“स्त्रियांच्या मनगटामध्ये बळ असते. त्या कुणावर अवलंबून राहू शकत नाही. मात्र अज्ञानी राहिल्याने पुरुष मंडळी आपला गैरफायदा घेतात. हा पुरुष घरातला, नातेवाईकातला, कामाच्या ठिकाणावरचा मुकादम किंवा आणखी कोणीही असू शकतो. त्यामुळं आपण कायदा माहिती करुन घ्यायला हवा. आपण आपल्या अत्याचाराविरूद्ध तक्रार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणात नोंदवून दाद मागू शकतो. महिलांनी त्या सेवेचा फायदा घ्यायला हवा.” असे मत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सदस्य न्या. जी. जी. सोनी यांनी व्यक्त केले.
महिला ऊसतोड कामगार संघटनेच्या वतीने कामगार महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन बीड शहरात करण्यात आले होते. यावेळी उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर ‘मकाम’ संस्थेच्या सीमा कुलकर्णी, ऊसतोड कामगार संघटनेच्या जिल्हा समन्वयक मनीषा तोकले आणि छाया पडघन, ऊसतोड कामगार कार्यकर्त्या ज्योती थोरात आणि सुशीला खडसे उपस्थित होत्या.
यावेळी सोनी म्हणाले, “एकाचं शोषण हे अनेकांच्या शोषणासाठी निमंत्रण असतं परंतु एकाने प्रतिकार केला तर तो सर्वांना धडा मिळतो. त्यासाठी विधीसेवा प्राधिकरणाची मदत घ्यावी. तेथे आपली बाजू मांडण्यासाठी मोफत वकिलही दिला जातो. 15100 या हेल्पलाईनवर तक्रार देऊ शकता. त्यामुळं अत्याचार सहन करु नका. शिवाय आपल्या भागात रोजगाराचा अभाव असल्याने आपण ऊसतोडीला जातो. मात्र उर्वरित सहा महिन्यात आपण आपले कौशल्य विकसित करुन अन्य रोजगार उपलब्ध करण्याचा प्रयत्न करत नाही. आपण ते केले पाहिजे.” अशी सूचनाही त्यांनी केली.
यावेळी सीमा कुलकर्णी यांनी ऊसतोड कामगार संघटनेची माहेरसंघटना असणाऱ्या महिला किसान अधिकार मंचाची माहिती दिली. त्या म्हणाल्या,“आपल्या गावात आपल्या ठिकाणी सन्मानपूर्ण रोजगार मिळाला पाहिजे. त्यासाठी आपण संघर्ष करुच मात्र आता ऊसतोड कामगार म्हणून आमचे हक्क मागण्यासाठी एकत्र येऊयात.
आपण ज्या जमिनीवर कष्ट करतो त्यावर पुरुषाची मालकी असते. आपल्याला कुणीही शेतकरी म्हणत नाही. 2007च्या धोरणानुसार शेती आणि शेतीशी संलग्न कामात असणारा प्रत्येक जण शेतकरी आहे त्यानुसार ऊसतोड कामगार देखील शेतकरी आहे. आणि आपली ओळख आपण मिळवण्यासाठी प्रयत्न करुया.” 
छाया पडघन म्हणाल्या, “ऊसतोड महिलांना त्यांच्या अधिकारांची जाणिव करुन देणारी ही संघटना आहे. गेल्या पाच वर्षांच्या कामाने बरेच बदल आणि यश मिळवले आहे. वर्षानुवर्षे काम करणाऱ्या महिलांच्या हाती कधी उचल नव्हती. महिलांना फडावरचा हिशोब माहिती नव्हता. मुकादम आता महिलांच्या हातात उचल देऊ लागला आहे. हिशोबाचं गणित समजल्याने महिला पुढाकार घेऊन फसवणूक टाळत आहेत. स्वत:च्या आरोग्याची जाणिवही नसणाऱ्या या महिला आता आरोग्यसखी होऊन फडावरच्या अन्य कामगारांच्या आरोग्याची काळजी घेऊ लागल्या आहेत.”
यावेळी सुशीला खडसे आणि ज्योती थोरात यांनी फडावरच्या स्थितीचं आणि महिलांच्या परिस्थितीची माहिती दिली. यावेळी आरोग्य सखी म्हणून काम केलेल्या ज्योती थोरात, निर्मला काळे, सुशीला खडसे, सविता गव्हाणे यांना प्रशस्तिपत्रक देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.
मागण्यांचा जोरदार उच्चार
विधी सेवा प्राधिकरणासारख्या यंत्रणांचा उपयोग करुन आपण आपले हक्क बजावले पाहिजेत. असं सांगत मनिषा तोकले यांनी ऊसतोड कामगार महिलांच्या मागण्या मांडल्या. ऊसतोडीसाठी निज्ञालेल्या कुटुंबाला गावातून निघाल्यापासून ते गावात येईपर्यंत विम्याचे संरक्षण मिळावे, महिला व पुरुषांना एक कोयता न धरता स्वतंत्र मजूर समजावे आणि त्यांना स्वतंत्र मजूरी द्यावी.
ती मजूरी आठ तासांसाठी सहाशे रुपये असावी आणि त्यावर काम केल्यास वेगळी रक्कम मिळावी, मुकादमांनी स्वच्छ जागी, पाण्याची सोय असेल अशा ठिकाणी कामाची निवड करावी, खोपी आणि बाथरुम बांधण्यासाठी दिले जाणाऱ्या सामानाचे पैसे हिशोबातून वजा करु नये तसेच फडावर बूट, बॅटरी, हातमोजे, सॅनिटरी पॅडस मोफत मिळावेत आणि फडावरचे शोषण थांबण्यासाठी तात्पुरती पोलिस चौकी किंवा पोलिसांची गस्त सुरु करावी अशा मागण्या त्यांनी मांडल्या. उपस्थित महिलांनी हात उंचावून मागण्यांना मंजूरी दिली.
संबंधित लेख वाचा: 1) ऊसतोडी कामगार महिलांसाठी दहा कलमी जाहीरनामा |
आरोग्यसखीचे मॉडेल बीड जिल्ह्यात राबवणार
दुसऱ्या माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सचिन शेकडे यांनी शासकीय योजनांची माहिती दिली त्यानंर त्यांनी उसतोड महिला कामगारांनी फडावर प्रथमोपचार देऊ शकणाऱ्या आरोग्यसखीच्या मॉडेलचे कौतुक केले. ते म्हणाले, महिला ऊसतोड कामगारांचा आरोग्यसखी हा युनिक मॉडेल आहे. आम्ही हे मॉडेल बीड जिल्ह्यात राबवणार आहोत. याबाबत सीएचओच्या मार्फत आरोग्य सखींना ट्रेनिंग दिले जाणार आहे. सत्रात कामगारांचे आरोग्य प्रश्नावर मांडणी झाली. यावेळी साथी, पुणे संस्थेचे भाऊसाहेब आहेर, कार्यकर्त्या आम्रपाली डोंगरे, अरुणा घोंगडे, अर्चना सभादिंडे यानी आरोग्याचे प्रश्न मांडले.
नरेगाचा फायदा घ्यावा
तिसऱ्या सत्रात गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप म्हणाले, ऊसतोड कामगार संघटनेचं असं काही व्यासपीठ आहे हे मला इथंच कळालं. शेतीच्या अभावामुळे आपल्याला ऊसतोडी करावी लागते. स्थलांतर ही काय चांगली गोष्ट नाही. बीड हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणवून घेणं हे भूषणावह नाहीये.
आपण नरेगातून फायदा घेतला पाहिजे. वैयक्तिक लाभाच्या योजनेतून विहीर बांधून शेतीसाठी मदत होऊ शकेल. याशिवाय वैयक्तिक शेततळे, गायगोठे, वृक्षलागवड, शेवगा लागवड अशा कितीतरी योजनांतून मदत होऊ शकते. नरेगातून 266 प्रकारच्या योजना घेता येतात आणि त्याचा प्रत्येकाने लाभ घेतला पाहिजे. यावेळी द्वारका वाघमारे, वंदना बेले, क्रांती खळगे यांनी रोजगाराच्या प्रश्नांची मांडणी केली.






