- ऋतुजा सुषमा सुभाष
अवघ्या तीन दिवसांनी गणपती येणार आहेत आणि त्यापाठोपाठ लगेचच गौरी आगमन... याच पार्श्वभूमीवर एक धक्कादायक घटना घडली आहे. घरी धार्मिक कार्य असल्यामुळे एका 18 वर्षाच्या मुलीने मासिक पाळी थांबवण्यासाठी काही हार्मोनल गोळ्या घेतल्या आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला. या गोळ्या घेतल्यामुळे त्या मुलीला डीप व्हेन थ्रोम्बोसिस झाला, डॉक्टरांनी तिला रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले पण तिच्या वडिलांनी नकार दिला आणि अखेर मध्यरात्री त्या मुलीचा मृत्यू झाला.
रक्तवहिन्यासंबंधीचे सर्जन डॉ. विवेकानंद यांनी एका पॉडकास्टमध्ये ही धक्कादायक माहिती दिली. डॉक्टरांनी सांगितले की, 18 वर्षांची एक मुलगी तिच्या मैत्रिणींसह त्यांच्या क्लिनिकमध्ये आली होती. तिच्या पायात आणि मांडीत वेदना आणि सूज येत होती. तिला खूप अस्वस्थ वाटत होते. डॉक्टरांनी तिला कधीपासून मासिक पाळी सुरू झाली असे विचारले तेव्हा तिने सांगितले की घरी पूजा असल्यामुळे पिरियड्स थांबवण्यासाठी तिने काही हार्मोनल गोळ्या घेतल्या होत्या.
जेव्हा तिचे स्कॅन केले तेव्हा असे आढळले की तिला डीप व्हेन थ्रोम्बोसिसचा त्रास होत आहे आणि तिच्या नाभीजवळ रक्ताची गुठळी आहे. डॉक्टरांनी तिच्या वडिलांशी बोलून मुलीला दाखल करण्यास सांगितले. पण तिच्या वडिलांनी नकार दिला आणि रात्री 2 वाजता तीचा जीव गेला. डीप व्हेन थ्रोम्बोसिस ही एक वैद्यकीय स्थिती आहे जिथे डीप व्हेनमध्ये, सामान्यतः पायांमध्ये,शरीरामध्ये रक्ताची गुठळी तयार होते. हार्मोनल गोळ्या घेतल्यामुळे रक्त घट्ट होण्याची प्रक्रिया वेगाने होते, ज्यामुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होतात.
ही घटना फार महत्वाची आहे, कारण आता सण सुरू होणार आहेत. जन्माष्टमी, हरतालिका, गणेश चतुर्थी आणि गौरी आगमन हे चक्र ठरलेलं आहे. दरवर्षी ते याच चक्रानुसार त्या त्या तिथीला येतात. एव्हाना गणेश गौरी आगमनाची तयारी सगळ्या घरात जोराने सुरू झाली असेल. साफसफाईपासून ते गोडधोड बनवण्यापर्यंत सगळी कामं स्त्रियांच्या वाट्याला असतात. मात्र हे सगळं करत असतानाच मासिक पाळीचं एक टेन्शन या महिलांना सतावतं असतं आणि त्यातूनच मग अशा काही घटना घडतात.
शेजारच्या काकू आणि वहिनी यांचं बोलणं सुरु होतं…,
"सगळं होईपर्यंत तुला प्रॉब्लेम येणार नाही हे पहा बाई, आधीच गोळ्या घे. ऐनवेळी अडचण यायला नको".
सहसा मासिक पाळीला अडचण, प्रॉब्लेमच म्हटलं जातं. मी देखील तिथेच होते. त्यांना मी म्हटलं,
"काकू तुम्ही पाळीला प्रॉब्लेम का बरं म्हणता?"
त्यावर काकू म्हणाल्या,
"अगं बघ ना, सण-वार, समारंभात मध्येच जर का पाळी आली तर अशा देवाधर्माच्या कार्यात सहभागी होता येत नाही. म्हणजे तो प्रॉब्लेमच आहे ना."
मग मी त्यांना म्हटलं,
"बघा काकू, ज्याप्रमाणे गणपती आणि गौरी ठरलेल्या तिथीला येतात, त्याप्रमाणे पाळी देखील आपल्या ठरलेल्या दिवसाला येते. ज्याप्रमाणे तुम्ही त्यांच्या आगमनाची तयारी महिनाभरापासून करत आहात त्याचप्रमाणे आपलं शरीर देखील दर महिन्याला काही तयारी करत असतं ज्यामुळे आपल्याला पाळी येते.’’
मग काकू बोलल्या,
"हे सगळं ठीक आहे. पण तात्पुरतं त्या चार दिवसासाठी गोळ्या खाऊन पाळी पुढं मागं ढकलली तर एवढा काय फरक पडणार आहे?"
मग समजावणीच्या सुरात मी काकूंना म्हटलं,
"पाळी पुढे ढकलण्याच्या किंवा आधी येण्याच्या गोळ्या कशा काम करतात ते सांगते."
संबंधित लेख वाचा: 1) ‘मासिक पाळीमध्ये ‘अमुक-तमुक’ करा’ अशा बातम्यांपासून सावधान… ही सगळी मुर्ख बनवणारी लक्षणे! |
त्या चार दिवसासाठी गोळ्या खाऊन पाळी पुढं मागं ढकलली तर काय फरक पडणार आहे?
काकूंना माझं बोलणं पटत नव्हतं पण त्यांना हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. मी सुरु केलं, "स्त्रीच्या शरीरात गर्भाशयाच्या बाजूला दोन बिजाशयं असतात ज्यामध्ये असंख्य अशी स्त्रीबीज असतात. दर महिन्याला परिपक्व झालेलं एक स्त्रीबीज बिजवाहक नलिकेत येत असतं. त्याच काळात पुरुषबीज शरीरात आलं तर गर्भाशयात गर्भ राहतो. त्या गर्भाचे पालन-पोषण करण्यासाठी गर्भाशयात रक्तवाहिन्या आणि मांसपेशीचं जाड असं अस्तर तयार होत असतं. हे सर्व करण्यासाठी आपल्या मेंदूतून शरीरात प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन ही रसायनं दर महिन्याला पाठवली जातात. पण पुरुषबीज जर आलं नाही आणि ते स्त्री बीजाला भेटलं नाही तर गर्भ राहत नाही. गर्भधारणा राहिली नाही तर प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन यांचे प्रमाण कमी व्हायला लागतं आणि ते स्त्रीबीज आणि गर्भाशयातील अस्तर हे रक्तस्त्रावाच्या स्वरूपात बाहेर टाकलं जातं. यालाच मासिक पाळी म्हणतात.
म्हणजेच पाळी येण्यासाठी इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे खुप कामाचे असतात. पाळी पुढे ढकलण्याच्या, आधी येण्याच्या गोळ्यांमध्ये अशीच रसायने असतात. त्या गोळ्या घेतल्यामुळे शरीरातील नैसर्गिक रसायनांचा प्रभाव कमी केला जातो आणि एकप्रकारे शरीराला उल्लू बनवलं जातं. या गोळ्या वारंवार घेतल्याने शरीरात Harmonal Imbalance म्हणजेच रासायनिक असंतुलन होतं आणि पाळीमध्ये अनियमितता येते. पाळीचे वेगवेगळे आजार देखील सुरु होतात. आता काकू आणि वहिनी तुम्हीच मला सांगा या गोळ्या घेणं चांगलं आहे का?" त्यांना हे सगळं ऐकून धक्का बसलाय असं मला जाणवलं.
गौरी-गणपती ठरलेल्या तिथीला येतात, तशीच पाळी देखील ठरलेल्या दिवशी येते
स्त्रीरोगतज्ञ गौरी पिंप्राळकर म्हणतात "कोणत्याही गोळ्या घेण्याआधी पेशंटची हिस्ट्री महत्त्वाची असते. बाईला जर व्हर्टिगो, मायग्रेनचा त्रास असेल, आधी स्ट्रोक येऊन गेला असेल, हाय किंवा लो ब्लडप्रेशर असेल, वजन जास्त असेल तर या गोळ्यांचा त्या बाईला जास्त त्रास होऊ शकतो. सतत या गोळ्या वापरल्या तर रक्ताची गुठळी तयार होते. ती गुठळी मेंदूत किंवा हृदयात गेली तर Brain Stroke किंवा Heart Attack देखील येऊ शकतो."
हे सांगून मी काकूंना म्हणाले, "देव, सण, समारंभ सतत चालूच राहणार आहेत आणि कोणत्या न कोणत्या सणाच्या वेळी पाळी ही असणारच आहे. कितींदा गोळ्या घ्याल? जर ही सृष्टी देवाने निर्माण केलीय असं तुम्ही म्हणता, तर देवाला चालणार नाही अशी बाई आणि बाईची पाळी देवाने दिली असती का? पाळीचा आणि देवा धर्माचा कसलाही संबंध नाही. पाळी येणं म्हणजे निसर्गाचा शरीरधर्म आहे. त्याचाही तेवढाच आदर करायला हवा." 
आता मात्र काकूंना सगळं पटलं असं त्या म्हणाल्या. कदाचित वहिनींना हे आधीपासून पटत असावं पण काकूंच्या प्रथेपुढे कसं जायचं असं त्यांना वाटत असावं.
पाळी लांब ढकलण्याच्या गोळ्यांमध्ये नेमकं काय असतं?
वारंवार या गोळ्या घेणं चांगल नाही आहे. पण तुम्ही स्त्रीरोग तज्ञाकडे गेल्या आणि तुमची medical history आणि सगळ्या बाबी बघून तुम्हाला Recommend केलेल्या Tablet तुम्ही घेऊ शकतात. पण किती महिला, स्त्री रोग तज्ञाकडे जाऊन टॅब्लेट्स घेतात? सहसा मेडिकल स्टोअरवर गेल्यावर, पाळी लांब ढकलण्याच्या टॅबलेट द्या, असं म्हटलं की फार्मसिस्ट गोळयांचे पाकीट देतो. याचे काही साईड इफेक्ट आहे का हे विचारायला महिलांना वेळ नसतो, आणि या विषयी माहिती सांगण्यात फार्मसिस्ट यांचा काही नफा नसतो.
या सर्व गोळ्यांमध्ये नॉरएथिस्टरॉन हा घटक असतो. हे एक कृत्रिम प्रकारचे प्रोजेस्टेरॉन आहे. प्रोजेस्टेरॉनचे प्रमाण कृत्रिमरित्या वाढवले जात असल्याने, गर्भाशयातील अस्तर जास्त बनले जाते, त्यामुळे ते शरीरातून बाहेर टाकण्यासाठी साहजिकच जास्त रक्तस्त्राव होतो. पाळीच्या रक्तस्रावामध्ये गाठी पडण्याची शक्यता वाढते. याशिवाय, अशा गोळ्या घेतल्याने शरीरात इतरही दुष्परिणाम होऊ शकतात. काही महिलांना स्तनांमध्ये जडपणा येतो, स्तन दुखू लागतात किंवा त्यामध्ये ठणका निर्माण होतो. मळमळणे आणि उलट्या होणे हे देखील काही वेळा या गोळ्या घेतल्यावर अनुभवायला येते.
काही जणींना डोकेदुखी, चक्कर येणे, आणि पोटात दुखणे या समस्याही जाणवू शकतात. स्त्री शरीराची कार्यें सुरळीतपणे चालू राहण्यासाठी संप्रेरके, त्यांचे योग्य प्रमाण, त्यांचे संतुलित कार्य आवश्यक असते. पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्यांमुळे आपण त्या संप्रेरकांचा समतोल बिघडवतो. त्यामुळे चिडचिड , सतत बदलणारे मूड्स (मूड स्विंग्स), हळवेपणा ह्या गोष्टी अनुभवास येतात. जास्त वेळा या गोळ्या घेण्यात आल्या तर पाळीतील अनियमितता - तारखेच्या आधी किंवा तारीख उलटून गेल्यावर खूप दिवसांनी पाळी येणे, पाळी येऊन गेल्यावर सुद्धा अचानक मध्येच थोडा रक्तस्त्राव (स्पॉटिंग), अशक्तपणा, रक्तस्रावातील अनियमितता -कधी जास्त, कधी एकदम थोडा रक्तस्त्राव असा त्रास संभवतो.
बऱ्याचदा कोण काय बोलेल या Guilt मधून अनेक बाया या गोळ्या घेत असतात, यावर सोपा उपाय म्हणजे पाळी आलीय हे कुणाला सांगायचंच नाही. ज्या समजू शकणाऱ्या आहेत त्यांना हे नक्की समजावून सांगावं पण समजावून ही ऐकत नसतील तर मात्र गोळ्या घेऊन आयुष्यभरासाठी गंभीर आजार ओढवण्यापेक्षा थोडं लपवलेलं केव्हाही बरं. एक वेळ येईल जेव्हा सर्वांनाच यातील फोलपणा लक्षात येईल. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया!
(लेखिका "समाजबंध" संस्थेमध्ये आरोग्य संवादक म्हणून काम करतात)






