- सविता चौहान
कोणत्याही क्रीडा स्पर्धांमुळे एकता वाढते, या स्पर्धा सन्मानाचं प्रतीकही असतं तसंच यामुळे लोकं एकत्र येतात, देश एकत्र येतात. जेव्हा एका देशाचा संघ दुसऱ्या देशाच्या संघाविरोधात खेळायला उतरतो तेव्हा त्या संघाकडे केवळ एक संघ म्हणून पाहिलं जातं. कोणत्या खेळाडूचा काय धर्म आहे, जात काय आहे याची चर्चा केली जात नाही. त्यामुळे खेळांनी एकता वाढवण्यात मोठं योगदान दिलं आहे असं म्हणता येऊ शकतं.
पण हेच खेळ आता जगात पर्यावरणाला घातक ठरत आहेत. ऑलिम्पिक, फिफा वर्ल्ड कप, आयपीएल इत्यादी मोठ्या स्पर्धा होतात तेव्हा लोक त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात. यातून अर्थव्यवस्थेला हातभार लागतोच पण अशा स्पर्धांमध्ये उर्जाही मोठ्या प्रमाणात वापरली जाते, ज्यातून लाखो टन कार्बन उत्सर्जीत होतो आणि कचऱ्याचे ढिगारेही. यामुळे हवामान बदलाचं संकट अधिक गंभीर होत चाललं आहे. यामुळे खेळाडूच नाहीतर सामान्य लोकही प्रभावित होत आहेत. 
भव्य क्रीडा स्पर्धांचा पर्यावरणावर कसा परिणाम होतो
‘द हिंदू’ मध्ये आलेल्या एका बातमीनुसार, आयपीएल स्पर्धेत एका सामन्यातच 10-14 हजार टन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित होतो. संपूर्ण आयोजनाच्या दरम्यान 7.5-9 लाख टन कार्बन उत्सर्जीत होतो. पर्यावरणासाठी ही घातक गोष्ट आहे. ‘अर्थ’ मध्ये आलेल्या बातमीनुसार एक क्रिकेट मैदान व्यवस्थित ठेवण्यासाठी आठवड्याला 3 लाख लीटर्स पर्यंत पाण्याची गरज भासते. उन्हाळ्यात याचं प्रमाण आणखी वाढतं. ही भीषण परिस्थिती आहे, कारण भारतात उन्हाळ्यात पाण्याचे स्त्रोत मोठ्या प्रमाणात आटतात आणि लोकांना पाण्यासाठी भटकावं लागतं.
संबंधित लेख वाचा ऐन उन्हाळ्यातली एक ‘त्यांची’ आयपीएल अन् एक खेड्यापाड्यातील आयपीएल अर्थात… ‘इंडियन परेशान लीग’! |
प्रत्येक सामन्यात मोठ्या प्रमाणात वीज वापरली जाते. बँगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियम मध्येच दरवर्षी 1.6 लाख युनिट वीज वापरली जाते. ज्यावर 14400 डॉलर्सचा खर्च होतो. वीजेचा खर्च जास्त वाटत असला तरीही कार्बन उत्सर्जनाचा मोठा भाग हा वाहन व्यवस्था आणि रसद पुरवठ्यातून होतो. 3.7 टक्के ग्रीनहाऊस गॅसेससाठी वाहने जबाबदार असतात. त्यामुळे त्यांच्यात बदल करणं गरजेचं आहे.
‘डी डब्लू’ मध्ये आलेल्या एका लेखानुसार, सर्वंच मोठ्या क्रीडा स्पर्धांमुळे पर्यावरणावर मोठा परिणाम घडतो. रशियात 2018 च्या विश्वकप स्पर्धेत 20 लाख टन कार्बन उत्सर्जीत झाला होता आणि 2016 च्या रियो ऑलिम्पिकमध्ये 45 लाख टन. प्रत्येक स्पर्धेच्या आयोजनानुसार याचं प्रमाण कमीजास्त होतं. ‘द गार्डीयन’च्या एका बातमीनुसार पर्यावरणीय समस्यांवर उपाय शोधण्यासाठी, फिफाने 2021 साली हवामान संकटाला सामोरं जाण्यासाठी आपल्याकडून एक अहवाल तयार केला होता.
त्यानुसार 2030 पर्यंत फिफाने कार्बन उत्सर्जनात 50 टक्के घट आणि 2024 पर्यंत शून्य उत्सर्जनाचं लक्ष्य समोर ठेवलं आहे. पण टिकाकार म्हणत आहेत की, या अहवालात फिफाची पारदर्शकता दिसून येत नाहीये. तसेच त्यांनी सुचवलेल्या उपायांमुळे पर्यावरणावरील प्रभाव कमी होण्याची शक्यता कमीच आहे. फिफाच्या आगामी स्पर्धेत 3.7 लाख टन कार्बन उत्सर्जन होण्याची शक्यता आहे जे आजवरचं सर्वाधिक उत्सर्जन ठरेल. या स्पर्धेसाठी जो प्रवास घडणार आहे त्यामुळे कार्बन उत्सर्जनात 85 टक्के वाढ होईल. त्यामुळे हे स्पष्ट होते की अशा स्पर्धांमुळे पर्यावरणावर किती गंभीर परिणाम पडत असतो.
खेळाडूंवरही कसा परिणाम होतो?
‘विश्व एथलेटीक्स’ मध्ये आलेल्या एका लेखानुसार, 89 देशांच्या खेळाडूंचे परिक्षण करण्यात आले ज्यात 80 टक्के खेळाडू हे पर्यावरणीय संकटांमुळे चिंतेत होते आणि अर्ध्याहून जास्त खेळाडूंनी सांगितलं की हवामान बदलामुळे त्यांच्यावरही थेट परिणाम होत आहे. ‘द गार्डीयन’ मध्ये आलेल्या बातमीनुसार भारतीय खेळाडू प्रज्ञा मोहन भारतातील उन्हाच्या त्रासामुळे युनायटेड किंगडमला प्रशिक्षणासाठी गेली. वाढत्या उन्हामुळे आपल्या खेळावर परिणाम होतोय याची चिंता तिने व्यक्त केली आहे. हवामान बदलाच्या संकटावर निश्चित उपाय शोधण्यात आला नाही तर ट्रायथॅलॉन सारखे खेळ संपुष्टात येतील असंही ती सांगते.
‘द वायर’ मध्ये आलेल्या एका वृत्तानुसार, आशियाई देशांमध्ये क्रिकेट अत्यंत लोकप्रिय खेळ आहे आणि क्रिकेट खेळणारे देश सध्या हवामान बदल उदा. उष्णतेच्या लाटा, वणवे, वादळ, दुष्काळ यांचा सामना करत आहेत. टेस्ट क्रिकेट पाच दिवस खेळलं जातं आणि त्यात खेळाडू जाडजूड पॅड, ग्लोव्ज घालतात व हेल्मेटही.
यामुळे हवेचा संचार रोखला जातो. क्रिकेट आणि हवामान बदल यांच्यावरील 2019 च्या अहवालात म्हटलं आहे की एक व्यावसायिक फलंदाज एक दिवसाच्या खेळात आपल्या शरीरात तेवढीच उष्णता निर्माण करतो जेवढी एक मॅराथॉन (42 किमी) धावणारा खेळाडू. त्यामुळे अनेक खेळाडूंना उन्हामुळे थकवा, तणाव, शुद्ध हरपणे, उलटी, जुलाब, श्वसनाचा त्रास जाणवतो. दुसरीकडे वाईट हवामानामुळे 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्स व गुजरात टायटन्स यांच्यातला आयपीएलचा अंतिम सामना, दोनदा रद्द करण्यात आला होता. 
भारतात खेळ आणि स्थैर्य
‘स्पोर्ट अँड डेव्हलपमेंट’ मध्ये आलेल्या लेखानुसार भारतात हवामान संकट वाढवणारी धोरणं अजूनही राबवली जात आहेत. बीसीसीआय तसेच बँगलोर एफसी इत्यादी संस्थांनी आपल्या परीनं या संकटावर मात देण्यासाठी काही उपाययोजना करण्याचं ठरवलं आहे, पण एकूण देशभरात याविषयी एकचएक योजना लागू झालेली नाही. आयपीएलने कचरा व्यवस्थापन तसेच उर्जाबचत याविषयी काम करणं सुरू केलं आहे. पण यात व्यापकता व स्थैर्य आलेलं दिसत नाही. उदा. लद्दाख फुटबॉल क्लबने स्पर्धा आणि पर्यावरण संरक्षण यासाठी क्लायमेट कप आयोजित केला होता. पण असे उपाय स्थानिक पातळीवरच दिसून येतात. देशात अनेक ठिकाणी क्रिकेट मैदानात साचलेलं पाणी साठवणं, सोलर पॅनेल लावणं, मैदानावरील गवत आणि मातीची देखभाल करताना पर्यावरण बिघडणार नाही याची काळजी घेणं यासाठी प्रयत्न करणं सुरू झालं आहे.
पुढचा रस्ता आणि सुधारणांसाठी उपाय
‘अर्थ’ मध्ये आलेल्या बातमीनुसार जगभरातील लोकांमध्ये हवामान बदलांविषयी जागरुकता वाढवण्यासाठी खेळ हे एक चांगलं माध्यम ठरू शकतं. मग त्यांची भौगोलिक परिस्थिती व सामाजिकता कोणतीही असू दे. खेळांशी संबंधित अब्जावधी लोकांना खेळाच्या माध्यमातूनच पर्यावरण संरक्षणाविषयी संदेश देता येऊ शकतो. ‘सेंटर फॉर स्पोर्ट्स’च्या अहवालानुसार सरकारी योजना, उद्योगसमूह, आर्थिक प्रोत्साहन आणि पर्यावरणीय जागृती यांचाही यात समावेश करता येऊ शकेल. खेळाडू देखील कचरा व्यवस्थापन, हरित उर्जेचा वापर, उर्जाबचत याविषयी लोकांना प्रेरीत करू शकतात. 
सार्वजनिक वाहतुकीचा वापर, रिसायकलिंग, इत्यादींद्वारेही मोठा बदल घडवून आणता येऊ शकतो. खेळ केवळ मनोरंजनाचं माध्यम नाही. समाजात जागरुकता आणि जबाबदारी निर्माण करण्याचं प्रतीकही आहे. साऱ्या जगावर हवामान बदलाचं संकट कोसळलं आहे. त्यामुळे खेळ जगतालाही पर्यावरण संरक्षणाची आपली जबाबदारी उचलावी लागणार आहे. यातून होणारं कार्बन उत्सर्जन, उर्जेची बर्बादी, नैसर्गिस संपदेचं नुकसान यावर आवाज उठवणं आता गरजेचं झालं आहे. ही प्रत्येक खेळाडूची, प्रेक्षकाची जबाबदारी आहे की त्यानं खेळांना पर्यावरणानुकूल बनवावं. पर्यावरण स्वच्छ असेल, सुरक्षित असेल तरच खेळ व खेळाडू सुरक्षित राहू शकतील.
(अनुवाद - प्रतिक पुरी. सौजन्य - फेमिनिजम इन इंडिया)






