- कोमल ठोंबरे
महिलांचे क्रिकेट म्हणजे केवळ ‘मुलीही खेळतात बरं का’ असे सांगणारे प्रतीकात्मक सामने नव्हेत, हे सिद्ध करणारी घोषणा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच केली आहे. या महिन्याच्या अखेरीस रंगणाऱ्या वर्ल्ड कप महिला एकदिवसीय सामन्यांत बक्षिसांच्या रकमेत मजबूत वाढ करण्यात आली आहे. विजेत्या संघाला आता 39.55 कोटी रुपये देण्यात येतील. महिला एकदिवसीय स्पर्धांच्या इतिहासातील ही सर्वाधिक रक्कम आहे. गेल्या स्पर्धेतील विजेत्यांना 11.65 कोटी देण्यात आले होते. त्या तुलनेत ही वाढ तब्बल चारपट आहे. दोन वर्षांपूर्वी पुरुषांच्या एकदिवसीय स्पर्धेतील विजेत्या ऑस्ट्रेलियाला 35.31 कोटी मिळाले होते. त्याहूनही ही रक्कम अधिक आहे, हे विशेष.
क्रिकेटमधील पैसा प्रचंड वेगाने वाढतो आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची उलाढाल तब्बल 600 कोटी डॉलर एवढी अवाढव्य आहे. साहजिकच नवनवे खेळाडू आकर्षित होत आहेत. यात जगभर मोठ्या संख्येने मुली असल्या तरी पुरुष खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या मानधनाशी तुलनाही होऊ नये एवढी कमी रक्कम सातत्याने महिलांना दिली जात होती, त्यात अलीकडे सुधारणा होऊ लागली आहे. टेनिस, ज्युदो, स्कीइंग आणि बॅडमिंटन यांसारख्या खेळांमध्ये पुरुष आणि महिलांना समान बक्षीस रक्कम दिली जाते.
महिला क्रिकेट विश्वचषकाची बक्षिसाची रक्कम पुरुषांपेक्षा जास्त
क्रिकेट आणि फुटबॉलसारखे खेळ मात्र मोठा भेदभाव करतात. याचे कारण देताना महिलांच्या खेळांना मिळणाऱ्या अल्प प्रतिसादाचे कारण पुढे केले जाते. त्यात तथ्य आहेही; मात्र असे म्हणणाऱ्यांनी महिलांना खेळाची मैदाने कधी उपलब्ध झाली तेही बघावे. 1896 मध्ये अथेन्समध्ये पहिले ऑलिम्पिक सामने झाले, त्यात महिलांना मज्जाव होता. 1940 च्या दशकात पहिली महिला व्यावसायिक क्रीडा लीग झाली. म्हणजे व्यावसायिक खेळाचे दरवाजे उघडण्यासाठी त्यांना 50 वर्षे लढावे लागले ! त्यानंतर स्वतःला सिद्ध करणे आणि खेळ लोकप्रिय होण्याची गोष्ट. प्रसारण हक्कांचीही समस्या आहे. 
महिलांचे खेळ माध्यमांतून इतके कमी दिसतात की त्यातून खेळ लोकप्रिय होणे, चाहते निर्माण होणे कठीण. यातून पुरुषी व्यवस्थेला अनुकूल असे विषारी चक्र सुरू राहते. आधीच्या पिढीतील महिलांनी खडतर मार्गावरून क्रिकेट पुढे नेले. मानधन इतके कमी असायचे की क्रिकेट खेळण्यासाठी खिशातून पैसे घालावे लागल्याची आठवण भारतीय महिला संघाच्या माजी कर्णधार सुधा शाह यांनी नोंदवली आहे. आयसीसीने महिलांसाठी बक्षिसाच्या रकमेमध्ये घसघशीत वाढ केली तरी अद्याप पुरुषांची बरोबरी गाठायची आहे.
असो, तर येत्या 30 सप्टेंबर पासून ICC महिला विश्वचषक 2025 रंगणार आहे. भारतात 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर या काळात भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे महिलांच्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे) आयोजन करणार आहेत. आतापर्यंत महिलांचे 12 एकदिवसीय विश्वचषक झाले आहेत. त्यांपैकी भारताने 2005 व 2017 या विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली होती. मात्र दोन्ही वेळेस त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मुख्य म्हणजे गेल्या विश्वचषकात (2022) भारताला उपांत्य फेरीसुद्धा गाठता आली नव्हती.
भारताच्या सामन्यांचे वेळापत्रक असे आहे
महिलांच्या या विश्वचषक स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होत आहेत. भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज. स्पर्धेचे स्वरूप Round Robin पद्धतीचे असेल, म्हणजे प्रत्येक संघ इतर सर्व संघांविरुद्ध किमान एकदा सामना खेळेल. असे एकूण 31 सामने होणार आहे. त्यानंतर अंतिम चार संघ बाद फेरीत प्रवेश करतील आणि शेवटी 24 ऑक्टोबरला अंतिम सामन्यात विजेता ठरेल. उद्घाटनीय सामना गुवाहाटीत भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळला जाणार आहे.
संबंधित लेख वाचा: 1) ‘ट्रान्सजेंडर’ खेळाडूंना महिला क्रिकेटमध्ये संधी द्या’’... अनाया बांगरच्या या मागणीबद्दल क्रिकेट जगतात खळबळ |
भारत विरुद्ध श्रीलंका- 30 सप्टेंबर, गुवाहाटी
भारत विरुद्ध पाकिस्तान – 5 ऑक्टोबर, कोलंबो
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका – 9 ऑक्टोबर, विशाखापट्टणम
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – 12 ऑक्टोबर, विशाखापट्टणम
भारत विरुद्ध इंग्लंड – 19 ऑक्टोबर, इंदूर
भारत विरुद्ध न्यूझीलंड – 23 ऑक्टोबर, गुवाहाटी
भारत विरुद्ध बांगलादेश – 26 ऑक्टोबर, नवी मुंबई
उपांत्य सामने (29-30 ऑक्टोबर)
29 ऑक्टोबर – पहिली सेमीफायनल (गुवाहाटी/कोलंबो)
30 ऑक्टोबर – दुसरी सेमीफायनल (बेंगळुरू)
अंतिम सामना (2 नोव्हेंबर)
पाकिस्तान फायनलमध्ये पोहोचला तर – कोलंबो
पाकिस्तान फायनलमध्ये नसेल तर – बेंगळुरू
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय महिला संघाला यंदा जेतेपद मिळेल?
भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या अनुभव आणि तरुणाई यांचा उत्तम समतोल साधत आहे. फलंदाज, अष्टपैलू खेळाडू, यष्टिरक्षकआणि गोलंदाज या सर्व विभागांत कागदावर तरी सध्या भारतीय संघ मजबूत दावेदार असल्याचे दिसत आहेत. स्फोटक सलामीवीर शेफाली वर्मा यांची निवड करण्यात आली नाही. तिला बाहेर ठेवणे हा एक कठीण निर्णय आहे. तिच्या अनुभवाबद्दल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील तिच्या रेकॉर्डबद्दल शंका नाही, परंतु शेफालीचा सध्याचा फॉर्म खराब आहे. तिने ऑस्ट्रेलियामध्ये भारत अ संघासाठी तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये 52, 4 आणि 36 धावा केल्या आहेत. नीतू डेव्हिड म्हणाल्या की शेफाली संघाच्या योजनांमध्ये आहे, परंतु तिला सध्या बाहेर बसावे लागेल.
विश्वचषकासाठी भारतीय महिला संघ असा आहे
हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मानधना (उपकर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, रेणुका सिंग ठाकूर, अरुंधती रेड्डी, रिचा घोष (यष्टीरक्षक), क्रांती गौड, अमनजोत कौर, राधा यादव, श्री चरणी, यास्तिका भाटिया, राधा यादव.
भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली आहे की, तिचा संघ पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या महिला विश्वचषकात आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवू इच्छित आहे आणि संपूर्ण भारत आमच्या विश्वचषक जिंकण्याची वाट पाहत आहे. ती म्हणाली - ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून आम्हाला आमच्या तयारीची आणि आम्ही कुठे उभे आहोत याची कल्पना येईल.
फलंदाज विभागात, कर्णधार हरमनप्रीत कौर हा संघाचा आधारस्तंभ मानला जातो. संकटात संघाला वाचवण्याची तिची क्षमता आणि मधल्या फळीतील जोरदार फटकेबाजी हा संघाचा सर्वात मोठा फायदा आहे. तिच्या सोबत उपकर्णधार स्मृती मंधाना डावखुरी सलामीची फलंदाज म्हणून भारताची सर्वात विश्वासार्ह खेळाडू ठरते. वेगवान गोलंदाजांविरुद्ध तिची खास ताकद आहे.
नवोदित प्रतिका रावळ ही आक्रमक सलामीवीर म्हणून शेफाली वर्माच्या जागी चमकू शकते, तर हर्लिन देओल मधल्या फळीत स्थिरता आणत धावांचा वेग वाढवण्याची क्षमता दाखवते. याशिवाय जेमिमा रॉड्रिग्ज ही फिरकीविरुद्ध उत्तम खेळ करणारी व संकटात डाव सांभाळणारी फलंदाज म्हणून ओळखली जाते. दीप्ती शर्मा भारताची सर्वात चमकदार खेळाडू आहे. डावखुरी फलंदाजी आणि ऑफ-स्पिन गोलंदाजीमुळे ती मधल्या षटकांत संघाला नियंत्रण देऊ शकते.
अमनजोत कौर खालच्या फळीत फिनिशरची भूमिका बजावते आणि उपयुक्त वेगवान गोलंदाजी देखील करते. क्रांती गौड ही तरुणी गोलंदाजी आणि फलंदाजीत आपली उपयुक्तता सिद्ध कू शकते. तर स्नेह राणा अनुभवी ऑफ-स्पिनर असून खालच्या फळीतही विश्वासार्ह फलंदाज आहे. नव्या समावेशांपैकी श्री चारणी जोरदार फटकेबाजी आणि मध्यमगती गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. ऋचा घोष ही भारताची मुख्य यष्टिरक्षक असून आक्रमक फलंदाजी व शेवटच्या षटकांत सामना संपवण्याची तिची क्षमता विशेष मानली जाते. गोलंदाज विभागात, रेणुका ठाकूर ही भारताची मुख्य वेगवान गोलंदाज असून नवीन चेंडूवर स्विंग काढण्यात तिला विशेष प्राविण्य आहे. तिच्यासोबत अरुंधती रेड्डी विश्वसनीय मध्यमगती गोलंदाज म्हणून रेणुकाला पूरक भूमिका बजावते. फिरकी विभागात राधा यादव डावखुरी फिरकी टाकून धावा आवरणे आणि महत्त्वाच्या भागीदाऱ्या मोडणे यात पारंगत आहे.
खेळाडूंचे मानधन आणि बक्षीस रक्कम
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) महिला क्रिकेट विश्वचषक 2025 साठी बक्षीस रकमेची घोषणा केली आहे. महिलांसाठीच्या या मेगा स्पर्धेसाठी ICC ने बक्षीस रकमेत मोठी वाढ केली आहे. हा विश्वचषक 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत भारत आणि श्रीलंकेत होणार आहे. गेल्या विश्वचषकाच्या तुलनेत ICC ने यावेळी बक्षीस रकमेत 297 टक्के वाढ केली आहे.
आयसीसीने महिला विश्वचषकाची बक्षीस रक्कम 13.88 दशलक्ष डॉलर केली आहे. ती भारतीय रुपयांमध्ये 122 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी हा निर्णय घेऊन महिला क्रिकेटला एका वेगळ्याच उंचीवर नेले आहे. महिला वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघासाठी 4.48 दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. ते भारतीय रुपयांमध्ये तब्बल 40 कोटी रुपये आहे. तर, अंतिम सामन्यांमध्ये हरणाऱ्या संघाला 2.24 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 20 कोटी रुपये मिळतील.
उपांत्य फेरीमध्ये पोहोचणाऱ्या संघाला सुमारे 10 कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. ग्रुप स्टेजमध्ये एक सामना जिंकणाऱ्या संघाला 34 हजार डॉलर्स म्हणजेच 30.19 लाख रुपये मिळणार आहेत. याशिवाय, पाचव्या आणि सहाव्या स्थानावर असलेल्या संघाला 62 लाखांचे बक्षीस मिळणार आहे. सातव्या आणि आठव्या क्रमांकावर असलेल्या संघाला 24 लाख रुपये मिळणार आहेत. एखादा संघ सामना जिंकला किंवा नाही, तरी प्रत्येक संघाला किमान 22 लाख रुपये देण्याची घोषणा आयसीसीने केली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, पुरुष 2023 वनडे विश्वचषकाची बक्षीस रक्कम 10 दशलक्ष डॉलर्स होती, जी भारतीय रुपयांमध्ये सुमारे 88.29 कोटी रुपये होती.
भारताला प्रमुख आव्हान देणारे संघ
भारतीय महिला क्रिकेट संघ या विश्वचषकात बलाढ्य आणि संतुलित मानला जात असला तरी काही संघ त्यांना मोठे आव्हान ठरू शकतात. ऑस्ट्रेलिया महिला संघ हा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी ठरेल. त्यांच्याकडे अॅशली गार्डनर, बेथ मनी, एलिस पेरीसारख्या अनुभवी ऑल राऊंडर खेळाडू आहेत. इंग्लंड महिला संघ हा अजून एक बलाढ्य प्रतिस्पर्धी आहे. नॅट स्कीव्हर-ब्रंट, सोफी एक्लस्टोन आणि हेदर नाईटसारख्या खेळाडूंचा अनुभव त्यांच्याकडे आहे. स्पिन व वेगवान गोलंदाजीतील विविधता इंग्लंडला उपखंडीय परिस्थितीतही जुळवून घेण्यास मदत करते.
दक्षिण आफ्रिका महिला संघ त्यांच्या मजबूत वेगवान गोलंदाजीमुळे (शब्नम इस्माईल, मरिझान कॅपसारखे खेळाडू) भारताला मोठा दबाव देऊ शकतो. याशिवाय न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज हे संघ त्यांच्या स्फोटक फलंदाजीमुळे कधीही सामन्याचे चित्र बदलू शकतात. त्यामुळे भारतीय संघाकडे अनुभव, संतुलन आणि घरचा फायदा असला तरी, विश्वचषक जिंकण्यासाठी त्यांना ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या संघांविरुद्ध सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागणार आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याकडे लक्ष
भारताच्या सामन्यांच्या वेळापत्रकानुसार सर्वाधिक चर्चेत असलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची तारीख देखील समाविष्ट आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये हवाई हल्ला केला. दोन्ही देशांमधील संबंध आणखी बिघडले. यानंतर, भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघ एकमेकांसमोर येण्याची ही पहिलीच वेळ असेल. भारतीय महिला क्रिकेट संघ आणि पाकिस्तान महिला क्रिकेट संघ यांच्यातील हा विश्वचषक सामना 5 ऑक्टोबर रोजी खेळला जाईल.
श्रीलंकेत सर्व पाकिस्तान सामने हायब्रिड मॉडेलवर खेळवले जातील. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) यांच्यातील हायब्रिड करारानुसार, पाकिस्तान त्यांचे सर्व सामने कोलंबोमध्ये खेळेल. यामध्ये बांगलादेश (2 ऑक्टोबर), इंग्लंड (15 ऑक्टोबर), न्यूझीलंड (18 ऑक्टोबर), दक्षिण आफ्रिका (21 ऑक्टोबर) आणि श्रीलंका (24 ऑक्टोबर) विरुद्धचे सामने समाविष्ट आहेत.






