- सागरिका किस्सू
ही कथा आहे काश्मीरमधील त्या मुस्लीमांची, ज्यांना त्यांच्या स्वतःच्याच धर्मात, त्यांच्या स्वतःच्याच मातीत परकं ठरवलं गेलं. ज्या भूमीवर एकेकाळी त्यांनी स्वातंत्र्याच्या कल्पनांसाठी पाकिस्तानचा विचार केला, तिथेच आज ते कट्टरतेच्या सावलीखाली, आपल्या अस्तित्वासाठी झगडत आहेत.
मोहम्मद आपल्या सायकलवरून कॉलेजहून घरी परतत होते. रस्त्याने जाताना कुणीतरी जोरात ओरडलं, “मिर्झई आव!”... म्हणजे “तो मिर्झाई आला!” आणि काही क्षणातच त्यांच्या पाठीत दोन लाठ्यांचे घाव बसले. त्या लाठ्यांभोवती काटेरी तार गुंडाळलेली होती. काहीही न बोलता मोहम्मद सायकल सोडून धावत सुटले.
मोहम्मद गुन्हा काय होता? फक्त एकच… तो अहमदिया मुसलमान होते.
आज 27 वर्षांचे मोहम्मद, श्रीनगरपासून 40 किलोमीटर दूर असलेल्या एका कॉलेजमध्ये प्रोफेसर आहेत. आपली खरी ओळख त्यांनी लपवली आहे. कॉलेजमध्ये इतर लोकांच्या नजरेत मोहम्मद एक ‘सुन्नी’ मुस्लमान आहे. कारण इथं आयुष्य वाचवण्यासाठी खोटं बोलावंच लागतं. “ही फक्त सावधगिरी नव्हे, ही सुरक्षिततेची गरज आहे,” असं मोहम्मद सांगतात.
मोहम्मदने ज्या रस्त्यावरून घरी जायचं ठरवलं होतं, तिथे मुख्यतः गैर-अहमदिया लोकं राहतात. त्या घटनेनंतर दोन आठवड्यांपर्यंत ते कॉलेजलाही गेले नाहीत. एक नवीन रस्ता शोधल्यावरच ते पुन्हा घरातून बाहेर पडू लागले.
काश्मीरमध्ये सार्वजनिकरीत्या अहमदिया मुस्लिम असण्याची मोठी किंमत चुकवावी लागत आहे. भारतात त्यांच्या मुस्लीम असण्याला सरकारी मान्यता आहे, मात्र, त्याच भारताच्या काश्मीरमध्ये, त्यांचं बहिष्कृत आयुष्य सुरू होतं. दुकानदार त्यांना हुसकावतात, शाळा त्यांना प्रवेश नाकारतात आणि लोक त्यांना “कादियानी” किंवा “मिर्झई” म्हणत सतत अपमान करतात.
श्रीनगरच्या एका मिश्र वस्तीत राहणारी नूर ही 12 वर्षांची मुलगीही अशाच भीतीच्या सावलीत वाढते आहे. तिची सगळ्यात जवळची मैत्रीण सुन्नी मुस्लीम आहे. “ती समजते की मी सुन्नी आहे,” नूर सांगते. “आणि मी तिला तसं समजण्यापासून परावृत्त करत नाही.”
ईदच्या दुसऱ्या दिवशी त्या दोघींनी व्हिडीओ कॉलवर नवीन कपडे दाखवत हास्यविनोद केला. पण नूरच्या मनात एकच भीती आहे, “तिला जर खरं समजलं तर ती माझ्याशी बोलणंच थांबवेल का?”
नूर दररोज दीड तास प्रवास करून शाळेत जाते. तिच्या घराजवळच्या शाळांमध्ये ती जाऊ शकत नाही, कारण लोकांना तिची खरी ओळख माहिती आहे. तिच्या भावाने 2019 मध्ये त्याची अहमदिया मुस्लिम असल्याची खरी ओळख काही मित्रांना सांगितली, आणि ते लगेच त्याच्यापासून दूर झाले. सहा वर्षांनंतरही त्याच्या जखमा अजूनही भरलेल्या नाहीत.
नूरच्या घरात, त्यांचे आजोबा सगळ्यांना गोळा करतात आणि सल्ला देतात, “आपली ओळख लपवा, पण जर समजलं तर, फक्त ‘सब्र’ करा. आपण गुन्हेगार नाही, आपण फक्त वेगळे आहोत. सब्र म्हणजेच आपलं कवच आहे.”
“काय करत होतात तुम्ही त्या ‘काफिर’ लोकांच्या मस्जिदमध्ये?”
काश्मीरमध्ये अहमदिया समुदायाची वस्ती फारशी मोठी नाही. त्यांची अंदाजे संख्या 15 हजारच्या आसपास असावी. बहुतांशजण छोट्या वस्तीत किंवा एकटेदुकटे राहतात, मिश्र वस्तीत राहणारे अहमदिया लोक आपली ओळख लपवतात. त्यांनी आपली स्वतंत्र व्यवस्था निर्माण केली आहे. स्वतःची शाळा, मस्जिद, दुकानं. त्यांच्या इमारतींच्या आतील भिंतींवर ‘सर्वांसाठी प्रेम, कोणावरही द्वेष नाही’ असा संदेश लिहिला असतो, पण तो संदेश फक्त भिंतींपर्यंतच मर्यादित असतो.
बहुतेक अहमदिया हे सुन्नी असल्याचा भास निर्माण करून शाळा, कार्यालयं, विद्यापीठं या ठिकाणी सहभागी होतात. परंतु त्यांच्या आयुष्यातला हा ‘सहभाग’ फक्त मुखवटा असतो. श्रीनगरमधील इस्फहाकने त्याच्या दोन मुलांना ज्यांची वयं अनुक्रमे 11 आणि 15 आहेत त्यांना शाळेतून काढलं.
कारण इतर विद्यार्थ्यांनी त्याच्या मुलांना अहमदिया मस्जिदमध्ये जाताना पाहिलं होतं. “काय करत होतात तुम्ही त्या ‘काफिर’ मस्जिदमध्ये?” असं इतर विद्यार्थ्यींनी जेव्हा विचारलं तेव्हा घाबरून इस्फहाकने मुलांचे दाखले शाळेतून काढून घेतले. त्यादरम्यान सबंध शाळाच त्या निरागस मुलांशी विचित्र वागू लागली होती.
आता इस्फहाकची मुलं एका अशा शाळेत जातात, जिथे मुख्याध्यापक हिंदू आहेत आणि अहमदियांच्या धार्मिक ओळखीबाबत कुठलाही भेदभाव ही शाळा करत नाहीत.
श्रीनगरमध्ये एका रुंद गल्लीत अहमदिया मस्जिद, शाळा आणि 30 घरं आहेत. या वस्तीतील दुकानं देखील फक्त त्यांच्यासाठीच आहेत. ही व्यवस्था आठ वर्षांपूर्वी सुरु झाली, जेव्हा एका छोट्या अहमदिया मुलाला गैर-अहमदिया दुकानातून चिप्स घेण्यापासून हाकलण्यात आलं. यानंतर त्या परिसरात गैर-अहमदिया लोकांनी सरकारी अधिकाऱ्यांकडे जाऊन वेगळ्या राशनकार्डांची मागणी केली. तेव्हापासून या समुदायाने ‘स्वतंत्र पण तरीही वेगळं’ असं आयुष्य स्वीकारलं.
एक 60 वर्षांचे अहमदिया मौलवी म्हणतात, “आम्हाला मुसलमानांनी तशीच वागणूक दिलीय, जशी उच्चवर्णीय हिंदूंनी दलितांना दिली. आम्ही रस्त्यावरून चाललो तर काही लोक आमच्याकडे पाहून थुंकतात.”
कट्टरतेचा उदय आणि अहमदियांचा इतिहास: पाकिस्तानपासून काश्मीरपर्यंत
काश्मीरमधील अहमदिया समाज आपली देशभक्ती सतत सिद्ध करत असतो. ते ठामपणे सांगतात की त्यांनी कधीही काश्मीरच्या स्वातंत्र्याच्या चळवळीला पाठिंबा दिला नाही आणि त्यांच्या समाजातील एकही तरुण दहशतवादाच्या वाटेवर गेला नाही. अगदी 1990 च्या दशकात काश्मीरमधील हिंसाचार शिगेला पोहचलेला असतानाही.
परंतु अहमदिया मुस्लिमांच्या इतिहासाला एक काळी बाजूदेखील आहे. त्यांनी कधी काळी पाकिस्तानच्या निर्मितीत महत्वाची भूमिका बजावली होती. पाकिस्तानाच्या निर्मितीत अहमदियांचा मोठा वाटा होता. त्यावेळी पाकिस्तान त्यांच्यासाठी एक वचनबद्ध देश होता. मिर्झा गुलाम अहमद यांचे अनुयायी म्हणून, त्यांनी त्या नव्या राष्ट्रात मोठी आशा ठेवली होती.
पण नंतर त्याच देशाने त्यांच्यावर ‘गैर-मुस्लिम’ ठपका लावला, सार्वजनिक नमाजावर बंदी घातली आणि त्यांच्या धार्मिक ओळखीला गुन्हा ठरवलं. अहमदियांसाठी या विरोधाभासाचं कारण म्हणजे पाकिस्तानची कट्टर विचारसरणी आणि त्यांचा काश्मीरमधील प्रभाव.
1980 च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि 90 च्या दशकाच्या सुरुवातीला काश्मीरमध्ये दहशतवादाची पाळंमुळं खोलवर रुजली आणि त्याच वेळी धार्मिक वातावरणही अधिक कट्टर आणि कठोर होत गेलं. पारंपरिक सूफी पद्धतींना झुगारून देत सलाफी आणि वहाबी प्रवाह बळकट होत गेला. काश्मीर विद्यापीठाच्या एका ज्येष्ठ अभ्यासकाच्या मते, “त्या काळात इस्लाम अधिक कठोर, रूढीवादी झाला. धार्मिक नेतृत्वाने तरुण मनांमध्ये कट्टरतेचे बीज पेरले.”
या परिवर्तनाने अहमदियांच्या अस्तित्वालाच प्रश्न उपस्थित केला. पाकिस्तानप्रमाणेच, काश्मीरमध्येही त्यांना ‘काफिर’ ठरवण्यात आलं. मुख्य धार्मिक प्रवाहांतून त्यांची हकालपट्टी करण्यात आली. जेएनयूच्या एजाज राठर यांनी आपल्या संशोधनात लिहिलंय, “1990 नंतर काही प्रमुख मुफ्तींनी अहमदियांच्या विरोधात उघडपणे बोलणं सुरू केलं. त्यामुळे त्यांच्यावरील बहिष्कार अधिक सखोल झाला.
ते कट्टरपंथी इस्लामीकरणाच्या प्रवाहात भरडले गेले. या दडपशाहीपुढे अहमदियांच्या प्रतिक्रिया अत्यंत संयत राहिल्या. समाजाच्या बाहेर फारसं न बोलता, त्यांनी आपापसात अधिक घट्टपणे एकमेकांचा आधार धरला.’’
काश्मीरमधील अहमदियांचा आजच्या भारतावरचा विश्वास, त्या दाहक अनुभवातूनच घडला आहे. त्यांच्या मते, ज्या देशाने त्यांना नाकारलं, त्याच्याच विरोधात उभं राहणं ही विवेकाची निवड होती.
या संघर्षाने विवाहाच्या संकल्पनाही बदलल्या. समुदाय खूप छोटा असल्याने आणि स्थानिक समाजात बहिष्कृत असल्याने, अनेकांनी आपल्या मुलींचं लग्न पाकिस्तानातील अहमदिया कुटुंबांमध्ये लावून दिलं. मात्र या कुटुंबांपैकी बहुतेकजण ब्रिटन किंवा कॅनडामध्ये स्थायिक झालेले असतात.
शिक्षण, रोजगार आणि धार्मिक संस्थांतील भेदभाव
शिक्षण हे अहमदिया समुदायाच्या जगण्याचं एक महत्त्वाचं साधन आहे. त्यांचं मूलभूत मत आहे की प्रगतीचा, स्वीकृतीचा आणि सुरक्षिततेचा एकमेव मार्ग म्हणजे शिक्षण. पण काश्मीरसारख्या परिस्थितीत शिक्षणसुद्धा समाजाने ठरवलेल्या सीमांच्या आतच बांधलेलं आहे.
श्रीनगरच्या उपनगरात एक छोटीशी अहमदिया शाळा आहे, फक्त 80 विद्यार्थ्यांसाठी. लाल विटांची भिंत, प्रवेशद्वारावर लावलेला हिरव्या रंगाचा फलक: “एक विद्यार्थी, एक शिक्षक, एक पुस्तक, एक पेनही जग बदलू शकते”. भिंतींवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगतसिंग, कल्पना चावला आणि पाकिस्तानचे पहिले नोबेल विजेते अब्दुस सलाम यांचे पोस्टर्स आहेत.
या शाळेत हिंदीसुद्धा शिकवली जाते, जी काश्मीरसारख्या प्रदेशात महत्वाची घटना आहे. शिक्षक सांगतात, “हिंदी ही फक्त एक भाषा आहे, पण ती आमच्या विद्यार्थ्यांना एक व्यापक सामाजिक स्वीकार मिळवून देऊ शकते.”
या शाळेसाठी हिंदी शिक्षक जम्मूपासून खास बोलावले जातात. विद्यार्थ्यांना इतर मुस्लिम पंथांविषयी देखील माहिती दिली जाते. हे सर्व समावेशाच्या दिशेने टाकलेलं एक पाऊल असतं, परंतु फक्त शाळेच्या चौकटीपर्यंतच. कारण बाहेरचं जग वेगळं आहे.
27 वर्षीय मोहम्मद, ज्यांच्याकडे दोन मास्टर्स, पीएचडी आणि नेट पात्रता आहे, ते एका महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. तरीदेखील, जेव्हा त्यांनी J&K विद्यापीठात असिस्टंट प्रोफेसर पदासाठी अर्ज केला, तेव्हा त्यांचं अहमदिया असणं एका अडथळ्यासारखं उभं राहिलं. ते सांगतात, “माझ्या सर्व पात्रता असूनही, फक्त माझ्या पंथाच्या ओळखीमुळे माझं नाव नाकारण्यात आलं.”
|
|
धार्मिक संस्थांमध्येही हेच चित्र आहे. श्रीनगरमध्ये एकच अहमदिया मस्जिद आहे. तिथे जास्त गर्दी होत नाही, पण हीच एक जागा आहे जिथे त्यांना मुक्तपणे प्रार्थना करता येते. इतर सार्वजनिक मस्जिदींमध्ये त्यांना कुठलाही स्वाभाविक हक्क मिळत नाही. मोहम्मद सांगतात, “मी इतर मस्जिदींमध्ये नमाज पढतो, पण मी तिथे एक मुसलमान असूनही स्वतःला परकं वाटतं. माझं मुस्लिम असणं तिथंही अपूर्णच राहतं.”
मोहम्मदचे भाऊ जेव्हा दक्षिण काश्मीरमधील एका मस्जिदीत गेले, तेव्हा त्यांना हुसकावून लावण्यात आलं आणि त्यानंतर त्या मस्जिदीला साबणाने धुतलं गेलं, जणू काही अपवित्र केल्यासारखं.
2012 मध्ये, इकबाल नावाच्या तरुणाला एका गैर-अहमदिया लग्नाचं आमंत्रण मिळालं. तिथे उपस्थित असलेला तो एकमेव अहमदिया मुसलमान.लागल्यामुळे इकबालने पाण्यासाठी एक नळ वापरला. दुसऱ्या दिवशी, गावातील मौलवी आणि काही पुरुष त्या टाकीजवळ आले. त्यांनी त्या टाकीत गवत टाकलं आणि तिचं सार्वजनिकरित्या दहन केलं.
युट्युबवर त्या घटनेचा व्हिडीओ “मिर्जईंच्या वापरानं अपवित्र झालेल्या सिंटेक्स टाकीचा नाश” या शिर्षकासह व्हायरल झाला.
2014 मध्ये, काश्मीरमधील अनेक सुन्नी मौलवींनी असा फतवा दिला की, अहमदिया आणि गैर-अहमदिया यांच्यातील विवाह अवैध आहेत. कट्टर मौलवींनी अहमदियांचे संस्थापक मिर्जा गुलाम अहमद यांना “दज्जाल” (अंतिम खोटारडा) ठरवलं.
त्यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर विषारी प्रचार सुरू झाला. पण याच्या उलट, अहमदिया समाजाचे मौलवी अत्यंत संयमी, राजकीय तटस्थ आणि गोड बोलणारे असतात. त्यांचे शुक्रवारचे भाषण ब्रिटनमध्ये तयार होतं, कादियान मुख्यालयात पाठवलं जातं आणि मग काश्मीरमधील मौलवींना पोहोचवलं जातं…
80 वर्षीय मौलवी म्हणाले, “आम्हाला राजकारणात उतरायचं नाही. कोणत्याही धर्म, समुदाय किंवा व्यक्तीविरोधात आमच्या भाषणात काहीही नसतं आणि हेच आमच्या विश्वासाचं सार आहे.”
अहमदिया समुदायाने त्यांची स्वत:ची अशी एक सामाजिक रचना तयार केली आहे. प्रत्येक गावात एक परिषद प्रमुख असतो, ज्याच्या अधिपत्याखाली युवक, महिला, कायदा, सुव्यवस्था अशा विविध विभागांची मांडणी असते. समाजाच्या समस्या प्रथम याच रचनेद्वारे सोडवल्या जातात. जवळपास ही एक मिनी-गव्हर्नन्स व्यवस्था आहे. युवा विभागप्रमुख सांगतात, “आम्ही पोलिसांकडे जाण्याआधी स्वतः प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न करतो. समाज एकसंघ राहावा म्हणून ही व्यवस्था आवश्यक आहे.”
2014 मध्ये काश्मीरमध्ये आलेल्या महापूराच्या वेळी, गुरदासपूर येथील मुख्यालयातून आलेल्या मदतीचं वितरण अहमदिया स्वयंसेवकांनी केलं. मात्र मोहम्मद सांगतात, “मुश्किलने अर्धा डझन कुटुंबांनी आमच्याकडून मदत घेतली. उरलेल्यांनी दरवाजे बंद केले. त्यांना आमच्याकडून काहीच नको होतं.”
कोण आहेत अहमदिया मुसलमान?
हनफी इस्लामिक कायद्याचं पालन करणाऱ्या समुदायाला 'अहमदिया' म्हटलं जातं. या समुदायाची स्थापना भारतातल्या पंजाबमधल्या कादियानमध्ये मिर्झा गुलाम अहमद यांनी केली होती. मिर्झा गुलाम अहमद, नबी यांचाच अवतार असल्याचं या समुदायाच्या अनुयायींचं म्हणणं आहे. मिर्झा यांनी नवा शरियतचा कायदा मांडला नाही.
पैगंबरांनी सांगितलेल्या शरियतचंच हा समुदाय पालन करतो. पैगंबरांनंतर जगभरात अल्लानं दूत पाठवण्याची परंपरा बंद झाली यावर मुसलमानांच्या बहुतांशी संप्रदायांमध्ये एकमत आहे. पण, अहमदिया समुदायाच्या म्हणण्यानुसार मिर्झा यांना नबीचा दर्जा प्राप्त आहे.
या मुद्यावरून मुसलमानांमध्ये तीव्र मतभेद आहेत. मुसलमानांमधील एक मोठ्ठा वर्ग अहमदिया समुदायाला मुसलमान मानतच नाही. पण, तरीही भारत, पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये या समुदायाच्या अनुयायांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. पाकिस्तानात अधिकृतपणे अहमदिया समुदायाला इस्लाममधून वगळण्यात आलं आहे. त्यांची लोकसंख्या 40 लाखांच्या आसपास आहे. पाकिस्तानातील अल्पसंख्यांकांमध्ये त्यांची संख्या सर्वांत जास्त आहे.
हज यात्रेची परवानगी नाही
जगभरातले लाखो मुसलमान हजयात्रा करायला दरवर्षी सौदी अरेबियाला पोहोचतात.
मक्का शहरातल्या काबा या चौकोनी वास्तूला इस्लाममधली सगळ्यांत पवित्र जागा म्हटलं जातं. ही प्राचीन जागा मुस्लीम धर्मीयांसाठी फार महत्त्वाची आहे. मुस्लीम धर्मीयांच्या पाच स्तभांपैकी एक हज आहे.
सगळ्या शारीरिकदृष्ट्या सुदृढ आणि चांगली आर्थिक परिस्थिती असणाऱ्या मुस्लिमांनी जीवनात एकदा तरी हज यात्रा जरूर करावी, असा नियम आहे. पण अहमदियांना इतर इस्लामधर्मीय मुस्लीम मानत नाही. सौदी अरेबियाने अहमदियांच्या हज यात्रेवर बंदी घातली आहे. असं असतानाही जे हज यात्रेसाठी मक्केला जातात त्यांना अटक होण्याची किंवा डिपोर्ट (मायदेशी परत पाठवून देणं) होण्याची भीती असते.
(सौजन्य - द प्रिंट)






