- अप्सरा आगा
बहरीनमध्ये झालेल्या तिसऱ्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत 17 वर्षीय सनी फुलमाळीने कुस्तीमध्ये सुवर्णपदक जिंकून भारताचं नाव उज्ज्वल केलं आहे. पत्र्याच्या शेडखाली वाढलेला, चिखलमय जमिनीवर घाम गाळणारा भटक्या समाजातला सनी फुलमाळी आज भारताचा अभिमान ठरला आहे. आशियाई युवा कुस्ती स्पर्धेत पदक जिंकून या मातीतल्या मुलाने देशाचं नाव उजळवलं आहे. संघर्ष आणि मेहनतीच्या वाळवंटातून वाट काढत सनीने सिद्ध केलं की स्वप्नांना आधार लागतो तो फक्त जिद्दीचा आणि आत्मविश्वासाचा. त्याचं “छपराआडचं स्वप्न” आज आशियाई रंगमंचावर साकार झालं आहे. पण या यशामागे आहे संघर्ष, हालअपेष्टा, भटकंती आणि सनीच्या जिद्दीची गोष्ट.
भटक्या आयुष्यातून आखाड्यापर्यंतचा प्रवास...
सनी हा नंदीवाले समाजातील मुलगा. या समाजाचं आयुष्य म्हणजे सततचं स्थलांतर. जिथे थोडी जागा मिळेल तिथे पाल ठोकायचा आणि दोन-तीन महिने राहायचं. मग पुन्हा मालक येतो, जागा रिकामी करायला सांगतो, आणि पुन्हा भटकंती सुरू. ना स्थिर घर, ना वीज, ना पाणी, ना रोजगार. अशा परिस्थितीत जगणं म्हणजे रोजच्या रोज एक लढाई लढणं. सनीचे आई-वडील, सुभाष आणि गंगू फुलमाळी, घरोघरी जाऊन सुया, दोर, बेंटेक्सचे दागिने विकतात. त्यातून कसाबसा उदरनिर्वाह होतो. सनीला दोन भाऊ आहेत, आणि तिघेही कुस्ती खेळतात. कधी पोटभर अन्न नाही, कधी पावसात ओले कपडे सुकवायला जागा नाही, पण या सगळ्यांवर मात करत या कुटुंबाने आपलं स्वप्न जपलं, ते म्हणजे “कुस्ती”. 
आजोबांकडून मिळाला कुस्तीचा वारसा…
सनीच्या घरात कुस्ती ही फक्त खेळ नाही, तर परंपरा आहे. त्याचे आजोबा गावोगावी होणाऱ्या यात्रांमध्ये, जत्रांमध्ये कुस्ती लढायचे. त्यांचं आयुष्य मातीच्या आखाड्यात गेलं, पण त्यांनी कधी मॅटवर खेळ पाहिला नाही. पुढे सनीचे वडील सुभाषही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून कुस्ती खेळू लागले. पण आर्थिक परिस्थितीमुळे त्यांचं स्वप्न अधुरंच राहिलं.त्याच स्वप्नाची गाठ आज सनीने पकडून तो दूरपर्यंत पोहचला आहे.
पालाखाली तालीम ते आंतरराष्ट्रीय मंचावरचा विजय...
सनीच्या वडिलांनी स्वतःची परिस्थिती ओळखली. मुलांना तालमीत पाठवणं, चांगल्या प्रशिक्षकांकडून सराव करवणं, हे त्यांच्यासाठी स्वप्नवत होतं. म्हणून त्यांनी जिथे पाल टाकली असेल, तिथेच मोकळ्या जागेत मातीचा आखाडा करून मुलांना कुस्ती शिकवायला सुरुवात केली. सुभाष सांगतात, “आम्ही रानातच मुलांची तालमी घेत होतो. रोज सकाळी उठून त्यांना मातीवर सराव करायला लावत होतो. हळूहळू सनी तयार व्हायला लागला, त्याच्यामध्ये खेळातली ताकद आणि झुंजारपणा दिसू लागला.” सनीची कुस्ती पाहून लोहगावातील एका वस्तादांचं लक्ष त्याच्याकडे गेलं. त्यांनी सनीला आपल्या तालमीत बोलावलं आणि पुढे स्वतःच्या देखरेखीखाली घेतलं. सनीच्या खान-पिण्यापासून शिक्षणापर्यंत सगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी घेतल्या. आणि याच काळात सनीचा खेळ खऱ्या अर्थाने बहरला.
संबंधित लेख वाचा : कुस्त्यांच्या आखाड्यांचा एकच ‘आवाज’… शंकर अण्णा पुजारी |
"आमचं आयुष्य मातीमध्ये गेलं पण मुलानं नाव कमावलं.."
सनीची आई गंगू भावूक होत सांगतात, “माझा मुलगा एवढा मोठा झालाय, देशासाठी खेळतोय. आमच्याकडे काही नव्हतं, पण त्याचं मन मोठं आहे. त्याने मेहनत करून दाखवली. त्याचा आम्हाला अभिमान आहे.” सनीचे वडील म्हणतात, “आम्ही समाजाचे भटके लोक. आम्हाला गावात घर नाही, जमीन नाही, पण आज सनीने देशात नाव केलं. आमचं आयुष्य जरी मातीमध्ये गेलं, तरी मुलाचं नाव उजळलं, हेच मोठं समाधान आहे.”
भटक्या समाजाचा आरसा...
भटक्या विमुक्त समाजाला आजही घर नाही, ओळखपत्र नाही, जमीन नाही. शासनाच्या योजनांपासून हा समाज दूरच राहतो. पावसाळ्यात पत्र्याखाली थेंब गळतात, उन्हाळ्यात गरमीने श्वास घ्यायला त्रास होतो. पण तरीही हे लोक जिद्दीने जगतात. सनीसारख्या मुलांनी या समाजाला आशेची किरण दाखवली आहे. एकेकाळी ज्यांच्याकडे खेळाचे बूटसुद्धा नव्हते, तो आज आशियाई स्तरावर देशासाठी खेळतो आहे.
आशियाई युवा कुस्ती स्पर्धेतील यश...
कठोर सराव, चिकाटी आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर सनीने आशियाई युवा कुस्ती स्पर्धेत पदक पटकावलं. हा केवळ एक वैयक्तिक विजय नाही, तर हजारो भटक्या समाजातील मुलांसाठी प्रेरणेचं प्रतीक आहे. सनीने सिद्ध केलं की प्रतिभेला जात, पंथ, संपत्ती यांची मर्यादा नसते. सनीच्या यशाने केवळ त्याचं कुटुंबच नाही, तर संपूर्ण समाज आनंदित झाला. त्याच्या वस्तादांनी सांगितलं, “सनी मातीतला मुलगा आहे. त्याच्यात जिद्द आहे. परिस्थितीशी लढायची सवयच त्याला बळ देत गेली.”
'छपराआडचं स्वप्न’ साकार झालं..
सनीचा प्रवास म्हणजे "छपराआडचं स्वप्न" साकार झाल्याची जिवंत कहाणी. जिथे अनेक स्वप्नं गरिबीने कोमजतात, तिथे या मुलाने परिस्थितीवर मात करून आपल्या घामाने नाव कोरलं. सनी सांगतो, “माझं आयुष्य सोपं नव्हतं. पण मी नेहमी विचार केला. माझ्या पालकांनी जसा संघर्ष केला, तसं मी हार मानायची नाही. देशासाठी खेळायचं, हेच माझं स्वप्न आहे.”
आशियाई विजयानंतर सनीची नजर आता ऑलिंपिकवर…
सनी आता आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं प्रतिनिधित्व करायचं स्वप्न बाळगतोय. त्याला ऑलिंपिकसाठीही तयारी करायची आहे. पण त्याच्यासाठी आर्थिक मदत, योग्य प्रशिक्षण आणि शासनाचं प्रोत्साहन आवश्यक आहे. सनीच्या यशातून अनेकांना दिशा मिळेल, हे निश्चित. पत्र्याच्या शेडखाली जन्मलेलं स्वप्न आज आशियाई पातळीवर झळकत आहे. सनी फुलमाळीच्या नावाने आज देशभरात अभिमानाचं वातावरण आहे. तो फक्त कुस्तीपटू नाही, तर संघर्षातून उभा राहिलेला प्रेरणादायी योद्धा आहे.






