‘75 वर्षांची शाल पांघरली, याचा अर्थ आता तुम्ही त्या वयात पोहोचला आहात, थोडे बाजूला व्हा… 75 वर्षांचे झाल्यानंतर, दुसऱ्याला संधी दिली पाहिजे.’’ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी दिवंगत संघनेते मोरोपंत पिंगळे यांचे उद्गार उद्धृत करून नुकत्याच केलेल्या विधानानंतर, वयाच्या 75 व्या वर्षी निवृत्तीबाबत पुन्हा एकदा राजकीय वादाचा धुरळा उडाला आहे.
विरोधकांनी भागवत यांच्या विधानाचा संबंध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वयाशी जोडला आहे. डॉ. भागवत व पंतप्रधान मोदी येत्या सप्टेंबरमध्येच 75 वर्षांचे होत आहेत. हाच धागा पकडून राजकारण सुरू झाले आहे. मात्र भागवतांच्या बोलण्याचा विपर्यास केल्याचे स्पष्टीकरण संघवर्तुळातून देण्यात आले आहे. भाजपच्या घटनेत सध्या निवृत्तीवयाची कोणतीही तरतूद नसल्याचे सांगण्यात आले.
भाजपमध्ये 75 वर्षांच्या वयात निवृत्तीचा नियम आहे का? हा मुद्दा समोर आणून विरोधक मोदी यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करतात. आपने पक्षा लोकसभा निवडणुकीमध्येच मोदी सप्टेंबरमध्ये निवृत्त होणार असल्याचा प्रचार केला होता. मात्र, ‘भाजपच्या घटनेत 75 व्या वर्षी निवृत्तीचा उल्लेख नाही. पंतप्रधान मोदी 75 वर्षांचे झाले, तर त्यामुळे कोणाला आनंदी होण्याची गरज नाही. मोदी हा कार्यकाळ पूर्ण करतील व भविष्यातही देशाचे नेतृत्व करीत राहतील,’ असे मागच्या वर्षी लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजप नेते अमित शहा यांनी स्पष्ट केले होते.
अमित शहा हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना, पक्षाने 26 ऑगस्ट 2014 रोजी पक्षासाठी मार्गदर्शक मंडळ निर्माण करून त्यात वरिष्ठ नेत्यांची नियुक्ती केली होती. या यादीत अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह मोदी आणि राजनाथ सिंह यांची नावेही होती; परंतु भाजपची सर्वांत शक्तिशाली संस्था असलेल्या संसदीय मंडळाची फेररचना करून वाजपेयी, अडवाणी व जोशी यांना वगळल्यानंतर, मार्गदर्शक मंडळाला ‘निवृत्तांचे मंडळ’ मानण्याची चर्चा सुरू झाली होती.
2016 नंतर प्रत्येक निवडणुकीत 75 वर्षांपेक्षा ज्येष्ठ नेत्यांना तिकीट देणार नाही, अशी चर्चा होऊ लागली. भाजपने तत्कालीन लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्यासह अनेकांबाबत याचे पालन केले. यातही कर्नाटकाचे बी. एस. येडियुरप्पा, पंजाबचे कॅप्टन अमरिंदरसिंग, 2021 च्या केरळ विधानसभा निवडणुकीतील भाजप उमेदवार 88 वर्षीय ई. श्रीधरन यांच्यासारखे अपवाद ठेवले.
निवृत्तीच्या वयाबाबत मोहन भागवत नेमके काय म्हणाले?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रसिद्धी पराड्मुखपणे कार्य करून पंच्याहत्तरीनंतर निवृत्त होण्याचा वस्तुपाठ मोरोपंत पिंगळेंनी घालून दिला होता. मोरोपंत पिंगळे यांच्या पंचहत्तरीची आठवण सांगत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सूचक वक्तव्य केले आहे. नागपुरातील वनामती सभागृहात संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी दिवंगत मोरोपंत पिंगळेंच्या जीवनावरील इंग्रजी पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते.
यावेळी मोरोपंत पिंगळे यांच्या पंचहात्तरीची आठवण सांगताना सरसंघचालक म्हणाले की, वृंदावन येथे आयोजित संघाच्या एका बैठकीत मोरोपंत पिंगळेंच्या पंच्याहत्तरी निमित्त त्यांचे सत्कार करण्याचे ठरले. त्यावेळी तत्कालीन सरकार्यवाह हो.वो. शेषाद्री यांनी मोरोपंतांचा शाल पांघरून बहुमान केला. त्यावेळी मोरोपंत म्हणाले होते की, 'पंच्याहत्तरीचा अर्थ मला कळतो. माणसाची पंच्याहत्तरी झाली की, आपण बाजुला होऊन इतरांना संधी दिली पाहिजे', असे मोरोपंत तेव्हा म्हणाले होते, अशी आठवण सरसंघचालकांनी यावेळी सांगितली.
संबंधित लेख वाचा: 1) मोहन भागवतांचे ‘पवित्र उजवे गुप्तांगी-विचार’ आणि डावी विचारसरणी… |
मोहन भागवतांचा इशारा पंतप्रधान मोदींच्या दिशेने आहे का?
मोहन भागवतांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ज्येष्ठ संपादक आणि राजकीय अभ्यासक शेखर गुप्ता यावर म्हणतात की, यावर प्रतिक्रिया देताना सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे, कारण भाजपात आणि विशेषतः भाजप-आरएसएस यांच्यातील नात्यांमध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नेहमीच एक अपवाद मानलं जातं. मोहन भागवत यांच्या विधानाचा विपर्यास केल्याचे संघो स्पष्टीकरण चुकीचे आहे. कारण भागवतांनी त्या कार्यक्रमात त्यांचे पूर्ण भाषण हे मराठी भाषेतच केले, मात्र जेव्हा ‘75 वर्षांचे झाल्यानंतर, दुसऱ्याला संधी दिली पाहिजे’ हे विधान करताना त्यांनी हिंदी भाषा वापरली. त्यामुळे भागवत यांनी जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक असे विधान केले हेच यातून स्पष्ट होतं.’’
शेखर गुप्ता पुढे म्हणतात की, 2005 साली तत्कालीन सरसंघचालक के.एस. सुदर्शन यांनी 77 वर्षांचे लालकृष्ण अडवाणी आणि 80 वर्षांचे अटलबिहारी वाजपेयी यांना तरुणांसाठी जागा मोकळी करण्याचा सल्ला दिला होता. मात्र त्यावेळी वाजपेयींनी “ ना टायर्ड हूं, ना रिटायर्ड हूं” असं उत्तर दिल्यामुळे सुदर्शन चांगलेच भडकले होते. त्या काळात वाजपेयी-आडवाणी जोडीचा पक्षावर जबरदस्त प्रभाव होता. ते संस्थापक नेते होते आणि त्यांच्या नेतृत्वाला आव्हान देण्याचे धाडस कुणीही करत नसे.
त्यामुळे सुदर्शन यांची टीका उघडपणे झाली नाही, पण मागच्या दाराने त्यांच्यावर ‘वयोमानामुळे मतिभ्रम’ झाल्याचं सांगितलं गेलं. मात्र सत्य काही वेगळंच होतं. संघाच्या दृष्टीने सुदर्शन यांची चूक ही होती की त्यांनी ते विधान चुकीच्या वेळी केलं. पक्ष नुकताच निवडणुकीत हरला होता आणि नेतृत्वात बदलाची गरज नव्हती. पण नंतर ते विधान योग्य ठरलं.
भाजपच्या घटनेत निवृत्तीवयाची तरतूद आहे का?
त्यामुळेच भाजपमध्ये नेतृत्वाच्या उत्तराधिकाराची प्रक्रिया सुरू झाली. राजनाथ सिंह, सुषमा स्वराज, अरुण जेटली, नितीन गडकरी आणि विशेषतः गुजरातचे नरेंद्र मोदी हे सर्व एकमेकांशी स्पर्धा करायला सज्ज झाले होते. 2012 मध्ये सलग तिसऱ्यांदा गुजरातमध्ये विजय मिळवून मोदी या स्पर्धेत आघाडीवर पोहोचले. हे पण तितकच खरं आहे की, भाजपात कधीही सोप्या पद्धतीने वारसा हक्काने नेतृत्व मिळत नाही. अनेक नेत्यांची मुलं-पुतणे आज महत्त्वाच्या पदांवर आहेत, पण त्यांनाही संपूर्ण प्रक्रिया पार करूनच तिथं पोहोचावं लागलं.
वाजपेयी-आडवाणी युगातही 49 वर्षं सरासरी वयाच्या तरुण मुख्यमंत्र्यांची निवड झाली, वसुंधरा राजे, रमन सिंह, नरेंद्र मोदी, शिवराज चौहान ही काही त्यापैकी नावं. भाजप अध्यक्षपदाच्या बाबतीत तर ही प्रक्रिया अधिक स्पष्ट दिसते. वेंकय्या नायडू (53), राजनाथ सिंह (54), नितीन गडकरी (48), अमित शाह (49) या सर्वांची नियुक्ती पण वयाच्या या टप्प्यावर झाली होती, असे शेखर गुप्ता म्हणतात.
याच्या नेमकं उलट कॉँग्रेस पक्षाचे चित्र आहे. बऱ्याच काळापर्यंत सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष राहिल्या, मधल्ल्या काळात फार कमी वेळेसाठी राहुल गांधींनी हे पद स्वीकारलं आणि आता मल्लिकार्जुन खडगे अध्यक्ष आहेत, पण त्यांच वय 80 च्या आसपास आहे. यामुळे कॉँग्रेसचे अनेक युवा नेते नाराज झाले आणि पक्ष सोडून गेले. विशेषत: ज्यांनी पक्ष सोडला ते भाजपमध्येच दाखल झाले.
दरम्यान अलीकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवृत्तीबाबत मोठे विधान केले होते. राजकीय निवृत्तीनंतर पुढील आयुष्यात काय करणार हे अमित शाह यांनी अहमदाबादमधील एका कार्यक्रमात सांगितलं. राजकारणातून निवृत्त झाल्यावर मी आयुष्यभर नैसर्गिक शेती करण्याचे ठरवले आहे. तसेच निवृत्तीनंतर संपूर्ण आयुष्य वेद, उपनिषद वाचण्यात वेळ घालवणार असल्याचे अमित शाह यांनी सांगितले होते.
भाजपने वयाच्या 75व्या वर्षी अनेक नेत्यांना निवृत्त केले
2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये 75 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नेत्यांना निवृत्त करण्याचा ट्रेंड सुरू झाला. पहिल्यांदाच पंतप्रधान झालेल्या नरेंद्र मोदींनी त्यांच्या मंत्रिमंडळात या वयापेक्षा कमी वयाच्या नेत्यांना स्थान दिले होते. मार्गदर्शक मंडळात लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांचा समावेश होता. 2016 मध्ये गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी राजीनामा दिला तेव्हा त्याही 75 वर्षांच्या होत्या. त्याच वर्षी 76 वर्षांच्या नजमा हेपतुल्ला यांनीही मोदी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला.
2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी एका मुलाखतीत सांगितले होते- 75 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कोणत्याही व्यक्तीला तिकीट देण्यात आलेले नाही. हा पक्षाचा निर्णय आहे. त्या निवडणुकीत सुमित्रा महाजन आणि हुकुमदेव नारायण यादव सारख्या नेत्यांना तिकीट देण्यात आले नाही. त्याचप्रमाणे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राजेंद्र अग्रवाल, संतोष गंगवार, सत्यदेव पचौरी, रीता बहुगुणा जोशी यांचे वय ७५ वर्षांपेक्षा जास्त असल्याने त्यांचे तिकिटे कापण्यात आले.
या सर्व पार्श्वभूमीवर आता सर्वांच्या नजरा ११ सप्टेंबरकडे असतील, जेव्हा भागवत 75 वर्षांचे होतील. जर त्यांनी स्वतः निवृत्त होण्याचा निर्णय घेतला, तर मोदींच्या भवितव्याबाबत चर्चा सुरू होईल. पण त्यांना कोणी थेट आव्हान देईल का? 2009 साली सुरू झालेली उत्तराधिकार प्रक्रिया पुन्हा सुरू होईल का? शक्यता अल्प आहे.
2028 नंतर एखाददुसऱ्या महत्त्वाकांक्षी नेत्याचा संयम सुटू शकतो, पण कोणी उघडपणे बोलणार नाही. कारण मोदी हे भाजप आणि आरएसएसच्या अंतर्गत इतके सर्वशक्तिमान झाले आहेत की तेच ठरवतील की ते किती काळ पदावर राहतील. २०२९ साली ते ७९ वर्षांचे असतील. सध्या आज डोनाल्ड ट्रम्प 79 वर्षांचे आहेत आणि त्यांच्या तुलनेत मोदी अधिक तंदुरुस्त आहेत. बाकीच्यांना वाट पाहावी लागेल, त्यांच्या संकेताची…






