- संजना खंडारे
गारठलेल्या मध्यरात्री मंदिराच्या प्राकारात हार्मोनियमचे सूर उमटले, पखवाजावर थाप पडली व झांजेने ताल धरला की दशावतारप्रेमींच्या हृदयातील तारा झंकारतात आणि रंगमंचावर प्रतिसृष्टी अवतरते. मध्यभागी एक बाकडे, त्याच्या मागे एकच पडदा व समोर मोजकेच माइक, बल्ब इतकाच काय तो नेपथ्याचा सरंजाम. मग गणपती, सरस्वती, ब्राह्मण, ब्रह्मदेव, शंखासुर व महाविष्णू येतात. याला 'आड-दशावतार' म्हणतात. त्यानंतर नाटक स्वरूपात 'आख्यान' होते व पहाटे दहीकाल्याने समाप्ती. 'दशावतारी जत्रा' म्हणतात ती हीच. पारंपरिक दशावतार नाट्यकलेचा हा ठेवा 800 वर्षे जुना आहे.
महाराष्ट्राच्या याच दशावतार परंपेरवरचा एक बहूचर्चित मराठी सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय. 'दशावतार' चित्रपटाचं पोस्टर, त्याचा पहिला लूक आणि चित्रपटातील पहिलंच गाणं “आवशीचो घो” यांनी आधीच रसिकांच्या मनात तुफान उत्सुकता निर्माण केला आहे. प्रेक्षकांची ही उत्कंठा शिगेला पोहोचली असतानाच ‘दशावतार' या चित्रपटाचा भव्य ट्रेलर एका शानदार समारंभात नुकताच प्रदर्शित करण्यात आला.
झी स्टुडिओजची प्रस्तुती, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊसची निर्मिती असलेला ‘दशावतार' चित्रपट मराठी चित्रसृष्टीत एक नवी झळाळी घेऊन अवतरत आहे. महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणात गणेशोत्सवाचं महत्त्व सर्वाधिक आहे. या गणेशोत्सवाप्रमाणेच कोकणात दशावतार ही कलापरंपरा तितकीच महत्त्वाची आहे. म्हणूनच येत्या गणेशोत्सवाच्या पाठोपाठ अवघ्या महाराष्ट्रात ‘दशावतार‘ चं मोठ्या दिमाखात आगमन होत आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर अशी मराठी चित्रपटातील दिग्गज कलाकारांची फौज असलेला हा मल्टीस्टारर ‘दशावतार ‘ येत्या 12 सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.
‘दशावतार’मध्ये फक्त पुरुष कलाकारांचीच मक्तेदारी का?
मात्र या लेखातून आपण 'दशावतार' या सिनेमावर भाष्य करणार नाही, दशावतार या पारंपरिक लोककलेवर चर्चा करणार नाही तर आपण इथे बोलणार आहोत दशावतार कलेतील लिंगभेदाबद्दल… तब्बल 800 वर्षांची परपंरा असलेल्या दशावतारात महिला कलाकार का नाहीत याबद्दल… ठसठशीत मेकअप, जड मुखवटे ल्यायलेली पात्रे, पौराणिक कथांवर आधारित नाटक ही वैशिष्ट्ये असलेले दशावताराचे खेळ हे खास कोकणाचं, त्यातही तळकोकणाचं वैशिष्ट्य. गावागावांमधल्या यात्रा असोत वा देवीचे उत्सव, दशावतार या त्याचा अविभाज्य भाग. अनेक शतकांची परंपरा असलेल्या या लोककलेमध्ये मक्तेदारी मात्र पुरुष कलावंतांचीच असते.
ज्या देशाच्या राष्ट्रपती ‘सुखोई’सारख्या अत्याधुनिक लढाऊ विमानात प्रवास करतात, त्याच देशाच्या कोल्हापूरसारख्या एका भागात महालक्ष्मी मंदिराच्या गाभा-यात महिलांना प्रवेश नाकारला जातो हे फक्त भारतातच घडू शकतं. ‘दार उघड बया दार उघड’ असं या देशाच्या महिलांना अंबामातेला साकडं घालावं लागतं, त्यासाठी पुरोहितांची मनधरणी करावी लागते, निकराचा लढा द्यावा लागतो आणि त्यानंतरच त्यांना मंदिराचे दार उघडले जाते. ही या देशाची शोकांतिका आहे.
संबंधित लेख वाचा: 1) दशावतारात आता फक्त ‘धटिंगण’च नाही तर महिला कलावंतही… |
या देशात अशी अनेक मंदिरे आहेत, ज्यांत एका विशिष्ट मर्यादेपुढे स्त्रियांना प्रवेश नाकारला जातो. यावर अनेकदा चर्चा झाल्या, आंदोलने झाली, कायद्याचा बडगा उगारून झाला, जनजागृती झाली. मात्र, धर्मांधतेने आंधळ्या झालेल्या इथल्या ‘मनुवादी’ पुरुषी मानसिकतेत अद्यापही बदल होण्यास तयार नाही ही खरोखरच लाजिरवाणी बाब आहे.
मंदिर परिसरातील विधिनाट्यांत महिलांना मज्जाव
हा प्रश्न फक्त मंदिरांबाबत नसून मंदिरांच्या परिसरात सादर केल्या जाणाऱ्या विधिनाट्यांच्या, लोककलांच्या बाबतीत देखील आहे. दक्षिणेतल्या अनेक मंदिरांमध्ये देवदास आाणि देवदासींची प्रथा होती, त्यातून अनेक कलांचा उगम झाला. काही शास्त्रीय कला म्हणून गौरविल्या गेल्या, तर काही लोककला म्हणून सादर होऊ लागल्या.
कीर्तन, भारूड, लळित, रणमाने, ढालो अशा अनेक लोककलांचा उगम हा मंदिर परिसरातूनच झाला आहे आणि त्यांतीलच एका लोककलेचा प्रकार म्हणजे दशावतार. ‘खेळता नेटके दशावतारी धटिंगण’ असा शब्दप्रयोग समर्थ रामदासांनी वापरला आहे. यातील ‘धटिंगण’ म्हणजे पुरुष मंडळी. थोडक्यात सांगायचे झाले तर मंदिर परिसरातही जी विधिनाट्ये सादर केली जात होती, ती फक्त पुरुष कलाकारांकडूनच. तिथेही स्त्रियांना आपली कला सादर करण्यास मज्जावच होता.
फार पूर्वी गिरगावमध्ये प्रसिद्ध दशावतारी कलावंत बाबी नालंग यांनी दशावतारात स्त्री भूमिका एका महिला कलाकारालाच देण्याचा धाडसी प्रयोग केला होता. मात्र, त्या वेळी प्रेक्षकांनी त्याची भरपूर टिंगलटवाळी केली होती. पुढे मामा मोचेमाडकर यांनी कोकणातील खानावली येथे ऐनवेळी पुरुष कलाकारांनी दगा दिल्याने गोव्याच्या भाविणींना घेऊन दशावतार सादर केला होता. हे दोन प्रयोग वगळता दशावतारात महिलांना स्थान मिळण्याचे प्रमाण अगदीच अल्प आहे.
दशावतार खेळातील पुरुषांची मक्तेदारी मोडण्याचा महिलांचा प्रयत्न
मात्र आता काही प्रमाणात का होईना परंतू परिस्थिती बदलत चालली आहे. दशावतार खेळातील पुरुषांची हीच मक्तेदारी मोडून काढत आज अनेक महिलाही या कलाप्रकाराकडे वळल्या आहेत. केवळ महिला कलावंत असे दशावतारी मंडळ उदयास येत असून पुरुषांसह महिलांनाही या कलेचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यासाठी थोडके का होईना, पण प्रयत्न सुरू झाले आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, कणकवली, कुडाळ, मालवण, देवगड, वेंगुर्ला आदी भागांत अनेक दशावतारी मंडळे आहेत. तळकोकणात सुमारे 800 ते 900 दशावतारी कलाकार आहेत. गेल्या पाच वर्षांत मात्र केवळ महिला दशावतारी कलाकारांची 3-4 मंडळे या भागात उभी राहिली आहेत. यामध्ये 25-30 महिला कलावंत आपली कला सादर करत आहेत.
या सगळ्या प्रकाराला छेद देण्याचा प्रयत्न केला तो ‘दशावतार’मध्ये डॉक्टरेट मिळविणाऱ्या आणि स्वत: अस्सल दशावतार सादर करणाऱ्या डॉ. तुलसी बेहरे यांनी. आज जरी लोककलेचे गाढे अभ्यासक डॉ. तुलसी बेहरे हयात नसले तरी त्यांनी फक्त महिलांचा दशावतार सादर करण्याचा एक क्रांतिकारक निर्णय काही वर्षांपूर्वी अमलात आणला होता.
या कारणांसाठी दशावतारात महिलांना सामावून घेतले गेले नाही…
दशावतार हा ग्रामदेवतेचा धार्मिक विधी आहे. दशावतारात स्त्रियांना मज्जाव करण्यामागचे मुख्य कारण ‘मासिक पाळी’ असे दिले जाते. बेहरेंनी मात्र त्याला महत्त्व दिले नाही. ते म्हणायचे की, ग्रामविधी म्हणून यात्रा-जत्रांच्या काळात दशावतार सादर केला जातो. मात्र, गोंधळ-जागरणासारख्या लोककलांना ज्याप्रमाणे परंपरेचे भान ठेवावे लागते तसेच ते दशावतार सादर करणाऱ्या मंडळींनाही ठेवावे लागते. या परंपरेनुसार दशावतार कधीही सादर करता येत नाही.
तुळशीचे लग्न म्हणजे कार्तिक शुद्ध द्वादशी ते महाशिवरात्र या कालावधीतच दशावतार सादर करता येतो. तुळशीचे लग्न पार पडले की मग तळकोकणात दशावतार सादर करणा-या मंडळींचे दशावताराचे पारंपरिक पेटारे वेशीबाहेर पडतात. आज ही जत्रा, उद्या ती जत्रा, असा या मंडळींचा महाशिवरात्रीपर्यंत प्रवास सुरू असतो. जवळपास सहा महिने दशावतारी मंडळी घराबाहेर असतात आणि म्हणूनच स्त्रियांना दशावतारात काम करण्यास मज्जाव असावा, असा तर्क बेहरे यांनी मांडला होता.
पूर्वी दशावताराचे प्रयोग कुठेही उघड्यावर, माळरानावर व्हायचे. अगदी गुरांचा गोठा ही कपडे बदलण्याची जागा असायची. त्यामुळे दशावतारी मंडळींना महिलांना सामावून घेणे शक्य नसायचे; परंतु आता परिस्थिती बदललेली आहे. आता स्त्रियांना दशावतारात सामावून घेणे शक्य आहे.
महिला दशावताराचा खेळ सर्वप्रथम कुठे झाला?
तुलसी बेहरे यांनी मात्र काही वर्षांपूर्वी सर्व महिला कलाकारांना घेऊन दशावतार सादर केला आणि त्याला प्रचंड दाद मिळाली. मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीतील मुलींना घेऊन बेहरे यांनी ‘गरुडजन्म’ हा महिला दशावताराचा खेळ सादर केला होता. संवादासकट युद्धनृत्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी मुलींनी इतके सराईतपणे काम केले की कुठेही रसास्वादात बाधा येत नव्हती. याचे सारे श्रेय तुलसी बेहरे यांना जाते.
महिलांचा दशावतार सादर करण्यासाठी बेहरे यांनी अगदी बारकाईने अभ्यास केला. सर्वप्रथम त्यांनी दशावताराच्या खेळाची लांबी कमी केली. दशावतार किमान सहा तासांपर्यंत चालतो आणि इतका स्टॅमिना महिला कलावंतांमध्ये असणे शक्य नसल्याने बेहरे यांनी हा खेळ दीड तासावर आणला. त्यापूर्वी बेहरे यांनी सर्व मुलींना घेऊन संशोधन दौरा केला. दशावताराचा मेकअप, संगीत यांची अगदी उत्तम प्रकारे माहिती करून दिली. 
स्वाती कांबळे या महिला दशावतारी कलाकार आहेत. त्या सांगतात की, मोकळ्यावरील प्रयोग, उत्स्फूर्त परफॉर्मन्स ही सर्वच लोककलाप्रकारांप्रमाणे दशावताराचीही वैशिष्ट्ये. ‘प्रॉपर्टी’च्या पेट्या डोक्यावर घेऊन गावोगावच्या यात्रांना हजेरी लावणे, तबला-पेटी- झांजा यांसारख्या दमदार वाद्यांच्या साथीने खड्या आवाजातील संवाद हा दशावताराचा महत्त्वाचा भाग. मात्र बायकांचा आवाज काहीसा कोमल असल्याने त्याला मर्यादा पडत असल्याचे मत महिला कलावंत मांडतात. बहुधा त्यामुळेच, मराठमोळ्या, रांगड्या दशावतारामध्ये रंगमंचावर महिला कलाकारांचा प्रवेश काहीसा उशिराच झाला.
सध्या किती महिला दशावतार मंडळे आहेत?
गेल्या काही वर्षांत महिला दशावतारी मंडळांची संख्या वाढत आहे. एवढेच नव्हे, तर पथनाट्ये वगैरे अन्य माध्यमात काम करणाऱ्या महिला कलावंतांमध्येही दशावतार या कलाप्रकाराबद्दल उत्सुकता वाढत आहे. दोन वर्षांपूर्वी इंडियन नॅशनल थिएटर (आयएनटी) आणि राज्य सरकारचे सांस्कृतिक कलासंचलनालय यांनी सावंतवाडी येथे दशावताराच्या कलावंतांसाठी विशेष निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये पुरुष तसेच महिला कलाकारांचाही सहभाग होता.
‘दशावताराच्या पारंपरिक प्रयोगांमध्ये सर्व पुरुष कलावंत असल्याने स्त्रीभूमिकाही पुरुष करतात. याउलट केवळ महिलांच्या मंडळांमध्ये पुरुष भूमिका महिला करतात. मात्र पुरुष व महिला कलावंतांनी मिळून प्रयोग केल्यास एक नाट्यप्रयोग म्हणून दशावताराचा अधिक चांगला प्रयोग सादर करता येऊ शकतो. या विचाराने महिला-पुरुष कलावंतांसाठी या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते.
ओमप्रकाश चव्हाण, बाबी नालंग यांसारके नामवंत दशावतारी कलाकार या शिबिरात प्रशिक्षण देण्यासाठी आले होते. महिला आणि पुरुष यांच्या आवाजाचा पोत भिन्न असतो, देहबोलीमध्ये फरक असतो, तो लक्षात घेऊन ते-ते पैराणिक पात्र रंगमंचावर सादर करणे महत्त्वाचे असते, हा फरक महिला कलावंतांना आवर्जून ध्यानात घ्यावा लागतो, असे दशावतारात काम करणाऱ्या स्वाती कांबळे यांनी सांगितले.
दशावताराची तुलना कर्नाटकातल्या यक्षगानाशी केली जाते. मात्र, यक्षगान आणि दशावतारामधला सगळ्यांत महत्त्वाचा फरक म्हणजे, यक्षगानामध्ये मेकअप हा दुस-यांकडून करून घेतला जातो तर दशावतारामध्ये कलाकारांना स्वत:चा मेकअप स्वत:लाच करावा लागतो. हे अवघड काम या मुलींनी आता अगदी सहज स्वीकारले आणि त्यात त्या तरबेजही झाल्या. जग इतके पुढे गेले असताना आणि महिलांनी सगळेच क्षेत्र पादक्रांत केले असताना आता लोककलांसारख्या क्षेत्रातही महिलांना मानाचे स्थान मिळायलाच हवे.
कोकणच्या मातीचे वैशिष्ट्य असलेला हा कलाप्रकार संपूर्ण राज्यभरात, विशेषतः शहरांत पोहोचायला हवा, लोकाश्रय मिळाला, तरच दशावतार व्यावसायिकदृष्ट्या पुढे येईल. त्यासाठी महिला कलावंतांचा सहभाग महत्त्वाचा आहे. संगीत नाटके वा अन्य नाट्यप्रयोग यांमध्ये कित्येक दशकापूर्वीच ‘स्त्री पार्टी’किंवा स्त्रीभूमिका करणाऱ्या पुरुष अभिनेत्यांची जागा महिला अभिनेत्रींनी घेतली. आता काहीशा उशिराने का होईना, पण दशावतारासारख्या पारंपरिक कलाप्रकारात महिलांच्या झालेल्या रंगमंच प्रवेशाचे स्वागत करायलाच हवे.






