हरियाणातील गुरुग्राममध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील टेनिसपटू राधिका यादवची तिच्याच वडिलांनी दीपक यादवने गोळ्या झाडून हत्या केली. यामागील नेमकं कारण काय हे आता समोर आलं आहे. यादव कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, वडील दीपक यादव यांनी टेनिस अकॅडमीसाठी 1.25 कोटी राधिकाला रुपये दिले होते. मात्र, एकाच महिन्यानंतर, त्यांनी आपल्या मुलीवर अकॅडमी बंद करण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. आरोपी वडिलांनी तिला टेनिस अकॅडमी बंद करण्यास सांगितले. पण, राधिका सहमत झाली नाही आणि दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर वडिलांनी संतापून तिच्यावर गोळी झाडली. ही घटना गुरुग्राममधील सेक्टर 57 येथील सुशांत लोक फेज 2 मध्ये घडली.
कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 15 दिवसांपासून घरात वाद सुरू होता. वडील आणि मुलगी दररोज भांडत होते. पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, राधिका टेनिस अकॅडमी चालवत होती. ज्यातून चांगले उत्पन्न मिळत होते. लोक तिच्या वडिलांना टोमणे मारायचे की ते त्यांच्या मुलीचे पैसे खात आहेत.
एफआयआरमध्ये काय आहे?
- आरोपी दीपकचा भाऊ कुलदीप यादवने पोलिसात तक्रार दाखल केली. कुलदीपने सांगितले की, गुरुवारी सकाळी दीपकचा राधिकासोबत अकॅडमी बंद करण्यावरून वाद झाला. राधिका स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असताना दीपकने त्याच्या परवानाधारक पिस्तूलने मागून तिच्यावर तीन गोळ्या झाडल्या.
- कुलदीप म्हणाला की, मी सकाळी तळमजल्यावर होतो. मला मोठा आवाज ऐकू आला आणि जेव्हा मी पहिल्या मजल्यावर गेलो तेव्हा मला राधिका स्वयंपाकघरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. तर पिस्तूल ड्रॉईंग रूममध्ये पडलेली होती. मी आणि माझा मुलगा तिला आशिया मारिंगो रुग्णालयात घेऊन गेलो, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
- कुलदीप म्हणाला की माझ्या भावाने 32 बोअरची त्याची पिस्तूल वापरली होती आणि ती परवानाकृत देखील होती. राधिका स्वयंपाकघरात रक्ताने माखलेली पडली होती आणि दीपकही जवळच बसला होता. माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दीपकला ताब्यात घेतले.
"लोक मला टोमणे मारायचे की मुलीची कमाई खातोय" - दीपक यादव
"राधिका एक उत्तम खेळाडू होती. तिने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पदके जिंकली होती. संपूर्ण कुटुंबाला याचा अभिमान होता. मलाही माझी मुलगी राधिकाचा अभिमान होता. राधिकाला सुमारे 3 महिन्यांपूर्वी खांद्याला दुखापत झाली होती. ही दुखापत टेनिस खेळताना झाली. त्यांनी डॉक्टरांकडून उपचार घेतले. तिला दुखापतीतून आराम मिळाला, परंतु मुलीने टेनिस खेळणे बंद केले. यानंतर राधिकाने स्वतःची अकॅडमी उघडली, जिथे ती मुलांना आणि मुलींना टेनिस शिकवत असे, असे दीपक यादवने सांगितले.
तो पुढे म्हणाला की, जेव्हा मी दूध खरेदी करायला जायचो तेव्हा लोक मला टोमणे मारायचे. ते म्हणायचे की तुमची मुलगी खूप पैसे कमवत आहे. तुम्ही मजा करत आहात, तुम्ही तुमच्या मुलीचे पैसे खर्च करत आहात. तुम्ही आणि तुमचे कुटुंब खूप छान वेळ घालवत आहात. लोकांचे हे बोलणे मला त्रास देत असे. मी याबद्दल राधिकाशी अनेकदा बोललो होतो. मी लोकांकडून टोमणे ऐकून कंटाळलो आहे. मी राधिकाला ही अकादमी बंद करण्यास सांगितले. आमचे कुटुंब श्रीमंत आहे, कोणतीही अडचण येणार नाही. यावर राधिका म्हणाली की लोक काय म्हणतात याची मला पर्वा नाही. खेळाने तिचे करिअर बनवले आहे, मग त्यातून पैसे कमवण्यात काय गैर आहे.गुरुवारीही मी तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा तिने ऐकले नाही तेव्हा मी तिच्यावर गोळी झाडली."
राधिका आंतरराष्ट्रीय स्तरावरची खेळाडू...
- 23 मार्च 2000 रोजी जन्मलेल्या राधिकाने अनेक आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशन (आयटीएफ) आणि महिला टेनिस असोसिएशन (डब्ल्यूटीए) स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. राधिकाचे कारकिर्दीतील सर्वोत्तम आयटीएफ रँकिंग सुमारे 1638 होते. राधिकाने महिला दुहेरी प्रकारात हरियाणामध्ये पाचवे स्थान मिळवले होते.
- जून 2024 मध्ये ट्युनिशियामध्ये झालेल्या W15 स्पर्धेत राधिका पोहोचली. याशिवाय फेब्रुवारी 2017 मध्ये ग्वाल्हेरमध्ये झालेल्या सामन्यात राधिकाचा सामना तैवानच्या खेळाडू हसीन-युआन शिहशी झाला. राधिका ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) मध्ये देखील नोंदणीकृत आहे.
- राधिका 22 जानेवारी 2018 रोजी एआयटीए मुलींच्या 18 वर्षांखालील गटात 75 व्या स्थानावर पोहोचली. 12 फेब्रुवारी 2018 रोजी एआयटीए महिला एकेरीमध्ये ती ३५व्या स्थानावर पोहोचली. 5 एप्रिल 2021 रोजी राधिकाचे महिला दुहेरीतील सर्वोत्तम स्थान 53 वे होते. 112 आठवडे महिला दुहेरीत टॉप 100 मध्ये तिचे स्थान कायम ठेवले.
- एआयटीए महिला दुहेरीत टॉप 100 मध्ये स्थान मिळवणाऱ्या हरियाणातील फक्त चार खेळाडूंपैकी राधिका एक होती. 4 नोव्हेंबर 2024 रोजी महिला दुहेरीत तिचे 113 चे आयटीएफ रँकिंग हे तिचे कारकिर्दीतील सर्वोत्तम रँकिंग होते.






