- संजना खंडारे
मागील काही महिन्यांत देशभरात हवामान बदलाचे तीव्र परिणाम स्पष्ट दिसत आहेत. काही भागांत अवकाळी आणि मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण केली आणि शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मागील काही वर्षांमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे लोकांच्या आरोग्यावरही परिणाम जाणवतोय. या सगळ्या संकटांचा सर्वाधिक फटका नेहमीच ग्रामीण भागाला बसतो. अशा परिस्थितीत हवामान बदलाचा सामना करण्यासाठी स्थानिक पातळीवर महिलांना केंद्रस्थानी ठेवणे हा खरा शाश्वत उपाय आहे, असा ठाम निष्कर्ष मुबंईत झालेल्या एका राष्ट्रीय चर्चासत्रातून निघाला.
‘लिंगभाव आणि हवामान बदल’ (Gender & Climate change) या विषयावर आयोजित चर्चासत्रात महिला पंचायत प्रतिनिधींना अधिक सक्षम बनवणे, ग्रामपंचायतींमध्ये महिलाकेंद्रित सभा भरवणे, स्थानिक अर्थसंकल्पात हवामान बदलाशी संबंधित निधी राखून ठेवणे आणि पंचायत सदस्यांचे कौशल्य विकसित करणे या महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चासत्रात भर टाकण्यात आली.
यशवंतराव चव्हाण केंद्र, रिसोर्स अँड सपोर्ट सेंटर फॉर डेव्हलपमेंट (आरएससीडी) आणि असर सोशल इम्पॅक्ट अॅडव्हायजर्स यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बुधवारी झाला. महाराष्ट्र, झारखंड आणि कर्नाटकमधील महिला प्रतिनिधींसह हवामान बदलासंदर्भात काम करणारे संशोधक, टाटा इन्स्टिटूट ऑफ सोशल सायन्स मधील 'महिला आणि लिंगभाव' या विषयात शिक्षण घेणारे विद्यार्थी, बाईमाणूस मीडिया रिसर्च फाऊंडेशन आणि हवामान बदलावर काम करणाऱ्या विविध संस्था या चर्चासत्रामध्ये सहभागी झाल्या होत्या.
(खासदार सुप्रिया सुळे)
"हवामान बदल हा राष्ट्रीय मोहिमेचा विषय" - सुप्रिया सुळे
या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रमुख पाहुण्या म्हणून आपले मनोगत मांडताना स्पष्ट केले की, "हवामान बदल हा पक्षीय राजकारणाचा विषय नसून आता याच्याकडे राष्ट्रीय मोहिम म्हणून पाहण्याची वेळ आली आहे. भारताने विविध कृती आराखडे तयार केले आहेत, मात्र खरी कसोटी ही त्यांच्या अंमलबजावणीची आहे. आपण राजकीय मतभेदांपलीकडे जाऊन हवामान बदलाविरुद्धची लढाई राष्ट्रीय मोहिमेत रूपांतरित केली तरच खरा बदल घडेल. या चर्चासत्रात निघालेले मुद्दे मी केंद्र सरकारपर्यंत पोहोचवेन,” असेही त्या म्हणाल्या.
महाराष्ट्र शासनाच्या राज्य हवामानबदल कृती कक्षाचे संचालक अभिजित घोरपडे यांनीही स्थानिक पातळीवरील अनुभव मांडले. मागील काही वर्षांत अतिवृष्टी, दुष्काळ, उष्णतेच्या लाटा यांसारख्या हवामान बदलाच्या घटनांनी ग्रामीण समाजावर मोठे परिणाम केले असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. "शेती, पाणी आणि वनक्षेत्रात महिलांच्या नेतृत्वाखाली सक्षम कार्यपद्धती उभ्या केल्या तर हे संकट कमी करता येईल", असे ते म्हणाले.
संबंधित लेख वाचा: हवामान बदल आणि प्रशासनातील त्रुटीमुळे ‘ओला दुष्काळ’ ही नवीन संज्ञा मराठवाड्यात कशी जन्माला आली…? |
गावपातळीवरील महिला सरपंचांचे अनुभव..
भंडाऱ्यातील बेला गावच्या सरपंच शारदा शेंडे म्हणाल्या, “हवामान बदल जाणवण्यासाठी केवळ अतिवृष्टी किंवा दुष्काळाची गरज नाही. आपले पाणी, आपली शेती, आपले आरोग्य या सगळ्यात मला रोज बदल जाणवतो. माझ्या गावातील प्रत्येकाच्या आरोग्याची जबाबदारी माझी आहे. माझे गाव 100% सौरऊर्जेवर चालणारे, स्वच्छ आणि हिरवे बनवणे हे माझे स्वप्न आहे.”
कर्नाटकातील छाया यांनी सांगितले की, "महिला सहभागामुळे नियोजन अधिक प्रभावशाली आणि परिणामकारक बनते". तर ओडिशातील "स्प्रेड" या संस्थेचे अध्यक्ष बिद्युत मोहंती यांनी, "गावकऱ्यांच्या सहभागातून तयार झालेल्या नकाश्यांमुळे पंचायत आराखडे अधिक प्रभावी झाले असल्याचे सांगितले. नागपूर मधील कोमल देवळकर यांनी पाणलोट व्यवस्थापनातील महिलांच्या नेतृत्वामुळे दुष्काळ आणि टंचाईला तोंड देणे शक्य झाले असल्याचे सांगितले.
हवामान बदलावर माही जीचा रॅप
या कार्यक्रमात लोकप्रिय रॅपर माही जी हिने तिचे रॅप सादर केले, ज्यामध्ये हवामान बदलाचे गंभीर परिणाम आणि स्थानिक समाजावर होणारे परिणाम अधोरेखित केलेलं आहे. त्यातील ‘Heatwave’ मध्ये उष्णतेच्या लाटांमुळे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांवर होणाऱ्या दडपशाहीवर प्रकाश टाकला गेला, तर ‘विकासाचं खूळ’ आणि इतर गाण्यांमध्ये विकास, पर्यावरणीय संकट वर लक्ष केंद्रीत केले गेले. माही जीच्या रॅप्समुळे उपस्थितांना विषयाची गंभीरता लक्षात आली आणि हवामान बदलासंदर्भातील उपाययोजना आणि सहभागासाठी प्रेरणा मिळाली. या गाण्यांमुळे कार्यक्रम अधिक उत्साही, सर्जनशील आणि परिणामकारक ठरला.
दुसऱ्या परिसंवादात हवामान बदलावरील संशोधन आणि धोरणं यावर चर्चा झाली. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या प्राध्यपिका बी. मंजुळा यांनी महिलांचा निर्णय प्रक्रियेत कसा सहभाग वाढवता येईल त्याबद्दल काय प्रयत्न करता येतील यावर मुद्दे मांडले. जलतज्ज्ञ सतीश खाडे यांनी हवामान बदलामुळे पाणीटंचाई भविष्यात अधिक तीव्र होणार असल्याचा इशारा दिला. ‘प्रकृती’ संस्थेच्या सुवर्णा दामले यांनी कृषी संकट आणि हवामान बदल या दुहेरी आव्हानांमुळे महिला शेतकरी व विधवांना विशेष पाठबळाची गरज असल्याचे स्पष्ट केले.
"माध्यमं बदलासाठी प्रेरणा निर्माण करतात" - प्रशांत पवार
या चर्चासत्रात माध्यमांच्या भूमिकेवर विशेष भर देण्यात आला. ‘बाईमाणूस मीडिया हाऊस’चे संपादक प्रशांत पवार यांनी हवामान बदलाबद्दलची जागरूकता लोकांपर्यंत कशी पोहचवता येईल, कोणकोणती प्रभावी माध्यमं आहेत हे अधोरेखित केले. ते म्हणाले, “गावोगावी महिला पंचायत प्रतिनिधींनी केलेले उपक्रम किंवा हवामान बदलाचे महिलांवर होणारे दुष्परिणाम, त्यावर करता येणाऱ्या उपाययोजना हे जर व्हिडिओच्या माध्यमातून, रॅप च्या माध्यमातून, चित्रांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवले तर लोकांपर्यंत ते सहजपणे पोहचू शकेल.
माध्यमांचा प्रभाव फक्त माहिती देण्यापुरता नसतो, ती लोकांच्या मनात भावना निर्माण करतात, अनुभव शेअर करतात आणि बदलासाठी प्रेरणा देतात. जेव्हा गावोगावी महिला नेत्यांच्या प्रयत्नांचे सत्य घटनाकथन लोकांपर्यंत पोहचते, तेव्हा त्या केवळ स्थानिक समस्या सोडवत नाहीत, तर राष्ट्रीय आणि जागतिक व्यासपीठावर आवाज उठवतात. हीच खर्या बदलाची बीजे आहेत.” असे ते म्हणाले.
(अभिजित घोरपडे)
स्थानीय पातळीवरील कृतीत महिला केंद्रस्थानी…
या कार्यक्रमाचे आयोजन असर आणि आरएससीडी यांनी महाराष्ट्रातील 50 ग्रामपंचायतींमध्ये केलेल्या प्रयोगांच्या आधारे केले होते. या गावांमध्ये महिला सभांचे आयोजन, जल समित्यांमध्ये महिलांचा सहभाग आणि पंचायत स्तरावरील हवामान बदलविषयक संवाद या उपक्रमांमध्ये महिला नेतृत्व पुढे आले आहे. असरच्या नेहा सैगल म्हणाल्या, “हवामान बदलाच्या संकटाच्या मुळाशी पाण्याचे संकट आहे आणि त्याचा सर्वाधिक परिणाम महिलांवर होतो. महिला जेव्हा जल समित्यांचे नेतृत्व करतात, तेव्हा त्या फक्त वरवरच्या समस्या सोडवत नाहीत, तर मूळ कारणे दूर करण्याचे काम करतात. हेच खरं विकेंद्रीकरण आहे.”
या चर्चासत्राचा समारोप करताना आरएससीडीचे संचालक भीम रासकर म्हणाले, “शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि शुद्ध अन्न या केवळ शहरी नव्हे तर ग्रामीण भागातीलही मूलभूत गरजा आहेत. यासाठी जल, जंगल आणि जमीन या संसाधनांचे बळकटीकरण आवश्यक आहे. पंचायत व्यवस्था ही आपल्या शासन व्यवस्थेचा कणा आहे आणि स्थानिक स्तरावरील वातावरण बदल कृतीचा पाया आहे. महिलांचे नेतृत्व सक्षम केले, तर या लढ्याला खरी दिशा मिळेल.”
दिवसभर चाललेल्या या चर्चा सत्रांमधून हाच निष्कर्ष निघाला की, हवामान बदलाचे संकट केवळ धोरणे किंवा आंतरराष्ट्रीय करारांवर अवलंबून नाही, तर गावोगावच्या पंचायत प्रतिनिधींनी घेतलेल्या कृतींवर अवलंबून आहे. आणि त्या कृतींच्या केंद्रस्थानी महिला आल्या, तर केवळ समस्या सोडवल्या जाणार नाहीत तर भविष्यातील पिढ्यांसाठी सुरक्षित आणि शाश्वत आयुष्याचा मार्गही मोकळा होईल.






