सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली जे. अंग्मो यांनी त्यांच्या पतीच्या सुटकेसाठी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 24 सप्टेंबर रोजी लेहमध्ये झालेल्या हिंसाचाराला चिथावणी दिल्याच्या आरोपाखाली राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत (एनएसए) 26 सप्टेंबर रोजी सोनम वांगचुक यांना अटक करण्यात आली होती. या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला होता. सोनम वांगचुक यांच्या व्यतिरिक्त, लेहमधील स्थानिक तुरुंगात ठेवण्यात आलेल्या 56 पैकी 26 निदर्शकांना 2 ऑक्टोबर रोजी सोडण्यात आले. त्यांच्यावर गंभीर आरोप नव्हते. तीस जण अजूनही तुरुंगात आहेत.
वांगचुक यांच्या सहकाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
दरम्यान, वांगचुक यांच्या नेतृत्वाखालील चळवळीचे सक्रिय सदस्य आणि माजी भाजयुमो कार्यकर्ते स्टॅनझिन दोर्जे यांनी 1 ऑक्टोबर रोजी सकाळी घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ते वांगचुक यांचे प्रशंसक आणि सहकारी असल्याचे सांगितले जाते. 38 वर्षीय स्टॅनझिन लेहपासून 100 किमी अंतरावर असलेल्या स्किटमांग गावात राहत होते. पूर्ण राज्याचा दर्जा आणि सहावी अनुसूची देण्याचे आश्वासन सरकारने पूर्ण न केल्याने हे पाऊल उचलण्यात आले. वांगचुकमध्ये सामील होण्यापूर्वी ते भारतीय जनता युवा मोर्चाचे सक्रिय सदस्य होते. 2020 मध्ये दोर्जे यांनी भाजयुमो सोडले.
सोनम वांगचूक यांच्या पत्नीची सर्वोच्च न्यायालयात धाव
गीतांजली अंग्मो यांनी त्यांच्या पतीच्या सुटकेसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. गीतांजली यांनी वांगचुक यांच्या तत्काळ सुटकेसाठी हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली आहे. डॉ. गीतांजली यांनी भारतीय संविधानाच्या कलम 32 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली, ज्यात त्यांच्या पतीची अटक बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. वांगचुक सध्या जोधपूर तुरुंगात आहेत.
संबंधित लेख वाचा: 'थ्री इडियट्स'च्या खऱ्या 'हीरो' ला मोदी सरकार अचानक खलनायक का ठरवतयं…? |
वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या, एक आठवडा उलटून गेला, पण अटकेच्या आदेशाची प्रत मिळालेली नाही. सोनम यांच्या तब्येतीची, प्रकृतीची किंवा ताब्यात घेण्याच्या कारणांबद्दल मला अजूनही कोणतीही माहिती नाही," असे गीतांजली यांनी एक्सवरील पोस्टमध्ये लिहिले आहे. वकील सर्वम रितम खरे यांच्यामार्फत अँग्मो यांनी वांगचुक यांच्या ताब्यात घेण्याला आव्हान दिले आहे आणि त्यांची तात्काळ सुटका करण्याची मागणी केली आहे. वांगचुक यांच्याविरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) लागू करण्याच्या निर्णयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. अँग्मो यांचा आरोप आहे की त्यांना अद्याप ताब्यात घेण्याच्या आदेशाची प्रत मिळालेली नाही, जे नियमांचे उल्लंघन आहे.
राष्ट्रपतींना लिहिले पत्र, ‘’आदिवासी पार्श्वभूमी असल्याने तुम्ही समजू शकता’’
अंग्मो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, गृहमंत्री अमित शहा, लडाखचे उपराज्यपाल कविंदर गुप्ता, कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि लेह जिल्हाधिकाऱ्यांना पत्रे लिहिली, ज्याची प्रत त्यांनी एक्स वर शेअर केली. गीतांजली अंगमो यांनी बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून भावनिक साद घातली आहे. या पत्रात त्यांनी राष्ट्रपतींना लडाखमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांच्या आणि पतीच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या भावना समजून घेण्याची विनंती केली आहे. तसेच त्यांच्या पतीच्या सुटकेची मागणी देखील केली आहे.
त्यांनी हे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनादेखील पाठवले आहे. या पत्रात अंगमो यांनी सोनम वांगचुक यांची ‘बिनशर्त सुटका’ करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी वांगचुक हे हवामान बदल आणि मागास आदिवासी भागाच्या विकासासाठी आंदोलन करणारे ‘शांतताप्रिय गांधीवादी आंदोलक’ असल्याचे म्हटले आहे.
अंगमो यांनी सांगितले की, 26 सप्टेंबर रोजी लेह येथील पोलीस निरीक्षक रिगझीन गुरमेत यांनी त्यांना सांगितले की, वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या कलम 3(2) अंतर्गत ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची रवानगी जोधपूर मध्यवर्ती कारागृहात केली जात आहे. त्या म्हणाल्या की त्यांना सांगण्यात आले की वांगचुक यांच्याबरोबर जोधपूर येथे जात असलेले एएसपी रिषभ शुक्ला हे तेथे उतरल्यावर त्यांचे बोलणे करवून देतील. “त्यांनी असेही सांगितले की ही अटक नाही कारण एफआयआर दाखल झालेला नाही, तर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत ताब्यात घेण्यात आले आहे,” असेही अंगमो यांनी सांगितले.
‘’आमच्या संस्थेवर सीआरपीएफ कडून पाळत’’
मात्र त्या अधिकाऱ्याने अजूनही फोन केलेला नाही किंवा बोलणे करवून दिलेले नाही असे अंगमो म्हणाल्या. तसेच त्यांना सांगण्यात आले होते की अधिकारी त्यांना त्यांचे कायदेशीर हक्क सांगतील मात्र ते देखील करण्यात आलेले नाही, असा दावा अंगमो यांनी केला आहे. इतकेच नाही तर अंगमो यांनी असाही दावा केला की, त्यांच्या हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टर्नेटिव्हज (HIAL) ही संस्था असलेल्या ठिकाणी, म्हणजेच फ्यांग) गावात, त्यांच्यावर सीआरपीएफ कडून पाळत ठेवली जात आहे. तसेच गेल्या तीन दिवसांत कोणत्याही कायदेशीर अधिकाराशिवाय इंस्टिट्यूटच्या दोन सदस्यांना पोलिसांनी कोठडीत पाठण्यात आले, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.
माझ्या पतीचा आणि ते ज्या उद्दिष्टे आणि तत्त्वांसाठी लढत आहेत त्या सर्वांचा आत्मा मारण्यासाठी गेल्या एक महिन्यापासून मोठ्या प्रमाणात जाणीवपूर्वक बदनामी मोहीम राबली जात आहे आणि ती गेल्या चार वर्षांपासून गुप्त पद्धतीने सुरू होती, असे अंगमो यांनी पत्रात म्हटले आहे.
वांगचुक यांच्या पत्नीने राष्ट्रपती मुर्मू यांना प्रश्न विचारला आहे, त्या म्हणाल्या की, “हवामान बदल, वितळत असलेले हिमनग, शैक्षणिक सुधारणा आणि ग्रासरूट इनोव्हेशन याबद्दल बोलणे हा गुन्हा आहे का? गेली चार वर्षे शांततापूर्ण गांधीवादी मार्गाने पर्यावरणाच्या दृष्टीने नाजूक असणाऱ्या एका मागास आदिवासी भागाच्या प्रगतीसाठी आवाज उंचावणे गुन्हा आहे का? याला नक्कीच राष्ट्रीय सुरक्षेला धोका म्हणता येणार नाही.”
वांगचुक यांच्या पत्नी राष्ट्रपतींना उद्देशून पुढे म्हणाल्या की, “महामहिम, तुम्ही स्वतः आदिवासी समाज/पार्श्वभूमीतून येत असल्यामुळे, लेह-लडाखच्या लोकांच्या भावना इतर कोणापेक्षाही चांगल्या प्रकारे समजू शकता.” तसेच अंगमो यांनी पुढे राष्ट्रपती मुर्मू यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. तसेच त्यांनी सोनम वांगचुक यांची बिनशर्त सुटका करण्याची मागणी केली आहे.
पाकिस्तानात गेलं की लगेच ISI एजंट बनतं का?
गीतांजली यांनी X वर एक पोस्ट लिहिली, ज्यामध्ये विचारले होते की, "भारत खरोखरच स्वतंत्र आहे का? 1857 मध्ये, राणीच्या आदेशानुसार 24,000 ब्रिटिशांनी 30 कोटी भारतीयांवर अत्याचार करण्यासाठी 1,35,000 भारतीय सैनिकांचा वापर केला. आज, गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार, एक डझन प्रशासक 2,400 लडाखी पोलिसांचा गैरवापर करून 3,00,000 लडाखींवर अत्याचार आणि छळ करत आहेत."
गीतांजलीने पतीचे पाकिस्तानशी संबंध असल्याच्या आरोपांचे खंडन केले आहे. रविवारी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले की वांगचुक नेहमीच गांधीवादी पद्धतीने निदर्शने करत असत आणि 24 सप्टेंबरच्या हिंसाचारासाठी सीआरपीएफ जबाबदार होते. अँग्मोने स्पष्ट केले की तिच्या पतीच्या पाकिस्तान भेटी हवामान बदलाशी संबंधित होत्या. "आम्ही संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत गेलो होतो.






