सातारा-सासवड रस्त्यावर वाठार स्टेशन नावाचं गावं आहे. गावात भौतिक सुविधांचा सुकाळ असला तरी, हे गाव अजून ‘शहर’ झालेलं नाही. याच गावातून जाताना रस्त्याच्या कडेला "दुर्गा खानावळ- स्थापना 1934’ हा बोर्ड आपलं लक्ष वेधून घेतो. प्रश्न पडतो 1934 मध्ये ही खानावळ या खेड्यात कशी स्थापन झाली? पुण्या-मुंबईसारख्या शहरांत एवढी जुनी खानावळ असणं शक्य आहे. पण या गावाचं आजचं स्वरूप पहाता त्यावेळी हे गाव खूपच लहान असेल मग तेव्हा खानावळ सुरू करण्याचं धाडस कुणी केलं असेल; याचाच शोध घेण्याचा हा प्रयत्न…
विमल जाधव यांच्या आजतसासू (सासूची सासू) सोनाबाई जाधव आणि सोनाबाई यांची भाची दुर्गाबाई यांनी 1934 मध्ये इंग्रज अधिकारी बेंझी यांच्या पुढाकाराने ही खानावळ सुरू केली. त्या काळी मुंबईवरून महाबळेश्वरला येणारे इंग्रजी अधिकारी रेल्वेने वाठार स्टेशनपर्यंत येत. तिथून घोडगाडीने महाबळेश्वरला जात. या प्रवासात त्यांच्या जेवणाची गैरसोय होई. तेव्हा बेंझी यांनी सोनाबाईंना वाठार स्टेशनवर खानावळ सुरू करण्याचा परवाना दिला.
खानावळ सुरू झाली… खानावळीत मिळणारी बाजरीची भाकरी, मुगाची उसळ, दही, चटणी, लोणचं आदी पदार्थ इंग्रजी अधिकारी मिटक्या मारत खाऊ लागले. खूप दिवस टिकणारी बाजरीची भाकरी, तर अनेक अधिकारी सोबत घेऊन जावू लागले. खानावळ जोरात चालू लागली. पैसेही चांगले मिळू लागले, याचा अर्थ सोनाबाई यांना इंग्रजी राजवट प्यारी होती, असं नाही. पण इंग्रजी राजवटीची अवकृपा होईल, म्हणून त्या गप्प होत्या. खरं तर इंग्रजी लोकांशी गोड बोलून त्या गुप्तपणे स्वातंत्र्याच्या चळवळीत काम करत होत्या. या संदर्भातली ही सोनाबाईचे नातसून विमल जाधव यांनी सांगितलेली माहिती खूपच वेगळी आणि इतिहासातील एका महत्त्वाच्या गोष्टीवर प्रकाश टाकणारी आहे.
विमल जाधव म्हणाल्या, "तवा घुमाईची दरी आणि महादेव मंदिर परिसरात इंग्रजी राजवटीच्या विरोधात लढणारे क्रांतिकारक राहत होते. या क्रांतिकारकांनी इंग्रजी सत्तेला मोठे आव्हान दिल व्हतं. त्यांना पकडायला सरकारने रोख बक्षीस लावलं होतं. ही पत्री सरकारची चळवळ करणारी लोक दिवसभर मोहिमेवर असायची, रात्री या घुमाईच्या दरीत मुक्कामी असायची.’
"याच काळात एका रात्री त्यातील दोन लोकं खानावळीत आले आणि दहा माणसांचं जेवण मागितलं. ही माणसं कोण आहेत? अशी शंका यायला लागली. मग सोनाबाई यांनी कसून चौकशी केली, तेव्हा त्यांनी खरं खरं सांगितलं,"आम्ही पत्रीसरकारची माणसं हायी. इथं घुमाईच्या दरीत राहतोय.'
संबंधित व्हिडिओ:
त्या लोकांविषयी सोनाबाई ऐकून होत्या. त्यांच्या कामाबद्दल त्यांना आदरही होता, कधी कधी ‘ती पत्रीसरकारची लोक कसली असत्याली?' असा प्रश्नही त्यांना पडत होता. तीच लोकं समोर आलेली पाहून सोनाबाईना खूपच आनंद झाला. त्याच्याकडील जेवण संपले होते. तरीही त्यांनी जेवण तयार करून दिले.
या घुमाईची दरी परिसरात, तेव्हा क्रांतिसिंह नाना पाटील, नागनाथ नायकवडी किसन वीर, पांडू मास्तर हे क्रांतिकारक वास्तव्य करून असायचे. त्यांच्यासोबत इतरही लोक असायचे. या सगळ्या लोकांना सोनाबाईचं जेवण मिळायचं. सुरुवातीला त्यांच्यातील लोक यायचे, पण नंतर इंग्रजी अधिकाऱ्यांचा वावर वाढल्यावर मात्र जेवण आणायला जायचं, त्यांनी बंद केलं.
देशासाठी लढणाऱ्या लोकांना जेवण मिळत नाही, ती उपाशी आहेत, हे पाहून सोनाबाई खूपच अस्वस्थ व्हायच्या. त्यांनी मग एक युक्ती केली. त्यावेळी वाठार भागात विटा-मायणीकडचा एक पोस्टमन होता. तो जेवायला सोनाबाईच्या खानावळीत असायचा. त्याला इंग्रजी राजवटीची चीड होती. हे तो खानावळीत सोनाबाईजवळ नेहमी बोलायचा. त्या पोस्टमनला सोनाबाईनी विश्वासात घेऊन सगळं सांगितलं.
त्याच्यावर घुमाईच्या दरीत जाऊन जेवण पोहोचण्याची जबाबदारी सोपवली. त्याने ती जबाबदारी आनंदाने स्वीकारली. त्याच्याकडं सायकल होती. तो सायकलीवर ती थैली बांधायचा आणि बघता बघता घुमाईच्या दिशेनं जायचा. त्याच्यामुळे भूमिगत क्रांतिकारकांना जेवण मिळू लागलं. तो जेवण देऊन परत येताना, जर कोण रस्त्यावर भेटलं तर म्हणायचा, "पोस्टाची नोकरी लै वाईट. कुठंबी फिरायला लागतं. माणूस जिथं रहायला असलं, तिथं जायला लागतं. बघा सकाळपासून फिरतुय...’
विमल जाधव यांनी सांगितले, "सोनाबाई या भूमिगत लोकांना नुसतं जेवणच पोहोच करत नव्हत्या, तर कोणी अधिकारी येणार असेल तर त्यांना अगोदर जेवण बनवायचा निरोप यायचा. मग त्या पोस्टमन सोबत हा निरोपही पोहोच करून भूमिगताना सावध करायच्या. अनेकदा या अधिकाऱ्यांनी धाडी टाकूनही त्यांच्या हाती भूमिगत सापडले नव्हते, याचं खरं कारण पोस्टमनाकरवी सोनाबाईने पोहोच केलेली बातमीच असायची.’
सोनाबाई जाधव या एकाच चुलीवर बनवलेला स्वयंपाक इंग्रजी अधिकारी आणि त्यांच्या विरोधात जीवावर उदार होऊन लढणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासारखे देशभक्त यांना पोहोच करत होत्या. तेव्हा संपर्क करण्याची कसलीही साधने नसताना, त्या हे काम यशस्वी करत होत्या. इंग्रजी राजवटीला त्यांची चुकूनही शंका असती, तर त्यांना काळ्या पाण्याचीच शिक्षा झाली असती! याची जाणीव सोनाबाई आणि त्यांची भाची दुर्गाबाई यांना नसेल का? नक्कीच असेल, पण त्यांनी त्याची पर्वाही केली नसेल. जे होईल ते होईल पण भूमिगत क्रांतिकारकांना जेवण द्यायचं असं, त्यांनी ठरवलं आणि धोका पत्करून त्यांनी हे देशकार्य केलं.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सोनाबाई आणि दुर्गाबाई भेट घेतली. त्यांनी केलेल्या उपकराबाबत कृतज्ञता व्यक्त केलीच, पण त्यांनी विचारले, "ताई, मी तुमच्यासाठी काय करू? मी काहीही केलं तरी तुमच्या उपकाराची परतफेड होणार नाही.’
त्यावर सोनाबाई यांनी, "आण्णा, मला कायबी नको. तुम्हीच तुमची काळजी घ्या. जपा.’ असं सांगितलं. स्वातंत्रसैनिक म्हणून मिळणारी पेन्शन आणि इतर सुविधा सोनाबाईंनी नाकारल्या. उदरनिर्वाहासाठी अखेरपर्यंत त्यांनी खानावळीचाच व्यवसाय नेकीने केला. नंतरच्या काळात स्वातंत्र्यलढ्यातील या अनमोल कामाचं भांडवल त्यांनी केलं नाहीच, पण स्वतःबद्दल कोणाला काही सांगितलंही नाही.
गेल्या 90 वर्षांपासून सुरू असणारी ही खानावळ जाधव कुटुंबीयांची तिसरी पिढी सांभाळत आहे. विशेष म्हणजे येथील जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी छत्रपती घराण्यासह अनेक सिनेस्टार, राजकारणी आणि पर्यटक आवर्जून येत असतात. आता तिसऱ्या पिढीतील दुर्गा जाधव या खानावळीचं काम पाहतात. येथील जेवणामध्ये चपाती, वरण, तिखट भाजी, सुकी भाजी, दोन प्रकारच्या चटण्या, खरडा, भात, लोणचे, दही, तूप, पापड, श्रीखंड असे पदार्थ अगदी माफक दरात दिले जातात. त्यामुळे नेहमीच याठिकाणी ग्राहकांच्या मोठी गर्दी असते.






