कर्नाटक राज्यातील गोकर्ण परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी 9 जुलै 2025 रोजी रमतीर्था हिल परिसरात तपासणी दरम्यान एका गुहेत राहणारी रशियन महिला आणि तिच्या दोन मुलींचा शोध लावला. प्रथमदर्शनी हा प्रकार ‘7 वर्षे गुहेत वास्तव्य’ असा समजला गेला, मात्र तपासात वेगळंच सत्य समोर आलं.
रशियन महिलेचा शोध कसा लागला?
गोकर्ण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक क्षीधर एसआर आणि त्यांची एक टीम पर्यटक सुरक्षित आहेत की नाही, हे तपासण्यासाठी रामतीर्थ डोंगरावर गस्त घालत होते. यावेळी सर्च ऑपरेशनदरम्यान त्यांना एका अतिशय धोकादायक अशा लँडस्लाईडजवळच्या गुहेत काही हालचाली दिसल्या. यानंतर एका नैसर्गिक तयार झालेल्या या गुहेत नीना नावाची रशियन महिला दोन मुलींसह राहत असल्याचे आढळले.
पोलीस दाखल होताच सुरुवातीला नीनाने कुठलीही ओळख दाखवण्यास नकार दिला. त्यानंतर महिला बालकल्याण विभागातील एका महिलेला बोलावून नीनाला बोलतं करण्यात आलं. यानंतर नीनाने सगळी माहिती सांगितली. तसेच नीनाने पासपोर्ट हरवल्याचे पोलिसांना सांगितलं. परंतु पोलिसांनी शोधाशोध केल्यास त्यांना नीनाचा पासपोर्टसह इतर महत्वाची कागदपत्र मिळाली. यावेळी नीनाचा व्हिसा 2017 रोजीच संपल्याचे दिसून आले.
कोण आहे ही महिला?
पोलिसांच्या माहितीनुसार, रशियाहून बिझनेस व्हिसावर भारतात आल्या. गोव्यामार्गे गोकर्ण शहर येथे पोहोचलेल्या नीना कुटीना उर्फ मोही यांच्यावर हिंदू धर्म आणि भारतीय आध्यात्मिक परंपरांचा खोलवर प्रभाव होता. त्यांनी घनदाट जंगल आणि उंच उतारांनी वेढलेल्या एका नैसर्गिक गुहेत एक साधे घर बांधले. सुरुवातीला ही महिला गेली 7 वर्षे गुहेत राहत असल्याची माहिती पसरली. मात्र तपासात स्पष्ट झाले की, ती केवळ सुमारे दोन आठवड्यांपूर्वी त्या गुहेत आली होती. मात्र ती भारतात 2016-17 पासून राहत होती. तिचा वीजा 2017 मध्येच संपला होता. ती गोव्यात अनेक वर्षे राहिली होती आणि नंतर गोकर्णच्या जंगलात आली.
जंगलातील सापांशीही मैत्रीपूर्ण संबंध...
नीना कुटीनाने पोलिसांना सांगितले की ती आणि तिच्या मुली "आध्यात्मिक साधने"साठी त्या ठिकाणी राहत होत्या. जंगलातील सापांशीही तिचे मैत्रीपूर्ण संबंध होते,असे तिने सांगितले. ती प्राचीन ऋषींप्रमाणे साधना करत होती आणि मुलींनाही त्याच वातावरणात वाढवत होती. नीनाचा वीजा 2017 मध्येच संपला असून ती अनधिकृतपणे भारतात राहत होती. त्यामुळे रशियन दुतावासाशी संपर्क करून तिच्या आणि तिच्या मुलींच्या परताव्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.






