-प्रसन्न थत्ते
ते गृहस्थ आपल्या लहानग्या 14 वर्षांच्या मुलीला घेऊन तिथे उभे होते. दोघंही गोंधळलेले होते, त्यांच्यासाठी सर्व वातावरण नवीनच असल्याने तिथली प्रत्येक व्यक्ती आपल्याच नादात, आपल्याच तालात.. त्यांच्याकडे कोणाचं लक्षच नव्हतं. एकदोनदा मनात विचार आला की परत जावं. पण जाणार कसे, त्यांना मुद्दाम निरोप पाठवून बोलावलं होतं. शेवटी एकदाची ती चलबिचल, ती प्रतिक्षा संपली आणि त्यांच्या नावाचा उच्चार करत त्यांना शोधत एक व्यक्ती आली. त्या व्यक्तीने जरा आश्चर्यानेच त्या लहानग्या मुलीकडे पाहिले आणि जरा प्रश्नार्थक चेहरा करून त्यांना आत नेले.
आत गेल्यावर तर आणखीनच धक्का, बरेच पुरुष वादक तिथे आपापली वाद्ये घेऊन बसलेले होते. त्या सर्वांमध्ये त्या छोटीला तिचं वाद्य घेऊन बसायला सांगितलं. बिचारी गोंधळून गेली, कावरीबावरी झाली. वडिलांनाही प्रश्न पडला, कसं निभेल हीचं? पण त्यांनी पाठीवर थोपटत तिला धीर दिला आणि ती धिटुकली तिथे जाऊन बसली. सर्वांच्या अविश्वासानी आणि आश्चर्यानी भरलेल्या नजरांकडे लक्ष न देता त्या चिमुरडीने तिला दिलेले नोटेशन्स तंतोतंत वाजवले. सर्वांच्या चेहऱ्यावर आश्चर्य पूर्ण कौतुक! बस… इथेच झाला एका यशस्वी कारकीर्दीचा श्रीगणेशा.
एक 14 वर्षाची चिमुरडी रेकॉर्डिंग स्टुडियोत शिरली आणि…?
हा होता हिंदी चित्रपट संगीताच्या ध्वनिमुद्रणाचा स्टुडिओ. आणि हे ध्वनिमुद्रण होतं 1960 मधील चित्रपट "मासूम" याच्या श्रेयनामावलीच्या संगीताचं. चार वर्षांनी 1964 मधे संगीतकार रोशन यांना "चित्रलेखा" या चित्रपटात सतार आणि सरोद यांचं मिश्रण हवं होतं. त्या चित्रपटाच्या संगीताचे सतारवादक इमरत खान यांनी याच चिमुरडीचं नाव सुचवलं. ते तिच्या वडिलांना ओळखत होते. रोशनजींच्या सांगण्याप्रमाणे ते त्या मुलीच्या घरी जाऊन तिच्या वडिलांना सगळं सांगून आले. ती बालिका तयार नव्हती, पण वडिलांनी समजावून सांगितलं की बघ तर काय आहे नाही आवडलं तर नको वाजवू. ही 18 वर्षांची बालिका आपल्या वडिलांसोबत आली सकाळी.
रोशनजींनी समजावलं की टायटल ट्रॅक मधील एक पीस आहे सरो, सतार (इमरत खान ज्यांना ती मुलगी ओळखत होती) आणि तबला (अब्दुल करीम खान), वाजवून बघ, आवडलं तर वाजव नाही वाटलं तर नको. ते ध्वनिमुद्रण ऐकल्यावर रोशनजी इतके खुष झाले की तिला म्हणाले दुपारी बॅकग्राऊंड स्कोअरचं रेकॉर्डिंग आहे ये परत. आवडलं तर वाजव नाहीतर नको कोणी जबरदस्ती करणार नाही. परत ती कच खाऊ लागली की मी कसं वाजवणार मला काही माहित नाही. परत वडिलांनी समजावलं की बघ तर कसं असतं, नवं काही शिकायला मिळेल. वडिलांचे शब्द आणि रोशनजींचं शांतपणे सांगणं दोन्ही आश्वासक होतं.
दुपारी मेहबूब स्टुडिओत पोचले, स्टुडिओ वादकांनी भरलेला. परत थोडा आत्मविश्वास डळमळीत झाला, पण वडील होतेच पाठीवर हात ठेवायला. वाद्यवृंदातील सर्व पुरुष वादक आश्चर्यचकित नजरांनी पहात होते. कारण एक तर ही छोटी मुलगी, त्यात सरोद वाजवणार! त्याकाळी एकतर सरोद वाजवणारे कमी आणि जे होते ते पुरुष. रोशनजींनी समजावलं की , "पुढे फिल्म चालेल, त्यात एका जागी पाठोपाठ तीन क्राॅसमार्क येतील, तिसऱ्या मार्कवर वाजवायचं."
संगीतकार रोशन म्हणाले, एक उत्तम सरोदवादक इंडस्ट्रीला गवसली…
रोशनजींनी तिला विचारलं "भैरवी आणि भैरव यांचे मिश्रण असलेला एखादा राग सांग."
पटकन उत्तर आलं, "बसंत मुखारी." रोशनजी समजले की उत्तम वादक आपल्याला गवसली आहे. त्या कन्येनी सरोदमधून जे काही अप्रतिम स्वर उमटवले की सर्वच प्रभावित झाले. रोशनजी खुष झाले आणि तिला म्हणाले, "पुढे सात दिवस हे बॅकग्राऊंड स्कोअरचं रेकॉर्डिंग आहे तू रोज ये."
संबंधित लेख वाचा: 1) ‘ढाक’ कुणाचा वाजं जी.. पुरुषी व्यवस्थेतील ‘ढाक’ वाजवणाऱ्या महिला! |
आणि "चित्रलेखा"च्या संगीत नियोजनात सरोदच्या सुरावटींची आणखीन भर पडली. आपल्या इथे चांगली असो की वाईट बातमी वा-यासारखी पसरते, बॉलिवूडमधे तर आणखीनच लवकर. त्याप्रमाणे लवकरच बातमी वा-यासारखी पसरली की एक छोटीशी पारशी मुलगी अप्रतिम सरोदवादन करते. एकतर हिंदी चित्रपटसृष्टीतील वाद्यवृंदात स्त्री कलाकार, त्यातही अप्रतिम सरोदवादन करणारी आणि त्यावरही भारतीय शास्त्रीय संगीत चपखल वाढवणारी हे आश्चर्यच होतं. सर्वदूर चर्चा होती - "ती पारशी मुलगी"!
लोकप्रिय विदूषी पंडिता झरीन दारूवाला शर्मा
एका पारशी पोलिस अधिकाऱ्याच्या घरी 9 ऑक्टोबर 1946 रोजी जन्म झाला एका कन्यारत्नाचा (रत्नच निघाली ही कन्या). लहानपणीच तिची संगीतातील रुची पाहून तिला शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. वयाच्या चवथ्या वर्षीच तिने संवादिनी शिकायला सुरूवात केली. वयाच्या सहाव्या वर्षी तिचे संवादिनी वादनाचे कार्यक्रम होऊ लागले. वडील तिला स्वतःबरोबर वेगवेगळ्या संगीत बैठकींना घेऊन जात. वडिलांच्या सोबत ती 1952 मध्ये स्वामी हरिदास संगीत संमेलनाला गेली आणि इथून तिला तिचा राजमार्गच सापडला. पंडित रविशंकर आणि उस्ताद अली अकबर खान यांच्या सतार आणि सरोद जुगलबंदीने ती भारावून गेली. त्यातही सरोद हे वाद्य तर तिच्या मनात घर करून बसलं. सरोद वाजवायला शिकायचं हे मनात रुजलं. वडिलांनी लेकीचा हट्ट पुरवायचं ठरवलं. पण सहाव्या वर्षी सरोद सारखं वाद्य पेलवेल का म्हणून तिला आधी लक्ष्मणप्रसाद जयपूरवाले यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे शिक्षण घ्यायला सांगितलं. 
शास्त्रीय गायन ती भराभर आत्मसात करत असे. गुरूंनी एकदा तिच्या वडिलांना सांगितलं, "तिला शास्त्रीय संगीताची जाण उत्कृष्ट आहे, पण तिचा आवाज गायनासाठी ठीक नाही . ती एखादं वाद्य शिकली तर जास्त चांगलं. "
वडिलांनी तिची सरोद शिकण्याची इच्छा सांगितली आणि लक्ष्मणप्रसादजींचा सल्ला घेऊन दहाव्या वर्षी सरोद शिक्षण सुरू केले. तिचे सरोद वादनाचे शिक्षण हरीपाद घोष या गुरूंकडे सुरू झाले. लवकरच ती सरोद वादनात प्रवीण झाली. याचसोबत तिने शास्त्रीय गायनाचे शिक्षण एस. सी. आर. भट, लक्ष्मणप्रसाद जयपूरवाले आणि एस. एन. रातंजनकर यांच्याकडून गिरवले. तसेच पंडित व्ही. जी. जोग यांच्याकडेही शिक्षण घेतले. हळूहळू ती स्वतः छोट्यामोठ्या कार्यक्रमांमध्ये सरोद वादन करू लागली. अशाच एका कार्यक्रमात हिंदी चित्रपटसृष्टीतील एका संगीत नियोजकांनी तिचं सरोद वादन ऐकून तिचं नाव "मासूम" चित्रपटाचे संगीतकार रॉबिन बॅनर्जी यांना सुचवलं आणि इथून सुरू झाली एक यशस्वी कारकीर्द.
"ती पारशी मुलगी" लवकरच संगीतकार आणि संगीतनियोजकांमधे लोकप्रिय झाली . चित्रपट संगीतात सरोदचा समावेश करायचा असेल तर तिचेच नाव पहिल्यांदा घेतले जाऊ लागले. ही मुलगी म्हणजेच पुढे सरोद वादनतील अत्यंत आदरणीय आणि लोकप्रिय विदूषी पंडिता झरीन दारूवाला शर्मा.
दरम्यान झरीनजींच्या जीवनात प्रेममय सुर झंकारत होते. लवकरच या प्रीतीस्वरांच्या जुगलबंदीने सुरमयी शिखर गाठलं. झरीनजींची सूरगाठ जन्मभरासाठी बांधली गेली सुप्रसिद्ध सतारवादक पंडित अशोक शर्मा (हुस्नलाल-भगतराम जोडीतील पंडित भगतराम शर्मा यांचे सुपुत्र) यांच्याशी. परंतु चित्रपट संगीत हा झरीनजींच्या सांगितीक कारकिर्दीतला एक छोटासा भाग. त्यांचे खरे योगदान म्हणजे शास्त्रीय सरोद वादन. अनेक मैफिली त्यांनी गाजवल्या. लहानपणीच मैफिलींमधे सरोद वादन सुरू झालं ते शेवटपर्यंत सुरूच होतं.
झरीनजींचा आत्मसात करण्यासारखा गुण म्हणजे सतत शिकत राहणं. प्रत्येक नवीन गाण्यातून, मैफिलीतून शिकायला मिळतं आणि ते आत्मसात केलं पाहिजे ही त्यांची ठाम समजूत. यामुळेच सच्चा कलाकार परिपक्व होत जातो हे त्यांचे मत होते. सुरूवातीला चित्रपट संगीताच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळी त्यांच्या लक्षात आलं की सर्व वादक समोर नोटेशन्स ठेवून वाजवतात, ज्यामुळे वादन सोपं होतं. शास्त्रीय संगीत शिकल्यामुळे त्यांना नोटेशन्स शिकवलं नाही. त्याच रात्री त्यांनी वडिलांकडून नोटेशन्स शिकायला सुरूवात केली. त्यांचे वडील थोडंफार व्हॉयलिन शिकले होते आणि आई पियानो. वडिलांनी सांगितले की मला फारसं नोटेशन्स बद्दल माहिती नाही नंतर जाणकारांकडून शिक. पण झरीनजींनी त्यांना सांगितले जे येतं ते शिकवा माझं शिक्षण सुरू तर होईल.
झरीनजींनी लक्ष्मणप्रसाद जयपूरवाले यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेतले होते. त्यांनी गुरूंना टप्पा शिकवायला विनंती केली कारण त्यांना सरोदवर टप्पा वाजवायचा होता. गुरूंनी सांगितलं की सरोदवर टप्पा वाजवाणं कठीण आहे. पण नाविन्याची ओढ असणा-या झरीनजींनी अथक प्रयत्नानंतर ही कला आत्मसात केली.
रवींद्र जैन यांच्या एका गाण्याचं ध्वनिमुद्रण होतं. ध्वनिमुद्रण पूर्ण झाल्यावर रवींद्रजींनी इतर वादकांना जायला सांगितले पण झरीनजींना थांबवलं. इतर वादक उत्सुकतेपोटी ध्वनिमुद्रण कक्षा बाहेर थांबले की काय विशेष वाजवून घेणार. रवींद्रजी रेकॉर्डिस्टच्या बाजूला बसले होते. तिथून त्यांनी काही सुरावटी गायल्या व झरीनजींना त्या वाजवायला सांगितले. आर्टिस्ट क्यूबिकल मधला स्पीकर सुरू होता की आत झरीनजींना ऐकू गेले पाहिजे. पण चुकून बाहेरचा स्पीकर सुद्धा सुरू राहिला. झरीनजींनी नेहमीप्रमाणे तंतोतंत वाजवले.
रवींद्रजींनी किंचित बदल करून परत वाजवायला सांगितले. परत तंतोतंत. असं 16 वेळा झालं. ध्वनिमुद्रण पूर्ण झाल्यावर बाहेर आलेल्या झरीनजींना सर्वांनी विचारले, "तुम्ही प्रत्येक वेळेस तंतोतंत वाजवले तरी दादांनी 16 वेळा वाजवून घेतले. आम्हाला तर वैताग आला असता. तुम्हाला राग नाही आला ?" झरीनजींनी उत्तर दिले, "कशाला वैताग यावा किंवा राग यावा. उलट मला आनंद झाला. कारण एक सुरावट सोळा वेगवेगळ्या प्रकारांनी वाजवता येऊ शकते हे शिकायला मिळालं."
झरीनजींच्या शिष्यांनी त्यांची परंपरा कायम ठेवली
महान कलाकार असा परिपक्व विचार करतात म्हणूनच ते अशा उंच पातळीवर पोचतात. झरीनजींच्या शिष्यांनी त्यांची परंपरा कायम ठेवली आहे. त्यापैकी एक म्हणजे सुप्रसिद्ध संतूरवादक पंडित उल्हास बापट. हो सरोदवादक संतूरवादकांचे गुरू. उल्हासजी आपल्या या गुरूंबद्दल मनापासून आणि खूप आदराने बोलतात. उल्हासजींचे हिंदी चित्रपट संगीतातले पहिले गाणे शारदाजींच्या संगीत दिग्दर्शनाखाली (बहुदा "माॅं बहन और बिवी" मधील "अच्छा ही हुवा दिल टूट गया..."). इथेच त्यांची ओळख झरीनजींशी झाली आणि त्यांना लक्षात आले की यांच्या बद्दल ऐकलं त्यापेक्षाही या महान कलाकार आहेत.
काही वेळा सोबत वाजवल्यावर वाटलं की आपण यांच्याकडून शिकण्यासारखे खूप खूप आहे. त्यांनी झरीनजींना शिकवण्यासाठी विनंती केली. पण झरीनजींनी नकार दिला असं सांगून की तुमचं वाद्य वेगळं माझं वेगळं, कसं शिकवणार. पण उल्हासजींचा निर्णय ठाम होता. लवकरच त्यांना संधी मिळाली. एकदा ध्वनिमुद्रणाला झरीनजींच्या बरोबर त्यांचे वडील आले होते. उल्हासजींनी त्यांच्याकडे आपली इच्छा प्रकट केली. झरीनजींना वडिलांनी समजावलं की होनहार बच्चा आहे तू शिकव. वडिलांच्या विनंतीला मान देऊन झरीनजी तयार झाल्या.
एका मुलाखतीत उल्हासजींनी सांगितलं, "दोन्ही वाद्यं वेगळी त्यामुळे प्रश्न होता की शिकवणार कसं. पण झरीनजींनी त्यावर सहज तोडगा काढला. त्यांच्या तीक्ष्ण निरीक्षण शक्तीमुळे त्यांनी जाणलं होतं की मला ताल अंग आहे (कारण मी तबला शिकलो होतो) . ते माध्यम बनवून त्यांनी शिकवणं सुरू केलं. पहिली बंदिश यमन मधील झपतालातली . दुसरी जनसंमोहिनी मधील रुपक तालातली. त्यातही वाद्यांमधील फरक लक्षात घेऊन आधी गायन मग वादन. त्यांचा बंदिशींकडे बघण्याचा अंदाज वेगळा होता, सरधोपट पद्धतीने बंदिश वाजवत नसत. त्या स्वतः बंदिशी बनवत, वेगवेगळ्या तालांसाठी वेगवेगळ्या मिंडचा प्रयोग मी त्यांच्याकडून शिकलो. "
उल्हासजींनी आपल्या एका मुलाखतीत झरीनजींच्या अभ्यासू वृत्तीचा तसेच अत्यंत साध्या स्वभावाचा एक किस्सा ऐकवला. उल्हासजींनी "पारिजात" नावाने एक राग तयार केला . त्यांनी झरीनजींना तो राग ऐकवला. झरीनजींनी त्याचे नोटेशन्स घेतले आणि दोन दिवसांनी सखोल अभ्यास करून त्यांनी उल्हासजींना त्या रागावरील आपली टिप्पणी व्यवस्थित लिहून दिली आणि त्यांना सांगितले, "असा राग अजून तरी कुठेच नाही. कर्नाटक संगीताच्या थाट विद्वांस या भागात यासारख्या सुरावटी आढळून येतात परंतु त्यात कोमल निषाद नाही. तुमच्या रागात कोमल निषाद आहे त्यामुळे हा तुमचा स्वतःचा राग निश्चित आहे."
उल्हासजी पुढे सांगतात, "झरीनजींनी सांगितले याच्या बंदिशी बनवा. मी त्यांनाच विनंती केली तर म्हणाल्या तुमचा राग आहे तुम्हाला बनवता येतील तेव्हा तुम्हीच तयार करा. मी झपताल आणि त्रिताल मध्ये दोन बंदिशी बांधून त्यांना ऐकवल्या, त्यांनी खूप कौतुक केलं. पुढे एकदा रेडिओ साठी वादन करण्याचं निमंत्रण आलं. मी झरीनजींना विचारलं तर पारिजात राग वाजवायला सांगितलं. नंतर त्यांना रेडिओ साठी वादन करण्याचं निमंत्रण आलं तेव्हा माझी परवानगी मागितली पारिजात राग वाजवायला. मी म्हणालो तुम्ही माझ्या गुरू आहात परवानगी काय मागता. तर म्हणाल्या राग तुमचा आहे तुम्हाला विचारणे जरूरी आहे, गुरू शिष्य हा प्रश्नच नाही. त्यावर मला म्हणाल्या मला बंदिश शिकवा. इतका साधा सरळ स्वभाव. आकाशवाणीवर वाजवल्यावर काहींनी विचारलं की हे ऐकल्यासारखं वाटतं आहे तर मोकळ्या मनाने सांगितलं की हा उल्हासजींचा राग त्यांच्याकडून शिकले. ही महानता."
झरीनजींना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. त्यापैकी महत्वाचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार 1988 मध्ये महाराष्ट्र गौरव पुरस्कार 1990 मध्ये. झरीनजींकडून अजूनही खूप काही ऐकायला रसिक आतूर होते. पण कदाचित तो जगन्नाथही या जादूच्या सुरांसाठी आसुसलेला होता. म्हणूनच त्याने झरीनजींना वयाच्या 68 व्या वर्षीच , 20 डिसेंबर 2014 रोजी आपल्याकडे बोलावून घेतलं. झरीनजी फार मोठा सांगितीक खजिना आपल्यासाठी सोडून गेल्या . आपण त्याचा आनंद लूटायला हवा.
झरीन दारूवाला यांची काही गाजलेली गाणी
चित्रपट संगीत वर्तुळात सरोद वादन म्हटलं की झरीनजींचं नाव पहिले यायला लागलं. अनेक चित्रपट गीते, पार्श्वसंगीत, श्रेयनामावली संगीत यांची झरीनजींच्या सरोद स्वरलहरींनी कर्णमधुरता वाढवली. त्यापैकी काहींचा धावता आढावा-
"चित्रलेखा" चित्रपटाचं श्रेयनामावलीचं संगीत - यात पहाडी रागातील अप्रतिम जुगलबंदी झरीनजींची सरोद आणि इमरत खान यांची सतार . हे झरीनजींचं पहिलं मोठं योगदान .
"सजनवा बैरी हो गए हमार..." मुकेश , शंकर-जयकिशन आणि शैलेंद्र यांचं "तिसरी कसम" चित्रपटातलं कर्णमधुर गीत . याची खुमारी वाढवतात झरीनजींच्या सरोदचे बोल .
शंकर-जयकिशन , शैलेंद्र आणि लता मंगेशकर यांच्या "आम्रपाली" चित्रपटांतील "तडप ये दिन रात की..."
"तेरे नैना तलाश करे जिसे..." मन्नदांच्या अतुलनीय गाण्यांपैकी एक . मजरुह सुलतानपुरी आणि सचीनदेव बर्मन यांचे शाहू मोडक आणि मधुमती यांच्यावर चित्रित छायानट रागातील "तलाश" मधील गाणं. या सुंदर गाण्याचं सौंदर्य द्विगुणित करते झरीनजींची सरोद.
"बडी सुनी सुनी है..." बरमनदांचं आणखीन एक उत्तम गाणं योगेश यांच्या लेखणीतून उतरलेलं आणि किशोरदांनी गायलेलं "मिली" चित्रपटात. या गाण्यातलं औदासिन्य झरीनजींच्या सरोदमुळे आणखीन गहिरं होतं.हे झरीनजींचं बर्मनदांसोबतचं शेवटचं काम.
"तुमको तो करोडो साल हुवे..." (चित्रपट "संबंध") कवी प्रदीप, ओ . पी . नय्यर, आशा भोसले आणि हेमंत कुमार हे हटके मिश्रण, त्यात शास्त्रिय संगीताची झलक असलेलं नय्यरसाहेबांच्या नेहमीच्या पठडीपेक्षा वेगळं गाणं. (अशी शास्त्रीय संगीताच्या अंगांनी जाणारी कमी पण अप्रतिम गाणी नय्यरजींनी दिली). झरीनजींची सरोद गाण्याला चारचाॅंद लावते.
"बोले रे पपिहरा..." "गुड्डी" चित्रपटातलं प्रचंड गाजलेलं मिया की मल्हार रागातलं कर्णमधुर गीत. गुलजार , वसंत देसाई आणि वाणी जयराम यांची सांगितीक कमाल. यातले सतार बरोबरचे झरीनजींच्या सरोदचे मोती कसे विसरू शकतो!
"मिठे बोल बोले..." ("किनारा") गुलजार, आर . डी . बर्मन, लता मंगेशकर, भुपेन्द्र सिंग, सपन चक्रवर्ती (श्रीराम लागू यांच्या तोंडी असलेले तालांचे बोल यांनी गायले).
सामता प्रसाद यांचा तबला आणि झरीनजींची सरोद यांनी या भैरवी रागातील गाण्याची लज्जत वाढवली आहे.
"किनारा" मधील एक आणखी गाणं… "नाम गुम जाएगा..." जिन्याच्या पायऱ्यांवरून जितेंद्र उतरताना वाजणारी सरोद !
"इस मोड से जाते है..." (आंधी) - किशोरदा , लताजी , पंचमदा आणि गुलजारजी यांच्या जादुगिरी मधली झरीनजींची सरोद !
"दिल में तुझे बिठाके..." ("फकिरा" - रवींद्र जैन , लता मंगेशकर) प्रील्यूड आणि इंटरल्यूड्स मधील झरीनजींची सरोद गाण्याला एका उंचीवर नेते .
रवींद्र जैन यांच्या बरोबर झरीनजींनी "सौदागर" चित्रपटाच्या बॅकग्राऊंड संगीतापासून काम सुरू केले. "सुनयना" आणि "चितचोर" मधील गाण्यांमधली सरोद कशी विसरता येईल! रवींद्र जैन यांच्या बरोबर झरीनजींनी पती पंडित अशोक शर्मा यांच्यासह अनेक चित्रपटांसाठी वादन केले.
"छोड दे सारी दुनिया किसी के लिये..." ("सरस्वती चंद्र - इंदिवर , कल्याणजी-आनंदजी, लता मंगेशकर) सतार आणि झरीनजींची सरोद यांची अफलातून जुगलबंदी.
"खिलौना जानकर तुम तो..." - "खिलौना" मधील आनंद बक्षी, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, महंमद रफी यांचे आर्त गीत. पहिल्या कडव्यानंतर रफीजींच्या "खिलौना" या आर्त गायनानंतर झरीनजींची सरोद तितक्याच आर्ततेने उरलेलं धृपद गाते.
"देख सकता हूं मैं..." ("मजबूर") लक्ष्मिकांत-प्यारेलाल यांच्या या गाण्याच्या यशात झरीनजींच्या सरोदचा वाटा आहे.
"मेरे नैना सावनभादो..." लता मंगेशकर यांनी गायलेलं, आनंद बक्षी आणि आर. डी. बर्मन यांचं "मेहबूबा" चित्रपटातलं गाणं. तिसऱ्या कडव्याच्या आधी सरोद, सतार, घुंगरू आणि तबला अप्रतिम!
"हमें तुमसे प्यार कितना..." "कुदरत" मधील मजरुह सुलतानपुरी आणि आर. डी. बर्मन यांच्या या गाण्याच्या यशात मोठा वाटा परवीन सुलताना यांच्या गायकीचा आहे आणि त्यांच्या गायकीला योग्य आणि चपखल साथ आहे इंटरल्यूड्स मधील झरीनजींच्या सरोदची.






