18 महिन्यांपासून तुरुंगात असणारी हरयाणाची नीलम आझाद आणि राजस्थानचा महेश कुमावत हे दोघे दोन दिवसांपूर्वी अखेर तुरुंगातून बाहेर आले. 13 डिसेंबर 2023 रोजी, आरोपी नीलम आझाद, सागर शर्मा, मनोरंजन डी आणि अमोल शिंदे यांनी संसदेच्या परिसरात धुराचे डबे फेकत सरकारचा निषेध केला होता. शर्मा आणि मनोरंजन डी यांनी लोकसभेच्या गॅलरीतून सभागृहात उडी मारली, तर आझाद आणि शिंदे यांनी संसद परिसराबाहेर निषेध केला होता. त्याच दिवशी चौघांना अटक करण्यात आली होती.
संसदेच्या सुरक्षा भंग प्रकरणात २ जुलै रोजी आरोपी नीलम आझाद आणि महेश कुमावत यांना काही शर्तींवर दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद आणि न्या. हरीश वाडियानाथन शंकर यांच्या खंडपीठाने प्रत्येकी 50 ,000 रुपयांचे जामीनपत्र आणि दोन जामीनदारांच्या अधीन आरोपींची सुटका करण्याचे आदेश दिले. कागदपत्रांच्या छाननीनंतर अखेर दोन दिवसांपूर्वी नीलम आझाद आणि महेश कुमावत तुरुंगातून बाहेर पडले.
दिल्ली पोलिसांनी आरोपींवर बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा(UAPA) आणि भारतीय दंड संहिता (IPC) अंतर्गत गंभीर आरोप केले होते. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल चेतन शर्मा यांनी दिल्ली पोलिसांची बाजू मांडताना असा युक्तिवाद केला की, “हा निषेध 2001 च्या संसदेवरील दहशतवादी हल्ल्याच्या वर्धापनदिनी घडवून आणला आणि देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचवण्याचा हा प्रयत्न होता.
आरोपींचे कृत्य खासदार, कर्मचारी आणि टीव्हीवर सभागृहाचे कामकाज पाहणाऱ्यांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी होते. विशेषतः शीख फुटीरतावादी नेते गुरपतवंत सिंग पन्नून यांनी धमकी दिल्याच्या दिवशीच हा प्रकार घडल्यामुळे ते अधिक गंभीर आहे.”
संसदेत धुर उडवून निषेध करणे हे खरंच दहशतवादी कृत्य आहे का? - न्यायालय
न्या. सुब्रमण्यम प्रसाद आणि न्या. हरीश वाडियानाथन शंकर यांच्या खंडपीठाने विचारले की, “संसदेत धुर उडवून निषेध करणे हे खरंच दहशतवादी कृत्य आहे का? बाजारात पिवळ्या धुराचे डबे उघडपणे विकले जातात. होळी, लग्न आणि इतर उत्सवांमध्ये हे वापरले जातात.
मग त्यांचा वापर UAPA (देशद्रोह) लागू करण्यासाठी कसा आधार असू शकतो? पहिल्या दृष्टीक्षेपात, त्यांच्यावर जे काही आरोप लावले गेले आहेत, ते देशद्रोहाच्या कक्षेत येत नाहीत.' असा असा खोचक प्रश्न करत खंडपीठाने मान्य केले की, संसद परिसरात असा निषेध अत्यंत गंभीर आहे. परंतु UAPA सारखा कठोर कायदा वापरणे तर्कसंगत आहे आणि तो वापरणे आवश्यक आहे का, यावर विचार दिल्ली पोलिसांनी केला पाहिजे.
याप्रकारे न्यायालयाने आपले मत व्यक्त करत दोन आरोपींना जामीन मंजूर करत 50 हजार रूपयाचा दंड दिला आहे. तसेच त्यात पुढील काही शर्तींचे पालन करण्याचा आदेश दिला आहे.
- या प्रकरणाविषयी कोणतीही मुलाखत देऊ नये किंवा पत्रकार परिषद घेऊ नये.
- सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट करू नये.
- दिल्ली सोडून जाऊ नये.
- प्रत्येक सोमवारी आणि बुधवारी सकाळी 10 वाजता पोलिस ठाण्यात हजर राहावे.
नीलमचे वकील बलराज मलिक आणि महेश कुमावत यांचे वकील सोमार्जुन यांनाही या प्रकरणात देशद्रोहाचा कोणताही आधार आहे असे वाटत नाही. बलराज म्हणतात, 'न्यायालयाने आमचा युक्तिवाद मान्य केला. सुनावणीदरम्यान न्यायालयाच्या टिप्पणीमुळे आम्हाला आशा आहे की उर्वरित 4 आरोपींनाही लवकरच जामीन मिळेल. सर्वांवरून UAPA देखील काढून टाकला जाईल.'
सोमार्जुन हे मनोरंजन डी चेही वकील आहेत, ज्याला या घटनेचा मास्टरमाइंड म्हटले जात आहे. ते म्हणतात, 'मनोरंजन हा मास्टरमाइंड नाही तर एक सामान्य तरुण आहे. त्या सर्वांना कोणतेही कट करायचे नव्हते तर फक्त त्यांचे मुद्दे मांडण्यासाठी निषेध करायचा होता.'
नीलमचा भाऊ रमेश म्हणाला, 'आम्हाला माहित होते की नीलम तिहारच्या गेट क्रमांक 4 मधून बाहेर पडेल, पण ती गेट क्रमांक 6 मधून बाहेर पडली. आम्ही अर्धा तास एका गेटपासून दुसऱ्या गेटपर्यंत धावत होतो. तिला पाहताच आम्ही सर्वजण रडू लागलो. नीलमही रडत होती. नीलमच्या सुटकेच्या वेळी आम्हाला तिचे फोटो काढू नका किंवा व्हिडिओ बनवू नका असे आधीच सांगण्यात आले होते. तिच्याबद्दल कोणालाही बोलण्यास पूर्ण बंदी आहे.'
नीलम आझादकडे आहेत पाच उच्च पदव्या
न्यायालयाच्या आदेशामुळे नीलम घरी जाऊ शकत नाही. त्यामुळे ती दिल्लीत भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहणार आहे. तिची आई आणि मोठा भाऊही तिच्यासोबत दिल्लीतच राहणार आहेत. तिचा भाऊ म्हणाला, 'दिल्लीत राहणे आमच्यासाठी खूप महाग आहे. फ्लॅटचे भाडे 9,500 रुपये आहे.
तीन लोकांचा राहण्याचा आणि जेवणाचा खर्च किमान 3-4 हजार असेल. आठवड्यातून 3 वेळा पोलिस स्टेशनला हजेरी लावणे म्हणजे जाण्याचा आणि परत येण्याचा खर्चही 1 ते 2 हजार असेल.सध्या नीलम बाहेर येणे महत्वाचे होते. आता आम्ही आमच्या वकिलाशी बोलू आणि याचिका दाखल करू जेणेकरून नीलमला लवकरात लवकर घरी जाण्याची परवानगी मिळेल.'
'माझी मुलगी अभ्यासात चांगली होती. NET कोचिंग शिकवायची. तिने लहान मुलांनाही शिकवले, पण कोणाकडूनही पैसे घेतले नाहीत. तिने खूप अभ्यास केला, पण नोकरी मिळाली नाही. याबद्दल दुःखी होती. संसदेच्या सुरक्षेचा भंग केल्याचा आरोप असलेल्या नीलम आझादची आई हे सांगताना रडते. नीलमचा भाऊ रमेश म्हणतो, 'माझी बहीण केवळ घरातच नाही तर संपूर्ण गावात सर्वात सक्षम होती.
तिच्याकडे 5 उच्च पदव्या आहेत. संस्कृतमध्ये एम.ए., एम.फिल, सीटीईटी, एचटीएटी, नेट. दुसऱ्या प्रयत्नात फक्त HTAT परीक्षा उत्तीर्ण झाली, बाकी सर्व पहिल्याच प्रयत्नात पास झाली. पण नोकरी मिळाली नाही.
नीलमला देशद्रोही म्हणणाऱ्यांचा रमेशला राग येतो. तो म्हणतो, 'लोक तिला खलिस्तानी पन्नूशी जोडत आहेत. त्याचे नावही आम्ही आजपर्यंत ऐकले नव्हते. नीलम ही दहशतवादी नाही. ती संसदेवर हल्ला करायला गेली नव्हती, तिला फक्त बेरोजगारीविरोधात आवाज उठवायचा होता. तिचा हेतू देशविरोधी असू शकत नाही.
नीलम संसदेच्या बाहेर होती आणि कुमावत दिल्लीच्या बाहेर होता
13 डिसेंबर 2023 रोजी घडलेल्या घटनेच्या वेळी, आरोपी नीलम संसदेत नव्हती. तिने डब्यातून पिवळा धूर सोडला, पण संसदेच्या बाहेर. दुसरा आरोपी महेश कुमावत घटनेच्या वेळी संसदेच्या जवळही नव्हता. त्यामुळे आता दोघेही जामिनासाठी पात्र आहेत. पोलिस तपासात असेही समोर आले आहे की नीलमने स्वतः संसदेत जाण्यास नकार दिला होता. महेश देखील या गटाच्या शेवटच्या दोन बैठकांमध्ये उपस्थित नव्हता.
आरोपींकडून जप्त केलेल्या पत्रकांमध्ये किंवा न्यायालयाच्या इतर नोंदींमध्ये असे काहीही आढळलेले नाही की ज्यावरून असे सिद्ध होते की आरोपीचा देशाची एकता, अखंडता, सुरक्षा किंवा सार्वभौमत्व धोक्यात आणण्याचा हेतू होता. तसेच आरोपीने दहशत पसरवण्याच्या उद्देशाने हे कृत्य केले होते हे सिद्ध होत नाही.
UAPA च्या कलम 15 किंवा 18 लागू केल्याचे सिद्ध करणारा कोणताही पुरावा रेकॉर्डवर नाही. तसेच या घटनेचा परिणाम देशातील किंवा देशाबाहेरील समाजातील कोणत्याही घटकाच्या मनात दहशत निर्माण करणे आहे हे देखील सिद्ध झालेले नाही.
घटनेच्या वेळी कोण कुठे होते, कोणत्या आरोपीची जबाबदारी काय होती?
1. कर्नाटकातील रहिवासी असलेल्या मनोरंजन डी याला या प्रकरणाचा सूत्रधार म्हणून वर्णन करण्यात आले आहे. घटनेच्या वेळी तो संसदेच्या आत असलेल्या लोकसभा वेलच्या अगदी जवळ होता. त्याने एका डब्यातून पिवळ्या रंगाचा धूर सोडला होता.
2. सागर शर्मा संसदेच्या आत असलेल्या वेलच्या अगदी जवळ होता. त्यानेही डब्याचा वापर केला.
3. नीलम आझाद आणि अमोल शिंदे संसदेत गेले नाहीत, ते गेट क्रमांक 2-3 वर बाहेर उपस्थित होते. त्यांनी कॅनिस्टरमधून धूर सोडला आणि पत्रके फेकली.
4. घटनेपूर्वी त्या चौघांनीही त्यांचे फोन फॉरमॅट केले होते. सिमकार्ड तोडल्यानंतर, त्या सर्वांनी त्यांचे फोन पाचव्या आरोपी ललित झा याला दिले जेणेकरून तो ते जाळू शकेल.
5. महेश कुमावत नावाचा एक तरुण या पाच जणांसोबत सुरुवातीच्या नियोजनात सहभागी होता, पण शेवटच्या दोन बैठकांना तो उपस्थित राहिला नाही. घटनेच्या वेळी तो राजस्थानमध्ये होता.






