- संजना खंडारे
समाजातील प्रत्येक व्यक्तीला प्रेम आणि आदर मिळणं अत्यंत आवश्यक आहे. समाजातील इतर लोकांनी आपण जसे आहोत तसा आपला स्वीकार करावा अशी भावना प्रत्येक व्यक्तीच्या मनात असते. मात्र, असं होत नाही. आजही तृतीयपंथींविषयी (पारलिंगी) अनेक गैरसमज समाजात असल्याकारणाने त्यांना समाजात आदर आणि प्रेम मिळत नाही. समाज त्यांना स्वीकारण्यास आजही तयार नाही. म्हणूनच त्यांच्याविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी, त्यांना समाजात सन्मानाने जगता यावं यासाठी शाळेतूनच मुलांना विविधता आणि समावेशकता शिकवणं गरजेचं आहे.
काव्या मुखर्जी साहा ही 12वीत शिकणारी दिल्लीची एक विद्यार्थिनी… इतक्या लहान वयातच काव्याने याच विषयाशी संबंधित ‘The Safe Space’ हे पुस्तक लिहिलं आहे. मात्र केवळ पुस्तक लिहून ती थांबली नाही तर या काव्याने आता थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तिने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून शालेय अभ्यासक्रमाच्या सर्वसमावेशक लैंगिक शिक्षणात (सीएसई) तृतीयपंथींविषयी माहिती समाविष्ट करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयानेही ही याचिका दाखल करून घेतली असून केंद्र सरकारसह सहा राज्ये आणि एनसीईआरटी यांना नोटीस बजावली आहे. यावर आठ आठवड्यांत आपले म्हणणे मांडावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे.
कोण आहे ही काव्या मुखर्जी साहा? वयाचा अवघ्या 16व्या वर्षी तिने जे पुस्तक लिहिलं त्या पुस्तकात नेमकं काय आहे? तिने सर्वोच्च न्यायालयात याचिका का दाखल केली? त्यावर सर्वोच्च न्यायालयाने काय निर्णय दिला? पारलिंगी समुदायातील कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्त्यांचं यावर काय मत आहे? या सर्व गोष्टींचा सविस्तर आढावा घेण्याचा प्रयत्न ‘बाईमाणूस’ने घेतला आहे. 
कोण आहे काव्या मुखर्जी साहा?
दिल्लीतील वसंत व्हॅली शाळेत शिकणाऱ्या काव्या मुखर्जी साहा या 12वीतील विद्यार्थिनीने सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे, ज्यामध्ये शालेय अभ्यासक्रमाच्या सर्वसमावेशक लैंगिक शिक्षणात पारलिंगीयांविषयीची माहिती समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे. तिने याचिकेत असे म्हणले आहे की, ‘Transgender Persons (Protection of Rights) Act, 2019’ आणि NALSA निर्णयानुसार, शाळांमध्ये समावेशक लैंगिक शिक्षण (CSE) देणं बंधनकारक आहे. मात्र, NCERT आणि अनेक राज्यांच्या SCERT पाठ्यपुस्तकांमध्ये याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे याचिकेद्वारे तिने केंद्र सरकारला पारलिंगीयांविषयी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची मागणी केली आहे.
जनयाचिकेत काय म्हटलं आहे?
सर्वोच्च न्यायालयाने काव्या मुखर्जी साहा यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर केंद्र सरकार, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT), तसेच महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगण, पंजाब, तमिळनाडू आणि कर्नाटकमध्ये शालेय अभ्यासक्रम तयार करणाऱ्या राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (SCERT) यांना नोटीस बजावली आहे. न्यायालयाने या सर्वांना आठ आठवड्यांच्या आत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.
संबंधित लेख वाचा: 1) एमपीएससी भरतीत आता तृतीयपंथीयही : कोल्हापूर खंडपीठाचा ऐतिहासिक निर्णय |
राष्ट्रीय विधिसेवा प्राधिकरण (एनएएलएसए) विरुद्ध केंद्र सरकार यांच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे पालन करण्यात एनसीईआरटी आणि एससीईआरटी अपयशी ठरले आहेत, असे याचिकेत नमूद आहे. तृतीयपंथी व्यक्ती (हक्क संरक्षण) कायद्यातील कलम २ (ड) आणि १३ अंतर्गत बंधनकारक असतानाही एनसीईआरटी आणि एससीईआरटी यांनी लैंगिक ओळख, लैंगिक विविधता आणि लिंगभाव या विषयांचा समावेश पाठ्यपुस्तकात केला नाही.
काव्या मुखर्जी साहा ही एक 12वीत शिकणारी विद्यार्थीनी आहे, जिला लैंगिक विविधता आणि समावेशक शिक्षण याबाबत जाणीव आहे. तिने केवळ शालेय अभ्यासक्रमात नव्हे तर समाजातही पारलिंगीयांविषयी जागरूकता वाढवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. 16 वर्षांच्या वयात तिने ‘The Safe Space’ हे पुस्तक लिहिले असून, त्यातून तिने मुलांमध्ये लैंगिक ओळख, विविधता आणि स्वीकार याविषयी संवेदनशीलता निर्माण करण्यावर भर दिला आहे.
'The Safe space' हे पुस्तक अवघ्या 16व्या वर्षीत तिने का लिहिलं?
काव्या मुखर्जी साहा ने ‘The Safe Space’ हे पुस्तक केवळ 16 वर्षांच्या वयात लिहिले, कारण तिला ट्रान्सजेन्डरविषयी समाजात असलेला गैरसमज आणि भेदभाव दिसत होता. तिला वाटायचं की मुलांना लवकरच या विषयांची माहिती मिळाली पाहिजे, ज्यामुळे त्यांच्यात सहिष्णुता आणि आदर वाढेल. तिच्या या पुस्तकाद्वारे तिने लैंगिक विविधतेबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 
‘The Safe Space’ या पुस्तकात लैंगिक ओळख, लैंगिक विविधता आणि लिंगभाव या संवेदनशील विषयांवर समज वाढवण्यावर भर दिला आहे. या पुस्तकात मुलांना आणि शिक्षकांना शाळेमध्ये ट्रान्सजेन्डरसाठी सुरक्षित वातावरण कसे तयार करता येईल, याची माहिती दिली आहे. पुस्तकाची मांडणी साध्या, समजण्यास सोप्या भाषेत केली आहे, ज्यामुळे मुलं ट्रान्सजेन्डरविषयी गैरसमज न करता त्यांचा आदर करतील. ‘The Safe Space’ मुलांना आणि शिक्षकांना लैंगिक विविधतेबाबत खुल्या मनाने विचार करण्यास प्रोत्साहित करते आणि लैंगिक भेदभाव कमी करण्यासाठी शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित करते.
काव्याने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर आणि सर्वोच्च न्यायालायने त्यानंतर दिलेल्या निर्देशावर ‘बाईमाणूस’ने काही पारलिंगी कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
ट्रान्सजेंडरकडे बघण्याचा लहान मुलांचा दृष्टीकोन बदलायचा असेल तर…- हेरंब कुलकर्णी
लेखक, शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करणारे हेरंब कुलकर्णी म्हणतात, "काही विषय सरकारच्या आणि एकूणच समाजाच्या फार उशिरा लक्षात येतात. त्यातीलच एक विषय म्हणजे ट्रान्सजेंडरचा विषय. आजही या समुदायाकडे बघतांना यांच्याबद्दल बोलताना एक चेष्टेचा सूर असतो, मग तो चित्रपटांपासून ते आजच्या सोशल मीडियाच्या 30 सेकंदाच्या रील पर्यंत.. यामधून काय होतं तर लहानपणापासूनच मुलांमध्येही ट्रान्सजेंडरकडे बघण्याचा दृष्टीकोन ही तसाच तयार होतो. या गोष्टींना छेद देण्यासाठी मुलांना शाळेतूनच शास्त्रीय माहिती मिळू लागली तर मुलांमध्ये त्यांच्याबद्दल सहानुभूती तयार होईल आणि त्यांच्याकडे ही माणूस म्हणून बघायला ते सुरवात करतील. फक्त त्यांच्या लैंगिक गोष्टींविषयी माहिती पुस्तकात समाविष्ट न करता त्यांच्या सामाजिक स्थानाबद्दलही माहिती द्यायला हवी. फक्त पुस्तकांमध्येच त्यांच्याबद्दल माहिती समाविष्ट करून चालणार नाही तर एकूणच समाजामध्ये त्यांच्याबद्दल असलेला दृष्टिकोन बदलणं गरजेचं आहे." 
ट्रान्सजेन्डरबद्दलची माहिती देताना काही चुकीची माहिती त्यात जायला नको - दिशा पिंकी शेख
दिशा पिंकी शेख या पारलिंगी सामाजिक कार्यकर्त्या असून गेल्या 15 वर्षांपासून त्यांनी लैंगिक शिक्षण आणि लैंगिक जागरूकतेसाठी महत्त्वाचे कार्य केले आहे. त्यांच्याशी या संदर्भात ‘बाईमाणूस’ने संपर्क साधल्यावर त्यांनी सांगितले की, "गेल्या पंधरा वर्षांपासून मी हा मुद्दा मांडतेय की, शालेय अभ्यासक्रमामध्ये लैंगिक जागरूकतेबद्दल शिक्षण देणं गरजेचं आहे. जेणेकरून किशोर अवस्थेत जे ट्रान्सजेन्डर आहे त्यांना स्वतःला जाणून घेण्यास फायदा होईल. यामध्ये फक्त शारीरिक बदल नाही तर मुळात जेंडर निर्माण कसं होतं, हे मुलांना सांगणं फार गरजेचं आहे. ट्रान्सजेन्डरबद्दलची माहिती शालेय पुस्तकात देतांना काही चुकीची माहिती त्यात जायला नको याची दक्षता ही घ्यायला हवी. जर या माहितीमुळे ट्रान्सजेंडर विषयी सकारात्मकता तयार होत असेल, संवेदनशीलता निर्माण होणार असेल तर हे स्वागतार्ह आहे.."
पुणे येथील प्रयास हेल्थ ग्रुप या सार्वजनिक आरोग्य संस्थेत गेल्या 20 वर्षांपासून काम करणारे डॉ. शिरीष दारक यांच्याशी ‘बाईमाणूस’ने संवाद साधला, ते म्हणाले "एनसीआरटी आणि एससीआरटीच्या पुस्तकांमध्ये ट्रान्सजेन्डरच्या लैंगिक शिक्षणाबद्दल गोष्टी समाविष्ट करणं हे तर ठीक आहे. मात्र, पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक लैंगिक शिक्षण देणं गरजेचं आहे. ते फक्त पुस्तकांमध्ये समाविष्ट करून चालणार नाही तर शिक्षक ते कोणत्या पद्धतीने शिकवतील हे ही बघणं तितकंच महत्वाचं ठरेल. यासाठी आधी शिक्षकांचं ट्रेनिंग घेणं महत्वाचं आहे.






