- केतन यादव
आजही देशातील अनेक भागांमध्ये महिषासुराची पूजा केली जाते. असुरसारख्या जमाती दसऱ्याच्या दिवसांमध्ये शोक व्यक्त करतात. त्यांचा विश्वास आहे की दुर्गा नावाच्या स्त्रीने कपटाने त्यांच्या देवतेची हत्या केली होती. ज्या असुर समुदायाला ब्राह्मणवादी संस्कृतीने गुन्हेगारासारखे दाखवले, तो या देशातील सर्वात प्राचीन जमातींपैकी एक आहे. हा समुदाय बंगाल, झारखंड, छत्तीसगड ते कर्नाटकपर्यंत वास्तव्यास आहे.
त्यांना भारत सरकारने विशेष आदिम जमात म्हणून मान्यता दिली आहे. असुर समुदायाला लोह गाळण्याच्या कलेतील जनक मानले जाते. या लोकांनी शतकानुशतके लोह गाळण्याची परंपरा जोपासली होती आणि टाटा स्टील कंपनीने सुमारे 120 वर्षांपूर्वी या तंत्राचा उपयोग आधुनिक पद्धतीने लोह गाळण्यासाठी केला. परंतु खाणकामाचा फायदा उच्च जातींना मिळाला आणि आदिवासींना विस्थापन आणि बेरोजगारी मिळाली.
‘प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती’ मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ‘असुर हे मानव कुटुंबाचे सदस्य होते, राक्षस नव्हते.’ महात्मा ज्योतिबा फुले यांनी द्रविड, मूळनिवासी आणि बहुजनांना दैत्य बनवण्याच्या मनुवादी कटाचा पर्दाफाश केला होता. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ मध्ये लिहिले आहे, ‘भारतात आर्यांच्या आगमनाने नव्या प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या; वांशिक आणि राजकीय. पराजित द्रविड जातींच्या सभ्यतेचा एक दीर्घ इतिहास आहे. यात काही शंका नाही की आर्य स्वतःला यांच्यापेक्षा श्रेष्ठ मानत होते आणि त्यांच्यातील अंतर खूप मोठे होते.’ (डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ - पान क्रमांक- 62)
समाजाच्या काठावर असलेला आदिवासी आपल्या स्वतःच्या भूमीवर स्वतःला मुख्य प्रवाहासमोर परका समजतो. असुर किंवा राक्षस हे असभ्य आणि हीनतेचे प्रतीक बनले, जे अपशब्दाप्रमाणे वापरले गेले, ज्याप्रमाणे सवर्ण हिंदू समाजाने सर्व मागास आणि शूद्र जातींना अपशब्दाप्रमाणे वापरले आहे.
आजही देशातील अनेक भागांमध्ये महिषासुराची पूजा केली जाते. असुरसारख्या जमाती दसऱ्याच्या दिवसांमध्ये शोक व्यक्त करतात. त्यांचा विश्वास आहे की दुर्गा नावाच्या स्त्रीने कपटाने त्यांच्या देवतेची हत्या केली होती. भौतिकशास्त्रज्ञ आणि लेखिका मधुश्री मुखर्जी दुर्गा आणि महिषासुर यांच्या कथेला प्रागैतिहासिक संघर्षाची कथा मानतात. त्या म्हणतात की, जनजातींचे दमन आजही सुरू आहे, ज्यांना जंगल, झाडे, शेतातून बेदखल करून सतत विस्थापित केले जात आहे.
छत्तीसगडच्या बस्तरमधील बारासुर येथे भैंसासुर ग्रामदेवता म्हणून पूजली जाते, कोरबा जिल्ह्यातील भैसमा गावातही महिषासुराची पूजा होते. या राज्यातीलच बिलासपुरमधील भैंसाझार गावात पीकांची रक्षक देवता म्हणून भैंसासुराची पूजा होते. छत्तीसगडच्या अभनपुर जनपदातील मोठ्या उरला गावात वनदेवता म्हणून महिषासुराची पूजा होते.
मध्य भारतापासून उत्तर भारतापर्यंत महिषासुराची मंदिरे…
मध्य प्रदेशातील मंडला, कटनी, डिंडोरी, सतना, सीहोर यासारख्या ठिकाणी जनजाती महिषासुराची पूजा करतात. सीहोरच्या इछावर येथे भैंसासुर बाबांचे मंदिर आहे. उत्तर प्रदेशातही अनेक ठिकाणी महिषासुराची पूजास्थळे आहेत. महोबा जिल्ह्यातील कुलपहाड तहसीलमधील चौका-सोरा गावात गडेरियापालांचा पशुदेवता मैकासुर नावाने भैंसासुराचे मंदिर आहे, जे भारत सरकारच्या पुरातत्व विभागाने संरक्षित केले आहे. उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात महिषेश्वर बाबांचे मंदिर आहे, जे मंदिर प्रांगण असंख्य म्हैसांच्या मूर्तींनी भरलेले आहे.
प्रोफेसर राजेंद्र प्रसाद सिंह लिहितात, ‘भारतात जेव्हा राजसत्ता विकसित झाली, तेव्हा ‘महिष’चा एक नवीन अर्थ ‘राजा’ असा झाला. कारण पृथ्वीवर ‘महाशक्तिमान’ राजेच असतात. म्हणूनच राणीला आजही ‘महिषी’ म्हणतात. भारतीय साहित्यात ‘महिष’चा अर्थ ‘भैंस’ असा प्रथम स्मृतीग्रंथांमध्ये आढळतो. स्मृतीग्रंथांपूर्वी कुठेही ‘महिष’चा अर्थ ‘भैंस’ असा सापडत नाही. ‘महिष’चा अर्थ ‘भैंस’ असणे हे भाषाविज्ञानात अर्थापकर्षाचे उदाहरण आहे.’
संबंधित लेख वाचा: आपल्या घराचा रं सत्यानाश केला, वाघदेवा, जंगल वाचवाया तू धाव रं…! |
आदिवासी लेखिका सुषमा असुर म्हणतात, ‘मी शाळेच्या पुस्तकात वाचले आहे की आम्ही राक्षस आहोत आणि आमचे पूर्वज लोकांना त्रास देण्याचे, लुटण्याचे, मारण्याचे काम करत होते. म्हणून देवतांनी असुरांचा संहार केला. आमच्या पूर्वजांची हत्या केली. आमच्या समुदायाचा नरसंहार केला. आमच्या नरसंहाराच्या विजयाच्या स्मृतीतच मनुवादी लोक दसरा यासारखे सण साजरे करतात. आजही आम्हाला आमचे जल, जंगल, जमीनच नव्हे तर आमची भाषा-संस्कृती यापासून रोज विस्थापित केले जात आहे, तर मग तुम्ही सांगा राक्षस कोण आहे?’
(महिषासुर एक जननायक: संपादक प्रमोद रंजन, पान क्रमांक- 111)
महिषासुर शहादत दिन..
डॉ. सौरभ सुमन यांना 8 मार्च 2016 रोजी कृषी-संशोधनासाठी राष्ट्रपतींनी सन्मानित केले होते. जातीविहीन समाजाच्या निर्मितीचे ध्येय ठेवणाऱ्या सौरभ महिषासुराला आपला पूर्वज मानतात आणि 2010 पासून महिषासुर शहादत दिन आयोजित करतात. (महिषासुर एक जननायक: संपादक प्रमोद रंजन, पान क्रमांक- 106)
आदिवासींची मान्यता आहे की, एका सुंदर स्त्रीला पाठवून कपटाने महिषासुराची हत्या केली गेली. रूप-सौंदर्याच्या या प्रलोभनाचा उल्लेख मार्कंडेय पुराणात दिसतो, जिथे अनेकदा देवी रूपाने असुरांना आकर्षित करत आहे. छत्तीसगडच्या बलोदा बाजार जिल्ह्यातील डमरू येथे, जे भारत सरकारच्या पुरातत्व विभागाने संरक्षित केले आहे, त्या गावात महिषासुराची पूजा ग्रामदेवता म्हणून केली जाते.
आंबेडकर विचारतात : देव भित्रे होते का?
बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रश्न उपस्थित केला आहे, ‘वैदिक काळात असुरांशी युद्ध देवतांनी लढले होते, तर पौराणिक काळात हे युद्ध देवींनी लढले. असे का? की पौराणिक काळात देवींना तेच करावे लागले जे वैदिक काळातील देवता करत होते? असे असू शकत नाही की पौराणिक काळात कोणतेही देवता नव्हते… असे वाटते की ब्राह्मणांना हे जाणवले नाही की, दुर्गाला नायिका बनवून, जी एकटीच असुरांचा नाश करू शकते, त्यांनी आपल्या देवतांना दयनीय भित्र्यांचा समूह बनवला आहे. असे वाटते की देवता असुरांपासून स्वतःचे रक्षण करू शकले नाहीत आणि त्यांना आपल्या पत्नींकडून रक्षणासाठी विनवणी करावी लागली.’ (हिंदू धर्माच्या कोडे, खंड-8 बाबासाहेब डॉ. आंबेडकर संपूर्ण वाङ्मय, पान क्रमांक- 115)
आदिवासींमध्ये आजही मुख्य प्रवाहातील हिंदू समाजाप्रमाणे पितृसत्ता किंवा वर्ण-व्यवस्था नाही. तिथे विवाह आणि घटस्फोटही खूप सोपे आहे. अनेक ठिकाणी तर स्त्रीला पुरुषाची चाचणी घेऊन वर निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. ब्राह्मण कथांमध्ये हे वाक्य वारंवार येते की असुर म्हणतात, ‘देवी, तुम्ही परत जा, आम्ही तुमच्यावर हात उगारू शकत नाही.’
“महिषासुर द्रविडांचा महान शासक” - गौरी लंकेश
2016 च्या लेखात पत्रकार गौरी लंकेश यांनी महिषासुराला एक महान उदार द्रविड शासक म्हटले, ज्याने आपल्या लोकांना मारेकरी आर्यांपासून वाचवले. त्यांनी कर्नाटक आणि मैसूरला महिषासुराचे शासन क्षेत्र म्हटले. मैसूरचे नाव महिषासुराच्या नावावरून पडले. आजही तिथे त्यांची पूजा होते आणि मैसूरमध्ये महिषासुराची एक विशाल मूर्ती आहे.
जेएनयूमधील महिषासुर शहादत दिन साजरा करणाऱ्या दलित, मागासवर्गीय आणि आदिवासी विद्यार्थ्यांचे म्हणणे होते की, जेव्हा कॅम्पसमध्ये दुर्गापूजा, सरस्वती पूजा यांसारखे हिंदू अनुष्ठान होऊ शकतात, तेव्हा बहुजन आपल्या नायक महिषासुराची पूजा का करू शकत नाहीत. हा विषय तत्कालीन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी संसदेत उपस्थित करत जेएनयूला देशद्रोह्यांचा अड्डा म्हटले होते, तेव्हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी राजा बळी आणि महिषासुर यांच्या देशातील विविध भागांमध्ये होणाऱ्या पूजेचा उल्लेख केला.
सीताराम येचुरी यांनी केरळमधील मल्याळींचा सण ओणम आणि मैसूरमधील महिषासुराचा दाखला दिला. त्यांनी म्हटले की, विष्णूने असुरांचा राजा बळीला पराजित केले, पण मल्याळी ओणम सणात आपल्या राजा बळीच्या आगमनाचा उत्सव साजरा करतात, ते हिंदू नाहीत का?
समाजवादी विचारवंत प्रेमकुमार मणी यांनी प्रश्न उपस्थित केला की, जेव्हा असुर ही या देशातील एक प्रजात आहे, तेव्हा त्यांच्या पराभवाचा किंवा त्यांच्या नायकांच्या हत्येचा उत्सव साजरा करणे हे कोणत्या मानसिकतेचे द्योतक आहे? ब्राह्मणवादी सामंतवादी संस्कृतीने वारंवार हत्येला उत्सवात बदलले आहे आणि दलित, मागासवर्गीय आणि आदिवासींना खलनायक म्हणून दाखवले आहे.
या संदर्भात हिंदी युवा कवी पराग पावन यांच्या ‘महिषासुराचा तहनामा’ या कवितेचा काही भाग पाहा:
हे युद्ध तुझे नाही, दुर्गे!
माझ्या बरगड्यात खुपलेला
तुझ्या हातावर चढलेला
हा त्रिशूळ कुणाचा आहे?
माझ्या रक्तात तरंगणाऱ्या तुझ्या तलवारीचा
खरा पत्ता काय आहे
खरे कारण काय आहे
ज्यामुळे माझा अंत
हेच तुझे लक्ष्य आहे
मी तुझी जमीन हिसकावली नाही
मी तुझ्याविरुद्ध कोणतेही
गीत गायले नाही
मी तुझ्याविरुद्ध कोणताही
कट रचला नाही
माझा जन्म एक उपहास होता
मला अपमानाने वाढवले आणि व्यंग्याने लाड केले
माझ्या जाड आणि काळ्या आईला कोणी म्हैस म्हटले
तुला माहीत आहे का?
दुर्गे!
हे युद्ध क्षणभर थांबव
त्या शक्तीच्या तंत्राची खोलवर चौकशी कर
ज्याने हत्येला उत्सवात बदलले
हे युद्ध क्षणभर थांबव, दुर्गे!
आणि आपल्या पूर्वजांना आठवत
छातीवर हात ठेवून
तुझ्या न जन्मलेल्या लेकीची शपथ घेऊन सांग
की गेल्या महिन्यात राजगीरच्या डोंगरावर
बलात्कार झालेल्या त्या मुलीशी
तुझा काहीही संबंध नव्हता!
(केतन यादव हे अलाहाबाद विद्यापीठात संशोधन करीत आहेत.)
(द वायर हिंदी ) वरुन साभार
मराठी अनुवादः भरत यादव






