- कोमल ठोंबरे
पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद पुन्हा सक्रिय झाल्याचे वृत्त आहे. भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील बहावलपूर येथील जैशचे मुख्यालय उद्ध्वस्त केले. ‘ऑपरेशन सिंदूर'दरम्यान भारताने पाकिस्तानात घुसून पाकिस्तानी अतिरेक्यांचे कंबरडे मोडल्यामुळे आणि 'जैश-ए-मोहम्मद' या अतिरेकी संघटनेचे तीन तेरा वाजवल्यामुळे या संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरच्या तळपायाची आग मस्तकात गेली आहे. आता, पाकिस्तानी सैन्याच्या आदेशानुसार, जैश पुन्हा एकदा संघटित होत असली तरी यावेळी या दहशतवादी संघटनेने आपल्या कार्यपद्धतीत महत्वाचे बदल केले आहेत. जैशने त्यांची पहिली महिला ब्रिगेड, “जमात-उल-मोमिनत” सुरू केली आहे.
महिला ब्रिगेडच्या नावाखाली जैशने 1500 दहशतवाद्यांची केली भरती
‘ऑपरेशन सिंदूर' या ऑपरेशनचं आणखी एक महत्त्व म्हणजे या मोहिमेत भारतीय लष्कराच्या लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी आणि भारतीय वायुसेनेच्या विंग कमांडर व्योमिका सिंह यांचाही त्यात सहभाग होता. या मोहिमेची सारी माहिती पत्रकार परिषदेद्वारे त्यांनीच दिली होती. यामुळेही मसूद अजहरच्या नाकाला मिरच्या झोंबल्या आहेत. या साऱ्या प्रकरणातून 'धडा' घेतल्यामुळे मसूद अजहरनं आता पाकिस्तानच्या प्रत्येक जिल्ह्यात महिला दहशतवादी आणि त्यांचं केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जैश-ए-मोहम्मदतर्फे महिलांना दहशतवादचं प्रशिक्षणही दिलं जाणार आहे. पाकिस्तानातील अधिकाधिक महिलांनी दहशतवादाकडे वळावं यासाठी त्यानं महिलांना प्रलोभनही दाखवलं आहे. त्याचं म्हणणं आहे, ज्या पाकिस्तानी महिला दहशतवादी केंद्राच्या सदस्य बनतील आणि शस्त्रं हातात घेतील त्यांना 'जन्नत' मिळेल.
मसूद अजहरच्या योजनेनुसार पाकिस्तानात आता प्रत्येक जिल्ह्यात महिला दहशतवादाचं एक केंद्र असेल आणि या केंद्राची एक प्रमुख असेल. स्थानिक महिलांना या दहशतवादी केंद्रात महिलांना भरती करण्याचे अधिकार या महिला प्रमुखाकडे असेल. त्यासाठीचे नियमही अतिशय कडक असतील. या 'ब्रिगेड'मध्ये सामील महिलांनी फोन किंवा मेसेंजरवर कोणत्याही अनोळखी पुरुषाशी बोलायचं नाही, असा नियम आहे. पुरुष आणि महिला लढवय्ये एकत्र काम करतील आणि संपूर्ण जगात इस्लाम पसरवतील, अशी मसूदची योजना आहे.
‘’ज्या पाकिस्तानी महिला दहशतवादी बनतील त्यांना 'जन्नत' मिळेल’’
मसूद अजहरनं त्यासाठी 21 मिनिटांचा ऑडिओ जारी केला आहे. त्यात महिलांची भरती, ट्रेनिंग आणि 'ग्लोबल जिहाद'साठी त्यांचा वापर करण्याचा संपूर्ण प्लॅन स्पष्ट केला आहे. या युनिटचं नेतृत्व मसूदची बहीण सादिया अजहर करत आहे. सादियाचा नवरा युसूफ अजहर 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूरदरम्यान ठार झाला होता. भारतानं ऑपरेशन सिंदूरदरम्यान बहावलपूरमधल्या एका दहशतवादी केंद्राला लक्ष्य केलं होतं, जिथे अनेक दहशतवादी लपलेले होते.
अजहरच्या म्हणण्याप्रमाणे पुरुषांसाठी जसा 'दौरा-ए-तरबियत' कोर्स असतो, तसंच महिलांसाठी पहिला कोर्स 'दौरा-ए-तस्किया' असेल. बहावलपूरच्या केंद्रात महिलांना दहशतवादाचं आणि इतर प्रशिक्षण दिलं जाईल. दुसरा टप्पा 'दौरा-आयत-उल-निसाह' असेल, ज्यात महिलांना जिहाद करण्याची पद्धत शिकवली जाईल. हा कोर्स गेल्या 20 वर्षांपासून पुरुषांना जिहादसाठी तयार करतो, ज्यात भारताविरुद्ध लढून मृत्यू आल्यास जन्नत मिळण्याचं आश्वासन दिलं जातं. आता महिलांनाही हेच शिकवलं जाणार आहे.
जिहादसाठी महिलांचा वापर का केला जातो?
अलिकडच्या काळात स्त्रियांचा दहशतवादी कारवायांमध्ये वाढता सहभाग चिंताजनक आहे. स्त्रियांना 'ब्रेनवॉश' करून, त्यांच्या भावनांचा फायदा घेऊन, किंवा बदला घेण्याच्या इच्छेचा वापर करून आत्मघातकी हल्ल्यांसाठी तयार केले जाते. जगभरातील अनेक दहशतवादी संघटनांनी स्त्रियांचा वापर केला आहे, जसे की एलटीटीई, बोको हराम, इसिस आणि चेचन्यातील ब्लॅक विडो. 'आयसिस' आणि 'बोको हराम'सारख्या संघटना महिलांचा वापर आत्मघाती हल्ल्यांसाठी करतात, पण जैश ए मोहम्मद, लष्कर आणि हिजबुलसारख्या संघटनांनी याआधी असं केलं नव्हतं. पण मसूदला आताच 'महिला दहशतवादी' तयार करण्याचं सुचलं, याचं कारण 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये असलेला महिलांचा सहभाग !
एखादी स्त्री दहशतवादी हल्ला घडवते, तेव्हा त्या घटनेकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन वेगळा असतो. समाजात सहानुभूती, आश्चर्य, भीती आणि मानसिक धक्का अशा अनेक भावना निर्माण करण्यात महिला दहशतवादी जास्त यशस्वी होतात. अशा घटनांना प्रसारमाध्यमांमध्ये मिळणारी प्रसिद्धी खूप जास्त असते. या विषयीची चर्चा दीर्घकाळ चालणारी असते. दहशतवादी संघटनेला तेच हवे असते. इथेच त्यांची अर्धी लढाई जिंकलेली असते. त्यासाठीच महिलांना दहशतवादी आपल्या संघटनेत सहभागी करून घेतात. इ.स. 1985 ते 2006 या दरम्यान झालेल्या एकूण दहशतवादी हल्ल्यांपैकी 15 टक्के हल्ले घडवणार्या स्त्रिया होत्या.
श्रीलंकेतील लिबरेशन टायगर फॉर तमिळ ईलम (एलटीटीई), पॅलेस्टाईनची अल अकसा मार्टीयर ब्रिगेड, नायजेरियाची बोको हराम, इस्लामिक स्टेट ऑफ सीरिया अँड लेवांत (इसिस), सोमालियाची अल शबाब यांसारख्या संघटनांनी स्त्रियांना दहशतवादी कारवायांमध्ये 'वापरून' घेतले आहे. चेचन्यातील 'ब्लॅक विडो' संघटना देखील यासाठी प्रसिद्ध आहे.
साधारणपणे 1970 नंतर मोठ्या दहशतवादी कृत्यात स्त्रियांचा सक्रिय सहभाग आढळून येतो. पहिली महिला आत्मघातकी दहशतवादी साना मेहदली ही मानली जाते. ती सिरीयन सोशल नॅशनॅलिस्ट पार्टीची सदस्य होती. तिने 9 एप्रिल 1985 रोजी लेबनॉनमध्ये इस्रायली सैनिकांच्या तुकडीवर स्फोटकांनी भरलेल्या गाडीने हल्ला केला होता. ह्यात इतिहासात महत्त्वाचा उल्लेख येतो तो लैला खालेद ह्या स्त्रीचा. ही पॉप्युलर फ्रंट फॉर दी लिबरेशन ऑफ पॅलेस्टाइनची सदस्य होती. 1969 मध्ये ती रोमहून (इटली) तेल अवीवला (इस्रायल) जाणार्या ट्रान्स वर्ल्ड एअरलाइन्स फ्लाइट 840 चे अपहरण करण्यात सहभागी झाली होती. महिला विध्वंस घडवून आणू शकतात हे अजून जगाला स्वीकारणे कठीणच जात होते. इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्या वादात इस्लामी दहशतवाद मोठ्या प्रमाणात वाढला. हमासने सुरुवातीला स्त्रियांना सहभागी करून घ्यायला नकार दिला होता. पण नंतर मात्र स्त्रियांना भरती करणे, प्रशिक्षण देणे आणि प्रत्यक्ष हल्ला करणे सुरू केले.
दहशतवादी स्त्रिया - काही केस स्टडीज
एकूणच स्त्रिया ह्या भावनिक कारणांमुळे दहशतवादाचा मार्ग स्वीकारतात. कुटुंबातील शोषण हेसुद्धा एक कारण आहे. पारंपरिक कुटुंबात पुरुषप्रधान व्यवस्थेचे, संस्कृतीचे अवास्तव स्तोम असणे, तसेच कुटुंबातील पुरुषांकडून होणारी पिळवणूक ह्यामुळे स्त्रिया आत्मघाताला प्रवृत्त होतात, असे पॅलेस्टिनी स्त्रियांचा अभ्यास करताना आढळले. भारताचा विचार केल्यास काश्मीरमध्ये असिया अंदराबी हिने ‘दुखतरान-इ-मिल्लत’ ही इस्लामी स्त्रियांची फुटीरतावादी संघटना सुरू केली होती. काश्मीरला भारतापासून स्वतंत्र करणे हे त्यांचे ध्येय होते. त्यांच्या देशद्रोही कारवायांमुळे त्यावर भारत सरकारने 2018 पासून बंदी घातलेली आहे.
साना मेह्द्ली हिने 9 एप्रिल 1985 रोजी लेबेनॉनमध्ये इस्रायली सैनिकांच्या तुकडीवर स्वत:सह स्फोटकांच्या गाडीने हल्ला चढवला. त्याआधी तयार केलेल्या व्हिडिओमध्ये ती म्हणते, “माझ्या मातृभूमीसाठी, माझ्या लोकांसाठी हे कर्तव्य पार पाडले.” पॅलेस्टिनी जनतेला आणि तिला स्वत:ला हलाखीत जगावे लागले, ह्याचे कारण इस्रायल आहे असे ती मानते.
मुरीयल डेगॉक ही बेल्जियमची कॅथलिक ख्रिश्चन स्त्री आपल्या मुस्लीम पतीसाठी धर्मांतर करून आधी मुस्लीम आणि नंतर आत्मघातकी दहशतवादी बनली. तिने बगदादमध्ये 2005 मध्ये कार बाँबचा स्फोट घडवत मरण पत्करले.
झेर्मा मुझहाखोयेवा ही चेचन्याची दहशतवादी होती. तिच्याजवळचा बाँब वेळेवर फुटला नाही, त्यामुळे तिला पोलिसांनी अटक केली. तिचे वैयक्तिक आयुष्य खूप कष्टात गेले. पंधराव्या वर्षी गर्भारपण, रशियन सैन्याने प्रियकराला ठार करणे, सासरच्या लोकांकडून छळ इत्यादी. एका गटाकडून ती पैसे उसने घेऊ लागली. त्यांनी तिला सगळे कर्ज फेडण्यासाठी भरपूर रक्कम देऊ केली, त्याच्या मोबदल्यात तिला दहशतवादाला प्रवृत्त केले.
वफा इद्रिस ही पॅलेस्टाइनच्या निर्वासित छावणीत लहानाची मोठी झाली. नंतर विवाह, मृत अर्भकाला जन्म, कधीही पुन्हा मातृत्व मिळणार नाही ह्यावर वैद्यकीय शिक्कामोर्तब, मग पतीने टाकून देणे, विवाहात अपयश, मग माहेरी परत ह्या पूर्णत: वैयक्तिक समस्यांचा तोडगा मानसिक स्तरावर काढता न आल्यामुळे तिची सतत वैफल्यग्रस्त अवस्था होती. नंतर स्वत:ला समाजात सिद्ध करण्यासाठी काहीतरी करून दाखवण्याची मानसिक गरज तीव्र होत गेली. इस्रायलचा रागही तिच्या मनात होताच. अल अक्सा मार्तीयार ब्रिगेडने तिचा उपयोग करून घेतला. तिने 27 जानेवारी 2002 रोजी जेरुसलेममध्ये आत्मघातकी हल्ला चढवला.
आयात अखरास ही बेथलहेमजवळच्या देहैशे निर्वासितांच्या छावणीत वाढली होती. 1987मध्ये पहिला इंतिफदा सुरू झाला, तेव्हा तिच्या भावाला तुरुंगवास भोगावा लागला, कारण त्याने इस्रायली सैनिकांवर हल्ला केला होता. दुसर्या इंतिफदाच्या वेळी इस्रायली डिफेन्स फोर्सकडून तिच्या कुटुंबातील काही जण जखमी झाले, तर काही ठार झाले. तिच्यासमोर तिच्या शेजारचा मित्र ठार झाला. ह्यानंतर तिने सूडाच्या भावनेतून स्वत:ला स्फोटकांनी जेरुसलेम तेथे उडवून दिले. शिवाय, इस्रायली गुप्तचर अहवालाप्रमाणे आयात ही विवाहापूर्वी फताहच्या एका सदस्यापासून गर्भवती होती. परिणामी समाजाच्या भीतीमुळे तिने ‘आत्मघातकी दहशतवादी’ बनून पळवाट शोधली.






