच्या बाबतीत मात्र वेगळंच घडलं. प्रेक्षकांनी प्रश्न विचारले, पण काय, तर परत कुठे शो असेल तर कळवा, आम्हाला आमच्या कुटूंबाला दाखवायचय.. मित्रांना दाखवायचंय. लोकांनी दोन-चार वेळाच नाहीतर चक्क तीस-चाळीस वेळा नाटक पाहिल्याचं सांगितलं. असं काही ऐकलं, की आम्हाला जेष्ठ रंगकर्मी डॉ.श्रीराम लागू यांचे शब्द आठवतात, ‘या नाटकाचे प्रयोग आता प्रेक्षकच घडवून आणतील!’ आम्ही भविष्यवाणी मानत नाही. म्हणून तो ‘जाणत्याचा अंदाज’ म्हणू. आणि छत्रपती शिवराय आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची समाजाला वाटणारी गरज प्रेक्षकांना खेचून आणते म्हणूया.
सर्व कलाकार शेतकरी
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आणि यासारख्या सर्व महामानवांच्या विचारात समाजाला एकत्र बांधू शकणारी एक चौकट देण्याची क्षमता आहे. हे आपले पूर्वज आहेत. आपल्या पूर्वजांच्या इतिहासाचं विद्रुपीकरण, विचारांचं विकृतीकरण होणार नाही याची काळजी आपणच, म्हणजे त्यांच्या विचाराच्या वारसदारांनी घ्यायला हवी. तरच तो इतिहास आपल्या समाजाचा वर्तमान प्रकाशमान करेल. आम्ही सर्व टीममधले लोक परंपरागत शेतकरी असल्याने शिवरायांच्या विचाराचे थेट वारस लागतो.
छत्रपती शिवराय म्हणजे शेतकऱ्यांचा, दिन-दलितांचा, सर्वधर्मीयांचा राजा. पण काही दांभिक राजकीय, धर्मांध लोकांनी शिवरायांचा विचार जाणीवपूर्वक मोडतोड करून, आपल्या सोईने सांगून समाजाचे धृवीकरण केले. पुढे यातून समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न झाले. अजूनही त्याच्या झळा सोसाव्या लागतात. दंगलीचे मास्टर-माईंड सोईस्कर या महापुरूषांच्या नावाचा वापर करून जनभावना भडकावत आपल्या पोळ्या भाजतात. त्यासाठी महापुरूषाच्या नावाचा तेलासारखा वापर करतात. समाजाचं सरपण बनवतात. या कटाला खीळ घालण्यासाठीच ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भिमनगर मोहल्ला’ या नाटकाची निर्मिती करण्यात आली, असे राजकुमार तांगडे यांनी सांगितले.
संबंधित लेख वाचा: शिवाजी कोण होता? असं काय आहे या पुस्तकात की, शहीद पानसरेंवर थेट गोळ्या झाडण्यात आल्या…? |
या नाटकाची सुरुवात कशी झाली याची कहाणी सांगताना तांगडे म्हणतात की, हे नाटक करण्यापूर्वी ‘रंगमळा’ ही जालन्यातल्या शेतकऱ्यांची अलिखीत संस्था शेती-मातीचे प्रश्न घेऊन रंगभूमीवर धडपडत होती. तेव्हाच लोकशाहीत दीन-दलित-कष्टकऱ्यांचा आवाज बनलेले लोकशाहीर संभाजी भगत महाऱाष्ट्र पिंजून काढत होते. उमदा अभिनेता कैलास वाघमारे हा आमच्या कुटूंबाचा सदस्य. त्याने आमची संभाजी सरांशी भेट करवली. संभाजी भगत सरांनाही त्याच काळात ‘राजे शिवाजी यांच्यावर एक जलसा उभारला पाहिजे’ असं आतून वाटत होतं! मग संभाजी भगतांच्या या संकल्पनेला नाटकात बांधण्याचे काम मी केले.
एरवी एखादा लेखक नाटक लिहितो आणि नंतर कलाकारांचा शोध घेतला जातो. पण या नाटकात अगदी सर्वच्या सर्व कलाकार हे नाटक लिहायला घेण्याअगोदरच बरोबर होते. त्यामुळे एक प्रकारे कलाकारांचं शिबिरही समांतरपणे होत होतं. अचूक तपशील आणि विज्ञाननिष्ठ लिखाणासाठी काही जाणते तज्ञ आणि पुस्तकांची गरज होती. ती अभ्यासक चंद्रशेखर शिखरे, श्रीमंत कोकाटे, प्रदीप सोळंके यांनी भरून काढली. शहीद कॉ. गोविंद पानसरे, कॉ.शरद पाटील यांच्या विचाराची शिदोरी पण सतत गाठीशी होतीच.
नाटक हे केवळ करमणुकीचं साधन नाही. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत ते समाजप्रबोधनाचंही फार मोठं माध्यम आहे. फॉर्म वेगवेगळे असले, तरी प्रत्येक कलाकृती आपल्या ठायी काही वेगळी विचारमूल्ये घेऊन येत असते.‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाची टीम ही सामाजिक चाड असलेली कलावंत मंडळी आहेत. पुण्यामुंबईच्या कुठल्याही नाट्यशास्त्राच्या शाळेत न शिकलेल्या जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मुलांना थेट बांधावरून रंगमंचावर घेऊन येताना या मुलांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची महान विचारसरणी या महाराष्ट्रापुढे नव्यानं मांडणं ही खरोखरच काळाची गरज होती, हे ‘शिवाजी अंडरग्राऊंड’ च्या आजवरच्या असंख्य प्रयोगातून, खेड्यापाड्यातून बहुजनांकडून मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादातून सिद्ध झालंय. 
‘अंडरग्राउंड’ सेनापतींचे सांस्कृतिक (मो)हल्ले.! - दत्ता पाटील
आघाडीचे नाटककार आणि लेखक दत्ता पाटील ‘बाईमाणूस’ शी बोलताना म्हणतात की, ‘शिवाजी अंडरग्राऊंड’ हे लोकनाट्य आहे. शाहिरी जलशातून साकारलेलं पारंपरिक विचारनाट्य आहे. लोकपरंपरांपासून, लोककलांपासून दूर गेलेल्या विशिष्ट नागरी समूहाला गावाकडची इरसाल भाषा, मौखिक परंपरेतून चालत आलेलं ज्ञान, त्यातील उपरोध, भाषासौंदर्य, याचा फारसा गंधही नाही. जे काही माहित असेल, ते ग्रंथातून किंवा अन्य माध्यमातून. लोकपरंपरेच्या बाजातील हे नाटकं ऐतिहासिक थोर पुरूषांचं ‘दैवत्वा’चं पौराणिक आवरण बाजूला सारत त्यांच्यातील लखलखीत विचार सौंदर्याचं या महाराष्ट्राला दर्शन घडविणारं आहे. भ्रामक कल्पनाविलासात रमलेल्यांच्या डोळ्यात अंजन घालणारं आहे.
‘’राम असो, कृष्ण असो, बुद्ध असो, संत तुकाराम असो, संत ज्ञानेश्र्वर असो, छत्रपती शिवाजी महाराज असोत, महात्मा फुले असोत, की डॉ. बाबासाहेब आंबेडकर असोत… प्रत्येक विभूतींना ‘पुराण’ कथांमध्ये बंदिस्त करताना त्यांच्यावरच्या संशोधनाच्या वाटाही बंद करण्याचे जाणिवपूर्वक प्रयत्न केले गेले. दैवत्वाचं आवरण देवून त्यांच्या सामाजिक क्रांतीची, विचारांची चळवळही चातुर्यानं बाजूला सारली गेली. इतिहास हा पौराणिक कथांच्या मनोरंजक, अद्भूत वलयातून शिकण्याची सवय असलेल्या बहुजन समाजाला त्या दैवी भाबडेपणातून बाहेर काढू पहाण्याचे प्रयत्न हे प्रतिगामीत्वाच्या आजवरच्या सत्तेला सुरूंग लावणारे असतात. म्हणूनच असे प्रयत्न उधळून लावण्याचे प्रकार घडत आले आहेत. शतकानुशतकं असलेली ही ‘दैवी’ सत्ता संपण्याच्या भीतीतूनच हे हल्ले होतात. पुण्यामुंबईपुरतं मर्यादित असलेलं नाटक आज शेतकरी, कष्टकऱ्यांच्या मुलांपर्यंत पोहोचलय. हा त्यांचा हुंकार आहे. त्यांचा आवाज आहे. त्यांचा विचार आहे. खूप काळानंतर बोलते झालेयत ते. तेही अभ्यास करूनच.’’
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ठायी असलेला बहुजन हिताचा ठाम विचार सर्वसामान्यांपर्यंत फार पोहोचलेलाच नाही. ऐतिहासिक व्यक्तिचित्र गोष्टीरूपातील धड्याच्या माध्यमातून फक्त शिकवलं गेलं. शूर, बुद्धीमान राजाच्या फक्त युद्धाच्याच गोष्टी सांगितल्या गेल्या. परिणामी शिवरायांचा आदर्श राखणं म्हणजे जातीचा, धर्माचा अहंकार बाळगत हाती तलवारी घेऊन आक्रमक, हिंसक तरूणांच्या फळ्या उभ्या करणं, असा समज गेल्या काही दशकात पसरत गेला.
क्रांतीकारक विचार आणि तत्वांची तितकीच ताकदीची बैठक असा अतिशय दुर्मिळ मिलाफ असलेलं छत्रपतींचं व्यक्तिमत्व आजवर काही अपवाद वगळता एकांगीच चितारलं गेलं. राजे हे सर्वसामान्यांचे, बहुजनांचे कैवारी होते, या वाक्यापलिकडे फारसं पोहोचू दिलं गेलं नाही. महाराजांची सर्वसमावेशकता आणि धर्मनिरपेक्षता बाहेर आली, तर बहुजनांवरील आजवरची पकड सैल होईल की काय अशीच भीती ‘कथित सत्तेला’ वाटत आलीये. महाराजांची आद्य समाजसुधारकाची, धर्मनिरपेक्षतेची आजवर फार बाहेर येऊ न शकलेली लखलखीत बाजू ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाच्या माध्यमातून जगापुढे आणणाऱ्या निर्मात्याला, दिग्दर्शकाला, कलावंतांना साऱ्या महाराष्ट्रानं गेल्या दोन वर्षापासून प्रचंड दाद दिली आहे, असेही दत्ता पाटील सांगतात.
‘’या नाटकानं गाडलं गेलेलं सत्य बाहेर काढलं’’
ज्येष्ठ लेखक राजा शिरगुप्पे यांनी ‘साधना’मध्ये या नाटकची सविस्तर मांडणी केली आहे. आपल्या लेखात शिरगुप्पे म्हणतात,’’ या नाटकाच्या नावातच तीन अस्मिता आहेत. छ. शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मोहम्मद पैगंबर. खरं तर या तीनही महामानवांचं चरित्र आणि चलन पूर्णपणे ‘माणूसकेंद्री’ आहे. तळागाळातल्या माणसासहित एकूण मानवजातीच्या उत्थानाचं स्वप्न या थोरांनी पाहिलं. कृती केली. आयुष्य वेचलं. ते तीन आदर्श प्रस्थापितांनी माणसं मारायचे मंत्र केले. प्रत्येक जातीनं, धर्मानं यांना आपल्या कब्जात घेऊन आपापल्या समूहांना आक्रमक बनवण्याचं कर्म केलं.
या देशात उच्चजातीयांचा अवास्तव मुजोर अहंकार, दलित जातींची दडपले गेल्याची वास्तव भावना आणि अल्पसंख्याकांची असुरक्षिततेच्या वास्तव अनुभवांनी झालेली सावध आणि संशयी वृत्ती या तिहेरी पेचात इथली सामान्य जनता अडकली आहे. ही सामान्य जनता म्हणजे स्त्रिया, दलित, भटके विमुक्त, शेतकरी, कामगार. थोडक्यात घाम गाळणारी कष्टकरी जनता. शिवराय, डॉ. आंबेडकर आणि म.पैगंबर ही खरं तर या शोषित जनतेचीच मुक्तीकडे पुढारण्यासाठी आदर्श अशी प्रेरणास्थानं आहेत. या तिघांचं जीवितकार्य याच वर्गांच्या उत्थानासाठी झालेलं आहे. पण व्यवस्थेनं आधीच केलेली जातिधर्माची अमानुष रचना, त्याला दिलेलं जन्माचं अधिष्ठान या तिघांच्या विभाजनासाठी इथल्या सत्ताधारी व्यवस्थेला छानच उपयोगी पडलं आहे.
या पार्श्वभूमीवर नाटकाच्या नावापासूनच एका झाकोळून टाकलेल्या सत्याला उजागर करत नाटकाचे निर्माते प्रस्थापित व्यवस्थेला तडे पाडायला सुरुवात करतात. या शीर्षकातून या तीनही महामानवांच्या एकत्वाची जाणीव करून देतानाच भाषेचीही मोडतोड करत प्रस्थापितांच्या भाषिक शोषणाविरुद्ध बंडखोरी करतात. छ. शिवाजी महाराजांवरचं नाटक म्हटलं की ते पल्लेदार, संस्कृतप्रचुर बऱ्याच वेळा अनाकलनीय असणाऱ्या त्यामुळे वजनदार वाटणाऱ्या भाषिक विभ्रांनीच, तेही अभिजनांच्या प्रमाण मराठीत असलं पाहिजे.
त्याहीपेक्षा थोर गोष्ट ही आहे की प्रस्थापितांनी उभा केलेला ‘खोटा’ शिवाजी पाहताना ‘खरा’ शिवाजी आता नेमका कुठे आहे याचा थेट इशारा. ज्यांच्या विरोधात आपला ‘खोटा’ शिवाजी हे प्रस्थापित वापरताहेत, त्यांच्यात वस्तीत हा ‘खरा’ शिवाजी भूमिगत आहे. या घोषणेने प्रस्थापितांच्या पायाखाली सुरुंग पेरणी, म्यान पाहूनच तलवारीच्या धारीचा अंदाज यावा असंच काहीसं हे शीर्षक. 
नाटकाच्या नावातच तीन अस्मिता…. शिवाजी महाराज, आंबेडकर आणि पैगंबर
हे ‘नाटक’ क्रांतिकारी आहे, कारण या नाटकाने साऱ्याच पारंपरिकतेच्या कड्या तोडल्या आहेत. या नाटकानं गाडलं गेलेलं सत्य जसं बाहेर काढलं आहे, तसंच भविष्यातलं आपण पाहत असलेल्या आदर्श समाजाचं प्रारूपही समोर ठेवलं आहे. त्यासाठी काय करायला हवं हेही सांगितलं आहे. प्रस्थापित व्यवस्थेच्या गोंधळ्याला आव्हान देत नव्या जगाचं स्वप्न पाहणारा गोंधळी सत्य सांगायची हिंमत दाखवत ‘फॅन्टसी’च्या अंगानं नाटकाला सुरुवात करतो. पाहायला आलेला प्रेक्षक शाळेत शिकवल्या जाणाऱ्या इतिहासातून आपली प्राथमिक समज घेऊन आलेला असतो. वर्तमानातले राजकारणी त्याच्या या प्राथमिक समजेनं बाळबोधपण सांभाळत आपली सत्तेची पोळी भाजताहेत.
अशा वेळी निव्वळ करमणूक करून घेण्याच्या इच्छेने आलेल्या प्रेक्षकाला केवळ दोन अडीच तासांच्या सादरीकरणात एकूण भवतालचं नेमकं भान आणून त्याच्या जाणिवा समृद्ध करण्याचं महान कार्य संपन्न होतं. दोन गोंधळ्यांच्या नमनात्मक संवादातून सुरू होणारं नाटक ‘फॅण्टसी’च्या तारेवरून तोल सांभाळत इतिहास आणि वर्तानात इतक्या सहजपणे आंदोलित होतं. सत्य आणि सत्यच सांगण्याची हिंमत करत प्रेक्षकाला नाटकाचा पडदा पडण्याच्या वर्तान क्षणापर्यंत आणून उभं करतं. शिवरायांप्रती असलेली इथल्या आम माणसांची अस्मिता प्रस्थापित शक्तींनी माणूसवजा करून आपल्या हितसंबंधकेंद्री बनवलीय. त्याचे तुकडेतुकडे करत ही अस्मिता पुनश्च एकवार ‘माणूसकेंद्री’ करण्याचं कलेचं सर्वश्रेष्ठ कार्य हे नाटक पार पाडतं.
एवढं एकच जरी सांगितलं तरी या नाटकाचं महानपण लक्षात येतं. म्हणूनच या नाटकातले कलाकार केवळ अभिनय करत नाहीत, अक्षरशः जगतात. आपण एक युद्ध आरंभलंय या सार्थ जाणिवेने ते हे युद्ध प्राणपणाने लढतात. त्यामुळे त्यांच्या नाटकाचा प्रयोग हा सर्वच अर्थांनी पहिला, ताजा आणि निर्णायक हेतूने ते सादर करत असावेत. रक्तविहीन चाललेलं हे युद्ध अंतिमतः आपल्याला जिंकायलाच हवं- मानव जातीच्या कल्याणासाठी, ही समर्पणाची भावना त्यांच्या संवादांतून, शारीर हालचालीतून काठोकाठ भरलेली असते.
हे सर्वच कलाकार आणि या नाटकाशी संबंधित सर्वच घटक ज्या वंचितांच्या सामाजिक स्तरातून आलेले आहेत, त्यांच्यासाठी कुठलीही कृती ही समाज बदलासाठीच असते. त्यामुळे त्यांच्या समर्पणाचं लहान मोठेपण ठरवण्याचा प्रस्थापितांचा नतद्रष्टपणा करणं मला तर शक्यच नाही, तो अधिकारही मला नाही. पण हेही तितकंच खरं की अभिनय, गायन, नृत्य कुणाची मिरासदारी वा ‘दैवी’ देणगी नाही. ती तुमच्या गरजेची आणि निष्ठेची निष्पत्ती आहे हेच ही सर्व कलाकार मंडळी अगदी निर्णायकपणे ठसवत जातात.






