अनुष्का ठाकूर
भटक्या कुत्र्यांची दहशत, कबुतरांचा उपद्रव, रानटी हत्त्यांचा कळप, नरभक्षक बिबट्या यानंतर आता राज्यात माकडांनी जेरीला आणलं आहे. सध्या राज्यभरात माकडांनी मोठा धुमाकूळ घातला आहे. राज्यात माकडांची संख्या वाढली असून, माकडांमुळे शेतीचं मोठं नुकसान होत आहे. फळ बागाच्या बागा माकडं उद्ध्वस्त करत आहेत, प्रचंड प्रमाणात नासधूस होत आहे, या संदर्भातील अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आता शेवटी वनविभागानं मोठा निर्णय घेतला आहे.
माकडांना प्रतिबंध घालण्यासाठी वन विभागाकडून नवीन योजना राबवण्यात येणार आहे. वनविभागाच्या या नव्या योजनेची सध्या राज्यभरात जोरदार चर्चा सुरू आहे. माकडं पकडणाऱ्या व्यक्तीला एका माकडामागे 600 रुपये मिळणार आहेत. पकडलेल्या माकडांना वनविभागानं संरक्षित केलेल्या जंगलामध्ये सोडण्यात येणार आहे.
वानरांच्या त्रासामुळे शेतकर्यांनी नाचणे, वरणे, कुळीथ आदी पिके, मिरच्या, वांगी, भेंडी आदी भाज्या, फुलबागा आदींची शेती बंद केली आहे. राज्यात विशेषत: कोकणामध्ये वानरांच्या त्रासामुळे शेकडो एकर भूमी पडीक झाली आहे. कोकणामध्ये एकाच वेळी 40ते 50 वानरांची झुंड येऊन पिके, फळे यांची नासधूस करते. घराजवळ येऊन घराची कौले फोडणे, नागरिकांवर आक्रमण करणे आदी प्रकार मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यामुळे मागील काही वर्षांपासून कोकणातील स्थानिक आमदारांकडे नागरिकांनी वानरांचा बंदोबस्त करण्यासाठी सातत्याने तक्रार केली आहे.
माकड पकडा अन् मिळवा 600 रुपये!
राज्यात माकड व वानरांचा उपद्रव वाढला असून उपद्रवी माकड, वासरांना जेरबंद करण्याचे आदेश राज्य सरकारने दिला आहे. माकड, पिल्लांना पकडून सुरक्षित वन क्षेत्रात सोडण्यात यावे. यासाठी प्रशिक्षितांची नियुक्ती करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. संबंधित महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामपंचायतींबरोबर समन्वय साधून वन विभाग ही कारवाई करणार आहे. राज्यात वानर/माकडांचा मानवी वस्तीत शिरकाव वाढला असून मालमत्ता व शेतपिकांचे नुकसान होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर दुसरीकडे मानव- वानर/माकड संघर्षात ही वाढ झाली आहे. मानव, माकड व वानर यांच्यातील वाढता संघर्ष रोखण्यासाठी राज्य सरकारने नवी नियमावली जारी केली आहे.
माकड उपद्रवाच्या तक्रारीनंतर वनपरिक्षेत्र अधिकारी तत्काळ चौकशी करून उपद्रवाची तीव्रता, संख्या आणि नुकसानीचा अहवाल तयार करतील. माकड पकडण्यासाठी सरकारने मानधनाचे दरही निश्चित केले आहेत. 10 माकडांपर्यंत प्रत्येकी 600 रुपये, तर 10 पेक्षा जास्त संख्येसाठी प्रत्येकी 300 रुपये देण्यात येणार आहेत. एका प्रकरणात देयकाची कमाल मर्यादा 10,000 रुपये असेल. 1 ते 5 माकडांसाठी प्रशिक्षित व्यक्तीस 1,000 रुपयांचा प्रवास खर्च दिला जाणार आहे. तसेच संख्या 5 पेक्षा जास्त असल्यास प्रवास खर्च मिळणार नाही.
अशी राबवणार मोहीम, वनविभागाची नवी योजना चर्चेत
माकडांच्या हल्ल्यांमुळे नागरिक जखमी होण्याच्या, घरांचे व शेतपिकांचे नुकसान होण्याच्या घटना झपाट्याने वाढल्या आहेत. स्थानिक सर्वेक्षण,फोटो/व्हिडीओ पुरावे आणि ‘मुक्तता प्रमाणपत्र’ अशा पारदर्शक प्रक्रियेद्वारे ही मोहीम राबवली जाणार आहे. वन्यजीव संरक्षण कायद्याचे सर्व नियम पाळून, माकड-मानव संघर्ष कमी करण्याचा राज्य सरकारचा हा प्रयत्न आहे. दरम्यान माकडं पकडण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार असून, या माकडांना कोणतीही दुखापत न होता, जाळे आणि पिंजऱ्याच्या मदतीनं पकडायचं आहे, त्यानंतर पकडलेल्या माकडाला वनविभागाच्या ताब्यात द्यायचं आहे, त्यानंतर ही माकडं वनविभागानं आरक्षित केलेल्या जंगालामध्ये सोडण्यात येणार आहेत.
यापूर्वीही झाला होता प्रयत्न !
वर्ष 2024 मध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीमधील त्यांच्या मतदारसंघात वानर पकडणार्या एका व्यक्तीला नियुक्त केले होते. वनअधिकार्यांच्या साहाय्याने काही ठिकाणी वानरांना पकडण्याचा प्रयत्नही करण्यात आला; मात्र वानरांची संख्या अधिक असल्यामुळे, तसेच कोकणातील भाग डोंगराळ आणि वनझाडीचा असल्यामुळे या प्रयत्न विशेष यशस्वी झाला नाही.
महाराष्ट्रात टोपी माकडांची संख्या अधिक
भारतात माकडांच्या 11 प्रजाती आढळतात. त्यातला लाल तोंडाचा माकड बहुसंख्येने आढळतो. त्याचं शास्त्रीय नाव मॅकाका रेडिएटा आहे. त्याला टोपी माकड असंही म्हणतात. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, अहमदनगर, सातारा, नाशिक, सांगली या भागात ही माकडं मोठ्या संख्येने आढळतात. लाल माकड उकिडवे बसले असता त्यांची उंची 60 सेमी असते आणि शेपटी शरीराच्या लांबीपेक्षा मोठी असते. नराचं वजन 6-9 किलो तर मादीचं वजन 5-8 किलो असतं. त्यांच्यावर डोक्यावर काळसर रंगाचे केस असतात आणि या केसाची रचना टोपी ठेवल्यासारखी असते म्हणून त्यांना टोपी माकड असं म्हणतात. ही माकडं कळपात राहतात. एका कळपात 30-40 माकडं असतात. त्यात 7-8 नर, 10-15 माद्या आणि बाकी लहान पिलं असतात. ही माकडं वनात लाजाळू असतात आणि शहरात आल्यावर आक्रमक होतात. वाळत घातलेले कपडे पळवणं, पिंकांची नासधूस करणं यामुळे ते त्रासदायक ठरू शकतात. वाघ आणि बिबट्या त्यांचे शत्रू असतात.
छ. संभाजी नगरचे ‘मंकी मॅन’, ज्यांनी आजवर लाखो माकडं पकडली
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड तालुक्यातील अंभई या गावातील रहिवासी 'गिरी बंधू' राहतात, ज्यांना मराठवाड्यात ‘मंकी मॅन’ म्हणून ओळखलं जातं. गेल्या तीस वर्षांत गिरी कुटुंबातील तीन भावांनी राज्यभरातील तब्बल साडेचार लाख माकडं पकडली असल्याचा त्यांचा दावा आहे. पणजोबा, आजोबा, वडील आणि आता त्यांची चौथी पिढी माकडांना पकडून गावाबाहेर जंगलात सोडण्याचं काम करत आहे. संदीप गिरी, समाधान गिरी आणि कृष्ण गिरी हे तिघं शेतात आले की, अगदी अर्ध्या तासात शेतातील माकडांचा बंदोबस्त करतात.
‘’ज्या भागात माकडांचा त्रास आहे, अशा ठिकाणी पोहोचल्यावर सर्वप्रथम योग्य ठिकाणी पिंजरा लावला जातो. यानंतर मका, ज्वारीची कणसं दाखवून परिसरातील माकडांना आवाज देऊन बोलविलं जातं. त्यानंतर पिंजऱ्यात ठेवलेली कणसं, केळी खाण्यासाठी माकडं स्वतःच पिंजऱ्यात शिरतात. एकदा का माकडं पिंजऱ्यात आलेत की पिंजऱ्याचं दार बंद केलं जातं. अनेकदा पंधरा ते वीस मिनिटांत आम्ही शंभर माकडं पकडतो," असं समाधान गिरी सांगतात.
"माकडं पकडण्यासाठी बोलवलं जातं, त्याठिकाणी आम्ही रात्रीच मुक्कामाला पोहोचतो. सकाळी उठल्याबरोबर संबंधित शेत आणि लगतच्या शेतातील माकडं आम्ही जवळ बोलावतो. गावापासून दूर असणाऱ्या शेतात बघ्यांची गर्दी होत नसल्यानं ही माकडं पटकन पकडली जातात. गावात धुमाकूळ घालणाऱ्या माकडांना पकडताना मात्र ग्रामस्थांचा गर्दीमुळं अनेकदा थोडा उशीर लागतो. आजवर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर साडेतीन हजार गावात आम्ही माकडं पकडलीत. या त्रासदायक माकडांना पकडून आम्ही दूर जंगलात सोडून देत असल्याचंही समाधान गिरी यांनी सांगितलं.
"आम्ही माकडांना पकडतो. याचा अर्थ आम्ही माकडांचे शत्रू आहोत, असं नाही. आम्ही माकडच नव्हे तर सर्व वन्यजीवांवर प्रेम करणारे आहोत. आम्ही माकडं पकडताना कुठलाही क्रूर प्रकार करत नाही. आमच्या वाहनातील पिंजऱ्यात त्यांची खाण्याची आणि पाणी पिण्याचीदेखील सोय केली जात," असंदेखील गिरी यांनी स्पष्ट केलं.
माकडांना हुसकावून लावण्यासाठी…
भारतातल्या अनेक शहरात माकडं बहुसंख्येने आढळतात. माकड दिसलं की आपल्याकडची कोणती वस्तू विशेषत: खाण्याची वस्तू हिरावून घेणार नाही याची काळजी घेतली जाते. राजधानी दिल्लीत सुद्धा बहुसंख्येने माकडं आढळतात. संसद, नॉर्थ ब्लॉक, साऊथ ब्लॉक या महत्त्वाच्या ठिकाणी त्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात पहायला मिळतो. माकडांना पिटाळून लावण्यासाठी तिथे खास माणसं ठेवलेली असतात.
दिल्लीत विशेषतः नवी दिल्लीत मोठ्या संख्येने झाडे आहेत. त्यामुळे माकडांचाही येथे मुक्त संचार असतो. संसदेपासून सर्वत्र ही माकडे टोळ्याटोळ्यांनी मुक्तपणे फिरत असतात. त्यातही सप्टेंबरपासून दिवाळी संपेपर्यंत त्यांचा अनेक भागांत उच्छाद सुरू असतो. दिल्लीतल्या या माकडांना लंगूर म्हणजेच वानरांचे भय वाटते, ही गोष्ट लक्षात घेऊन वानरांचे मोठमोठे कटआउट प्रगती मैदानापासून नवी दिल्लीच्या चौकाचौकांत उभारण्यात आले होते. रात्री सुनसान होणाऱ्या नवी दिल्लीतील मीनाबाग, साऊथ-नॉर्थ अॅव्हेन्यू, विश्वंभर दास व इतर मार्गांवरील कचराकुंड्यांभोवती वानरांची चित्रे झळकवण्यात आली होती.
दिल्लीच्या आजूबाजूच्या परिसरात कलंदर समाजाची वस्ती आहे. कलंदर म्हणजे माकडाचा आणि अस्वलाचा खेळ करून दाखवणारी एक भटकी जमात. माकडांना पळवून लावण्यासाठी प्रशासनाने अत्यावश्यक सेवे अंतर्गत कलंदर समाजाच्या काही तरुणांना हंगामी नोकरी दिली होती. माकडे लंगुरांच्या कटआऊटजवळ येणार नाहीत कारण त्यांना पाहिल्यानंतर ते घाबरतात. माकडांना पळवून लावणे शक्य नव्हते. त्यांना इजा किंवा मारता येत नाही. म्हणूनच कलंदर समाजातील तरुणांना यासाठी नियुक्त केले.
काही वर्षांपूर्वी दिल्लीच्या रस्त्यांवर माकडाचा खेळ करून दाखवताना काही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या माकडवाल्यांना दिल्लीतील माकडे पळवून लावण्यासाठी काय उपाययोजना आहेत, अशी विचारणा केली. त्यावेळी माकडे लंगूर म्हणजे वानरांना घाबरतात असे या कलंदरांनी सांगितले. याचे प्रात्याक्षिक दाखवताना माकडवाल्याने त्याच्याकडे असलेले लंगूर मंत्रालयाच्या इमारतीवर माकडांचा समूह बसला होता तिथे नेले आणि त्या लंगूरला पाहून सगळी माकडे पळून गेली.
पुढे पर्यावरण मंत्रालयाने माकडांना हाकलण्यासाठी लंगूरच्या वापरावर बंदी घातली होती. लंगूर ठेवणे, खरेदी करणे, विकणे किंवा भाड्याने देणे यासाठी तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते. मग कलंदर समाजातील या लोकांनी तोंडाला रुमाल बांधून हुबेहुब लंगुरासारखा आवाज काढत माकडांना पिटाळून लावायला सुरूवात केली आणि आश्चर्य म्हणजे या नकली आवाजाला माकडेदेखील फसली.
यापूर्वी कोणकोणत्या उपाययोजना झाल्या
माकडांना थोपवण्यासाठी आतापर्यंत काहीच उपाय झाले नाहीत, असं नाही. जुलै 2014 मध्ये राज्यसभेत विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात तत्कालीन नागरी विकासमंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी माकडांशी दोन हात करण्याबाबतच्या उपायांची माहिती दिली होती. त्यांनी सांगितलं की नवी दिल्लीने चाळीस प्रशिक्षित लोकांकडे माकडांना हुसकावून लावण्याचं काम दिलं आहे. या लोकांना मानवी वानर संबोधलं जायचं. हे लोक वानराचा आवाज काढून त्यांना हुसकावून लावतात. माकडांना पळवून लावण्यासाठी रबराच्या गोळ्यांचा वापर करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. याआधी 2010 मध्ये माकडांचा सामना करण्यासाठी खऱ्याखुऱ्या वानरांचा वापर केला होता. त्यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षण दिल्याचंही सांगतात. मात्र या वानरांना घेऊन येणारे त्यांना बांधून आणायचे. त्यावर प्राणी हक्क कार्यकर्ते आणि तेव्हा विरोधी पक्षात असलेल्या भाजपच्या नेत्या मनेका गांधी यांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर पर्यावरण आणि वन मंत्रालयाने दिल्ली आणि केंद्रातील मंत्र्यांना सांगितलं की वानरांना असं बांधून काम करवून घेणं बेकायदेशीर आहे.
‘ईब आले ऊ’ म्हणजे…
मध्यंतरी नेमक्या याच दिल्लीतल्या माकडांवर अतिशय सुरेख चित्रपट प्रदर्शित झाला होता. लुटियंस दिल्लीत धुमाकूळ घालणाऱ्या माकडांना पळवून लावण्यासाठी शासनाने काही माणसं कामाला लावली आहेत. “ईब आले ऊ” असा आवाज काढून माकडांना घाबरवण्याचं काम ही माणसं करतात. नोकरीच्या शोधात असलेल्या अंजनीला त्याच्या बहिणीचा नवरा या कामी लावतो. पण त्याला ते जमत नाही. तरीही माकडांना घाबरवण्यासाठी तो आणखी चांगल्या क्लृप्त्या लढवतो. मात्र त्याचे भलतेच परिणाम होतात. अशी “ईब आले ऊ” या चित्रपटाची सर्वसाधारण कथा आहे. वरवर ही साधी, सोपी, सरळ कथा वाटत असली, तरी माकडांचा हैदोस, त्यांना पळवून लावण्याचं काम हे फक्त रूपक आहे.
त्याद्वारे स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नांवर, भारतीय तरुणांच्या बेरोजगारीवर, परंपरागत पद्धती अवलंबण्याच्या अट्टाहासावर, कुणी काही वेगळं करू पाहत असेल तर त्या व्यक्तीला वेड्यात काढण्याच्या समाजाच्या मानसिकतेवर, आवडत नसूनही केवळ दुसरा मार्ग उपलब्ध नाही, म्हणून कोणतंही काम करायला लागण्याच्या भारतीय तरुणांच्या अगतिकतेवर आणि जिवंत राहण्याच्या स्पर्धेत माणसाचं कसं माकड होत चाललं आहे, यावर हा चित्रपट भाष्य करतो.






