- शंतनू खुजे
‘’कुठल्या तोंडाने आता घरच्यांकडे पैसे मागू…? गावाकडं घरदार, पिकपाणी, जनावरं सगळंच उद्धवस्त झालयं, त्यातून सावरायला किमान सहा महिने तरी लागतील. आता खोलीचं भाडं, ‘मेस’चे पैसे, लायब्ररी, पुस्तकांचा खर्च हे सगळं कसं होणार…? घरून वेळेवर पैसे न मिळाल्यामुळे इकडे मेसचा मालक तगादा लावतोय, सध्या तर फक्त वडापाव खाऊनच पोट भराव लागतयं…"
हिंगोलीचा क्षितीज अतिशय हतबलतेने बोलत असतो. क्षितीज हा सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी छ. संभाजी नगरमध्ये राहतो.
निसर्गाची आपत्ती मराठवाड्यासाठी नवीन नाही. दुष्काळाचे चटके सतत बसलेला मराठवाडा अनेक संकटं सहन करत आलाय. पण यावेळचं संकट वेगळंच आहे. कोरड्या नव्हे तर “ओल्या दुष्काळा”नं इथल्या जनमाणसांचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलंय. त्यामुळे जगायचं कसं आणि पुन्हा उभं कसं राहायचं हा प्रश्न जसा मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना पडलायं, तसाच या शेतकऱ्यांच्या लेकरांनाही पडलाय. पोलीस भरती, स्पर्धा परीक्षा, मेडिकल आणि इंजिनियरिंगसाठी मराठवाड्यातील हजारो मुलं-मुली घरापासून दूर छ. संभाजी नगरच्या क्रांती चौक, टीव्ही सेंटर या परिसरात राहतात. या भागात एक फेरफटका जरी मारला तरी अनेक काळवंडलेले चेहेरे दिसू लागतात.
‘’कुठल्या तोंडाने आता घरच्यांकडे पैसे मागू…?
एमपीएससीची तयारी करणारा ओम गव्हार हा असाच एक हतबल झालेला विद्यार्थी… ओम धाराशिव जिल्ह्याच्या एडशी येथील रहिवासी आहे. तो सांगतो की, “मला महिन्याला 7-8 हजार इतका खर्च येतो. मी कुठलीही नोकरी करत नसल्यामुळे मला हे पैसे घरीच मागावे लागतात. परंतु आता घरच्यांवरच अशी परिस्थिती ओढवल्यामुळे पैसे मागण्याआधी दहा वेळा विचार करावा लागतोय.”
(ओम दिलीप गव्हार)
शहरातील महागडं भाडं, मेसचा आणि क्लासेसचा खर्च झेपत नसल्यामुळे अभ्यास सोडून गावी परतण्याचा विचार असल्याचा विचार ओम बोलून दाखवतो. अतिवष्टीमुळे शेतीतील उत्पन्नाचे स्त्रोत पूर्णपणे ठप्प झाल्यान आता हा खर्च घरच्यांना मागावा तरी कसा असा गंभीर प्रश्न या विद्यार्थ्यांपुढे उभा राहिलाय.
गेल्या महिन्यात मराठवाड्यातील नांदेड, लातूर, हिंगोली, परभणी, धाराशिव, बीड, अहिल्यानगर आणि जालना या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली. यात विशेषतः बीड, नांदेड आणि धाराशिव या जिल्ह्यांमधील सोयाबीन आणि कापूस यांसारखी खरीप पिकं पाण्याखाली गेली. तोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. पाण्यामुळे शेतजमिनी खरडुन निघाल्या, जनावरं दगावली तसेच अनेक ठिकाणी घरांची पडझड देखील झाली.
यामध्ये शेतकऱ्यांचं किती नुकसान झालं? किती जमिनी पाण्याखाली गेल्या? किती घरं पडली? किती माणसं दगावली? किती जनावरांचा मृत्यू झाला? याचे पंचनामे सरकारी अधिकारी करत आहेत. या सगळ्या गोष्टींचा आढावा माध्यमांमध्येही देखील घेतला जातोय. पण या सगळ्यामध्ये एका गोष्टीकडे दुर्लक्ष होतयं, ते म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थी जे गाव सोडून मोठी स्वप्न घेऊन शिक्षणासाठी शहरात आली आहेत, त्यांच्या भविष्याबद्दल…
संबंधित लेख वाचा: या शेताचा आता लळाच राहिलेला नाही… शेती करणाऱ्याांच्या संख्येत विक्रमी घट |
मराठवाड्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे बहुतांश विद्यार्थी हे सामान्य शेतकरी कुटुंबातीलआहेत, त्यातील काही सध्या छत्रपती संभाजीनगर येथे वास्तव्यास आहे. शेतीच्या उत्पन्नातून येणाऱ्या रकमेतूनच या विद्यार्थ्यांना क्लासेस, पुस्तकं आणि राहण्या-खाण्याचा खर्च घरच्यांकडून पुरवला जातो. शेतात राबराब कष्ट करून शहरात शिकत असलेल्या आपल्या मुला-मुलींना महिन्याला पाच-सहा हजार पाठवणारा शेतकरी आता त्याच्याच घरात काही नसल्यामुळे शिक्षणाला पैसा पुरवणार तरी कसा ? हे विद्यार्थी आता शहरामध्ये त्यांच्या रूम/हॉस्टेलचं भाडं, मेसच्या जेवणाचे पैसे या सगळ्याची कुठून आणि कशी व्यवस्था करणार? हे सगळे प्रश्न घेऊन ‘बाईमाणूस’ने छ. संभाजीनगर शहरातील गावखेड्यातून आलेल्या विद्यार्थ्यांना बोलतं केलं…
घरून पैसे मिळत नसल्यानं विद्यार्थी आर्थिक अडचणीत....
हिंगोलीचा क्षितिज मोरे म्हणतो, घरी आज पैसे मागितले तर ते 10 - 15 दिवसांनी मिळतात. आधीच पिकांना भाव कमी होता, त्यात हे नुकसान झालं. त्यामुळे घरच्यांकडून पैशाची अपेक्षा करावीशी वाटत नाही. घरच्यांना मदत म्हणून पार्ट टाइम जॉब करावा असं वाटायला लागलयं.. पण मग अभ्यासाकडे देखील दुर्लक्ष होतं. घरून वेळेवर पैसे न मिळाल्यामुळे इकडे मेसचा मालक तगादा लावतोय, त्यामुळे कधी - कधी वडापाव खाऊनच पोट भरावं लागत असल्याचं क्षितिज सांगतो.
मुळात स्पर्धा परीक्षांच्या तयारीला लागलेले अनेक विद्यार्थी नकळतपणे एका मोठ्या मानसिक जाळ्यात अडकले जातात. सुरुवातीला प्रशासकीय अधिकारी किंवा इतर उच्च पदाचे ग्लॅमर आणि समाजात मिळणारा मान पाहून ते या क्षेत्राकडे आकर्षित होतात. परंतु स्पर्धा परीक्षांमधील अनिश्चिततेमुळे आणि अनियमिततेमुळे हे विद्यार्थी या जाळ्यात गुंतत जातात. याच काळात विद्यार्थ्यांचं वाढत चाललेलं वय त्यांना अजून तणावात ढकलतं.
(क्षितिज अनिल मोरे)
बँकिंगची तयारी करणाऱ्या कर्जतच्या 28 वर्षीय विकास पाटील हाच ताण आलाय. तो म्हणतो, घरात कमावणारे फक्त आई वडिलच आहे, त्यामुळे त्यांच्याकडूनच मला पैसे घ्यावे लागतात. आमच्याकडे 2 एकर मका होता पण या पूरामुळे सर्व वाया गेलं. आधीच वय वाढत चालल्यानं घरी पैसे मागावेसे वाटत नाही, आता तर अश्या परिस्थितीत पैश्यासाठी घरी फोन करायची सुद्धा हिम्मत होत नाही. अजून किती दिवस आपण घरी पैसे मागणार याचा विचार मनात येतो आणि स्वतःचीच लाज वाटायला लागते.
विद्यार्थ्यांना प्रचंड मानसिक तणाव जाणवतोय
या संकटाचा मानसिक परिणाम विद्यार्थ्यांवर देखील होतोय. रोज मोबाईलवरून आई वडिलांशी बोलताना ते तणावात असल्याचं लक्षात येतं आणि मग यामुळेच विद्यार्थी सुद्धा एकाग्रतेने अभ्यास करू शकत नाही.
"आमचं सर्व काही शेतीवर अवलंबून आहे, शेती एकमेव उदरनिर्वाहाच साधन आमच्याकडे आहे. मला महिन्याला लागणारा सात-आठ हजार रुपये खर्च आई-वडील शेतीच्या उत्पन्नातूनच पुरवायचे. पण हे नुकसान झाल्यानं त्यांना पैसे पाठवायला कठीण जातंय. आधीच घरच्यांना माझ्याकडून खूप अपेक्षा आहे, त्यातल्या त्यात ह्या अशा परिस्थितीमुळे मानसिक तणाव अधिक वाढला आहे. अर्धवेळ नोकरी करावी की पूर्णवेळ अभ्यास करावा अशी द्विधा मनस्थिती तयार झाली आहे" असं गेवराई येथील हर्षदा वावरे सांगते.
हर्षदा सारखीच परिस्थिती इतरही मुलीची आहे. मुलींवर घर सांभाळण्याची तितकी जबाबदारी नसली तरी त्यांना स्पर्धा परीक्षेत अपयश आल्यास घरचे आपलं लग्न तर लावून देणार नाहीत ना अशी देखील भीती असते. परीक्षा वेळेवर होत नसल्याने आणि अभ्यासाच्या भारामुळे विद्यार्थी आधीच तणावात असतात. त्यातल्या त्यात आता वेळेवर न मिळणारे पैसे, पालकांचे फोन आणि गावाकडील शेतीचं नुकसान झाल्याच्या बातम्या बघून विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे वेळापत्रक कोलमडले आहे. कुटुंब संकटात आहे आणि आपण इकडे शहरात आरामशीर अभ्यास करतोय, अशी भावना निर्माण होत असल्यानं मन एकाग्र होत नसल्याचं विद्यार्थी सांगतात.
"घरच्यांना पैसे मागितले की ते म्हणतात आता कसे पाठवायचे ? थोडे दिवस थांब. पैसे वेळेवर न दिल्यामुळं इकडे मेस आणि रूम मालकांचं बोलणं सहन करावं लागतं. यामुळे मग अजिबात अभ्यासात मन लागत नसल्याचं, खुलाबादचा समाधान जाधव सांगतो.
अभ्यास करायला बसलो कि तेच गावाकडचं चित्र डोळ्यापुढे येत, शेतीच्या नुकसानामुळे चिंतेत असलेले आई वडील आठवतात, असं समाधान म्हणतो.
“जुलैच्या पावसामुळे देखील आमच्या शेतीच नुकसान झालं होतं. आता थोडं काही हाती आलं असताना ते ह्या पावसाने हिरावून घेतलं. त्यामुळे आता आमच्या पूर्ण अपेक्षा सरकारकडूनच आहे. एका हेक्टरमागे मिळणारी 8500 रु. ही रक्कम खूपच कमी आहे, या संकटातून सावरण्यासाठी कमीतकमी हेक्टरी 50000 रु. अनुदान सरकारने द्यावी तसेच आमच्या परीक्षा शुल्कामध्येही थोडी सूट मिळायला पाहिजे” असं यूपीएससीची तयारी करणारा विजय घोडके म्हणतो.
(विजय संजय घोडके)
शेतीचं झालेलं हे नुकसान भरून काढण्यासाठी सरकारने भरीव मदत जाहीर करावी अशी अपेक्षा विद्यार्थ्यांना आहे. शासनाने अनुदान दिल्यास शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळेल आणि त्यातून काही रक्कम या विद्यार्थ्यांना घरच्यांकडून मिळू शकेल .
पूरस्थितीमुळे स्पर्धा परीक्षा पुढे ढकलल्या
गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा परिसरात पूर स्थितीमुळे अनेक ठिकाणी वाचनालये बंद आहेत, तर अनेक विद्यार्थ्यांचे अभ्यास साहित्य वाहून गेले किंवा खराब झाले आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या पूर स्थितीमुळे गाव आणि शहरांना जोडणारे रस्ते खचले आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अशा परिस्थितीत परीक्षा केंद्रांवर वेळेवर पोहोचणेही अनेक विद्यार्थ्यांसाठी अवघड झाले आहे. परिणामी, परीक्षा पुढे ढकलल्यास तयारीसाठी आणि परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल, अशी अपेक्षा विद्यार्थी व्यक्त करत होते. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने त्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहे. यासंदर्भात संबंधित विभागाने एक परिपत्रक देखील जाहीर केले आहे.
दुसऱ्या बाजूला छत्रपती संभाजीनगरसह बीड, लातूर, धाराशिव, जालनासह इतर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले. हे पाहता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्रातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे विद्यापीठ परीक्षा शुल्क माफ करा, अशी मागणी प्राध्यापक संघटनेने केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महाविद्यालयीन प्राध्यापक संघटनेने (बामुक्टो) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी केलीय. 'बामुक्टो'ने उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव आणि राज्याच्या मुख्य सचिवांकडेही हीच मागणी केलीय.






